ह्या आठवड्यात आमच्या शाळेच्या ग्रुपवर १० च्या क्लासविषयी एक चांगली चर्चा झाली. त्या निमित्ताने हे दोन (?) शब्द.
आपण
सर्व १० वी झालो झालो त्यावर्षी म्हणजे
१९८७ - ८८ साली ((सुजित देवकरचा सन्माननीय अपवाद वगळता) प्रामुख्याने चार क्लास वसईत होते. परुळेकर सर, फडके सर,
भिडे सर आणि मोदगेकर सर.
आता माझ्या आधीच्या
अभ्यासपद्धतीकडे! मला काहीजण पुस्तकी किडा म्हणायचे! मी अभ्यास सोडून बाकी
काही करायचो नाही म्हणुन! आमच्या आजोबांनी मांडलईतील घरापासुन दूर येऊन
रमेदीला घर बांधलं. घरात मी आणि माझा मोठा भाऊ अशी दोनच मुलं बाकी सर्व
बहिणी. आणि माझी आई बऱ्यापैकी कडक आणि त्यामुळे माझा बाहेरच्या नॉर्मल
(खट्याळ असे वाचा) मुलांशी संपर्क कमी आला. घरी आलो की गल्लीतील मुलांसोबत
क्रिकेट खेळून मग मागच्या वाडीत बाकी भावंडासोबत खेळणं ह्याच करमणुकीचा
मार्ग असे! ह्या सर्व घटकांमुळे मी बाकीचा वेळ अभ्यासात घालवत असे. सर्व
पुस्तक पाठ करण्यावर माझा भर असे.
बाकी आठवीची परीक्षा
सुरु असताना मीना म्हात्रे मॅडम ह्यांनी मी मोदगेकर सरांचा क्लास जॉईन
करावा ह्यासाठी माझ्याशी बोलणं केलं. त्यांचे यजमान हे माझ्या आईचे
मावसभाऊ! पण आम्ही आधीच फडके सरांना शब्द दिला आहे असे मी त्यांना
सांगितलं.
नववीत जेव्हा फडके क्लास सुरु झाला तेव्हा प्रथमच वारंवार पारनाक्यावर जाण्याचा प्रसंग आला. तिथं राकेश आणि योगेशला पाहुन माझा जीव भांड्यात पडला. बहुदा संतोष भांडारकर सुद्धा होता. नववीच्या डिसेंबर मध्ये फडके सरांनी माझा दहावीचा भूमितीचा पहिला धडा घेतला. नववीची वार्षिक परीक्षा सुरु होण्याआधी त्यांनी मे महिन्यात सुट्टी वगैरे विसरुन जा असा प्रेमळ सल्ला मला दिला होता. नववीची परीक्षा शुक्रवारी संपणार होती. शनिवार रविवार मनसोक्त (??) मजा करुन घे असे त्यांनी मला सांगितलं. सोमवारपासून त्यांनी मला सकाळच्या म्हणजे बहुदा सव्वासहाच्या बॅचला येण्यास सांगितलं. ही बॅच आठच्या सुमारास संपायची. राकेश आणि बाकी शाळेतील मंडळी आठच्या बॅचलाहोती. माझी बॅच संपली की मी सरांच्या घरी अभ्यासाला जाऊन बसायचो. एप्रिलमधल्या त्या सोमवारी सरांनी मला दहावीचा इतिहासाचा पहिला धडा शिकविला. आणि दुसऱ्या दिवशी त्यावरील सर्व प्रश्नोतरे पाठ करुन येण्यास सांगितलं. मी त्यादिवशी दुपार, संध्याकाळी जीवाचा आटापिटा करुन हे कसबसं पाठ केले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सरांच्या घरी गेल्यावर त्यांनी हे माझ्याकडुन म्हणवुन घेतलं.
