व्यावसायिक जीवनात ज्या गोष्टींमध्ये अडखळायला झालं अशा गोष्टींची यादी खुप मोठी नसली तरी अगदीच छोटीसुद्धा नाही. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे एखाद्या दिलेल्या कामातील (Task) पूर्णत्वाचा ध्यास कोणत्या क्षणी सोडुन द्यायचा!
३०- ४० वर्षांपुर्वी मध्यमवर्गीय घरातील लहानपणी आयुष्याचं गणित ज्या गोष्टींनी बनायचं त्या बऱ्यापैकी सरळसोप्या असायच्या. त्यामुळं त्याकाळातील बालकाच्या नजरेतुन पाहिलं असता बऱ्याच गोष्टी कळायच्या. आईवडिलांची आर्थिक व्यवहारातील शिस्त (खर्च केलेल्या पैं पै चा हिशोब ठेवणं, घरातील मोजक्याच गोष्टी जागच्या जागी ठेवण्याची पद्धत, सर्वांची घरात येण्या-जाण्याची ठरलेली वेळ, एकत्र जेवण) हे मोजकेच महत्वाचे घटक सरळसोपे होते.
ह्या सर्व घटकांचा अप्रत्यक्ष परिणाम मनावर झाला होता. आयुष्यात जे काही करायचं ते परिपुर्ण असलं पाहिजे असं वाटायचं. ह्या तत्वाला पहिला धक्का बसला तो अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जीवनात! तिथं बऱ्याच गोष्टींचं स्वरुप dynamic होतं. तुम्हांसमोर पुर्ण करायला असलेल्या गोष्टींची संख्या बरीच असली की त्यातील एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे बाकीच्या गोष्टींत अपयशाला निमंत्रण देणं. अनुभवानं शिकत गेलो, पूर्णत्वाचा ध्यास हळुहळू मागं पडत गेला.
हल्लीचं आयुष्य बरंच बदललं. खुपच dynamic झालं. तुमच्यासमोरील असलेल्या गोष्टींची संख्या, प्राधान्यक्रम प्रत्येक दिवशी, तासातासाला बदलत राहतो. मेंदुच्या एका कोपऱ्यात ह्या दोन गोष्टींचं अदृश्य चित्र तयार असणं खुप आवश्यक असतं. हे चित्र अगदी अचुकपणे रेखाटणं कोणालाच शक्य नसतं पण ज्यांना हे चित्र reasonably अचूकतेने आपल्या मेंदुत सतत राखणं शक्य होतं, ती माणसं यशस्वी होण्याची शक्यता वाढीस लागते.
पण शेवटी माणुस माणुस असतो, यंत्र नव्हे. त्यामुळं आपल्या स्वभाववैशिष्ठयांमुळं आपण एखाद्या टास्कला त्याच्या गरजेपेक्षा थोडा जास्तच वेळ देतो कारण हे करताना आपल्याला बरंच समाधान मिळतं. बऱ्याचवेळा आपण हा निर्णय जाणीवपुर्वक घेतो. दुनियेच्या गदारोळात समाधानाचे क्षण पुर्णपणे नाहीसे झालेत असं नाही पण त्यांना शोधण्याच्या कलेने आपली काठिण्यपातळी मात्र दिवसेंदिवस उंचावत नेली आहे.
जाताजाता - ह्या सर्व कशाबशा संपवलेली पण परिपूर्ण नसलेली कामं आपल्याला सहजासहजी सोडत नाहीत. ती आपल्यामागं मनात कोठंतरी भुणभुण करीत राहतात. काही काम थोडीशी भुणभूण करुन मनःपटलावरून नाहीशी होतात तर काहींची भुणभूण दीर्घकाळ रेंगाळत राहते. आणि ह्या सर्वात लहानपणी पाहिलेली नीटनेटकी लावलेली, मोजक्याच गोष्टींनी भरलेली खोली उगाचच डोळ्यासमोर येत राहते!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा