मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

एका नोटेचे महाभारत !



सध्या खरंतर आत्येबहिणीने (प्राची) दिलेल्या एका मुंगीचे महाभारत ह्या पुस्तकाचं वाचन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकसत्तेतील ह्या पुस्तकाचं आणि एक झाड दोन पक्षी ह्या पुस्तकाचं परीक्षण वाचुन मीच तिच्याकडे ह्या पुस्तकाची मागणी केली. पण अशी पुस्तकं वाचताना मनातील बाकी सर्व विचार बाजूला ठेवून त्या पुस्तकात पुर्णपणे समरस व्हायला अजुनही जमत नाही. 

असो एका मुंगीचे महाभारत ह्या शीर्षकावरून आजच्या ह्या पोस्टचं शीर्षक! ह्या आठवड्याच्या आरंभीस पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातुन रद्द करण्यात आल्या. ह्या घोषणेचा विविध लोकांवर वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम झाला आणि त्याचे पडसाद अजुनही सुरु आहेत आणि अजून काही काळ सुरु राहतील. 

ह्या घटनेकडे आपण काहीशा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. गेल्या १० - २० वर्षात समाजातील यशस्वी लोकांचं प्रमाण काहीसं वाढलं आहे. यश हे लोकांनी अर्जित केलेल्या पैशाच्या प्रमाणात मोजलं जाऊ लागलं आहे. ह्या यशाच्या दर्शनी स्वरूपाला आपण भुलून जाऊन एकंदरीत परिस्थितीचं वास्तववादी परीक्षण करु इच्छित नाही. आपल्या मनाच्या कोण्या एका कोपऱ्यात आपलं हे यश आणि एकंदरीत परिस्थिती यांचं एक विस्तृत चित्र दडून असत पण आपण हा क्षण, हा काळ जी सुखद भावना देत आहे ती इतक्या तात्काळ विसरण्याची तयारी दर्शवित नसल्यानं ह्या बाकीच्या प्रतिकुल घटकांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. 

केवळ चलनी नोटांच्या मार्फत बहुतांशी व्यवसाय करणारे लोक बराचसा कर चुकवितात आणि हा घटक त्यांच्या यशाचा पाया बनतो. बाह्य देशातील अर्थव्यवस्थेला पूरक अशी काम भारतातुन करणारे व्यावसायिक मोठ्या पगाराच्या नोकऱ्या बाळगून आहेत. ही झाली काही उदाहरणं! आणि अशा लोकांकडे आलेल्या पैशाच्या सुजेमुळे चित्रपट, मॉल, पर्यटन हे व्यवसाय भरभराटीला आले आहेत. 

५००, १००० रुपयांच्या नोटा रद्दबातल झाल्यानं पहिल्या प्रकारातील व्यावसायिक अडचणीत येऊ शकतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालामुळं  अजून काही व्यावसायिक अडचणीत येऊ शकतात. आणि अशा वर्गाची खर्च करण्याची शक्ती वा इच्छा जर मर्यादित झाली तर ह्या वर्गाच्या spending power वर अवलंबून असणारे अनेक उद्योग धोक्यात येऊ शकतात. 

सारांश - आपल्या समाजाची दीर्घकालीन विचार करण्याची क्षमता वा इच्छाशक्ती फार कमी झाली आहे. शाश्वत उद्योगधंदे म्हणजे शेती आणि पारंपरिक अभियांत्रिकी (Civil, Electrical, Mechanical)! ह्यात स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये मोठाली धरणे, कारखाने हे अभिप्रेत आहे. अशा शाश्वत उद्योगांचा सखोल अभ्यास करुन देशाची, जगाची येत्या काही वर्षातील गरज लक्षात घ्यायला हवी आणि त्यानुसार पावलं उचलायला हवी!
नाहीतर आपण पाचशेच्या नोटा संपविण्यासाठी पेट्रोलपंपावर गर्दी करत बसु आणि बँकात रांगा लावत बसू! आणि येणाऱ्या काळातील अधिक गंभीर संकटे आपल्या ह्या वृत्तीला हसत आपली मोर्चाबांधणी करत बसतील!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...