रविवारचे अनेक प्रकार असतात, त्यातील एक असतो अगदी शांत रविवार. प्राजक्ता आणि मी चांगल्या गप्पा मारतो. घरात बसुन शांतपणे गप्पा मारणं ज्याला जमलं त्याला सुखी आयुष्याची किल्ली सापडली असे फंडे वगैरे मी देतो. काही वेळ ऐकुन घेतल्यावर मग हळूच ती पळ काढते. मला कधी असा शांत वेळ मिळाला की मग मी उगाचच आधीच्या आयुष्याच्या आठवणी काढत बसतो. २००५ सालापासून काही वर्षे न्यु जर्सीत काढली होती. कधीही मोकळा वेळ मिळाला की ह्या काळाच्या आठवणी हमखास येतात. मागे ह्या काळातील आठवणींविषयी एक चांगली शृंखला मी लिहिली होती.
आजही ह्या आठवणी आल्या. इथं आम्ही Avis ह्या भाड्यानं कार देणाऱ्या कंपनीच्या IT ऑफिसचा कारभार सांभाळायचो. त्यांचे अनेक व्यवस्थापक पन्नाशीच्या पलीकडचे होते. माझे त्या सर्वांशी चांगले पटायचे. त्यातील एक देशी होता. त्याचा स्वतःचा भला मोठा तीन मजली बंगला होता. मागे मोठं बॅकयार्ड होतं. आणि त्याच्या पलीकडं चक्क नदी वगैरे होती. त्याची दोन्ही मुलं अमेरिकेच्या दुसऱ्या राज्यांत कामासाठी स्थिरस्थावर झाली होती. तो बऱ्याच वेळा आम्हां लोकांना सहकुटुंब शनिवारी जेवणासाठी बोलवायचा. आमची सर्वांची मस्ती आनंदानं सहन करायचा. इतक्या मोठ्या घरात दोघांनाच राहायला कससंच वाटत नाही का ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळायचा.
अमेरिकेत असताना का कोणास ठाऊक पण शांत क्षण मिळायचे. आयुष्याचा खुप विचार करायला मिळायचा. पण इथं परतल्यापासून मात्र का कोणास ठाऊक ते कमी झाले. शांत बसुन विचार करायला लागल्यावर हमखास येणारा प्रश्न म्हणजे "ही सारी धडपड कशासाठी आणि ही कोठंवर करायची?"
मुख्य प्रवाहात राहायची आपल्याला इतकी ओढ का लागते? बऱ्याच वेळा मुख्य कारण म्हणजे मुख्य प्रवाहात न राहिल्यानं आपण बरंच काही गमावतो आहोत ही भिती असते. जे काही व्यावसायिक आयुष्य पाहिलं आहे त्यावरुन एक म्हणायचं धाडस करु इच्छितो. "एका विशिष्ट कालावधी व्यतीत केल्यानंतर तुम्हांला सर्वसाधारणतः अगदी वरच्या पातळीपर्यंत काय घडत असावं ह्याचा अंदाज येतो आणि ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळालंच पाहिजे ह्याची आस कमी होते." जगात मनाचा खंबीरपणा, वाचन, संगीत आणि बौद्धिक चर्चेची भूक भागवणारी संगत लाभण्याचं सुदैव ज्यांना मिळालं आहे ती लोक केवळ मुख्य प्रवाहापासुन दूर राहण्याचं टाळावं म्हणुन उगाचच धडपड करत नाहीत.
सात वर्षांपूर्वी हा ब्लॉग सुरु केला होता तेव्हा एक "चौथी पास" नावाची पोस्ट लिहिली होती. सुखी संसारासाठी चौथी पास पत्नी करावी असं मी विनोदानं माझ्या बहिणींच्या घोळक्यात म्हटलं असल्याचा त्यात उल्लेख होता. गंभीरपणानं बोलायचं झालं तर नवराबायकोपैकी एकानं घरी राहुन थोडा कमी टेन्शन देणारा उद्योग देत मुलांकडं लक्ष द्यावं असं मला मनापासुन वाटतं. थोडासा कालबाह्य विचार असला तरी मला आवडतो.
शांतपणे बसुन (जमल्यास वाय - फाय, दिवे, टीव्ही सर्व काही बंद करुन) नुसतं मनाला मोकळं सोडा. मुंबईबाहेर असाल तर आकाशातील चांदण्या दिसतील अशा स्थितीत बसा. सर्व चिंता, मागील आयुष्याचे विचार, पुढील आयुष्याविषयी वाटणाऱ्या सर्व चिंता सर्वांना मनाच्या मैदानात मोकळं सोडा. आयुष्य किती झटपट हातातुन निसटुन चाललं आहे ह्याची एक भितीदायक जाणीव अगदी प्रखरपणे तुमच्यासमोर उभी राहील. आणि आपल्याला ह्या क्षणी वाटणाऱ्या चिंता गेले कित्येक वर्षे आपल्याला केवळ त्रस्त करत राहिल्या आहेत आणि आपण त्यावर काहीच केलं नाही हे ही जाणवेल. मग मनात अजुन विचार येईल की जर आपण ह्यावर काहीच करत नसु तर त्याची चिंता तरी का करावी?
थोडक्यात काय तर मनाच्या शांत स्थितीचा शोध घ्या!
वैधानिक इशारा - एका शांततेचा अतिरेकी पुरस्कार करणाऱ्या माणसानं एका टोकाच्या शांत रविवारी रात्री लिहिलेली ही पोस्ट आहे. तिला गंभीरपणं घ्यायचं असेल तर ज्यानं त्यानं स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा