सकाळी बऱ्यापैकी आराम केल्यानंतर आम्ही दुपारी तीन वाजताच्या सुमारास बाहेर पडलो. आजचा कार्यक्रम होता कनकादित्य आणि महाकाली मंदिराचे दर्शन. कनकादित्य मंदिर गणेशगुळेपासून साधारण २० किमी अंतरावर आहे. दुपारी तीन वाजता भर उन्हात बाहेर पडणे हे काहीसं कठीण काम होतं.
एकंदरीत प्रवास हा अत्यंत नैसर्गिक भागातून होत होता. पुर्णपणे निर्मनुष्य असा रस्ता होता. अशा भागामध्ये एखादं वाहन बंद पडलं तर कसला दुर्धर प्रसंग उद्भवत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. आमचा ड्रायव्हर आज चांगल्या मुडमध्ये होता. त्यानं बरीच माहिती आम्हांला दिली. पावसाळ्यामध्ये इथं तीन चार दिवस संततधार लागू शकते आणि लोकांना घराबाहेर पडणार देखील अशक्य होतं. त्याचप्रमाणे अशा दुर्गम भागापर्यंत बाहेरील लोकांना सहजासहजी पोहोचणे पावसाळ्यात शक्य होत नसल्यामुळे समजा जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर इथल्या नागरिकांवर बरेच दिवस विद्युत पुरवठ्याशिवाय रहाण्याची वेळ येते. एखाद्या नैसर्गिक समृद्धीने नटलेल्या भागात चार-पाच दिवस पर्यटक म्हणून जाणे आणि त्याच भागात कायमचं वास्तव्य करून राहणे यात जमीन-अस्मानाचा फरक असतो याची जाणीव या प्रवासात बऱ्याच वेळा होत होती. तुमचं मन दिलेल्या परिस्थितीत कशाप्रकारे समाधानाने राहू शकते ह्याबाबत तुमची जी क्षमता आहे ती फार महत्त्वाची आहे. जर अशी क्षमता तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा भागात किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीत शांतपणे राहू शकता. उगाच भोवतालच्या परिस्थितीचा दोष देण्यात काही अर्थ नसतो.
साधारणतः तीस-चाळीस मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही कनकादित्य मंदीरापाशी येऊन पोहोचलो. संपूर्ण भारतात सूर्याची फार थोडी मंदिरे आहेत त्यापैकी हे एक अत्यंत प्राचीन असे मंदिर आहे. साधारणतः हजार वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी अशी दंतकथा आहे.
या मंदिराच्या स्थापनेविषयी एक आख्यायिका इथं मंदिराच्या आवारात लिखित स्वरुपात उपलब्ध होती. एक नावाडी ही मूर्ती घेऊन समुद्रमार्गे दुस-या ठिकाणी जात होता. परंतु या ठिकाणावर आल्यावर त्याची नौका ना पुढे जाईना, ना मागे!! त्यामुळे या देवतेला तिथेच कायमस्वरूपी वास्तव्य करायचं आहे हे त्या नावाड्याने ओळखलं आणि मग भक्तिभावाने या मंदिराची स्थापना करण्यात आली.
या मंदिराच्या आवाराचे सुशोभिकरण करण्यात येत होते. मंदिरात भाविकांनी प्रवेश करण्याआधी आपले हात पाय धुवावेत यासाठी विहिरीतून पाणी काढण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची शास्त्रीय संरचना करण्यात आली होती.
कनकादित्य मंदिराच्या दर्शनानंतर आम्ही महाकाली देवीच्या दर्शनासाठी निघालो. या मंदिराला आम्ही आमच्या मागच्या कोकणभेटीत सुद्धा भेट दिली होती. या मंदिराच्या परिसरात एकंदरीत ५ देवतांची मंदिरे आहेत आणि कोणत्या क्रमाने त्यांचं दर्शन घेत घ्यावं याची सूचनादेखील मंदिराच्या आवारात देण्यात आली आहे. सर्व देवतांची दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराचा कळस पहावा अशी जी समजूत आहे त्याचं स्मरण मला करून देण्यात आलं.
