मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

'काहे दिया परदेस' च्या निमित्तानं !



काही अपरिहार्य कारणांमुळं Trapped कथा रखडली आहे. अशातच काल निऊने 'काहे दिया परदेस' चा विषय काढला. आणि मग ह्या मालिकेवर पोस्ट लिहिण्याव्यतिरिक्त पर्याय उरला नाही. 

मी मराठी मालिका पाहत नाही. म्हणजे स्वतःहुन पाहत नाही पण काही अपरिहार्य कारणांमुळं त्या माझ्या नजरेस पडतात. आणि माझा संताप होतो. मनोरंजन आणि समाजप्रबोधन ह्यांचा एकमेकांशी संबंध नसला तरी ठीक पण मनोरंजनाच्या माध्यमातुन आपण मोठ्या प्रमाणात मराठी कुटुंबांना आणि खास करुन गृहिणींना जुन्या मानसिकेत अडकवून ठेवत आहोत ह्याची जाणीव ह्या मराठी मालिकेच्या निर्मात्यांना नसावी ह्याचा प्रचंड खेद मला होतोय!

ह्या मालिकेतील उत्तर भारतीय कुटुंब अगदी खानदानी असल्याचा अभिमान त्या कुटुंबातील स्त्रियांच्या बोलण्यातुन जाणवतो. ह्याउलट मराठी कुटुंब आजुबाजूच्या कुटूंबांना डबे करुन पुरवणारे! उत्तर भारतीय कुटुंबाला आपल्या श्रीमंतीचा इतका अभिमान असेल तरीही उपजीविकेच्या माध्यमासाठी त्यांना मुंबईत यावं लागतं ह्याची जाणीव त्यांना कोणीही का करुन देत नाही? मराठी कुटुंबाच्या डबे बनविण्याविषयी माझा आक्षेप नाही पण कोणत्याही उद्योगास मोठं स्वरुप देण्याच्या वृत्तीचा जो अभाव बहुतांशी मराठी कुटुंबात आढळतो त्याचच प्रतिबिंब इथं दिसतं आणि मी खंतावतो!

एकंदरीत व्यावसायिक जगात वावरताना उच्चपदस्थ मराठी माणसं कमी प्रमाणात आढळताना दिसतात. त्याची मनात खंत असतेच आणि अशा वेळी मराठी मालिकांमध्ये उच्चपदस्थ मराठी माणसाचं वास्तववादी चित्रण क्वचितच आढळतं ह्याचा मोठा खेद होतो. "होणार सुन ह्या घरची" मध्ये एका यशस्वी मराठी उद्योजकाचे चित्रण दाखवलं गेलं पण ते वास्तववादी नव्हतं! सद्यकालीन ऑफिसात ज्या प्रकारचं वातावरण असतं त्याच्याशी १० टक्के सुद्धा साधर्म्य नव्हतं. बहुसंख्य मराठी गृहिणी ह्या मालिका पाहतात. आणि मागच्या काळात रमतात. आपली मुलं ह्या गृहिणी आणि आज्यांसोबत बराच वेळ काढतात. मुलं थोडी मोठी झाली की मग आपल्या काळासोबत न राहू शकलेल्या ह्या घरातील गृहिणी आणि आज्यांसोबत कनेक्ट होत नाहीत.

अजुन एक मुद्दा! बऱ्याच वेळा वास्तवात मराठी मुली परप्रांतीय मुलांशी संसार करताना आढळतात. पण त्या प्रमाणात परप्रांतीय मुली मराठी कुटुंबात लग्न होऊन येताना दिसत नाहीत. ह्यामागं नक्की काय कारण असावं? बाकी समाज ज्याप्रमाणात आपल्या घरातील मुलींना आपल्या ज्ञातीत विवाह करण्याचं बाळकडू देत असावा तितकं आपण देत नाही की मराठी मुली अधिक आधुनिक बनल्या आहेत? जाणकारांनी ह्यावर अभ्यास / विचार करावा आणि आपली मतं मांडावीत! 

घरात मराठी मालिका बघितलं जाण्याचं प्रमाण २० टक्के इतकं सिमीत ठेवावं आणि सर्व गृहिणींनी बाकीचा ८०% वेळ CNN, BBC, Discovery वगैरे वाहिन्या पाहण्यात घालवुन काळाच्या सोबत राहावं आणि आधुनिक जिजामाता बनावं असं मत व्यक्त करुन आजची पोस्ट संपवतो!

1 टिप्पणी:

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...