मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

Ventilator



एकत्र कुटुंबातील नात्यांचे एक सुंदर चित्रीकरण! ह्या चित्रपटात मला जाणवलेल्या, भावलेल्या काही मानवी स्वभावाच्या छटा!


  1. एकत्र कुटुंबाच्या दृष्टिकोनातून पाहिला गेलं तर लग्न, जन्म मृत्यू, आजारपण ह्या नियमीत घडणाऱ्या गोष्टी! ज्या वेळी त्या ह्या कुटुंबातील दुसऱ्या कोणाच्या बाबतीत घडतात त्यावेळी त्यांच्याकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन बराच वेगळा असतो आणि ज्यावेळी ह्या गोष्टी आपल्या बाबतीत घडतात त्यावेळी आपण अगदी वेगळ्या भावनांचा अनुभव घेतो. त्यावेळी बाकीच्या लोकांच्या वागण्यामुळं कदाचित आपल्याला विरक्तपणा येऊ शकतो. पण जीवनरहाट चालू ठेवण्याचं जो अविरत दबाब आज आपण सर्वजण अनुभवत आहोत त्यामुळं त्या बाकीच्या सर्वांचं वागणं आपण समजून घ्यायला हवं.
  2. एकत्र कुटुंबात ज्यांचं मत मोलाचं मानलं जातं अशा मोजक्या व्यक्ती असतात. जसजसा काळ पुढं सरकत जातो तसतसं नवीन व्यक्ती पुढं येतात आणि सूत्र आपल्या हाती घेतात. अशा वेळी  वयोमानापरत्वे ज्या व्यक्तीच्या हातून सूत्र  निघून गेलेली असतात त्यानं ते वेळीच ओळखायला हवं. नाहीतर चित्रपटातील भाऊ (आशुतोष गोवारीकर ह्याचे वडील) ह्यांना काही प्रसंगात ज्या चेष्टेला तोंड द्यावं लागलं तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. 
  3.  जारी नातेवाईकाला पाहायला जायचा प्रसंग - प्रसंग सुखाचा असो व दुःखाचा! त्याला एक सोहळा बनविण्याची जी वृत्ती अशा एकत्र कुटुंबात दिसून येते त्याचं एक हलकंफुलकं चित्रण गजाभाऊ (गजानन कामेरकर) ह्यांच्या आजारपणाच्या निमित्तानं दिसतं. 
  4. एकत्र कुटुंबातील एक सर्वांपेक्षा यशस्वी पुरुष! त्याला बाकीच्या सदस्यांकडून मिळणारी खास वागणूक! आणि त्यानेसुद्धा सर्वांना समजुन घेण्याचा खास प्रयत्न! आशुतोष गोवारीकरचा अभिनय अगदी लीलया आणि यशस्वी माणसाचं वागणं दाखवणारा! 
  5. मुलगा आणि वडील ह्यांच्या नात्यांचं एक खोलवर विश्लेषण! आपल्या भारतीय कुटुंबात बऱ्याच वेळा पिता - कन्या आणि माता -पुत्र ह्यांचं बऱ्यापैकी चांगलं जमतं. पण पिता आणि पुत्र ह्यांच्या उदाहरणात बऱ्याच वेळा संवादांची कमतरता जाणवते. आणि ह्या संवादांच्या अभावाने बऱ्याच वेळा गैरसमज निर्माण होतात आणि आयुष्यभर टिकुन राहतात. ह्या नात्यातील दोन क्षण महत्वाचे असतात.  
  6. अ) ज्या क्षणी मुलगा आपलं शिक्षण संपवून स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करीत असतो त्यावेळी पित्यानं त्याला कोणत्या प्रकारे वागणुक देतो  ह्यावर ह्या नात्याचं सुदृढपण अवलंबून असतं. 
  7. ब ) ज्या क्षणी पिता आपला सक्रियपणा गमावून बसतो आणि आधारासाठी पुत्रावर अवलंबू पाहतो त्यावेळी पुत्र कोणत्या प्रकारे वागतो हे ह्या नात्याचा पुढील प्रवास ठरवतं. 
  8. ह्या चित्रपटात एक गोष्ट खास प्रकर्षानं जाणवते. माणसं त्यांना खंत लावून गेलेल्या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि त्याचा बदला घेण्याची संधी आयुष्यभर शोधत राहतात. मग हा बदला कधी बोलण्यातून तर कधी कृतीतून घेतला जातो.    
  9. चाळिशीतील पुरुष - आशुतोष आणि त्याच्या सोबत असणारा त्याचा भाऊ! दोघेही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी आणि एकत्र कुटुंबातील आपल्या जबाबदाऱ्या मुख्यत्वेकरुन महत्वाचे निर्णय घेण्याचे पार पाडणारे! ह्या दोघांनी ह्या व्यक्तिरेखा अगदी सुरेख रंगविल्या! 
  10. ऐशीतील पुरुष - गात्रं थकलेली! आणि आपलं एकंदरीत महत्वाचं स्थान गमावलं गेल्याची खंत मनात बाळगणारा! आशुतोषच्या वडिलांची भूमिका निभावणाऱ्या जेष्ठ अभिनेत्यांनी ही व्यक्तिरेखा अगदी उत्तमरित्या निभावली आहे! 
  11. लग्न झालेली बहीण - आपल्या वडिलांच्या आठवणी, त्यांचं उमेदीच्या काळातील कर्तृत्व कायम मनात जतन करुन ठेवणाऱ्या  बहिणीची भुमिका सुकन्या कुलकर्णी मोने ह्यांनी  अगदी उत्तमरीत्या वठविली आहे.  
  12. अवयवदान - हा खरंतर सामाजिक जाणीव दर्शविण्याचा उत्तम मार्ग! पण जी व्यक्ती ह्या भावनिक कठीण प्रसंगातुन जात आहे तिचीभावुकता लक्षात घेणं सुद्धा कसं महत्वाचं आहे ह्याचा उत्तम संदेश इथं मिळतो.  
  13. अशा कुटुंबातील छोट्या छोट्या गोष्टींवरून बरीच वर्षे टिकणारी भांडणं / वाद - विवाद! कदाचित ह्या गोष्टी बाहेरच्या जगात वावरणाऱ्या लोकांना क्षुल्लक वाटत असतील पण केवळ त्या विश्वात वावरणाऱ्या लोकांसाठी मात्र त्या गोष्टींतील जय - विजय हे त्यांच्यासाठी सर्वस्व असतं. 
  14. पैशाचा प्रश्न - अशा प्रसंगी ज्याच्यावर हा दुर्धर प्रसंग ओढवला त्याची आर्थिक बाजू सांभाळणं'सुद्धा किती महत्वाचं आहे हा संदेशसुद्धा हा चित्रपट हळूच देतो. 
 जितेंद्र जोशींचा, आशुतोष गोवारीकर, सुकन्या कुलकर्णी आणि अन्य मात्तबर अभिनेत्यांचा अभिनय सुरेख! Toilet ह्या मुलभूत हक्कासाठी भांडणाऱ्या अभिनेत्रीचा अभिनय धमालच! एकंदरीत एक सुरेख चित्रपट! मस्ट सी! आणि हो हॉलिवूडवासी प्रियांका चोप्रा हिचे एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केल्याबद्दल अभिनंदन !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...