महाकाली देवीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही चहापान केलं. याच हॉटेलमध्ये दोन वर्षांपूर्वी आम्ही आमचं दुपारचं भोजन केलं होतं. चहापानानंतर आम्ही निरूळ या गावाकडे प्रस्थान प्रस्थान केले. हे गावसुद्धा अत्यंत दुर्गम भागात आहे. एकंदरीत तीस-चाळीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही तिथं पोहोचलो. इथं शंकराचं एक सुंदर मंदिर आहे. त्याला सांब मंदिर असे म्हणतात असं पुसटसं आठवतं. या मंदिराकडे पोचण्यासाठी एक काहीसा कमजोर असा लोखंडी पूल आहे. या पुलावरून चालताना आवाज होतो आणि मध्यावर तर अधिकच होतो. परंतु त्याला न घाबरता आपल्याला पुढे जायचं असतं. मंदिरात देवाचं दर्शन घेतल्यानंतर पुढं नैसर्गिक पाण्याचा प्रभाव आहे तिथं आपण पाय सोडवून बसायचं असतं आपण तिथे बसलो आणि स्थिर झालो की पाण्यातील मासे आपल्या पायाभोवती गर्दी करतात आणि आपल्या पायावरील मृत पेशी खातात. अशाप्रकारे एक नैसर्गिक पॅडीक्यूअर आपोआप होतं. मला तर एक दोन माशांनी चावल्याची भावना निर्माण झाल्यानं मी त्यांच्याकडं संशयानं पाहत होतो.
हा परिसर अत्यंत नैसर्गिक उपाय रुपामध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे. मंदिराच्या परिसरात काही अधिक उंचीवर तीन-चार घरे आहेत. तिथे पुजारी राहात असतात. पुजाऱ्याच्या घरातील एक मुलगा आम्हाला भेटला. पावसाळ्यात सुद्धा ही मुले इतक्या दुर्गम भागात कशी काय ये जा करत असतील हा विचार आमच्या मनाला शिवुन गेला. मी पाण्यात पाय सोडुन बसलो असता काढलेला एक फोटो.
हा फोटो फेसबुकवर टाकला असता वसईतील नामवंत कवी मार्टिन यांनी एकदम मला संत पुरुषांच्या पंक्तीत बसवून सोडलो!
Martin Gabriel Sequeira झांकळुनी जल गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला "औदुंबर "......
पाय टाकुनी जळात बसला असला "औदुंबर "......
त्यामुळे मी धन्य झालो! धन्यवाद मार्टिन!!
सायंकाळी हॉटेलात परतल्यावर पुन्हा आम्ही शेजारच्या शेतात गेलो आणि ताजी भेंडी घेऊन आलो. रिसॉर्टचा खानसामा अत्यंत अचंबित झाला होता. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला ताजी भाजी आणून देऊन त्याचा स्वयंपाक करुन देण्याची विनंती करणारे पाहुणे त्याला प्रथमच भेटले होते हे त्याच्या मुद्रेवरुन स्पष्ट होत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा गणेशगुळे येथील एका रम्य सकाळचा अनुभव घेऊन आणि त्याच्या स्मृती मनात साठवून आम्ही या ठिकाणाचा निरोप घेतला. हे ठिकाण मला अजून एका कारणामुळे आवडलं. इथं मोबाईलची रेंज येत नव्हती त्यामुळे बाह्यजगताशी संपर्क फुटला होता तुटला होता. परंतु हॉटेलवाल्यांनी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध केल्यामुळे आम्ही विचलित होत होतो. गणेशगुळेपासून निघाल्यानंतर थोड्यावेळातच मोबाईलची रेंज उपलब्ध झाली आणि त्यामुळं घरी फोन लावणं शक्य झालं.
यापुढील आमचं ठिकाण ते म्हणजे रत्नागिरी येथील भगवती देवीचं मंदिर. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर मनात खास समाधानाची भावना निर्माण झाली. मंदिरातील मूर्ती आणि मंदिरातील शिल्पकला अतिशय सुंदर आहे.
