गेले १० - १५ दिवस सौमिल दौऱ्यावर होता. तिलोत्तमाला आपल्या जीवनात काही फारसा फरक जाणवला नव्हता. नाही म्हणायला गेलं तर विवाहानंतरच्या सुरुवातीच्या नावीन्याच्या दिवसानंतर समांतर रेषेतील आयुष्याची त्या दोघांना सवय झाली होती.
दुपारची उन्हं खिडकीतुन आत येऊ पाहत होती. आपल्या जीवनात शिरू पाहणाऱ्या पण नकोशा असणाऱ्या माणसांप्रमाणं ह्या क्षणाला तिलोत्तमाला ही किरणंसुद्धा नको होती. तिला हवा होता एकांत! आपल्या मनात क्षणाक्षणाला घोंघावणाऱ्या आणि सदैव बदलत राहणाऱ्या विचारांची संगत तिला पुरेशी होती. आपल्या भोवतालचं साधं गाव अचानक नाहीसं होऊन तिथं आपल्या मनातील विविध भाव आपापली घरं उभारुन राहताहेत असं तिला वाटू लागलं होतं. समोरचं घर होतं ते औदासिन्याचं, त्याच्या पलीकडं निर्विकारतेचं वगैरे वगैरे !! दुःख, आनंद अशा टोकाच्या भावना शोधून सापडत नव्हत्या. त्यांची घरं कुठं असतील ह्याचा ती शोध घेऊ लागली. पश्चिमेकडं अजून अधिक झुकलेल्या दिनकराच्या लुडबुडणाऱ्या किरणांनी तिची विचारशृंखला खंडित केली.
आपण दोघांनी मिळून आयुष्य अगदी एंजॉय करायचं असं सुरुवातीला सौमिल कधीतरी बोललेला तिला अधुरंसं आठवत होतं. पण नंतर मात्र जसजसं आयुष्य पुढं सरकत गेलं तसं ह्या समांतर रेषेतील आयुष्याची त्या दोघांना सवय झाली होती. तिलोत्तमा होती प्रसिद्ध चित्रकार! अमूर्त चित्रकारितेत तिचा बराच नामलौकिक होता. सौमिल होता एक उच्चपदस्थ शास्त्रज्ञ! म्हटलं तर दोघांची आयुष्यं सामान्यतेच्या बऱ्याच पलीकडं कुठंतरी अज्ञातात वावरणारी! पण ह्या अज्ञाताच्या प्रचंड विश्वात ते दोघं सुद्धा शेकडो मैल दूरवर होते. "आपण दूरवर आहोत ह्याचं दुःख नाही पण तुझ्याकडं पोहोचण्यासाठी नक्की कोणत्या दिशेला शोध घ्यायचा ह्याची यत्किंचितही कल्पना मला नाही ह्याची खंत आहे!" अशाच एका दुर्मिळ सानिध्याच्या क्षणी सौमिल म्हणाला होता.
समोरच्या अर्धवट पूर्ण केलेल्या चित्राकडं तिलोत्तमाची नजर गेली. अमूर्तातील कोणत्याही विशिष्ट आकाराचं तिला वावडं नव्हतं. एखादा विशिष्ट आकार काढताना फक्त त्या क्षणाशी आपण प्रामाणिक राहायचं इतकं तिला ठाऊक होतं. नंतर त्या चित्राचं विश्लेषण करणारी समीक्षक मंडळी त्या चित्रातील गर्भितार्थ समजुन घेण्यासाठी तिचा अगदी पिच्छा पुरवीत. त्यांनाही एखादं असं वेगळंसं स्मितहास्य देऊन तो क्षण निभावून नेण्याची कला तिनं चांगली साध्य केली होती.
रेषा समांतर का धावतात - एकत्र येऊन एका रेषेत धावणं त्यांना जमत नाही म्हणून की समांतरतेच्या पलीकडील कोन स्वीकारल्यास वाढत जाणारं अंतर जो दुरावा निर्माण करेल तो सहन करण्याची ताकत नसते म्हणून! आपल्याच चित्रातील दोन समांतर रेषांकडे पाहून तिलोत्तमा विचार करत होती.
आपली चित्रकला अमूर्त! त्यातून कोणता बोध घ्यायचा ते आपण आपल्या रसिकांवर सोपवून देतो. कारण आत्मविश्वासपूर्वक त्यातला अर्थ सांगायचा आपल्यात आत्मविश्वास नाही! हा विचार येताच तिलोत्तमा काहीशी हादरली. हा विचार झटकून टाकायचा प्रयत्न करू लागली. पण तो विचार तसाच पुढं येत राहिला; अगदी त्या सूर्यकिरणाप्रमाणं! जशी चित्रकला तशी आपल्या आयुष्याची समांतरता! कारण सौमिलच्या रेषेजवळ स्वतःहून जाणं आपल्याला जमलं नाही! आपलं त्यानं कौतुक करावं ही आपली भावना आपल्या मनातच दाबून ठेवली आपण! कारण स्वतःहून कोणत्या भावनेला मोकळं करणं आपल्या स्वतःच्या स्वभावातच नव्हतं आपल्या! आपण उघडपणे ह्या समांतरतेविषयी कधी खंत व्यक्त केली नसली तरी एका रेषेतील आयुष्य किती आल्हाददायक असतं ह्याविषयीचं औत्सुक्य आपल्याला कधीच दाबून टाकता आलं नाही!
तो विचार असाच आपला मार्ग संक्रमित करीत तिलोत्तमाला पूर्ण अस्वस्थ करुन गेला. तिची शांतता पुरती भंग करीत! आपल्या स्वकेंद्रिततेवर आपल्याच विचारानं इतका घणाणती घाव घालावा ह्याचं वैषम्य तिला लागून गेलं. समोरील गवाक्ष अर्धवट उघडी होती. आपलं आयुष्य आपण त्या गवाक्षाच्या उघड्या भागातून पाहिलं की काचेतून ह्याचाही तिला आता उलगडा होत नव्हता! बहुदा आपण बाहेर कधी पाहिलंच नाही केवळ आपण आतल्या आत घुटमळत राहिलो अशी समजूत तिनं करून घेतली. ह्या विचारानं तिला बरंच बरं वाटलं. सायंकाळचा थंड वारा एव्हाना त्या अर्ध्या खिडकीतून आत येऊ लागला होता. खिडकी बंद करत घोटभर दुध घेऊन तिलोत्तमा आपल्या अमूर्ताच्या पूर्णत्वाच्या प्रयत्नात गढून गेली.
(संपूर्णतः काल्पनिक )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा