आधीच्या भागाच्या लिंक्स
भाग पहिला
भाग दुसरा
भाग तिसरा
भाग चौथा
भाग पाचवा
इतक्या खोलवर संवादानंतर योगिनी अगदी भावनिकदृष्ट्या दमून गेली होती आणि पहिल्यांदाच तिला आपल्या जिवाची सुद्धा भिती वाटू लागली होती. त्याच्या बोलण्यावरुन खरंतर स्वामी बुद्धिमान वाटत होता; पण त्याचा लढा होता तो त्यांच्यासारख्याच बुद्धिमान असलेल्या त्याच्या संपूर्ण प्रजातीशी! स्वामीच्या म्हणण्यानुसार आता तिला सर्व काही आठवणार होतं; आणि बाकीच्या मनुष्यजातीशी संपर्क साधायला ती आता पुर्णपणे मुक्त होती.
असंच आर्यनला उचलून घ्यावं आणि तडकाफडकी पोलिसांकडे जावं असा तिच्या मनात विचार आला. पण पाठमोऱ्या बसलेल्या आणि आपल्या ऑफिसच्या कामात गढून गेलेल्या स्वामीकडे पाहून तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं. "ह्याला इथं असा एकट्यालाच टाकून आपण फक्त आपला विचार करायचा? हा तर स्वार्थीपणाच होईल."
नेमकं त्याच क्षणी स्वामीनं मागं वळुन पाहिलं, तशी ती दचकली. ह्याला अजुनही आपल्या मनात काय चाललंय ते समजतंय की काय? पण स्वामी मात्र सहजच वळून पाहत होता. कदाचित आर्यनसोबत योगिनीसुद्धा झोपी गेली की काय हे तपासून पाहत होता.
त्याच्या चेहऱ्यावरून फारसा काही बोध न झाल्यानं योगिनी कसनुसं हसली. "मी पटकन बाजारात जाऊन येऊ! तुझ्या आवडीचं काही खायला घेऊन येते!" ती म्हणाली. "आर्यनला माझ्यासोबत नको सोडूस एकटा!" स्वामी अगदी गंभीर चेहऱ्यानं म्हणाला. योगिनीला अशाश्वत भवितव्याच्या वास्तवाची जाणीव झाली. "ठीक आहे, साडेअकरा झाल्यात! तुझ्या आवडीचा पिझ्झाच मागवूया इथं!" परिस्थिती सावरुन घेत योगिनी म्हणाली.
स्वामीला त्याच्या आवडीच्या पिझ्झाचा अगदी मनसोक्त आस्वाद घेत असताना पाहून योगिनीचे डोळे आपसुक भरुन आले. सारं काही मिळाल्यासारखं वाटत होतं पण ते सर्व काही क्षणभंगुर असल्याची जाणीव मनाला एखाद्या तप्त अग्नीच्या चटक्याप्रमाणं जाळत होती. अचानक तिच्या मनात एक प्रश्न आला. पण हा प्रश्न स्वामीला विचारणं कितपत प्रशस्त राहील ह्याची तिला खात्री वाटत नव्हती. पण पिझ्झा खाऊन अगदी तृप्त झालेल्या स्वामीची नजर तिच्या काहीशा संभ्रमावस्थेतील चेहऱ्याकडे गेली आणि त्यानं तिला विचारलंच, "काय झालं योगिनी?"
"नाही म्हणजे... '" योगिनीचा प्रश्न तिच्या ओठातच रेंगाळत होता.
"योगिनी - जे काही मनात असेल ते विचारुन घे! आपल्यापाशी बोलण्यासाठी किती वेळ आहे हे आपल्याला माहित नाही!"
"समजा तुला जावं लागलं आणि आधीचा स्वामी ह्या देहात प्रकट झाला; तर त्याला मधल्या काळात काय झालं ते सारं आठवेल का?"
कधी नव्हे तो स्वामी गोंधळलेला वाटला योगिनीला!
"हं .. मी तुला ह्याविषयी खात्रीलायकरित्या सांगु शकत नाही! त्याचं काही दिवस तू निरीक्षण करीत राहा आणि मग अंदाज घे! बहुदा त्याला अशा सर्व काही घटना आठवतील ज्या ह्या शरीरात कोणीतरी वेगळा राहून गेलाय हे त्याला समजायच्या दृष्टीनं निरुपद्रवी असतील!" स्वामीने आपलं मत नोंदविलं.
आपल्याला कितीतरी अनिश्चिततेचा सामना करावा लागणार आहे ह्याचा मनात आडाखा बांधण्याचा प्रयत्न करणारी योगिनीचा ह्या सर्व थकव्याने कधी डोळा लागला हे तिला समजलं सुद्धा नाही.
आर्यनच्या रडण्याच्या आवाजानं योगिनीला जाग आली. तेव्हा आपल्याला किती वेळ झोप लागली होती हे तिला समजेना. सोफ्यावर झोपलेल्या स्वामीला पाहून तिला काहीसं आश्चर्य वाटलं. हा असा दुपारच्या वेळी कसा काय झोपला बरं? तिच्या मनात शंका आली. आर्यनला शांत करेस्तोवर स्वामी सुद्धा जागा झाला होता. एखादं भयंकर स्वप्न पाहून भयभीत झालेल्या माणसाप्रमाणं त्याच्या चेहऱ्यावर भाव होते.
"ह्याला चांगला चहा करून दिला म्हणजे ह्याची झोप उडेल" योगिनीने मनातल्या मनात विचार केला. ती उठून स्वयंपाकघराकडे जाऊ लागली तितक्यात "एक कप मस्तपैकी कॉफी बनव गं, लाडके !" ह्या स्वामीच्या वाक्यानं तिच्या मनात एक तीव्र संवेदनेची लहर उमटून गेली. हा नक्कीच पूर्वीचा स्वामी परतला होता.
घरात कॉफी नव्हतीच. मनाचा मोठा हिय्या करून ती बाहेर आली. "कॉफी नाहीये , चहा केला तर चालेल का? " तिनं स्वामीकडं पाहत कसंबसं विचारलं.
"का कॉफी संपली कशी? " काहीशा रागीट मुद्रेनं स्वामी म्हणाला.
"आतापुरता चहा ठीक आहे, पण आजच्या आज कॉफी घेऊन ये!" इतकं म्हणून स्वामीने टीव्हीवर क्रिकेट सामना सुरु केला.
गॅसवर चहाचं आधण ठेवताना योगिनीच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. ज्याच्या आठवणीत तिनं इतकी वर्षे काढली त्याचं हे नवरेपणातील रूप तिला अगदी धक्कादायक होतं. आणि तिला परग्रहवासियांबरोबरचा लढा देखील लढायचा होता तो पण एकटीनं!
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा