तंत्रज्ञानाच्या मदतीने मनुष्य दिवसेंदिवस नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करीत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने उपलब्ध असलेल्या डेटाचं विश्लेषण करुन भविष्यात त्या माहितीच्या स्त्रोताची वागणूक कशी असेल याविषयी अनुमान मानण्याचं बांधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आणि ह्या प्रयत्नाला काही अंशी यशसुद्धा मिळत आहे. त्याचप्रमाणे एकंदरीत मनुष्याच्या सोशल मीडियावरील वागणुकीवरून त्याच्या वर्तणुकीविषयी तर्क काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व प्रकारात मनुष्याचं वागणं हे एका विशिष्ट साचेबंद पद्धतीतून वर्तवता येईल हे एक मोठे गृहीतक आहे.
आता ह्या गृहीतकाची अचूकता आपल्याला पडताळून पाहायची असेल तर एक मनोरंजक अभ्यास करता येईल. पूर्वी मुलं वेगवेगळ्या गावांमध्ये शिकायची आणि हे शिक्षण मातृभाषेतून दिलं जायचं. शिक्षकांच्या किमान पात्रतेविषयी काही मार्गदर्शक तत्व असली तरी त्याविषयी फारसा आग्रह धरला जात असेल अस मला वाटत नाही. शिक्षक सुद्धा आपल्या स्वभावात वैविध्य बाळगुन असायचे. त्यामुळे एकंदरीत व्हायचं काय की ज्या प्रकारे मुलं शिक्षण घ्यायची त्यामध्ये भरपुर वैविध्य असायचं. आणि त्यामुळं शालेय जीवन संपेपर्यंत वेगवेगळी व्यक्तिमत्वे विकसित व्हायची.
सद्यकाळी असं घडू लागलं आहे की मुल जन्मल्यापासून आपण त्याच्या भोवतालचे घटक साचेबंद करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि त्यामुळे भविष्यातील मनुष्याचं वागणं आणि विचारपद्धती ह्यांच्यात खरोखरच एक प्रकारची साचेबद्धता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित ज्या काही प्रणाली असतील त्यांच्या यशाची शक्यता वाढीस लागली आहे असं आपल्याला आढळून येईल. आता दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा झाला तर भविष्यात या साचेबद्धतेच्या पलीकडे जी माणसे विचार करू शकतील त्यांचं महत्व वाढीस लागेल. आणि जर त्यांच्या विचारामध्ये खरोखरच शुद्धता असेल तर त्यांना खरोखरच महत्त्व प्राप्त होईल. आणि त्यामुळेच सर्वांनी सरसकट स्टिरीओटाईप जीवनपद्धतीच्या मागे लागणे चुकीचे आहे.
हे सर्व सुचायचं कारण की गेल्या रविवारी पाहिलेला संताप सिनेमा राझी. खरंतर हा पिक्चर मी पाहिला सुद्धा नसता परंतु एका अग्रगण्य मराठी वर्तमानपत्रातील या चित्रपटाचे परिक्षण वाचून मी हा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला. आता हल्ली झालंय कसं ते पहा!! जेव्हा केव्हा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळी त्या चित्रपटाचे आघाडीचे कलाकार तथाकथित लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये किंवा शोमध्ये येऊन आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करीत असतात. त्याच प्रमाणे ह्या चित्रपटाचे मीडिया पार्टनर असणारे रेडिओ स्टेशन, वर्तमानपत्र हे सर्व संभाव्य प्रेक्षकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करीत असतात. या सर्व लोकांचं लक्ष्य असते ते खूप खोलवर विचार न करणारा समाजातील वर्ग. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ज्या काही प्रणाली विकसित होत आहेत त्या सर्वांचे सर्वात मोठे गृहीतक म्हणजे हे सर्वजण निकालांची 100% अचूकता देण्याचं कबूल करत नाहीत. याचाच अर्थ असा होतो की समाजातील जो काही सरसकट पद्धतीने विचार करणारा वर्ग आहे, तोच वर्ग ह्या सर्व प्रणालींचे लक्ष्य असणार आहे.
यंत्रमानव एक तर बाह्यशक्तीद्वारे आपल्यावर लादले जाऊ शकतात किंवा आपल्यातील काही जणांचे यंत्रमानवांत रुपांतर केले जाईल !!
आपल्या वागण्यामुळे आपल्या भविष्याविषयी कोणाला तर्क बांधता येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या वागण्यामधे काहीतरी ओरिजिनॅलिटी ठेवण्याचा प्रयत्न करा हेच या पोस्टचे सांगणे!! आणि काहीसे विवादास्पद विधान म्हणजे मातृभाषेतील शाळा, गावातील बालपण मुलांची ओरिजिनॅलिटी कायम ठेवण्यास मदत करतात !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा