मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ एप्रिल, २०१७

खंत ५०१ ची!



गाव  - कोपरगाव 
स्थळ - गावाचा पार 
ज्योतिषी जोशी आपला जामानिमा घेऊन एका कोपऱ्यात बस्तान ठोकुन बसले होते . अधुनमधून अंगाला लागलेल्या घामाच्या धारा पंच्याने पुसून काढता काढता एप्रिलमध्येच उन्हानं इतकं बेजार केलं असताना मे महिन्यात आपला कसा निभाव लागणार ह्या चिंतेनं त्यांना पुरतं बेजार केलं होतं . उन्हाच्या चिंतेनं इतकं ग्रासलं असताना देखील चष्म्याच्या फ्रेमच्या वरून त्यांचे डोळे रस्त्याकडं लागले होते . आजच्या दिवसात एकही गिऱ्हाईक फिरकलं नाही तर कसं काय होणार हे त्यांना समजत नव्हतं. आपल्या ज्योतिष्यशास्त्राच्या आधारे आज आपल्याकडं एकतरी भाविक येणार की नाही ह्याचा सुद्धा आपल्याला उलगडा करता येऊ नये ह्याची चिडचिड मनातल्या मनात दाबुन धरण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडं दुसरा उपाय देखील नव्हता. 

अचानक एक चांगलं सुटबूट घातलेलं भारदस्त व्यक्तिमत्व आपल्या दिशेनं येताना त्यांना दिसलं. ह्याला चांगलाच गंडा घातला की महिनाभराची तजवीज होऊन जाईल  ह्या विचारानं त्यांची मुद्रा अचानक प्रसन्न झाली. आपली बैठक आवरून आणि मुद्रेवर भारदस्त हावभाव आणून त्यांनी उगाचच आपल्यासमोरील पोथीवाचनाचा आभास निर्माण केला. 

व्यक्ती - नमस्कार बुवा!

क्षणभर वाचनात मग्न असल्याचा आव आणुन मग जोशीबुवांनी नजरेनं त्यांना बसण्याची खुण केली. अजून काही वेळ तरी पोथीवाचनाचं नाटक सुरु ठेवणं आवश्यक होतं. गेली कित्येक वर्ष आपण नेमकं तेच पान का वाचत बसतो आणि तरीही आपल्याला त्याचा उलगडा का होत नाही ह्याची खंत करणं त्यांनी हल्ली सोडून दिलं होतं. शेवटी एकदा आपली साधना आटपून त्यांनी त्या व्यक्तीकडं आपला मोर्चा वळविला. 

जोशीबुवा - नाव ?
व्यक्ती - ५०१!

जोशीबुवांची मुद्रा काहीशी त्रस्त झाली. पण अधुनमधून असल्या टग्या माणसांशी त्यांची गाठ पडायची त्यामुळं पहिल्या प्रश्नात हार न मानण्याची त्यांनी सवय करुन घेतली होती. 

जोशीबुवा - जन्मस्थळ 
व्यक्ती - भारत 

हे बेणं जरा पोहोचलेलं आहे ह्याची मनोमन बुवांनी स्वतःला जाणीव करुन दिली. 

जोशीबुवा - जन्म दिनांक , वेळ 
व्यक्ती - नक्की माहित नाही, पण जन्म किमान दहा हजार वर्षांपूर्वीचा !

नाक्यावर आपल्या ओळखीची माणसं वावरत आहेत ना ह्याची बुवांनी फ्रेमच्या वरून नजर फिरवुन खातरजमा करून घेतली. कुडमुड्या ज्योतिष्याला भुताची सदिच्छा भेट वगैरे बातमी पेपरात छापुन येईल ह्याची त्यांनी एव्हाना मानसिक तयारी करुन घेतली होती. 

जोशीबुवा - अं  अं 
जोशीबुवांची ही स्थिती पाहून त्या व्यक्तीनं अगदी हळुवार आवाजात त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली!

व्यक्ती -  जोशीबुवा ! तुम्हांला दिलेल्या  त्रासाबद्दल अगदी क्षमस्व ! मी आहे  संख्यारेषेवरील  ५०१!  माझ्या जीवनात अचानक गेल्या आठवड्यात  जी काही  अभूतपूर्व  घडामोड झाली  त्यामुळं  मी अगदी हबकून गेलो आहे. तुम्ही  पंचक्रोशीतील नावाजलेले  ज्योतिषी , तुम्हीच मला वाचवु  शकाल अशी  आशा मनी बाळगुन मी आपणाकडे आलो आहे! 

क्षणभरात जोशीबुवांच्या  मनात असंख्य भावनांनी थैमान घातलं. बालपणी दैत्यापेक्षा ज्याची त्यांना भिती वाटायची आणि दहावीच्या परीक्षेत ३५ गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यावर ज्याच्याशी आपलं जीवनभरातील नातं संपलं असा सुस्कारा त्यांनी सोडला होता त्या खलनायक गणितातील एक पात्र ५०१ त्यांच्यासमोर अगदी जिवंतरूपात हजर होतं आणि वर गयावया करुन त्यांच्याकडं मदतीची याचना करीत होतं. बहुदा आपल्या गणिताच्या मास्तरांनीच ह्याला पाठवलं असावं अशी त्यांनी मनोमन आपली खात्री करुन घेतली. काहीही झालं तरी आल्या प्रसंगाला तोंड देणं भाग होतं. 

