तात्या - "साला आपल्याला पण मीडियावर समीक्षक बनलं पाहिजे !"
वासु - "का रं बाबा, सगळं काही चांगलं चाललं असताना असले नको ते उद्योग का सुचतात तुला"
तात्या - "त्याचं काय आहे बघ वासु , सगळीकडं समीक्षकांची झुंड बाहेर पडली आहे. पावसाच्या आधी दोन दिवस घरात पुर्वी मुंग्या निघायच्या तसे अचानक इकडेतिकडे समीक्षक उगवलेत. तो आदित्य पाटील सुद्धा दररोज काही बाही लिहीत असतो. लोकं वाचो ना वाचो! "
वासु - "असला काही विचार करु नको तात्या, आपलं हे दररोज संध्याकाळी भेटणं, त्यानंतरची चर्चा सगळं काही व्यवस्थित चाललंय"
तात्या - "पण त्यात काय मजा नाय वासु ! मी दोन वाक्य बोलली कि तू त्यात खोड घालणार. मग माझ्या विचाराची लिंक तुटते ना! आता गावस्कर, मांजरेकर मंडळी बघ ना, T20 सामन्यामध्ये मोजुन २४० चेंडू टाकले जातात आणि त्यावर ही मंडळी २४००० वर शब्द लिहुन मोकळी होतात. एखादा खेळाडु दोन सामन्यात अपयशी ठरला तर त्यामागे मोठमोठ्या थियरी लिहितात. "अजिंक्यने टॅटू काढल्याशिवाय त्याला भारतीय संघात प्रवेश नाही" असं लिहून मोकळा होता येतं त्यांना.
आपल्या गल्लीतला तो अमर! GST पासुन उत्तर कोरियाच्या अणुचाचणीचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम अशा सर्व विषयावर फेसबुक, ट्विटरवर अगदी आत्मविश्वासानं लिहितो. मी जर का असलं इथं बरळलो तर तुझ्या शेलकीतल्या पाच दहा शिव्या खाव्या लागतील मला !"
वासु - "***** जा आता जेव आणि झोप! उद्या टाळकं ठिकाणावर आलं की भेटूच !"
दुसऱ्या दिवशीची सायंकाळ !
तात्या निमुटपणे वासूच्या हाती एक वही आणुन ठेवतो.
वासु - "आता हे काय ?"
तात्या - "फेसबुकवर टाकायच्या आधी म्हटलं तुला दाखवावं ! आयुष्यभराची सवय एका दिवसात थोडीच जाणार !"
वासु - डोळे मोठे करून, "विषय कोणता आहे?"
तात्या - "पडवळाच्या फसलेल्या भाजीच्या निमित्तानं "
आपली हरपलेली शुद्ध सावरायला वासु काही क्षण घेतो . मग मुकाट्यानं वही वाचायला घेतो.
पडवळाच्या फसलेल्या भाजीच्या निमित्तानं - लेखक तात्या अबकड
आजची पडवळाची भाजी अबकड कुटुंबाच्या पाककलेच्या गौरवशाली इतिहासाला साजेशी नव्हती. तेल, मीठ, मसाला ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. घटत आहे म्हणण्यापेक्षा त्यात सतत चढउतार दिसुन येत आहेत. पत्नीशी ह्याविषयी चर्चा केली असता तिनं मी ज्या प्रकारचे पडवळ बाजारातुन खरेदी केले त्याविषयी नाराजी व्यक्त केली. पडवळ एका विशिष्ट भाजीवालीकडुन खरेदी करावे ही सुचना न पाळल्यामुळं हे सर्व काही झालं असं तिचं म्हणणं होतं ...
वासु (वही बाजुला सारुन) - "बस बस ह्यापुढं वाचलं जात नाही!"
तात्या (अगदी नाराज होत ) - "का बरं? सोशल मीडियावर कसं सगळ्यांच्या पोस्ट्स वाचत असतोस, लाईक करतोस आणि कॉमेंट्स पण देतोस!
वासु - "अरे तो सोशल etiquette चा भाग आहे. आता हीच पोस्ट तु सोशल मीडियावर टाकली तर तुला नक्कीच शेकडो लाईक्स मिळतील, आणि माझी कॉमेंट सुद्धा मिळेल!"
तात्या - "हे असं कसं ? "
वासु - "अरे माझ्या ठरलेल्या कॉमेंट्स मी आलटून पालटुन टाकत असतो. आणि त्यातुन स्वतःला सुद्धा सिद्ध करीत असतो ! आणि त्यामुळं साईड इफेक्ट म्हणुन तुझा आत्मविश्वास बळावला तर it's ok for me!"
तात्या - "ओह ओके ! ठीक आहे आताच जाऊन हे सर्व पोस्ट करतो "
वासु - "ठीक आहे ! पण उद्या घरी जेवण मिळणार नाही असलं काही वाक्य पोस्टमध्ये नाही ना ह्याची खातरजमा करुन घे ! नाही म्हणा तसं काही घडलंच तर गमभन कुटुंबाचं दार तुला सदैव उघडं असेल !"
(तळटीप - हल्लीचं वातावरण बघता अबकड आणि गमभन ह्या आडनावांची निवड करण्यात आली आहे. त्यातुन काही निष्पन्न होत नसल्यानं पहिल्या नावांवरून उगाचच काही तर्कवितर्क करु नयेत !)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा