मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

पालकत्व - जुनं आणि नवं!




यंदा सोहम सातवीत पोहोचलाय! त्यामुळं मी सध्या आम्हां दोघांना मुरलेल्या पालकांत गणायला लागलोय! असंच कधीतरी मग आपलं लहानपण आठवतं. मग त्यावेळचं पालकत्व आणि आजचं पालकत्व ह्यात अभावितपणे मन तुलना करु लागतं. ह्यात एक स्पष्टीकरण असं की मी इथं जे काही जुन्या जमान्यातील पालकत्व उल्लेखतो आहे ते एकंदरीत त्याकाळच्या सर्व मध्यमवर्गीय पालकांचं एकत्रित पालकत्व आहे! 


सुरुवात राहणीमानापासुन! पूर्वीचा पालकवर्ग निःसंशयपणे अगदी साध्या राहणीमानाचा अंगिकार करणारा होता. हाताच्या बोटावर मोजण्याइतके कपड्यांचे जोड बाळगुन असणारा! आफ्टरशेव, जीन्स हे प्रकार साठीनंतर आपल्या मुलांकडून माहिती झालेला आणि अंगी अगदीच धीटपणा असेल तर ते स्वीकारलेला! 

ह्या काळातील बऱ्याच पालकांना एकत्र कुटुंबपद्धतीमुळे घरी निर्णयस्वातंत्र्य मिळण्यास बराच काळ लागला. त्यामुळं पालकत्व स्वीकारलंय पण हाती अधिकार नाही अशी परिस्थिती उद्भवली होती. कार्यालयात सुद्धा ह्यातील फार थोड्या जणांकडे मोठया हुद्द्याच्या जागा होत्या. त्यामुळं आपलं प्रभुत्व गाजविण्यासाठी त्यांना एकमेव संधी आपल्या पाल्याच्या रुपानं मिळत असे.  पण ह्या पिढीने त्याचा अतिरेक कधीच केला नाही. आपल्याला आयुष्यात जी उंची गाठता आली नाही ती आपल्या पाल्यांनी गाठावी अशी निर्व्याज भावना मनी बाळगुन त्यांनी हे पालकत्व निभावलं. 

ह्या पिढीनं आपल्या पालकांशी अथवा बॉससोबत स्वतः कधी मुक्त संवाद अनुभवला नव्हता. त्यामुळं मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांचा आपल्या मुलांशी संवाद काही प्रमाणात कमी व्हायचा. अभ्यास व्यवस्थित चालला आहे का वगैरे हे सहीसाठी आणलेल्या प्रगतीपुस्तकांवर कळायचं. मुलांच्या कपडा खरेदीचा प्रसंग बहुदा दिवाळी - दसऱ्याला उजाडायचा. मुलांच्या दृष्टीकोनातुन पहायला गेलं की साधारणतः आठवी नववीच्या आसपास मुलं पालकांपेक्षा मित्रांच्या सहवासात जास्त रमायला लागायची. आणि मग कळत नकळत आपल्या बाबांची दुसऱ्यांच्या बाबांसोबत मनातल्या मनात तुलना देखील व्हायची. आपल्या आईबाबांनी घेतलेल्या काही निर्णयांमागची खोलवर कारणं कळायचं ते वय नसायचं. त्यामुळं ह्या वयापासुन ते मग बहुदा लग्न होईपर्यंत आईवडिलांशी कुरबुरी व्हायच्या. ह्यातसुद्धा वडिलांशी जास्तच! कारण बिचारी आई - तिच्या आणि आपल्या समस्या बऱ्याच वेळा सारख्या असल्यानं तिची आपणास बरीच सहानभुती असायची!
काळ पुढे सरकत गेला आणि आज मागे वळून पाहता आपल्यातील प्रत्येकाच्या मनात आईवडिलांविषयी केवळ आदराची भावना आहे. त्यांनी आपल्या लहानपणी घेतलेला प्रत्येक निर्णय मागे वळून पाहता आपल्याला पटतोय. कदाचित अजुनही पटत नसला तरी त्यामागची त्यांची विचारधारणा समजतेय! आणि मग आता उरलंय ते एक केवळ आदराचं नातं!

आता वळुयात आजच्या पालकत्वाकडे! आज सर्वत्र पारदर्शकता हा मूलमंत्र बनला आहे. आपण घेतलेला प्रत्येक निर्णय का घेतला हे समजवुन सांगण्याची अपेक्षा जशी कार्यालयात असते तशी ती अपेक्षा आजकाल पिता ह्या भुमिकेत सुद्धा असते. थोडं विनोदी वळण! ही अपेक्षा पती ह्या भुमिकेत तेव्हाही नव्हती आणि आजही नाहीये! कारण आज पती ह्या भूमिकेत स्वतःचा निर्णय घेतोय कोण! 
आजच्या पिढीतील सर्वच पालक पूर्णपणे आधुनिक बनले आहेत असंही म्हणता येणार नाही. काहींजण दोन्ही विचारपद्धतीचा मिलाफ गाठुन आहेत. आधुनिक पालकत्वाचं अतिरंजित वर्णन म्हणजे नक्की काय? बाबा हा कूल असावा! त्याला नवी चित्रपटातील गाण्यावर डान्स करता यायला हवा! आयपॅड, मोबाईल ह्यांची लेटेस्ट मॉडेल्स त्याला माहित असावीत. परीक्षेतील मिळालेले कमी गुण त्याने मनावर घेऊ नयेत. उलट चुकून जर दुःख झालं असेल तर ते कमी करण्यासाठी त्याने सर्वांना हॉटेलिंगला बाहेर न्यावं. ड्रिंक्स न घेणारा बाबा म्हणजे थोडा जुन्या मताचा! 
असो आधी म्हटल्याप्रमाणे हे थोडं अतिरंजित वर्णन! पण एक गोष्ट मात्र खरी - आजचा बाबा हा मुलाचा मित्र असावा! तुम्हांला मित्र बनण्याच्या अनेक संधी असतात. त्याच्यासोबत खेळावं, त्याला न समजणारा विषय समजवुन द्यावा, आधीच अवास्तव अभ्यासाच्या दबावाखाली दडपून गेलेल्या पाल्यास एखादं प्रोजेक्ट वेळेत पुर्ण नाही झालं म्हणुन न ओरडता स्वतः पूर्ण करण्यास मदत करावी. जर तुम्ही अट्टाहासाने त्याला उच्चभ्रु शाळेत टाकलं असेल तर केवळ तिथली आकाशाला भिडणारी फी भरली की आपलं कर्तव्य संपलं असं समजु नये. तिथल्या मुलांचे राहणीमान कसं असतं, तिथली मुलं उन्हाळ्यात सुट्टीस कोठे जातात ह्या सर्व बाबींचा अभ्यास करावा! जमल्यास आपण त्या गोष्टी कराव्यात. जमत नसेल तर एक तर मुलाला विश्वासात घेऊन सगळी वस्तुस्थिती स्पष्ट करुन सांगावी अन्यथा सरळ आपल्या परिस्थितीला अनुरुप अशा शाळेत टाकावं. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाचा आत्मसन्मान कमी होऊ देता कामा नये. आत्मसन्मानाशिवाय मोठं होणं हा प्रकार चुकीचा असला तरी तो मागच्या पिढीत चालुन गेला कारण स्पर्धा इतकी तीव्र नव्हती आणि हे दुःख कमी करायला संगत मिळायची. पण आजच्या पिढीत मात्र आत्मसन्मानाशिवायआपल्या मुलांस वाढताना पाहिलंत तर लगेचच जागे व्हा आणि योग्य उपाययोजना करा! आजच्या जगाची एक चांगली बाजु म्हणजे तुम्ही कोणताही पेशा निवडा आणि त्यात सर्वोत्तम बनाल तर तुम्हांला धन, मान-सन्मान सर्व काही मिळतं. त्यासाठी केवळ पुस्तकाचाच आधार घ्यावा लागतो असं नाही. 
पूर्वी असं म्हणायची पद्धत होती की वडिलांच्या पायातील वहाण मुलाला यायला लागली की त्याला मित्र समजा! आज मी असं म्हणेन ज्या दिवशी तुमचा मुलगा तुम्हांला मोबाईल, आयपॅडचं एखादं फीचर समजावुन सांगेल त्यावेळेपासुन त्याला मित्र समजायला सुरुवात करा! जाता जाता हे ही सांगायला हरकत नाही की आमच्या बाबतीत ह्या गोष्टीला बरीच वर्षे उलटून गेली! पण अजुनही एकोणतीस सक ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र मीच आधी देतो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...