सद्यकालीन महाराष्ट्रदेशी नवलेखक. नवकवी ह्यांच्या प्रतिभेला प्रचंड अंकुर फुटले आहेत. पहिल्या पावसानं रानात दबून राहिलेलं प्रत्येक बीज नवजीवनाचा घोष करीत ज्याप्रमाणं जमिनीबाहेरडोकावतं त्याप्रमाणं हे सारे मराठी भाषेचे नवशिलेदार सोशल मीडियाचं विश्व व्यापून टाकत आहेत. आठ - दहा वर्षांपूर्वी मराठी भाषेचं भवितव्य काय हा सर्वांना सतावणारा प्रश्न सध्या तरी मागे पडलेला दिसतोय!
कितीही नाकारलं तरी ह्या सर्व नवशिलेदारांना मनात कोठेतरी जनांकडून स्वीकृतीची वा कौतुकाची आस असते. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर दाद देण्यात आपला समाज फारसा प्रसिद्ध नाही. त्यामुळं हे सर्व नवशिलेदार मनातून काहीसे खट्टू असतात. आजची पोस्ट ह्या नवशिलेदारांना आवर्जुन दाद देणाऱ्या संदेशभाऊ वर्तक ह्यांना समर्पित!
संदेशभाऊ हे वसईतील मुळगाव गावातील! ह्या गावाला वैचारिक नेतृत्व देणाऱ्या समाजधुरिणांचा वारसा लाभला आहे. संदेशभाऊ हे ह्या मुळगाव गावातील ह्यापारंपरिक विचारसरणीचं प्रतिनिधित्व करतात. वसईतील सांस्कृतिक जीवनातील परंपरेचा अभ्यास असणं हा एक आवश्यक निकष त्यांनी सहजगत्या पूर्ण केला आहे. पारंपरिक विचारसरणीचा वारसा पुढे चालवताना त्यांनी आधुनिक जगातील संकल्पनांना आपलंसं केलं आहे आणि त्यामुळं डिजिटल इंडिया पासून त्यांच्या कार्यक्षेत्रातील विमानाची रडारप्रणाली अशा विविध विषयांवर ते सहजगत्या आपली मतं नोंदवू शकतात!
सोशल मीडियाचं एक नाजुक अंग म्हणजे तुम्ही ह्यावर जर अतिसक्रिय असाल तर तुम्हांला टीकाकारांच्या टोमण्याला. तिरकस टिपण्णीला तोंड द्यावं लागतं . अशा केवळ एका टिपण्णीनं सार्वजनिक जीवनातील आपला गाशा गुंडाळणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. संदेशभाऊ ह्या सर्वांपेक्षा वेगळे ठरतात ते ह्यामुळं ! त्यांच्यावर खेळीमेळीची टीका करणाऱ्या त्यांच्या सुहृदांची फौजच्या फौज वसईत उभी आहे! तरीही नाराज न होता ते आपलं सामाजिक कार्य सुरु ठेऊन आहेत.
त्यांच्या प्रतिक्रियेने मला सुद्धा बऱ्याच वेळा हुरूप मिळाला आहे. आजची ही पोस्ट अशा ह्या काहीशा अनाम संदेशभाऊना समर्पित! आपण एक व्यक्ती नसून परंपरा आणि आधुनिकता ह्यांचा उत्कृष्ट मिलाफ असणारी संस्था आहात आणि आपल्या कॉमेंट्सची कृपादृष्टी आम्हां पामरांवर सदैव असू द्यावी ही विनंती !
मी फक्त 'धन्यवाद' इतकेच म्हणू शकतो.
उत्तर द्याहटवा