मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १ एप्रिल, २०१८

कोकण २०१८ - भाग २


The Blue View हॉटेल एकंदरीत चांगलं असलं तरी रात्रभर तिथं थांबलेल्या पाहुण्यांनी बराच आवाज केला आणि आमच्या झोपेचं खोबरं केलं. सकाळी हॉटेलच्या खानसाम्याने बनवलेला उपम्याचा नाष्टा आणि चहा पिऊन आम्ही या हॉटेलचा निरोप घेतला. या हॉटेलच्या व्यवस्थापकाकडे रात्रीच्या गोंधळाविषयी तक्रार नोंदवली असता त्याची प्रतिक्रिया फारशी सकारात्मक नव्हती. 

आता आमची खरी कोकण सहल सुरू होणार होती. आज प्रथम आमचं आगमन पावस येथील स्वरूपानंद महाराजांच्या आश्रमाच्या ठिकाणी झालं. पावस एक मनोरंजक अशी घटना घडली. तिथं एक एसटी बस , ट्रॅक्‍टर आणि आमच्या पुढे असलेली एक मोटार गाडी यांच्यामध्ये ट्रॅफिक जॅम झाला. एसटीचा ड्रायव्हर आणि मोटार गाडीचा ड्रायव्हर हे दोघेही नमतं घेण्यासाठी तयार नव्हते आणि त्यामुळं आश्रमाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अडला गेला होता. त्यामुळे आम्हाला तो रस्ता सोडून दुसऱ्या मार्गाने जावं लागलं. त्या पर्यायी रस्त्याने गेल्यावर आम्ही थेट आश्रमापर्यंत पोहोचू शकलो नाही. 

तिथून थोडी वाटचाल करीत आम्ही एकदाचे आश्रमात पोचलो. या आश्रमाचे वातावरण अत्यंत पवित्र आहे.  माझे काका नरेंद्र पाटील स्वरूपानंदांचे परमभक्त आहेत. 

आम्ही प्रथम स्वरूपानंदांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. तेथील तीर्थप्रसाद घेतला. इथलं तीर्थ हे आमरसाच्या स्वादाच्या रूपात होते. दर्शन घेतल्यानंतर तिथं असलेल्या ज्ञानेश्वरीमधील कोणताही एक पान उघडून आपण वाचू शकतो. त्या पानात आपल्याला बोध घेण्यासाठी खास असा संदेश असतो अशी समजूत आहे. त्याच प्रमाणात माझ्या काकांनी सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ध्यान करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. आम्ही तेथील सिक्युरिटी गार्ड आणि पुजारी ह्यांची परवानगी घेऊन मंदिराच्या आतल्या भागात ध्यानासाठी गेलो.  तेथील वातावरण अत्यंत शांत आणि मनाला विचार करणारे आहे. मला खरंतर ध्यान करण्याची सवय नाही. पण मागच्या कोकण दौर्‍यात मी इथं 
ध्यान केलं होतं. त्या अनुभवाच्या जोरावर यावेळी सुद्धा मी ध्यान करण्याचा प्रयत्न केला. पण ध्यान करणे ही काही सोपी गोष्ट नव्हे याची प्रचिती यावेळी मला आली. आपल्या मनांत कोणतेही विचार येऊ न देता शांत बसुन राहणं म्हणजेच खरं ध्यान असं म्हटलं जातं किंवा माझी समजूत आहे परंतु तिथं बराच काळ माझ्या मनातील विचारांना मी थोपवू शकत नव्हतो. पण त्यानंतर मात्र थोडसं नियंत्रण मिळवता आलं. जे कोणी खरोखर ध्यान असतात त्यांच्याशी चर्चा करून हे तंत्र अवगत करता यायला हवा असं मला मनोमन वाटून गेलं. आपला जो श्वास आहे त्यावर लक्ष केंद्रित करावं असं असा सल्ला मला एका तज्ज्ञ व्यक्तीनं दिला. अर्धा तास संपला आणि आम्ही वर आलो. काही धार्मिक पुस्तकांची खरेदी करून आम्ही आश्रमाच्या बाहेर पडलो. आश्रमाबाहेर भक्तांसाठी उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोकम सरबत, आंबा पन्हे यांची सोय ही त्यातलीच एक सुविधा. आंबा पन्ह्याचा आस्वाद घेऊन आम्ही मंदिराबाहेर बाहेर पडलो. आश्रमाबाहेरच देसाई यांचं कोकणातील विविध वस्तुंची विक्री करण्याचे  दुकान आहे.  तिथं आंबापोळी, फणसपोळी आणि इतर स्थानिक वस्तूंची खरेदी करून आम्ही या आश्रमाच्या पवित्र परिसरातून निघालो. 

इथं एक आंबा विक्रेत्याशीसुद्धा आमची भेट झाली. सहजच म्हणून त्याला आंब्याचा भाव विचारला असता त्यानं बाराशे रुपये डझन असा भाव सांगुन आमच्या उत्साहावर पाणी फेरलं. यंदाच्या वर्षी कोकणात आंब्याच्या काही खरं नाही हेच खरं, पहिला बहर डिसेंबरातील पावसानं म्हणावा तसा हाती आला नाही आणि दुसर्‍याची अजूनही काही खात्री नाही असं जाणवलं. 

यापुढील थांबा होता तो गणेशगुळे येथीलगणपतीचं एक साधासुधा परंतु अत्यंत मनोहारी असे हे मंदिर. हे मंदिर डोंगराच्या एका बाजूला उभारण्यात आलं आहे. 

गणपतीपुळे येथील गणपती गणेशगुळे इथूनच नेण्यात आला अशी आख्यायिका आहे. गणेशाचे दर्शन घेऊन डोंगराच्या उतारावर वसलेल्या आंब्याच्या आणि पोफळीच्या बागांच्या मनोहारी दृश्य पाहुन आमच्या डोळ्याचे पारणे मिटलं . 




गणेशगुळे ह्या मंदिराचा भोवतालचा प्रदेश अत्यंत रखरखीत आहे. अशा या रखरखीत भागात मार्च महिन्यात सुद्धा आमची गाडी अतिशय तापत होती. आणि या गाडीमध्ये उन्हाळा त्रासदायक होत होतं तरीदेखील त्याचा मुकाबला करीत आम्ही आमच्या दुसऱ्या हॉटेलच्या दिशेने म्हणजेच Oceano Pearl च्या दिशेने निघालो. प्रथमदर्शनीच ह्या गावाच्या प्रेमात मी पडलो आधुनिकतेचा अजिबात स्पर्श न झालेलं हे गाव आहे. 
ह्या गावात प्रवेश केल्यावर इथं काळ साधारणतः एकोणिसाव्या शतकातच थांबून राहिला का काय अशी भावना निर्माण होते. अत्यंत साधी घरं, घराच्या आजूबाजूला असणारे गाई गुरांचे गोठे आणि त्याच्या पलीकडे असणारे छोटी छोटी शेती असा हा गाव पाहून कोणीही त्याच्या प्रेमातच पडेल. आमचं रिसॉर्ट अशाच या रम्य निसर्गरम्य परिसरात वसलं होतं रिसॉर्टच्या समोर गावातून जाणारा रस्ता आणि मागच्या बाजूला नारळाची मोठी बाग आणि त्याच्या पलीकडे समुद्रराया असा हा सुंदर परिसर होता. 


हॉटेलच्या रूमवर स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही जेवणासाठी हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये किंवा डायनिंग एरिया मध्ये गेलो. 

आता इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आपण ज्यावेळी मोठाल्या हॉटेल्समध्ये बुकिंग करतो आणि त्यामध्ये ज्यावेळी जेवण समाविष्ट असतं त्यावेळी आपणास खाद्यपदार्थांचे भरपूर पर्याय उपलब्ध होत असतात परंतु ज्यावेळी आपण लंचचा खर्च वेगळा ठेवतो त्यावेळी मात्र आपल्याला मोजक्या स्वरूपात थोडेच पर्याय उपलब्ध होतात, सर्व काही मोजुन मापून दिलं जातं.  

मत्स्याहाराच्या बाबतीत आमच्या समजुतीच्या पूर्णपणे उलट असा अनुभव यावेळच्या कोकण दौऱ्यात आम्हांला आला. माशांचे भाव अव्वाच्या सव्वा होते. उदाहरण द्यायचं झालं तर एक सरंगा पाच जणांत वाटुन बनल्या जाणाऱ्या नॉन व्हेज प्लेटचा दर साधारणतः तीनशे - साडेतीनशे रुपयाच्या घरात जात होता. 

बाकी भाज्या आणि वरणभात ह्यांची प्रत खानसाम्यानं चांगल्याप्रकारे टिकवली होती. भोजन आटपून आम्ही आजूबाजूच्या मोकळ्या भागात फेरफटका मारला. नारळाच्या झाडांना बांधलेले झुले अर्थात hammock हे सुद्धा होते. सुरुवात तरी त्यावर केवळ बसून केली.  दुपारी एक चांगली डुलकी घेऊन, चहाचा आस्वाद घेऊन आम्ही समुद्रकिनाऱ्याच्या  दिशेने निघालो. या समुद्रकिनाऱ्यावर केवळ पाच-सहा लोक होते आणि हा अत्यंत सुंदर शुभ्र वाळूने आच्छादलेला असा हा समुद्रकिनारा होता. ही वाळू अत्यंत मऊ असल्याने त्यावर चेंडू उडत नव्हता आणि क्रिकेट खेळण्याची आमची मनिषा  पूर्ण होऊ शकली नाही.  तरीदेखील निराश न होता आम्ही समुद्राच्या लाटांबरोबर मनसोक्त विहार केला आणि समुद्रकिनाऱ्याचे भरपूर फोटो काढले. 


 





त्यानंतर आम्ही रात्रीच्या जेवणासाठी परतलो इथे आजूबाजूला शेतांमध्ये हव्या तितक्या हिरव्या भाज्या असूनदेखील स्वयंपाकी लोक त्यांचा स्वयंपाकात वापर करत नव्हते. ही गोष्ट आम्हाला फारशी रुचली नाही प्राजक्ताने त्यांच्याशी काही चर्चा केली आणि मनात काही बेत आखूनच ती झोपी गेली. 

एका अत्यंत विरळ लोकवस्तीच्या भागातील सकाळ अनुभवायला हवी तरी ह्या गावात यायला हवं. अनेक प्रकारचे पक्षी आपल्या वैविध्यपुर्ण आवाजांनी वातावरणात प्रसन्नता आणत होते. गावातील शेतकरी भल्यापहाटे आपल्या शेतात कामास लागले होते. 













आम्ही क्रिकेट खेळत असताना सुस्मितताई आणि प्राजक्ता प्रथम शेतांचा फेरफटका मारुन आले. त्यानंतर मी आणि प्राजक्ता पुन्हा परिसराचा फेरफटका मारण्यास निघालो. तिथल्या शेतात भेंडी, चवळी, वांगी, कोबी वगैरे ताज्या भाज्या होत्या. सुकविलेल्या भाताच्या पेंढ्याच्या राशी नेटक्या रचुन ठेवल्या होत्या. तुरळकपणे झाडांना लटकलेले आंबे आम्हांला खुणावत होते. अशाच एका शेतातील काम करणाऱ्या महिलेकडून आम्ही चवळीच्या तीन जुड्या घेतल्या आणि आज हिरवी भाजी खायला मिळणार ह्याचा आनंद व्यक्त करीत हॉटेलात परतलो. 

(क्रमशः)
तळटीप - कोकण शृंखलेतील पोस्टचा बहुतांशी भाग मी बोलुन व्हाट्सअँप / गुगल ह्या द्वयीकडून लिहुन घेत आहे. त्यामुळं शुद्धलेखनाच्या चुका माझ्या प्रूफ रिडींगनंतर देखील बाकी राहिल्यास तज्ञांची माफी असावी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...