मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २ जुलै, २०१७

पर्ण, दवबिंदु . . .

आठवणींचं कसं असतं पहा ना, आयुष्यातील कोणती आठवण कधी अचानक मनःपटलावर उमटून येईल ह्याचा काही नेम नसतो. न्यु जर्सीतील वास्तव्यात साधारणतः सप्टेंबर महिन्यातील ही गोष्ट ! त्या आधी ऍरिझोना , फ्लोरिडा ह्या उष्ण वातावरणाच्या राज्यांत राहिल्यानंतर बर्फाळ प्रदेशातील हा पहिलाच हिवाळा येऊ घातला होता. जुलै आणि ऑगस्ट महिने व्यवस्थित उन्हाळा होता. आमच्या अपार्टमेंटमध्ये केवळ तीव्र हिवाळा लक्षात घेऊन वातानुकूलित व्यवस्थेची निर्मिती केली होती, म्हणजे फक्त गरम पाणी संपुर्ण सदनिकेत फिरविणारे पाईप अस्तित्वात होते. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट जरा कठीणच गेले. सप्टेंबरातील एका सायंकाळी अचानक थंड हवेचा झोत मनाला प्रसन्नता देऊन गेला. दुसऱ्या दिवशी तिथले अनेक हिवाळे पाहिलेल्या कल्याणशी बोलताना ह्याचा उल्लेख केला तर त्यानंही त्यास दुजोरा दिला. पुढे मिश्किलपणे तो म्हणाला की पुढील सहा महिने उत्तर ध्रुवाकडून कॅनडामार्गे येणाऱ्या अतिथंड हवेचा अगदी कंटाळा येईपर्यंत तुला मुकाबला करायचा आहे. खरोखर पुढील सहा महिने थंड हवेनं आमचा पुरता पिच्छा पुरवला. बाकी न्यु जर्सीची थंडी म्हणजे काहीच नाही असं ज्यावेळी कॅनडातले लोक म्हणायचे त्यावेळी त्यांच्याकडं मी पुरत्या आदरानं पाहायचो!

ह्या आठवणीतून मग आपल्या ऑक्टोबर महिन्याकडं! इथंही ऑक्टोबरात जर वसईत असलो तर मग थंडाव्याची हलकी चाहुल लागते. अंगणातील पारिजातक हळुवार फुलू लागलेला असतो. रात्रीच्या जेवणानंतर अंगणात फिरताना ह्या पारिजातकाची नुकतीच उमलू लागलेली फुलं पाहुन मन कसं प्रसन्न होतं. आणि मग सकाळी उठून त्यांचा डोळ्यांना सुखावणारा सडा अंगणात पाहून मनदेखील प्रसन्न होतं. ही फुलं पाहतानाच लक्ष मग वेधलं जातं ते त्या फुलांना आपल्या संभारात सामावुन घेणाऱ्या त्याच्या हिरव्यागार पर्णांकडं आणि मग त्या पर्णांच्या टोकाला असलेल्या त्या दवबिंदूकडे !  (खालील चित्रातील पान काही पारिजातकाचं नाही !) 




'Let your life lightly dance on the edges of time like dew on the tip of a leaf' - रवींद्रनाथ टागोरांच्या ह्या सुप्रसिद्ध पंक्ती ह्या संदर्भात आठवणीत येतात. ह्या पंक्तीत त्यांना नक्की काय म्हणायचं आहे ह्याचा उलगडा आपल्याला लागणं तसं कठीणच ! 

' कोणत्याही क्षणी आपल्याला आधार देण्याऱ्या पर्णाची साथ सुटून आपण जमिनीवर पडणार आणि आपलं अस्तित्व संपणार ह्याची जाणीव असुनसुद्धा दवबिंदु आपलं आयुष्य पुर्णत्वानं जगतो, त्याचप्रमाणं काळाच्या गर्भात कधीतरी आपलं अस्तित्व नाहीसं होणार असलं तरी जोवर आपण जिवंत आहोत तोवर आयुष्य पुर्णत्वानं जगा'  असा अर्थ बहुदा त्यांना अभिप्रेत असावा. 

रवींद्रनाथांना अर्थ केवळ मनुष्य आणि काळ  ह्या जोडगोळीपुरता अभिप्रेत होता की नाही हे समजायला मार्ग नाही, पण हे उदाहरण आयुष्यात आपण बाकी कित्येक ठिकाणी पाहु, अनुभवू शकतो. पर्ण आणि दवबिंदू ह्या उदाहरणातील दवबिंदूचं अस्तित्व पर्णाची साथ सुटल्यावर संपुष्ठात येतं पण आयुष्याच्या प्रवासात आपल्याला पर्णाप्रमाणं आधार देणारे गुरुजन, मित्र, सहकारी  भेटत राहतात. ह्या नात्यात सुद्धा आर्द्रता हाच एकत्र आणणारा घटक असतो. मग कधीतरी दुराव्याचा क्षण येतो, दवबिंदु तर निघुन जातोच पण पर्ण सुद्धा मग आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रवासासाठी निघून जातो. 

वरचा भावनिक भाग सोडला तर मग ह्या दवबिंदू आणि पर्णाच्या काही गोष्टी नव्यानं कळल्या. दवबिंदू केवळ गुरुत्वाकर्षणाच्या दिशेनं प्रवास करणार आणि त्यामुळं तो पर्णाच्या केवळ खालच्या बाजुला ओथंबुन असणार असा सर्वसामान्य समज ! पण Martin E.R. Shanahan  ह्यांच्या संशोधनानुसार ह्या बाबतीत काही विशिष्ट संगती (पॅटर्न) आढळुन येते. वातावरणातील आर्द्रतेद्वारे गोळा झालेले जलबिंदु सपाट पर्णाच्या पृष्ठभागावर कोणत्याही दिशेनं आढळतात, परंतु दवबिंदु मात्र लांब, निमुळत्या पानांच्या अग्राशी आढळून येतात अगदी त्यांना गुरुत्वाकर्षणाचा नियम झुगारून द्यावा लागला तरी ! अगदी खालील चित्राप्रमाणे !  


Martin E.R. Shanahan ह्यांना ह्या उदाहरणानं काहीसं अचंबित केलं असावं. त्यांनी त्यावर पुढे संशोधन करुन Principle of Free Energy च्या तत्त्वाचा आधार घेऊन दवबिंदूंच्या ह्या वागण्याचं स्पष्टीकरण दिलं. 

हा काही शास्त्रीय ब्लॉग नाही! त्यामुळं मार्टिनसाहेबांना इथंच सोडूयात! पर्ण आणि दवबिंदुची अनेक मनोवेधक अनुभव आपण सर्वांनी घेतले असतील. 



दवबिंदु अगदी छोटा असला तरी निरखुन पाहिलं तर त्यात आपणास भोवतालच्या परिसराचं प्रतिबिंब दिसतं. पर्णाला हेच मोहवत असावं आणि त्यामुळं साथ सोडुन जाणाऱ्या दवबिंदूचा विरह त्यालाही जाणवणारच ! पुढं कधीतरी पर्णाचं सुद्धा आयुष्य संपलं की त्याचाही प्रवास जमिनीच्या दिशेनं सुरु होणार! आणि मग अवतीभोवती उरणार ते फक्त साक्षीदार वातावरण !

1 टिप्पणी:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...