मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

Trapped - भाग ५


"आर्यन" मुलाचं नाव "आर्यन"! हॉलमध्ये मोठ्यानं उदघोषणा झाली आणि सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला. आपल्या आईच्या तब्येतीची खंत बाजुला ठेवून योगिनीनं आपल्या नवीन विश्वात प्रवेश केला होता. स्वामी अगदी सराईतसारखा सर्व नातेवाईकांशी मिळून मिसळून वावरत होता. 

बारसं आटपलं आणि सर्व पाहुणे आपापल्या घरी परतले. आर्यनला घेऊन मोठया आनंदात स्वामी आणि योगिनी घरी प्रवेश करते झाले. आर्यनच्या बाललीलांनी योगिनी अगदी मनापासुन खुश झाली होती. अचानक स्वामीला भ्रमणध्वनीवर फोन आला. 

"स्वामी, तुला दिलेली तीन वर्षांची मुदत आम्ही आता कमी करत आहोत. तुला पुढील महिनाअखेरी नवीन कामगिरीवर रुजू व्हावं लागेल." स्वामीचा बॉस निर्वाणीच्या स्वरात स्वामीला आज्ञा देत होता. स्वामीने फोन ठेवला आणि त्याच्या चेहऱ्यावर उदासीचं सावट पसरलं. "काय झालं स्वामी? " योगिनीने चिंतेच्या स्वरात विचारलं. ह्या क्षणी योगिनीला ह्यातलं काही सांगणं स्वामीला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळं त्यानं वेळ मारुन नेली. दिवसभर कार्यक्रमाच्या तयारीनं आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाने थकलेली योगिनी आर्यनच्या बाजुलाच काही वेळातच निद्राधीन झाली. रात्रीच्या चंद्राची किरणे त्या दोघांच्या निरागस चेहऱ्यावर पडली होती आणि त्या दोघांकडे पाहत रात्र जागवणाऱ्या स्वामीच्या मनात मात्र विचारांचं वादळ सुरु होतं. 

पुढील काही दिवस स्वामीचं ऑफिसातील काम खूपच वाढलं होतं. किंवा त्यानं योगिनीला तसं सांगितलं होतं. आणि मग तो दिवस उगवला. स्वामीनं आज सुट्टी घेतली होती. योगिनीने बाळाला चांगलं न्हाऊ घातलं आणि आर्यन काही वेळातच झोपी पुन्हा गेला. स्वामीने मग आपलं काम सुरु केलं. योगिनीचं डोकं अचानक दुखू लागलं. "स्वामी स्वामी बघ ना! मला काही विचित्रच होतंय!" घाबरीघुबरी झालेली योगिनी स्वामीजवळ आली. आणि स्वामीने बाम म्हणुन तिला आपल्याजवळील एक लोशन दिलं. त्या लोशनच्या प्रभावाखाली योगिनी चांगली दोन तासभर झोपली होती आणि त्या वेळात स्वामीने आपल्याला हवे ते बदल घडवुन आणले होते. 

योगिनी उठली ती अगदी भयभीत होऊनच! तिच्या आधीच्या सर्व  आठवणी जागृत झाल्या होत्या. स्वामीकडं ती भयानं पाहत होती. 
"घाबरू नकोस योगिनी!" स्वामीने अगदी आश्वासक स्वरात तिला म्हटलं. 

"तुला जे काही आठवतंय ते सर्व खरं आहे! पण तुझा हा स्वामी आता बदलला आहे!" स्वामीच्या ह्या बोलण्यानं योगिनी अजुनच गोंधळली होती. 

"आमच्या प्रयोगाची खरी मुदत तीन वर्षे होती पण आता अचानक मला पुढील तीन दिवसात सर्व काही सोडुन पृथ्वीवरुन निघुन जावं लागणार आहे! आणि आता मी जे काही धाडस करीत आहे त्याचा थांगपत्ता जर माझ्या वरिष्ठांना लागला तर कदाचित हे आपलं शेवटचंच बोलणं असेल!" 

"तू हे जे काही बोलत आहे ते मला अजिबात समजत नाहीये!" योगिनीला आता धीर आला होता. 
"तू कोणतं धाडस करत आहेस? तू तर इथं शांतपणे माझ्याशी बोलत बसला आहेस!" ती पुढं म्हणाली. 

"मूळ योजनेनुसार आर्यन तीन वर्षाचा झाला की मी ह्या देहातुन निघुन जाणार होतो आणि तुझा मूळचा स्वामी सक्रिय झाला असता. आणि आम्ही आर्यनला आमच्या पद्धतीनं निरीक्षणाखाली ठेवला असता. आणि तुझ्या स्मृतीचा तो भाग कायमचा नाहीसा केला असता." स्वामी बोलत होता. 