कोकण दौर्यात विविध मंदिरातील सुंदर मूर्ती पाहून त्यांचा फोटो काढण्याचा मोह अनावर होता. परंतु एकंदरीत या मंदिरांचे आणि तेथील देवतांचे पावित्र्य कायम राखण्यासाठी त्यांचे फोटो न घेऊन देण्याचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. तरीही काही बाह्य परिसराचे फोटो मी घेतले.
रत्नागिरीला माझा शालेय मित्र प्रसाद मांजरेकर राहतो. त्याने वसईहून रत्नागिरीला काही वर्षांपूर्वी स्थलांतर केलं होते. मला भेटण्यासाठी तो भगवती मंदिरात आला. या मंदिराच्या नूतनीकरणासाठी त्याच्या आजोबांनी मोठाच हातभार लावला होता. प्रसादसह आम्ही सर्वांनी मंदिराच्या भोवतालच्या परिसराचा फेरफटका मारला. या परिसरातून रत्नागिरी बंदराचे अत्यंत नयनरम्य असे दृश्य दिसते. ह्या बंदरात एक ब्रेकवॉटर जेटीसुद्धा आहे. समुद्राच्या लाटा वेगानं समुद्रकिनाऱ्याला आदळून समुद्र किनाऱ्याची झीज होऊ नये यासाठी अशा जेटी उभारल्या जातात. प्रसाद आणि त्याचा मुलगा या समुद्रात नित्यनेमाने पोहण्याचा सराव करतात अशी माहिती त्यांनी दिली.
त्यानंतर प्रसादचा निरोप घेऊन आम्ही लोकमान्य टिळक यांनी आपल्या आयुष्याची सुरुवातीची 10 वर्षे ज्या वाड्यामध्ये घालवलीत त्या वाड्याला
आम्ही भेट दिली. इतक्या आदरणीय युगपुरुषाने ज्या वास्तूत वास्तव्य केलं तिथे आपण सुद्धा आलो आहोत या भावनेनं अभिमानानं ऊर भरून आला. या वाड्यामध्ये लोकमान्य टिळकांची वंशावळ ठळक स्वरूपात नमूद करण्यात आली आहे आणि त्यांच्या जन्म वेळी असणारे ग्रहांची स्थिती देखील मांडण्यात आली आहे. लोकमान्य टिळक अत्यंत विद्वान होते आणि त्यांच्या विद्वत्तेचे दाखले देणारे काही संदर्भ सुद्धा नजरेस पडले. नक्कीच कोकण भेटीतील हा एक अविस्मरणीय क्षण म्हणता येईल !
त्यानंतर आम्ही जवळच असलेल्या रत्नागिरी मत्सालयाकडे गेलो. इथं कॉलेजच्या मुलामुलींची खूप गर्दी पाहून हे सर्व मत्सालय पाण्यासाठी आले असावेत असा आमचा ग्रह झाला. परंतु थोड्याच वेळात फोटो काढण्यासाठी त्यांनी ही गर्दी केली होती हे लक्षात आले. आपली ही नवीन पिढी कुठे चालली आहे हे देवच जाणे !
बाकी मत्सालय खूप सुंदर होते. यात विविध प्रकारचे मासे होते. या माशांची ही सुंदर छायाचित्रे!!
माशांच्या बाबतीत म्हणजे त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत तज्ञ नसल्याने मी आवड यावर फारसे भाष्य करत नाही तसं खाण्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तरीसुद्धा केवळ मोजक्या जातीच मला माहित आहेत. मत्स्यालयानंतर त्यांचं माशांचं म्युझियम सुद्धा होतं त्याला आम्ही भेट दिली. तिथं मृतावस्थेतील मासे अथवा त्यांची सांगाडे जतन करून ठेवण्यातआले आहेत.
(क्रमशः)
मस्त, वाचून कोकणात जायचा मोह झालाय
उत्तर द्याहटवा