मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

अंतर्मुख



ह्या आठवड्यात एक लक्षवेधी वाक्य ऐकायला मिळालं. अंतर्मुख लोक ऊर्जा मिळविण्यासाठी स्वतःच्या आत डोकावतात तर बहिर्मुख लोक समाजाशी झालेल्या संपर्कातुन ऊर्जा मिळवितात. हे वाक्य तसं रूढार्थानं Heavily Loaded होतं. 

ह्या वाक्यावर विचार करण्यासाठी त्यावेळी जास्त वेळ मिळाला नाही. पण आज शनिवारी सकाळी मात्र हे वाक्य आठवलं आणि म्हटलं की ह्यावर दोन चार शब्द खरडवुया. माणसाला ऊर्जेची गरज का भासते? विविध माणसांच्या ऊर्जानिर्मितीच्या गरजा वेगवेगळ्या असतात. आपलं वैयक्तिक, व्यावसायिक काम व्यवस्थित करता यावं ह्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते. अगदी मोठं विधान करायचं झालं तर "आपल्याला स्वतःविषयी चांगलं वाटावं" ही मनःस्थिती आणण्यासाठी आपण धडपडत असतो. कलाकार ह्याबाबतीत अगदी खास असतात. आपल्या मनाची एक विशिष्ट स्थिती असल्याशिवाय ते आपली सर्वोत्तम कला पेश करु शकत नाहीत.

अंतर्मुख माणसांची स्वतःची अशी काही खासियत असतात अशी माझी अटकळ आहे. 

ह्या व्यक्तींचं आणि त्यांच्या अंतर्मनाचे एक dedicated communication channel असतं. आणि ह्या चॅनेलला बाह्यव्यत्ययापासुन सुरक्षित ठेवण्याची कला त्यांना उत्तम साधली असते. अशा माणसांमध्ये आपल्या स्वतःच्या क्षमतेविषयीची खात्री आणि जितकं यश आपल्या स्वतःच्या हिकमतीवर मिळवता येईल त्यावर समाधान मानण्याची तयारी ह्या गुणांचा काहीसा मिलाफ दिसुन येतो. अंतर्मनाला सतत नवनवीन विचारांचा, ज्ञानाचा पुरवठा करणं ही ह्या अंतर्मुखी माणसांची महत्वाची गरज / जबाबदारी असते. 

काही माणसं जन्मतः अंतर्मुख असतात तर काहींना परिस्थिती अंतर्मुख बनवते. परिस्थितीनं अंतर्मुख बनवलेल्या माणसांच्या बाबतीत कधी कधी काही लोकांनी दिलेल्या कठोर अनुभवांची परिणिती संपुर्ण जगाविषयी विरक्तीची भावना निर्माण होण्यात झालेला दिसुन येतो. 

जन्मतः अंतर्मुख असलेली माणसं आयुष्यभर अंतर्मुखच राहतील असंही नाही. बाह्यवातावरणात आपलं अस्तित्व टिकवुन धरण्यासाठी त्यांना आपलं मुळ रुप / स्वभाव बाजुला सारुन बहिर्मुख बनावं लागतं. परंतु बऱ्याच वेळा असल्या माणसांचं अवघडलेपण त्यांच्या वागण्यातुन दिसुन येतं. 

वरील लेखात मी माणसांचं introvert आणि extrovert अशा दोन अगदी टोकाच्या प्रकारात थेट वर्गीकरण केलं. पण लिहितालिहिता जाणवलं की खरंतर प्रत्येक माणसात हे दोन्ही गुणधर्म थोड्या-अधिक प्रमाणात अस्तित्वात असतात. ज्या गुणधर्माचं प्रमाण जास्त त्यानुसार आपण त्या व्यक्तीला ओळखतो. अजुन खोलवर पाहिलं तर कोणतीही व्यक्ती ठराविक settings मध्ये अंतर्मुख बनते आणि काही वेगळ्या settings मध्ये तिला बहिर्मुख बनायला जमतं. माणसाचं आयुष्य कसं काय उलगडत जातं आणि त्यांना अंतर्मुख / बहिर्मुख बनायला भाग पडणारी settings किती प्रमाणात त्यांच्यासमोर पेश होतात ह्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बाह्य थर बदलत राहतो. 

(तळटीप - हा माणुस उगाचच इतकं गंभीर का लिहितो असा विचार तुमच्या मनात येणं साहजिकच आहे. हल्लीच्या सर्वत्र ऊतू जाणाऱ्या आत्मविश्वासाचं लोण काही प्रमाणात माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचलंय !)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...