मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

दडलेले सुखक्षण !



मोठमोठी लोकं एका वाक्यात तत्वज्ञान सांगुन जातात. माझ्यासारखे पामर मोठाल्या पोस्ट लिहितात. एक विद्वान माणुस सांगून गेला आहे, "माझ्याकडं मोजक्या शब्दात बोध देणारं वाक्य लिहायला वेळ नव्हता म्हणुन मी पानभर लिखाण केलं !"

असो परवा पेपर वाचता वाचता प्राजक्तानं सैफच्या वाक्याकडं माझं लक्ष वेधलं. 

Saif Ali Khan: In this digital age, relationships need open conversations. 

चांगलं वाक्य आहे म्हणुन मी दाद दिली आणि मग एका क्षणभरच्या नजरेला सामोरा गेलो. आता कळलं की हे वाक्य त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रोमोच्या निमित्तानं घेतलेल्या मुलाखतीचा भाग होतं. 

त्याला नक्की काय म्हणायचं होतं ह्यावर मग आमची चर्चा झाली. म्हणजे मी श्रोता होतो. त्यातील काही मुद्दे आज इथं ! सोशल मीडियाच्या अलिखित नियमांपैकी एक म्हणजे चांगल्या गोष्टीची अतिशोयक्ती अलंकार वापरुन स्तुति करायची आणि न पटलेली गोष्ट सौम्य स्वरुपात मांडायची. सोशल मीडियावर हे ठीक असतं पण  सोशल मीडियातील  वापरात असणारा  हा प्रकार पतीपत्नीच्या संवादाच्या बाबतीत जेव्हा सुरु होतो त्यावेळी मात्र गडबड होऊ शकते. असा एकंदरीत आमच्या चर्चेचा सुर होता. कधीकधी बायकोचं ऐकुन फायदा होतो असा हा क्षण! 

मग मोकळा वेळ मिळाल्यानं मी स्वतः विचार करायला लागलो. मागचा मिठचौकीची पोस्ट हा open conversations चा  प्रकार आहे असं मला वाटुन राहिलं सॉरी वाटुन गेलं! (नको त्या मराठी मालिका बघितल्याने होतं असं कधी कधी ) खरंतर त्यातील मुद्दा अगदी छोटासा आणि ब्लॉगच्या माध्यमातुन मांडण्याच्या धाटणीचा नव्हे! पण मला वाटलं म्हणुन लिहिला आणि प्रसिद्ध केला. मला आणि चार - पाच जणांना मनापासुन आवडला. आपला पैसा वसुल !   

हा सुखक्षण जसा अचानक गवसला तसे एक दोन क्षण ह्या आठवड्यात आले. परवा सकाळी सहा वाजता बऱ्याच दिवसांनी मराठी अभंगांचे स्टेशन लावलं आणि "माझं माहेर पंढरी" हे भीमसेन जोशींचं गाणं ऐकुन मन तृप्त झालं. 
काल रात्री आदित्यसेनांनी घरी येताना विविधभारती लावलं आणि "अपलम चपलम " हे १९५५ सालीचे आझाद चित्रपटातील गाणं लागलं. लहानपणी आमच्या दिदीचे हे आवडतं गाणं ! पुन्हा एकदा मन आनंदी झालं. बोरीगाव केव्हा आलं हे समजलं सुद्धा नाही. 
असाच एक सहकारी ऑफिसच्या कँटीनमध्ये भेटला आणि नेहमीच्या औपचारिक गप्पांच्या सीमा पार करुन मनमोकळ्या गप्पा मारुन गेला. 

सारांश  - मन  प्रसन्न  होण्यासाठी  लागणारे सुखक्षण  असेच अवतीभोवती विखुरलेले असतात . जणु काही गवतांच्या  पानाखाली दडलेल्या दवबिंदूंप्रमाणे ! नेहमीच्या  चाकोरीच्या  रस्त्यानं  जाताना  सुद्धा  ते कधीमधी दिसतात  पण थोडं  वाट  बदलुन गेलं की ते सामोरे येण्याची शक्यता थोडी अधिक वाढीस  लागते . 

1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...