मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

स्थलांतर!



मुंबईबाहेरील एखाद्या शहरास भेट दिली की काहीसं वेगळं जाणवतं. काहीसं वेगळं म्हणजे आयुष्य मुंबईत राहुन जितकं धकाधकीचं वाटतं तितकं सर्वत्र नाहीय, जगात जागेची कमतरता मुंबईत राहुन जितकी जाणवते तितकी सर्वत्र नाही ह्याची जाणीव होते. शांत जीवनाचं मुंबईच्या आसपासचं उदाहरण म्हणजे आमची वसई! पण तिथं चांगल्या नोकरीधंद्याच्या संध्या अजुन उपलब्ध नाहीत आणि नजीकच्या भविष्यात उपलब्ध होण्याची शक्यता कमी! त्यामुळं आयुष्यातील कित्येक वर्षे वसईच्या वास्तव्याशिवाय व्यतित करावी लागतात ह्याची मनाला खंत जाणवते. 
मग मनात विचार येतो तो अशा एखाद्या तुलनात्मक दृष्ट्या जागेची ऎसपैसता असणाऱ्या आणि रहदारी अजुनही काबुत असणाऱ्या भारतातील इतर शहरात नोकरीसाठी जाऊन वास्तव्य करण्याची मानसिकता  मुंबई आणि आसपासच्या भागातील तरुणांच्या मनात निर्माण झाली आहे का? थोडं खोलवर पाहिलं तर ह्यात जाणवणारे काही सूक्ष्म मुद्दे !

१> मी  मुंबई सोडुन भारतातील इतर शहर असा उल्लेख केला. 'मुंबई सोडुन भारतातील इतर शहर' आणि 'मुंबई सोडुन जगातील इतर शहर'
ह्या दोन पर्यायांमध्ये निर्णय घेण्याच्या दृष्टीनं नक्की फरक कोणता? व्हिसा मिळविण्याचा आणि आपल्या मुलाबाळांना कशा प्रकारे वाढवु शकु ह्याचा विचार करण्याचा?

२> भारतातील इतर शहर आणि पुणं ह्या दोन पर्यायांमध्ये  निर्णय घेण्याच्या दृष्टीनं नक्की फरक कोणता? जागतिकीकरणाचा अजुन किती अनुभव आपल्याला आवश्यक आहे की आपण महाराष्ट्रातील शहरे आणि महाराष्ट्राबाहेरील शहरे ह्यांना एका तराजूत मांडुन त्यांची तुलना करु शकु?

३> स्थलांतर करण्याच्या ह्या निर्णयामधील वसईसारख्या गावातून आलेल्या आणि आपल्या गावाशी घट्ट नाळ टिकवुन असलेल्या तरुणांची मानसिकता आणि मुंबईसारख्या शहरात वावरुन survival instinct ला जास्त महत्व देण्याची गरज भासण्याची शक्यता निर्माण झालेल्या तरुणांची मानसिकता ह्यातील फरक काय? आता मुंबईत पण पार्ल्यासारखी उपनगरं अजुनही आपली घट्ट ओळख (identity) टिकवून आहेत. तिथं लहानपणापासुन वाढलेल्या तरुणास हा स्थलांतराचा निर्णय घेताना बाकीच्या तरुणांपेक्षा काही वेगळंपण जाणवेल का?

४> ही जी पर्यायी शहरं मी म्हणतोय ती किती काळ मुंबईला भेडसावणाऱ्या समस्यांपासुन स्वतःला सुरक्षित ठेऊ शकतील? बंगलोर तर हळूहळू आवाक्याबाहेर जाऊ लागलंच आहे. हैद्राबाद आणि चेन्नईला किती वेळ लागणार?

५> समजा पती पत्नी पैकी एकालाच दुसऱ्या शहरात नोकरी / व्यवसायाची संधी मिळाली, तर घरकामाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सदस्यास बाहेरच्या समाजाशी सोशल लाईफ मध्ये एकरुप होण्यास वाव मिळेल का?

असे अनेक मुद्दे विचार करण्यासारखे! पण एक गोष्ट मात्र खरी! भारतातील इतर शहरांत जाऊन वास्तव्य करणाऱ्या तरुणांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच जाणार! आजही आपल्या प्रत्येकाच्या ओळखीतल्या बऱ्याच मराठी तरुणांनी हा निर्णय घेतला आहे. भौगोलिक अंतर जरी शेकडोच्या घरात असलं तरी विमानानं ही शहरं तासा- दोन तासांच्या अंतरावर आहेत!  

मी काहीसा एकांगी विचार करतो असं मला जाणवतं! संस्कृती एका बाजुला आणि व्यावसायिक संधी दुसऱ्या बाजुला असा पर्याय ठेवला असता आयुष्याच्या ह्या वळणावर मी व्यावसायिक संधींचा पर्याय निवडताना मला जाणवतंय! त्यामुळं दुसरी बाजू जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल!

आजच्या पोस्टचा सारांश - भविष्यात तुम्ही किंवा तुमची मुलं भारतातील इतर शहरांत जाऊन कायमचं वास्तव्य करण्याची शक्यता वाढीस लागणार! आणि मग बहुदा निवृत्तीनंतर सुद्धा ह्यातील काहीजण तिथंच राहतील! आणि मग हैदराबादेत "आयुष्याची सायंकाळ व्यतित करणारा मराठी म्हातारा" वगैरे पुस्तके प्रसिद्ध होतील! बाकी ती मराठीत होतील की तेलगुमध्ये? देव जाणे!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...