मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ३ एप्रिल, २०१७

हँडवॉश



प्रत्यक्षातील सामाजिक जीवनात लोकसंपर्कापासून दुरावलेली जनता इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे होणाऱ्या मेंदूसंभ्रमाची शिकार होण्याची शक्यता वाढीस लागते. मेंदूसंभ्रम करण्यासाठी विविध कंपन्या स्त्रिया आणि लहान मुलं ह्यांना आपलं लक्ष बनवतात. डासांपासून संरक्षण, झटपट बनणारे खाद्यपदार्थ, हातांची स्वच्छता, घरबसल्या उपलब्ध असणारे मुलांच्या करमणुकीचे पर्याय ह्यासाठी चांगले खासे पारंपरिक उपाय उपलब्ध असताना केवळ आपली उत्पादनं खपवायची म्हणुन दृक, ध्वनी अशा विविध माध्यमांतुन चुकीच्या संदेशांचा मारा केला जातो. एक सुखी कुटुंबाच्या चित्रात हे सर्व घटक आवश्यकच आहेत असा हळुहळू बालकांचा आणि काही प्रौढांचा समज होऊ लागतो. 

ह्या संभ्रमापासुन वाचविण्यासाठी काही घटकांचं अस्तित्व आवश्यक असतं. उदाहरणार्थ तुमचा कॉमनसेन्स, तुमचा जनसंपर्क, तुमच्या ज्ञानाविषयी तुमची असणारी खात्री आणि समुहासोबत वाहत जाण्याच्या इच्छेला थोपवून धरण्याचं तुमचं मनोबल! 
कॉमनसेन्स  - अर्थात बुद्धी ताळ्यावर असणं. सार्वजनिक  माध्यमातून जी काही जाहिरात आपणासमोर प्रदर्शित होते तिचं लक्ष्य समाजातील केवळ १० टक्के लोक असुन त्यात आपण नाही आहोत असा समज तुम्ही स्वतःपाशी बाळगा! बरंचसं काम साध्य होईल! 
तुमचा समाजातील जनसंपर्क दांडगा असल्यास तुम्ही जाहिरातीला बळी पडण्याची शक्यता कमी होते. ही मंडळी पारंपरिक दृष्टिकोन चांगल्या प्रकारे जोपासतात. 
तुमच्या ज्ञानाविषयी तुमची असणारी खात्री आणि समुहासोबत वाहत 
जाण्याच्या इच्छेला थोपवून धरण्याचं तुमचं मनोबल हे सुद्धा महत्वाचे घटक!

ह्या पोस्टचं कारण काय तर म्हणे हँडवॉशने सतत हात स्वच्छ करत राहणं हे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं तितकसं चांगलं नाही हे नव्यानं प्रकाशित झालेलं संशोधन! अत्यंत योग्य असं संशोधन! 

होतंय काय की मुलांशी पालकांचा कमी होत चाललेला संपर्क ह्या जाहिरातदारांच्या फायद्याचा ठरतोय. एखादी चुकीची गोष्ट सतत सांगितली की ती बरोबर वाटू लागते त्याचप्रमाणं ह्या जाहिरातदारांनी अशा अनेक चुकीच्या गोष्टीचं ब्रेनवॉशिंग (मेंदूसंभ्रम) आपल्या मुलांवर केला आहे. ही मुलं ज्यावेळी पुढे जाऊन पालक बनतील त्यावेळी हँडवॉश, पिझ्झा, डोरेमॉन, ह्या गोष्टीचे स्वतः पुरस्कर्ते बनतील. हे सर्व सरसकट संपुर्ण समाजात घडत आहे असं मी म्हणत नाही. अजुनही बराचसा सुजाण पालकवर्ग अस्तित्वात आहे. पण ह्यातील बराचसा सामाजिक जीवनात सक्रिय नाही आणि त्यामुळं सोशल मीडियावर मात्र मेंदूसंभ्रम करणाऱ्या लोकांची चलती सुरु आहे. 

जाता जाता मुलं कार्टून बघतात म्हणून स्वतःचं व्हाट्सअँप चेक करता करता तक्रार करण्याऐवजी एक साधा पत्त्यांचा कॅट विकत आणा आणि मुलांबरोबर मेंढीकोट, सात-आठ असे प्राथमिक खेळ खेळा. किमान एक आठवडा तरी डोरेमॉन तुमच्या घरी फिरकणार नाही! 

1 टिप्पणी:

  1. स्त्रियांना आणि लहान मुलांना लक्ष आणि साधन दोन्ही बनवल जात. तसेच जनसंपर्क दांडगा असायला हवा हे म्हणताना तुम्ही कोणत्या वर्तुळात वावरता तेही महत्वाचे आहे. लेख सुंदर!!

    उत्तर द्याहटवा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...