स्वामी आणि त्याच्या सहसदस्यांची मोठ्या तावातावानं चर्चा सुरु होती. सुधाताईंना पृथ्वीवासीयांपासुन shut off करायचं ह्याविषयी सर्वांचं एकमत होतं. पण योगिनीच्या भवितव्याविषयी मात्र सर्वांचं एकमत होत नव्हतं. शेवटी त्यांच्या मुख्यानं स्वामीला दटावलंच . "No emotions Swami. You will have to obey our instructions!" emotions हा शब्द स्वामीला प्रथमच ऐकायला मिळाला असला तरी दुसरं वाक्य मात्र त्याला पुर्णपणे समजलं.
सुधाताईंना कसं सुचलं कोणास ठाऊक पण त्यांनी अचानक आपल्या मुलाला म्हणजेच भावेशला फोन केला. योगिनीनं जे काही त्यांना सांगितलं होतं ते सर्वकाही त्यांनी भावेशला सांगितलं होतं! आणि भावेशच्या सुदैवानं सुधाताई आणि योगिनीच्या भवितव्याच्या चर्चेत गुंतलेल्या स्वामी आणि मंडळींच्या नजरेतून हे एका मिनिटांचं बोलणं हुकलं होतं.
सुधाताई आणि योगिनी दोघीजणी कोल्हापुरच्या गाडीत बसल्या खऱ्या पण दोघांच्या मेंदूत आमुलाग्र बदल होत होते जे त्यांना झेपणं कठीण झालं होतं. रात्रीच्या वेळी त्या कोल्हापुरातल्या घरी पोहोचल्या खऱ्या पण तुम्ही तडकाफडकी इथं का आल्यात ह्या प्रश्नाचं उत्तर सुधाताईंकडे नव्हतं आणि आपली आई आपल्याशी खोटं का बोलली हे योगिनीला अजिबात कळत नव्हतं.
दुसऱ्या दिवशीची सकाळ उगवली ती सुधीरभाऊंच्या कुटुंबात वादळ घेऊनच! सकाळी नित्यनेमानं साडेपाचला उठून बसणाऱ्या सुधाताई सात वाजले तरी झोपूनच होत्या. "दमली असेल कालच्या प्रवासानं बिचारी!" सुधीरभाऊंचा स्वतःचीच समजुत घालण्याचा संयम सात वाजेपर्यंत चहा न मिळाल्यानं संपुष्टात आला होता. "अगं सुधा, उठ आता सात वाजले बघ!" सुधीर ह्यांच्या हाकेनं सुधाताई उठल्या खऱ्या पण त्यांची आढ्याला लावून पाहणारी शुन्यातील नजर सुधीरभाऊंना भयभीत करुन गेली. सुधाताई त्यांना ओळखण्याची अजिबात चिन्हं दिसत नव्हतं. आपल्या आईबाबांच्या कोलाहलानं जागी झालेली योगिनी धावतच सुधाताईंच्या खोलीत आली.
पुढील काही दिवस जोग कुटुंबियांना अगदी खडतर गेले. उत्तमोत्तम डॉक्टरांना सुधाताईंना दाखविण्यासाठी त्यांच्या अनेक फेऱ्या चालु होत्या. योगिनीने तर खुपच धावपळ केली. पहिल्याच दिवशी हा सगळा तणाव तिच्या झेपण्यापलीकडं गेला होता. नमिता तर शिकण्यासाठी पुण्यात होती आणि परीक्षा चालू असल्यानं तिला काही ताबडतोब येता येणार नव्हतं. कोणास ठाऊक पण का भावेश ह्या सगळ्या प्रकारापासून अलिप्त राहत होता.योगिनी आणि वडिलांना मदत करण्याऐवजी तो आपलं वागणंच निरखुन पाहतो आहे असंच तिला राहून राहून वाटत होतं. आई कोणालाच ओळखत नव्हती. तिच्या जवळपास कोणी गेलं की मोठं अकांडतांडव करायची! शेवटी मग गुंगीचं औषध देऊनच तिला शांत करावं लागायचं. सुधीरभाऊनी तर आशा सोडली होती. शेवटी हा सगळा तणाव असह्य होऊन तिनं स्वामीला फोन लावला.
तिचा फोन येणं हे स्वामीला अपेक्षितच होतं. तो तात्काळ कोल्हापूरला धावतच आला. "मी तिच्याशी बोलुन येतो!" स्वामी म्हणाला. बाकी सर्वजण अगदी दमल्यामुळं कोणी काही म्हटलं नाही. स्वामी तिच्याशी दहा पंधरा मिनिटं काही बोलला कोणास ठाऊक पण सुधाताई त्यानंतर अगदी माणसात आल्या. अगदी स्वतःच्या हातानं व्यवस्थित जेवल्या देखील! योगिनीला आपल्या नवऱ्याचं मोठं कौतुक वाटलं. स्वामी आठवडाभराची सुट्टी घेऊन कोल्हापुरात थांबला. आई बऱ्यापैकी नियंत्रणात आली. भावेशदेखील मोठ्या अदबीनं स्वामींशी वागत होता.
योगिनीला गेले कित्येक दिवस एकटं राहण्याची वेळ आली नव्हती आणि जरी आली असती तरी तिला आता एकटेपणात देखील काही काही आठवणार नव्हतं!
योगिनी ह्या सर्व प्रकारात मनानं स्वामीच्या खूप जवळ आली होती. आई थोडीफार बरी झाली आणि मग तिनंच आपण कोठेतरी फिरायला जाऊयात असं स्वामीला सुचवलं. आणि कधी नव्हे ते स्वामीने कामाचा काही बहाणा न करता मनालीची तिकिटं बुक केली होती.
ती दोघं फिरायला गेली आणि आईचं वागणं पुन्हा बिनसलं. पुन्हा तिचं खोलीत बंद करुन घेणं, बाकी सर्वांपासुन दूर राहणं वगैरे प्रकार वाढीस लागले होते. सुधीरभाऊंची वाढीस लागलेली आशा मात्र पुन्हा मंदावली होती. पण भावेश मात्र आता आईकडे व्यवस्थित लक्ष देत होता. आणि ह्या दोघांना आपण फोन करुयात नको असं त्यानंच सुचविलं होतं.
भावेशला बहुदा आईच्या वागण्यातील लय समजली होती. त्यामुळं तिला तिची स्वतःची स्पेस देऊन तिचा मूड चांगला राखण्याची त्याने कला साधली होती. सुधीरभाऊंनीसुद्धा आपल्या नशिबाला स्वीकारलं होतं. आणि त्यामुळं स्वामी आणि योगिनी परस्पर सुट्टी आटोपुन मुंबईला परतले होते.
दिवस नेहमीप्रमाणं मोठ्या गतीनं पुढं चालले होते. स्वामी कामात गढुन गेला होता. आज त्याला ऑफिसातून यायला काहीसा उशीर झाला होता. त्यानं घरी प्रवेश केला तर योगिनीचा चेहरा काहीसा प्रसन्न असल्याचं त्याला जाणवलं. फ्रेश होऊन तो आला आणि सोफ्यावर बसला. आणि त्याची नजर समोर भिंतीवर लावलेल्या कैलेंडरवर गेली. एका गोंडस बाळाचा फोटो त्यावर झळकत होता. त्याच्या डोक्यात प्रकाश पडायला काही सेकंद गेले आणि मग त्यानं परमानंदानं योगिनीकडं पाहिलं. "खरं की काय?" त्याच्या चेहऱ्यावरील आनंदाला सीमा नव्हती. आपल्या ओढणीत चेहरा लपवत योगिनीनं मानेनंच होकार दिला!
पुन्हा एकदा स्वामी आणि त्याच्या वरिष्ठांत मतभेद झाले होते. "Swami, you can't be emotional; the countdown has begun now! You have three more years to live on this planet!" त्याचा वरिष्ठ मोठ्या रागानं त्याच्याशी बोलत होता. "सॉरी सर! मी आपल्याकडं ह्या ग्रहावर कायमची राहायची परवानगी मागु इच्छितोय!" स्वामीच्या ह्या उत्तरानं अवाक झालेले त्याचे वरिष्ठ त्याच्याकडे पाहताच राहिले! emotions ह्या शब्दाशी स्वामी आता चांगलाच परिचित झाला होता.
(क्रमशः)
मागील भागाच्या लिंक्स
भाग १
http://patil2011.blogspot.in/2016/09/trapped.html
भाग २
http://patil2011.blogspot.in/2016/09/trapped_18.html
भाग ३
http://patil2011.blogspot.in/2016/09/trapped_25.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा