मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

आकर्षक वेष्टन!



दोन तीन वर्षांपूर्वी ह्याच विषयावर एक पोस्ट लिहली होती. आता पोस्टला साधर्म्य असणारा शब्द स्फुट! पण स्फुट म्हटलं की एक किमान कलात्मक पातळी, साहित्यिक दर्जा असावी असा माझा समज! त्यामुळे मी आपला बापुडा ह्या लिखाणाला पोस्टच म्हणतोय!

IT सारख्या तुलनात्मकदृष्ट्या तरुण असणाऱ्या व्यावसायिक क्षेत्रात काम करताना मध्यंतरी आपण आता वयाने आणि विचाराने बुजुर्ग झाल्याची भावना वाढीस लागली होती. पण नंतर मग वयाने तरुण असणाऱ्या अनेक सहकाऱ्यांशी चर्चा करताना काही सुखद धक्के मिळाले. त्याचाच सारांश म्हणजे आजची पोस्ट!

चर्चेची सुरुवात झाली आकाशवाणी, दूरदर्शनपासून! जर शांतपणे बातम्या ऐकायच्या असतील, गाण्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर अजुनही आकाशवाणी आणि दुरदर्शनला पर्याय नाही! उगाच आरडाओरडा नाही आणि पाहुण्यांना बोलावून आपणच बोंबाबोब करण्याचा आक्रस्ताळेपणा / आगाऊपणा नाही! जीवन कसं शांत वाटतं! ५ मिनिटात मोजक्या पण महत्वाच्या बातम्या आणि त्यातसुद्धा शेवटच्या १ मिनिटात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा गोषवारा! सकाळी थोडं उशिरानं ऑफिसात जायचं असल्यानं रेडिओ चालू असतो आणि तो आम्ही बऱ्याच वेळा विविधभारती आणि मुंबई ब मध्ये फिरता ठेवतो. 

कार्यालयातील चर्चेत अजुन एक गोष्ट जाणवली. मुंबईबाहेर शहरात वाढलेली काही तरुण मुलं अजुनही पारंपरिक पद्धतीनं विचार करताना दिसतात. असाच एक मुलगा प्रत्येक पार्टीला येताना टाळाटाळ करायचा. जरा खोदून विचारलं असताना म्हणाला, "पार्टीतला धांगडधिंगा, नाचगाणी नाही जमत मला!" माझ्या मनातली गोष्ट थेट बोलला होता तो!

मग खोलवर विचार करताना काही गोष्टी जाणवतात. एक समाज म्हणुन आपण काहीसे loud बनत चाललो आहोत. आपण मुलांना ज्या प्रकारे सध्या वाढवतो आणि ज्या प्रकारे आधीची पिढी वाढली त्यात आमुलाग्र फरक दिसुन येत आहे. मूळ सत्व कमी प्रमाणात असलं तरी चालेल पण बाहेरचं आवरण आकर्षक असायलाच हवं असा गाढ समज एक समाज म्हणुन आपण करुन घेतला आहे आणि त्यामुळं सद्यकालीन प्रत्येक मुलं संगीत, चित्रकला, वक्तृत्वकला, नृत्य ह्या सर्व कलागुणांत प्राविण्य मिळविण्यासाठी झटत असताना दिसतोय! 

व्यावसायिक जगात नक्कीच स्वतःला presentable ठेवणं आवश्यक आहे. पण केवळ ह्या गुणांवर यशस्वी होऊ शकणाऱ्या मोजक्या जागा असतात. बऱ्याच जागी मूळ सत्व असणं आवश्यक आहे आणि जिथं वर्षानुवर्षांची मेहनत, संयतपणा ह्या गुंणाची आवश्यकता आहे. क्षणिक दिखाऊपणाला तिथं फारसं स्थान नाही. 

सारांश एकच - एक समाज म्हणुन आकर्षक वेष्टनाला आपण बहुदा गरजेपेक्षा जास्त महत्व देतोय! सध्या काही काळ हे सर्व खपून जाईल सुद्धा पण काही काळानं त्यावेळा आपल्याला वास्तवाची जाणीव होईल त्यावेळी कदाचित उशीर झाला असेल. आणि त्यावेळी कदाचित शांतपणे सुगम संगीत ऐकवणारी मुंबई ब सारखी स्टेशन अस्तित्वात सुद्धा नसतील!

(ह्या पोस्टमधल्या प्रतिमेतील दिसणाऱ्या व्हॉल्वचा रेडिओसारखा एक रेडिओ  आमच्या घरी जवळपास तीसवर्षे टिकला. वडिलांनी तो आमचे शेजारी जॉनी अंकल ह्यांच्याकडून जवळपास पाच सहा वेळा दुरुस्त करुन घेतला. ह्या रेडिओवरुन सकाळच्या सहा वाजता लागणाऱ्या मंगलप्रभात कार्यक्रमात लागणाऱ्या  "माझे माहेर पंढरी" ह्या भीमसेन जोशींच्या सुरेल आवाजातील गाण्यानं जाग येण्याचं भाग्य लाभणारी आमची सुदैवी पिढी!!) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...