एक आटपाट नगर होतं. नगरातील लोक म्हटली तर सुखी होती. कष्ट करायची तयारी असेल तर प्रत्येकाला नगरीत कामधंदा मिळायचाच! नगरीत सगळं काही आलबेल होतं असं नाही. कामधंद्याची ठिकाणं वास्तव्याच्या ठिकाणांपासून बऱ्याच वेळा दुरवर असायची. त्यामुळं लोक चालत कामधंद्याच्या ठिकाणी जाऊ शकत नसत. त्यामुळं त्यांना अश्व, रथ वगैरे साधनांचा वापर करुन कामाच्या ठिकाणी जावं लागत असे.
नगराचा विस्तार जसजसा वाढत गेला तसतशी रस्त्यांची, नाक्यांची संख्या सुद्धा वाढत गेली. नाक्यांच्या ठिकाणी एकमेकांना काटकोनी दिशेत प्रवास करणाऱ्या सारथ्यांमध्ये विवादाचे प्रसंग वारंवार ओढवू लागले. मी मोठा मातब्बर त्यामुळं माझाच रथ आधी गेला पाहिजे वगैरे वगैरे. ही गोष्ट राजाच्या कानांवर पडुन सुद्धा त्यानं कानाडोळा केला होता. पण एकदा स्वतः राजाच ह्या वर्दळीत सापडला.
ह्या नगरात मिठचौकी नावाचा मोठा नाका / चौक होता. सर्वसामान्य जनता जिथं अधिक प्रमाणात राहायची त्या बोरीगावला जिथं उद्योगधंदे व्यापक प्रमाणात आहेत त्या मनोभूमी ह्या भागाला जोडणारा रस्ता मिठचौकीतुन जायचा. त्याला काटकोनी दिशेतून जाणारा रस्ताही तसा वर्दळीचा होता. तिथं एके दिवशी सकाळी ११ वाजता राजाचा रथ प्रचंड वाहतुक कोंडीत सापडला. वाहतुककोंडीतुन बाहेर पडता पडता राजाच्या आणि त्याच्या सारथ्याच्या नाकी नऊ आले.
झालं. राजानं मोठी सभा भरवली. प्रधान, सेनापती, विदुषी झाडुन सर्वांना बोलावण्यात आलं. दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर मिठचौकीत नवीन नियंत्रणव्यवस्था बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सातासमुद्रापलीकडील राज्यात वापरात असणारी सिग्नलव्यवस्था मिठचौकीत बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी विदुषींचे शिष्टमंडळ त्या राज्यात जाऊनसुद्धा आलं.
सिग्नलव्यवस्था बसविण्यात आली. वाहतुक अगदी नियंत्रणात आली. बोरीगावातुन मनोभुमिला कार्यासाठी जाणारे आदित्यसेन वगैरे मंडळी अगदी खुशीत आली. पण सगळं काही आलबेल असेल तर कसं काय चालणार? ह्या मिठचौकीत अधुनमधुन विपरीत घटना होऊ लागली. राज्याचा एक शिलेदार व्यवस्थित चाललेल्या सिग्नलला स्वतःहुन नियंत्रित करु लागला. बोरीगावाहून येणाऱ्या वाहनांची लांबच्या लांब रांग लागली असताना पश्चिम दिशेनं येणाऱ्या अश्वांना आणि रथांना तो चार - चार मिनिटं मोकळी वाट देऊ लागला आणि उत्तरेच्या बोरीगावाहून अथक प्रयत्न करुन आलेल्या आदित्यसेनसारख्या मंडळींना मात्र आठ- दहा रथ पार पडताच सिग्नल बंद पडतो हे पाहण्याची वेळ आणु लागला.
आदित्यसेनसारख्या मंडळींच्या मनात संताप, मनःस्ताप वगैरे भावनांनी घर केलं. पक्षांच्या गुंजनातुन राजाला टॅग करुन त्यांच्या कानावर आपली समस्या घालण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केला. पण खुप महत्वाच्या कामांत गर्क असलेल्या राजाला आदित्यसेनच्या तक्रारींकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. आता भविष्यात होऊ घातलेल्या उड्डाणपुलाची स्वप्नं पाहण्यात आदित्यसेन आणि मंडळी समाधान मानत आहेत.
गांभीर्यानं बोलायचं झालं तर मिठचौकीला आपल्या मर्जीनं सिग्नलचा कालावधी नियंत्रित करणाऱ्या वाहतुकपोलिसांनी आपलं लॉजिक जनतेसमोर सादर करावं ही मागणी मी करत आहे. ह्यामुळं होणारी विनाकारण वाहतुककोंडी नक्कीच कमी करता येईल !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा