मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

रिसेप्शनला उशिरानं येणारी वधु !



अखिल भारतीय पुरुष वर्गाला ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्याविषयी क्वचितच मी लिहावं असा सततचा आग्रह मित्रवर्गाकडुन धरला जातो. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आणि योग्य ती परवानगी घेऊन लिहलेली आजची ही पोस्ट ! 

भारतीय पुरुषवर्ग आणि लग्नसमारंभ ह्यांचं म्हटलं तर नाजुक नातं आहे. अगदी लहानपणी आई जबरदस्तीनं लग्नाला घेऊन जाते त्यावेळी घरी एकटयाला सांभाळणार कोण असा प्रश्न असतोच (आमच्या लहानपणी एकत्र कुटुंबात हा प्रश्न नसायचा !). त्यावेळी मात्र लग्नसमारंभातील मांडवांचे खास आकर्षण असायचं. ओळखपाळख नसलेली समवयस्क पोरं दंगामस्ती करायला चालायची. पुर्वी अशा मस्तीत काय पडापडी, लुटूपुटीची मारामारी झाली तर मोठ्यांना येऊन सांगायची पद्धत नसायची, हल्ली चित्र थोडं बदललं आहे. असो! 

मग काही वर्षांनी चित्र बदलतं. सातवी, आठवीत मुलांना शिंग फुटतात. हे वय ते लग्न होईपर्यंतचा काळ हा मुलांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ असतो. आईने 'Give Up' करण्याचा काळ आणि मुलाच्या आयुष्यात 'Supreme Authority' येण्याचा काळ ह्यामधील ह्या कालावधीत मुलगा चक्क आपल्या मतानुसार वागु शकतो, आणि केवळ आपल्या हव्या असलेल्या लग्नांना हजेरी लावायचा हक्क बजावु शकतो. मग कधीतरी मुलगा सेटल होतो. हे सेटल होणं हा प्रकार म्हणजे नक्की काय आहे हे कोणालाच माहित नसावं.

मग कधीतरी मुलाच्या आयुष्यात त्याला हजेरी लावण्याची फार इच्छा असणारं लग्न येतं आणि मग सर्व चित्र पालटतं. नव्यानं लग्न झालेलं जोडपं म्हणुन, कधी सासरचे जवळचं म्हणुन तर कधी सासरचे अटेंड केलं म्हणुन घरचं लांबचं अशी अनेक लग्न हा मुलगा अटेंड करत राहतो. आणि मग त्याचा चक्क गृहस्थ बनतो. तो गृहस्थ बनल्यावर लग्नमांडवाला शोभा लावणं ही त्याच्या पुर्वजांनी पार पडलेली जबाबदारी त्याच्या शर्टी (अंगावर) येऊन पडते. 

इतक्या भल्या मोठ्या प्रस्तावनेनंतर आजच्या पोस्टचा मुख्य विषय ! रिसेप्शनला उशिरानं येणारी वधु ! हल्ली लग्न लागल्यावर साधारणतः एक तासानं रिसेप्शनची वेळ असते. वधुवरांवर अक्षता टाकल्यावर (आणि अक्षता टाकणं योग्य की अयोग्य ह्यातील द्वंद्वाला मनातल्या मनात सामोरं जाऊन) लग्न लागतं आणि मी स्थानापन्न होतो. 

आपण हजेरी लावत असलेली लग्न दोन प्रकारची असतात असं माझं म्हणणं ! एक ज्यात बहुतांशी लोक आपल्या परिचयाची असतात आणि दुसरं म्हणजे ज्यात फार थोडे लोक आपल्या ओळखीतले असतात. पहिल्या प्रकारात वेळ घालवणं हा मोठा प्रश्न नसतो, पण काही मंडळींविषयी आपण साशंक असतो; त्यांचं नक्की नाव काय, आपलं आणि त्यांचं नक्की नातं काय? काही वर्षांपुर्वी मंडळी मला थेट प्रश्न विचारायची; हल्ली नाही विचारत. पण त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सर्व काही सांगुन जातात. 
दुसऱ्या प्रकारात आपण पुर्ण हॉलला नजरेनं स्कॅन करतो आणि ओळखीचा माणुस शोधायचा प्रयत्न करतो. असा एखादा गृहस्थ दिसला की युसेन बोल्टच्या वेगानं त्याच्या दिशेनं जाऊन त्याच्याशी वार्तालाप करतो. ह्यावेळी अजुनही मंडपात वावरणारे नवरा- नवरी माझ्या डोळ्यात खुपसतात. ह्यांना तयारीला जायला काय होतं असले विचार माझ्या मनात घोळु लागतात. 

ह्या दोन्ही प्रकारात आपला (किंवा माझा ) एक डोळा / कान जेवणाची व्यवस्था कोठे आहे, जेवण सुरु केलं आहे का ह्या गोष्टीवर असतं. पुर्वी बुफेच्या रांगेत पहिल्या पाचात असायला मला कसंस व्हायचं, हल्ली होत नाही. जेवण आटपुन मी पुन्हा हॉलमध्ये येतो. अजुनही परिस्थितीत फारसा काही फरक पडलेला नसतो. महिलावर्ग ऐतिहासिक परंपरेनुसार एकमेकींच्या साड्या, दागिने ह्यांचे निरीक्षण करण्यात दंग / गुंग असतो. मागील पाच समारंभात घातलेली साडी, ड्रेस ह्या लग्नात रिपीट झाला नसावा ह्या तत्वामुळं पानेरी, लाजरी, सुविधा वगैरे दुकानं निर्विघ्नपणे गेले कित्येक दशके चालु आहेत आणि चालु राहतील. पुरुषवर्ग भारताचे आर्थिक धोरण, भारत - पाक - चीन त्रांगडं ह्या विषयांवर आपली मतं नोंदवत असतो. ह्यातील काही माणसांचं अशा आंतरराष्ट्रीय विषयांवरील ज्ञान पाहुन ही लोक मोदींसोबत का नाहीत हे मला न उलगडलेलं कोडं असतं. मी मोठ्या निर्धारानं वेळ व्यतित करत असतो. क्रिकेट सामन्याच्या थेट प्रक्षेपणात दोन षटकाच्या मधील ३० सेकंदात सुद्धा जाहिरात देणाऱ्या जाहिरातदारांना अशा ह्या मधल्या वेळात बोलावुन मांडवात आपली जाहिरात करण्यास परवानगी द्यावी अशी माझी सुचना आहे. आणि ह्या सुचनेचं मी पेटंट घेऊ इच्छितो. 

जर पत्नीसोबत लग्नाला आलो असेन तर हळुच तिच्याकडं पाहुन मी नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी उगाचच आपण चर्चेत दंग आहोत असा भास निर्माण करण्याची कला तिला चांगली साधली आहे. मग नाईलाजानं मी व्हाट्सअँप आणि फेसबुकला शरण जातो. बराच वेळ गेलेला असतो. ह्या क्षणी आहेर असल्यास ते पाकीट दुसऱ्याकडं सोपवुन कलटी मारण्याचे किती गंभीर परिणाम होतील ह्याची मी मनातल्या मनात चाचपणी करत असतो. 

बहुदा देवाला माझी दया आलेली असते. सुस्त मांडवात अचानक हालचाल दिसु लागते. दोन तासांच्या तयारीनं सज्ज अशा वरवधू ह्यांचं मांडवात आगमन होणार अशी आतल्या गोटातील बातमी आली असते. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच तज्ञ मंडळीनी योग्य टोकाने रांगसुद्धा लावली असते.   मग मी सुद्धा त्यात सामील होतो. उत्सवमूर्तींचं अखेरीस आगमन होतं. आतातरी हे थेट स्टेजवर विराजमान होतील ह्या आशेवर दुष्ट फोटोग्राफरची टीम पाणी फेरते. मग मी 'Dig deep into संयम' चा वापर करुन रांगेत उभं राहणं चालु ठेवतो. ज्यावेळी खरोखर रांग पुढं सरकु लागते त्यावेळी आपल्यापुढं असलेल्या १५ लोकांचे दीडशे लोक कसे होतात हे मला न उलगडलेलं कोडं ! शेवटी एकदाचा मी वरवधूंचे अभिनंदन करायला पोहोचतो. वर जर चांगला परिचयाचा असेल तर "अरे वा झक्कास दिसतोयस; म्हणुनच दोन तास लागले वाटतं तयारीला !" असं मी म्हणतो. तो मनापासुन हसतो, नवरीच्या नजरेला नजर देण्याचं मी टाळतो! फोटोसाठी उभं राहताना नवरा मला आग्रहानं जवळ उभं करुन कानात म्हणतो, " अरे मी तर पंधरा मिनिटांत तयार होतो, हिच्याच त्या सात की काय लेयरच्या तयारीला वेळ लागला !" आमच्या मनसोक्त हास्याच्या खळखळाटाकडं वधू साशंक नजरेनं पाहत असते. मी नवऱ्याला म्हणतो, "Welcome to Navara Club"

राहिलेल्या दुपारी झोपण्याचा अयशस्वी प्रयत्न करुन सायंकाळी चहा पिताना मग प्राजक्ता म्हणते, "अहो ऐकलं का (हे माझ्या मनातलं), पुढच्याच्या पुढच्या रविवारी xxxx कडे लग्न आहे बरं का?" आम्ही संयममुर्ती हाच शर्ट त्या लग्नाला बहुदा चालेल असा विचार करुन लोकसत्तातील न समजणारा अग्रलेख वाचण्याचं नाटक करण्यात मग्न होतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...