मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १ एप्रिल, २०१८

कोकण २०१८ - भाग १




24 मार्च 2018
कोकण सहलीचा आजचा हा आमचा पहिला दिवस. भल्या पहाटे साडेचार वाजता उठून आम्ही तयारीस लागलो. नेहमीप्रमाणे मी सर्वांच्या मागे तगादा लावुन सहा वाजता तयार होण्यास हातभार लावला. आगगाडीने दीर्घ पल्ल्याचा प्रवास करण्याची आमची ही पहिलीच वेळ. त्यामुळे आम्ही अधिक सावध होतो. दादर रेल्वे स्थानकामध्ये पोहोचण्यासाठी टॅक्सी बुक करायची की ट्रेनने जायचे याविषयी आमची द्विधा मनःस्थिती होती. शेवटी पक्क्या मुंबईकरांच्या विचारसरणीनुसार आम्ही लोकल ट्रेन जायचा निर्णय घेतला. सव्वासहा वाजताची बोरिवलीहून सुटणारी लोकल ट्रेन पकडली.  कूर्मगतीने जाणारी लोकल ट्रेन पाहून आपण बोरिवलीहून सुटणारी जलद ट्रेन पकडायला हवी होती असा विचार मनात आला. परंतु अंधेरीनंतर लोकल ट्रेनने बऱ्यापैकी जलद वेगाने पुढील स्थानकांचा प्रवास पार पाडला आणि आम्ही 7:15 वाजताच्या सुमारास दादर स्थानकात पोहोचलो. पश्चिम रेल्वेच्या फलाटावरून मध्य रेल्वेकडे जाण्यासाठी एका हमालानेआम्हांस मदत केली. एकंदरीत त्यानं 50 रुपये भाडं आकारलं. परंतु आम्ही त्याला त्याला काहीशी जास्त रक्कम देऊ केली. आमचं बुकिंग मांडवी एक्सप्रेसचे होतं आणि वातानुकूलित ३ स्लीपर कोचने आम्ही प्रवास केला. 

पहिल्यांदाच अशा प्रकारच्या मांडणीनुसार प्रवास करण्याची आमची वेळ असल्याने आम्ही काहीसे गोंधळलो होतो. बसताना एकमेकांनी बाजूला बसायचं परंतु ज्यावेळी झोपायची वेळ येते त्यावेळी या तीन सीट्सचे  झोपण्याच्या 3 आसनांमध्ये परिवर्तन होतं. आमच्यासोबत खरंतर एका दुसऱ्या माणसाचा नंबर होता, परंतु तो एका मोठ्या गटाचा सदस्य असल्याने त्यांनी आपल्या आसनांची आदलाबदली करुन एका वयस्क महिलेला आमच्यासोबत पाठवले.  तिनं काही वेळातच मला आता झोपायचं आहे असा अट्टाहास धरला. त्यामुळं काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी आम्ही तिचं म्हणणं मान्य करून तिला झोपण्यासाठी तिची बर्थ देऊन टाकली. वाट्याला आलेल्या वरच्या बर्थवर कसं चढायचं  याविषयी सोहम प्रथम साशंक होता.  परंतु एकदा का त्याने वरती चढण्याचं तंत्र आत्मसात केलं आणि त्यानंतर तो वरतीच स्थिरस्थावर झाला. तिथं त्यानं आपलं बस्तान बसवलं. तिथेच त्यानं आपला नाश्ता, दुपारचे जेवण आणि संदीपभाईसोबत पत्ते खेळणे हे कार्यक्रम पार पाडले. 

मांडवी एक्स्प्रेस मध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाणाऱ्या फेरीवाल्यांची सतत वर्दळ सुरू असते. वरच्या सीटवर बसलेल्या सोहमला या खाद्यपदार्थांचा एक आकर्षक नजारा मिळत असल्यामुळे तो त्याकडे आकर्षित होत होता. परंतु त्याने मोठ्या कसोशीने आपल्या मनावर ताबा ठेवला होता.  काही वेळातच तिकीट चेकर अर्थात TC यांचं आगमन झालं. त्यांच्याकडे आज प्रत्येक आसनावर कोणी बुकिंग केलं आहे याची यादी होती. त्या बुकिंग केलेल्या माणसाकडे photo identity मागून ते शहानिशा करीत होते. या महाशयांकडे खूप अधिकार असतात आणि ते विविध दर्जाच्या आसनांत फेरफार ऑन द स्पॉट करू शकतात. आमच्यासमोर अशा बरेच अपग्रेड केलेल्या प्रवाशांच्या आसनांची यादी आम्हास पहावयास मिळाली.  खरंतर अशा ट्रेनमधून प्रवास हा प्रवेश करतानाच तुमचं तिकीट तपासण्याची सोय करण्यात यायला हवी. 

कोकण रेल्वे हा भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा एक उत्तम नमुना मानण्यास हरकत नाही मार्ग मार्ग केवळ एकेरी लाईन आहे
परंतु विविध स्टेशनांवर स्थानकांवर उभारलेल्या उभारलेल्या फलाटांवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीला काढून महत्त्वाच्या गाड्यांना प्राधान्यक्रम दिला जातो अशाप्रकारे अत्यंत किचकट असं असंख्य गाड्यांचे वेळापत्रक मोठ्या कौशल्याने हाताळला जातो पण अभियांत्रिकीची खरी झलक आपल्याला या प्रवासात येणाऱ्या अनुभवातून येते. हे असंख्य बोगदे या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कसे उभारले असतील असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. 
http://konkanrailway.com/ ह्या संकेतस्थळावर सर्व गाड्यांचं वेळापत्रक, त्यांचं प्रत्यक्ष स्थान वगैरे आपण पाहू शकतो. हे स्थळ दर तीन मिनिटाला अद्ययावत माहितीने अपडेट केलं जातं. 
मुंबईतील मध्यरेल्वेची सर्व स्थानक सोडल्यानंतर साधारणता पनवेलच्या नंतर आता गावाकडील भाग सुरु झाला होता. आमची गाडीसुद्धा अशीच सायडिंगला काढली जात होती.  वीर स्थानकावर काढलेलं हे छायाचित्र!!






 असंख्य बोगद्यांमधून प्रवास करताना एयरटेल नेटवर्क नाहीसे होत होते आणि आम्ही बाहेर येताच पुन्हा नेटवर्क रजिस्टर होत होते आणि पुन्हा तोवर नवीन बोगदा येत होता. अशाप्रकारे रजिस्टर आणि डी-रजिस्टर हा खेळ सुरू होता. दूर पल्ल्याच्या गाड्यांमध्ये उपलब्ध असलेल्या खानपान सेवेविषयी आम्ही काहीसे साशंक होतो. त्यामुळे महिला वर्गाने आपल्या परीनं बनविलेला शिरा आणि पुलाव असा वर्षभर अतिपरिचित झालेला मेनू आमच्यासमोर ठेवला. आम्हीसुद्धा काहीही तक्रार न करता आनंदाने केला. सायडिंगला काढण्याचा आणि पुन्हा मुख्य मार्गावर येण्याचा खेळ सुरू होता आणि अशा या खेळात कधी एकदाचे आम्ही दोन वाजताच्या सुमारास रत्नागिरीस पोहोचलो हे आम्हांस समजले नाही. रत्नागिरीचा पल्ला गाठेपर्यत मांडवी एक्स्प्रेसला अर्धा तास उशीर झाला होता. 

The blue view ह्या बाह्यदर्शनी आकर्षक दिसणाऱ्या हॉटेलच्या प्रवेश द्वारापाशी आम्ही येऊन पोहोचलो. आम्हा दोन कुटुंबांना एक बंगला देण्यात आला होता. या बंगल्याच्या बेडरूममधून समुद्राचं दिसणारा एक आकर्षक रुप!


चहापानानंतर आम्ही स्थळ दर्शनासाठी निघालो. साधारणतः १९१० च्या सुमारास ब्रह्मदेशात थिंबा राजा राज्य करीत होता. त्याची सावत्र आई महत्त्वाकांक्षी होती.  थिंबा राजाच्या माध्यमातून देशाची सत्ता आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिच्याच एका स्त्री नातलगाने  हे सर्व प्रयत्न फोल ठरवीत सत्ता आपल्या हाती घेतली होती. पुढे ब्रिटिशांनी ब्रह्मदेशात आगमन केलं. मग कधीतरी पुढे ह्या सर्व घडामोडीत थिंबाने ब्रिटिशांविरुद्ध एक छोटसं बंड केलं होतं. पाच-पाच हजाराच्या तीन विविध आघाड्यांवर त्याने ब्रिटिशांची झुंज दिली. परंतु ब्रिटिशांनी त्याला पकडून त्यांना ब्रह्मदेशात जास्त काही गडबड करू नये म्हणून भारताच्या दक्षिण किनाऱ्याला वळसा घालून रत्नागिरीला नजरकैदेत ठेवले. ह्या नजरकैदेत बहुदा थिंबा राजाला खूपच स्वातंत्र्य मिळाले होते.  पुर्ण रत्नागिरीभर त्याचा वावर होता असं उपलब्ध माहितीनुसार वाटतं.  त्यानं स्वतःच्या खास देखरेखीखाली आपल्या राजवाड्याची उभारणी केली. रत्नागिरी थिंबामुळं प्रसिद्ध झाली असे म्हणता येणार नाही पण थिंबा मात्र रत्नागिरीमुळं नक्कीच प्रसिद्ध झाला असं मला वाटुन गेलं. 

थिंबा राजाचा राजवाडा बाह्यदर्शनी थोडा फार आकर्षक वाटतो. त्याच्या आतल्या भागाचं वास्तुसंग्रहालयात रूपांतर करण्यात आला आहे. परंतु स्पष्ट सांगायचं झालं तर काही जुन्या पाषाण वस्तू सोडल्या तर या राजवाड्यात अथवा संग्रहालयात बघण्यासारखं खास काही नाही. या सर्व संग्रहालयांची प्रवेशफी ही अत्यंत माफक आहे. त्यानंतर आम्ही थिंबा पॉईंटच्या दिशेने कूच केलं. ह्या पॉईंट्सचे रुपसुद्धा फारसं वाखाणण्यासारखं नाही. तिथल्या बागेतील हे फुलांचं दृश्य. 

इथून आम्हांला रत्नागिरी शहराचा अप्रतिम नजारा मिळाला. त्याचे हे मनोहारी दृश्य. 
सूर्य मावळतीच्या दिशेने वेगाने चालला होता आणि आम्ही समुद्रकिनारी जाण्याचा निर्णय घेतला. समुद्रकिनाऱ्यावर फारशी गर्दी नव्हती. आम्ही एक उत्तम जागा निवडून छायाचित्रण केलं आणि सुर्यास्ताचा आनंद लुटला.






 तिथंच एक शहाळी विक्री करणारी महिला होती. तिच्याकडून तीन शहाळी शंभर रुपये दराने घेतली. शहाळ्याचं पाणी म्हणावं तितकं गोड नव्हतं. आमच्या ड्रायव्हरचा सल्ल्यानुसार आम्ही स्वतःला आमंत्रण या रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणाकरता आमंत्रित करून घेतलं. आमंत्रणचे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही उत्तम होते. शाकाहारी थाळीमध्ये हिरव्या चवळीची आणि मुगाची भाजी अतिशय स्वादिष्ट होते. मांसाहारी जेवणातील चिकन हंडी अगदी चविष्ट होती. बाकी सोलकढी, ताक, भाकऱ्या वगैरे मेनूनं जेवणाची रंगत अधिकच वाढवली. आणि भोजनानंतर हाती आलेलं माफक बिल पाहुन आश्चर्याचा काहीसा सुखद धक्का बसला.    


(क्रमशः)  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...