जोशीबुवा - मला नक्की समजलं नाही! नक्की झालं तरी काय ?
५०१ (काहीशा निराश चेहऱ्यानं) - मला वाटलं तुमच्या सारख्या ज्ञानी माणसाला हे तात्काळ कळलं असणार! पण बरोबर आहे जेव्हा ग्रहच चांगले नसतात त्यावेळी अशा गोष्टी घडणारच!

हे पात्र गणितातील असलं तरी ह्याची मराठी भाषा देखील चांगली आहे! बुवांनी मनोमन दाद दिली. 

५०१ - अहो सरकारने असा काही निर्णय घेतला की माझी अगदी धुतल्या तांदळासारखी प्रतिमा मलीन झाली! 

जोशीबुवांच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला! लहानपणी सतत डोळ्यासमोर फिरणारी एक प्रतिमा त्यांना आठवली. आई वैतागली की ह्याचीच सोबत देत त्यांना न्हाणीघरात कपडे धुवायला पिटाळायची!
जोशीबुवा - अहो ५०१, इतके निराश का होता? काळ बदलला तशा लोकांच्या सवयी सुद्धा बदलणार ना !  आणि ५०१ बार तर बऱ्याच आधी कालबाह्य झाला आहे!

५०१ - अहो साहेब, कशाला जुन्या जखमांना पुन्हा उजाळा देता आहात? ५०१ बारचं दुखणं तर मी केव्हाच विसरुन गेलोय!

जोशीबुवा - मग? गेल्या आठवड्यात झालंय तरी काय?

५०१ - (अत्यंत निराश चेहऱ्यानं) - अहो साहेब असं काय करता! सरकारनं महामार्गापासुन ५०० मीटरच्या आत मद्याच्या दुकानांना बंदी घातली हे तुम्हांला माहित नाही काय?

जोशीबुवा - (रागीट मुद्रेनं) - मला माहित नसणार हे कसं शक्य आहे! मलादेखील त्याचा फटका बसलाय! पण त्या निर्णयाचा आणि तुमचा काय संबंध? 

५०१ - अहो भारतभर जो तो आता दारूची नवीन दुकानं टाकतोय आणि जिकडतिकडं म्हटलं जातंय - ५०१ मीटरवर दुकान टाका! माझी अगदी धुतल्या तांदळासारखी प्रतिमा मलीन झाली! 

इतकं उच्च मराठी ऐकण्याची सवय नसल्यानं बुवांना त्रास होऊ लागला!

जोशीबुवा - (संतापून ) तुम्हांला बजावून सांगतोय अगदी उच्च दर्जाची मराठी भाषा वापरणं सोडून द्या ! तुमचं घराणं कोणतं आणि अभिमान बाळगता तो दुसऱ्या घराण्याचा!

५०१ - (चढ्या स्वरात) - मी आपल्या घराण्याचा का अभिमान बाळगू! केवळ १६७ आणि ३ होते म्हणून मी मूळ संख्या (प्राईम नंबर) होता होता वाचलो! बाकी सगळा भाव मिळतो तो ५०० ला! 

५०१ ने आपल्या मनातील खंत बोलुन दाखविली.  मूळ संख्या वगैरे संज्ञा ऐकून जोशीबुवांनी आपला संताप आवरता घेतला. 

जोशीबुवा - ह्यावर एकच उपाय आहे! 
५०१ - (आशा पल्लवित होऊन) - कोणता? कोणता?? लवकर सांगा!
जोशीबुवा - नाशकाला मला सोबत घेऊन चला! चांगली ग्रहशांती करू! चांगली ग्रहशांती झाली की सरकारला सद्बुद्धी सुचेल आणि हा निर्णय ते मागं घेतील!

५०१ - (खुशीनं) नशीब माझं! देवाच्या कृपेनं अजुनही चांगली माणसं ह्या दुनियेत अस्तित्वात आहेत! नाहीतर ती सरकारमधील माणसं! ५०० मीटरपर्यंत दारूची दुकानं नसली म्हणून काय लोकं १ किमी आत जाऊन दारू पिऊन रस्त्यावर यायची थांबणार का? आणि वाहनचालकाचा परवाना देण्यासाठी योग्य परीक्षा घ्या म्हणावं! मंद गतीनं जाणाऱ्या जड वाहनांनी डाव्या मार्गिकेतून क्रमण करावं हे जाऊन सांगा म्हणावं! ओव्हरटेक करताना कोणती काळजी घ्यावी हे समजावून सांगा सर्वांना! आपल्या वाहनांचा व्यवस्थित निगराणी करा म्हणावं! ह्या सगळ्या प्रकरणात उगाचच माझी धुतल्या ... 

धुतल्या शब्दानं जोशीबुवांच्या मुद्रेवरील बदललेले भाव बघताच ५०१ ने आपलं बोलणं आवरतं घेतलं!

५०१ - चला निघतो मी! 

ही घ्या दक्षिणा असं म्हणत ५०१ ने ५०० ची करकरीत नोट आणि एका रुपयाचं नाणं जोशीबुवांच्या हाती ठेवलं ! 

५०१ दक्षिणा पाहून जोशीबुवा अगदी प्रसन्न झाले होते. 

जोशीबुवा - बघा मिस्टर ५०१! शुभकार्यासाठी तुम्ही तुमचीच निवड केली की नाही ! आणि हो उद्या महामार्गावर सोमरसपान करुन वाहन हाकणाऱ्या चालकास पकडल्यास तो स्वतःची सुटका करून घ्यायला मात्र कसला वापर करणार! ५०० चे नोटेचाच ना!  

जोशीबुवांचं हे वाक्य ऐकताच मात्र ५०१ अगदी प्रसन्न मुद्रेनं आपल्या परतीच्या मार्गाला निघाला !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...