"पण मी तुझ्यात गुंतत गेलो ते पाहुन आमच्या वरिष्ठांनी माझी मुदत लवकर संपविण्याचा निर्णय घेतला आणि मी ह्या देहातून बाहेर पडताना हा देहच नष्ट करण्याचा निर्णय घेतला!" स्वामीच्या बोलण्यानं योगिनीला धक्क्यावर धक्के बसत होते. 

"त्यामुळं मी आज हे धाडसी कृत्य केलं! तुझ्या स्मृतीचा तो भाग सक्रिय केला आणि मी बाहेर पडताच तुझा मूळ स्वामी परतेल ह्याची योजना केली आहे!" 

"खरंतर ही गोपनीय माहिती परक्या व्यक्तीला कळली तर आमची सुरक्षाप्रणाली सक्रिय होते आणि मग ज्या परकी व्यक्तीला हे रहस्य माहित पडलं असतं तिचा मानवी जातीशी संपर्क उपलब्ध विविध मार्गांपैकी एखाद्या मार्गानं कायमचा तोडला जातो!" स्वामीच्या ह्या बोलण्यानं योगिनीच्या डोक्यात प्रकाश पडला होता. 

"माझी आई बरी होईल ना स्वामी?" योगिनीने काकुळतीला येऊन स्वामीला विचारलं. 

"मला वेळ मिळाला तर नक्की होईल! पण माझ्या प्राधान्यक्रमात ते पहिल्या तिघांत नाहीये! " स्वामी काहीशा कठोरतेने म्हणाला. 

"मी सध्या आमच्या सुरक्षाप्रणालीला छेद दिला आहे आणि त्यामुळं मी तुझ्याशी इतकं सारं बोलू शकत आहे!" 

"स्वामी, हो तू स्वामी - तूच इथे थांब ना!" योगिनीच्या डोक्यातील विचारचक्र अगदी जोरात चाललं होतं. 

"तुला काय वाटलं, माझा आधीचा स्वामी परत आणुन तू माझ्यावर मोठी कृपा करतोयस? अरे मी आधी त्याच्यात पूर्ण भावनिकदृष्ट्या गुंतले होते त्यावेळी तुम्ही त्याला परत नेलंस! नंतर तुम्ही माझ्या स्मृतीशी खेळलात आणि माझ्या विस्मृतीचा फायदा घेऊन तू मला माझ्यात गुंतवलंस! आणि आता सोयीस्कररित्या तू मला सांगतोयस की आपल्या मूळच्या स्वामीकडे परत जा! त्याच्यात गुंत! अरे स्त्री हृदयाचा काय खेळ मांडला आहे तुम्ही! " योगिनीचा हा अवतार स्वामीला पूर्णपणे अनपेक्षित होता. 

"तू जर इथं थांबू शकत नसशील तर आम्हां दोघांना सुद्धा तुझ्यासोबत घेऊन चल! तुझ्या विश्वात!!" योगिनीने आपल्या मनातील सर्व काही एका दमात बोलुन दाखवलं. 

"आर्यनला तर तसंही एके दिवस आमची लोक परत घेऊनच जातील!" स्वामी मोठ्या निर्विकारपणे म्हणाला. 

"का म्हणून!" योगिनी झोपलेल्या आर्यनकडे पाहत जवळपास ओरडलीच! 

"कारण तो आमचा आहे म्हणुन!" स्वामीच्या निर्विकारपणात काही फरक नव्हता. 

"तुमचा का म्हणून तुमचा?" योगिनीला अजून एक धक्का बसला होता. 

"त्याच्या बापाचं शरीर मनुष्याचं असलं तरी त्यात वास्तव्य करणारा मी परग्रहवासी आहे, हे गोष्ट विसरू नकोस योगिनी!"  स्वामीनं आपलं बोलणं जवळपास आटपत घेतलं. 

ह्या दोघांच्या जोराच्या बोलण्यानं आर्यनची झोप नाही म्हणा चाळवली गेली होतीच.

"आणि हो एक लक्षात ठेव! ह्या पुढं काहीही होऊ शकत. जरी मी तिसऱ्या दिवशी बाहेर पडणार असलो तरी कोणत्याही क्षणी मला परतावं लागण्याची शक्यता आहे! त्यामुळं All The Best!" स्वामीच्या डोळ्यात अश्रू खरोखर आले होते की आपल्याला भास झाला होता हे योगिनीला कळलं नाही!

(क्रमशः)


मागील भागाच्या लिंक्स
भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...