हे सत्र मे महिनाभर सुरु राहिलं. मे महिन्यात माझा दहावीचा जवळपास ७० ते ७५
टक्के अभ्यास करुन घेण्यात आला होता. जोवर फक्त क्लास सुरु होता तोवर मी
अगदी एकाग्रतेने अभ्यास करत होतो. पण शाळा सुरु झाली आणि सुरुवातीपासुनचे
धडे शिकविण्यास आरंभ झाला. आणि मी गोंधळून गेलो. हे तर सर्व आपल्याला येत
आहे असे मला वाटू लागलं. आणि शाळा सुरु झाल्याने सरांनी सुद्धा थोडी सूट
दिली. त्यात मग १९८७ चा रिलायन्स वर्ल्ड कप आला. आणि माझं लक्ष पुर्णपणे
उडालं. एकदा दिवाळीच्या सुट्टीत मृणाल मॅडमनी मला दुपारी अभ्यास करुन यायला
सांगितलं होतं आणि त्यादिवशी नेमका गावसकर न्यूझीलंडची गोलंदाजी चोपून
काढत होता. मी त्यादिवशी दांडी मारली. मग दुसऱ्या दिवशी मृणाल मॅडमनी जो
ओरडा दिला तो अजुनही माझ्या लक्षात आहे. मृणाल मॅडमना मी अजुनही वर्षातून
एकदा फोन करतो. तेव्हा त्या मध्येच आठवण येऊन त्या म्हणतात, "तू दहावीत
थोडं अजुन मनावर घ्यायला हवं होतं!"
१ जानेवारीपासुन दहावीचे पेपर सोडवावे लागतील ह्याची सरांनी मला आधीपासुन कल्पना देऊन ठेवली होती. त्यानुसार त्यांनी १ जानेवारीला मला बीजगणित आणि भुमिती हे दोन पेपर सोडवायला दिले. जर मी त्यांच्या नियोजनानुसार वर्षभर अभ्यास केला असता तर १ जानेवारीपासुन दररोज एक पेपर सोडविणे सहजशक्य होते. पण मधल्या काळातील माझ्या काहीशा दुर्लक्षामुळे मी दररोज पेपर सोडविण्याच्या परिस्थितीत नव्हतो. आतापर्यंत मी सर्व पुस्तक लक्षात ठेऊन परीक्षा द्यायचो. म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी माझे सर्व धडे बऱ्यापैकी पाठ असायचे आणि गणिताच्या पेपरच्या आधी मी सर्व प्रकारची गणिते सोडवून पाहायचा प्रयत्न करायचो. मला दहावीच्या परीक्षेआधी ही स्थिती आणायची होती आणि त्यामुळे मी दररोज पेपर सोडविण्याच्या सरांच्या योजनेच्या विरुद्ध होतो. त्यामुळे जानेवारी - फेब्रुवारीमध्ये मी जवळपास बंडखोरी केली आणि तीन चार दिवस पेपर सोडविलेच नाही. पुन्हा मग चौधरीसर आणि माझे वडील सरांना जाऊन भेटले आणि सरांनी पण मला माफ केलं. त्यानंतर परीक्षा जवळ आल्यानं शेवटी सरांनी माझ्या कलाने घेतलं.
आता ह्यातील प्रत्येक क्लासच्या पद्धतीविषयी! फडके सर पाठांतरावर जास्त भर द्यायचे असा आक्षेप घेतला जातो. पण मी त्यांच्या घरी अभ्यासाला बसलो असताना त्यांच्याकडे अनेक असे पालक यायचे ज्यांची मुले अतिशय द्वाडपणा करायची. त्यातील काहीजण दोन तीन वेळा दहावी नापास सुद्धा झालेली असायची. पण सरांच्या धाकाने हीच मुले पास होताना सुद्धा मी पाहिलं आहे! त्याचप्रमाणे हुशार मुलांकडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेण्यात सुद्धा सरांची खासियत होती. संपुर्ण महाराष्ट्रात पहिली आलेली सरांची मुलगी साधना फडके आणि दहावा आलेला विजय फडके ही त्याची उदाहरणे आहेत. आयुष्यात तुम्हांला यश मिळवायचे असेल तर गुणवत्तेसोबत शिस्तसुद्धा आवश्यक आहे - सरांनी हे वाक्य प्रत्यक्ष बोलुन दाखवलं नसलं तरी नंतर कधीतरी ते मला समजलं आणि आजही मी त्या शिकवणीचे पालन करायचा प्रयत्न करतो. गुणवत्तेची व्याख्या आयुष्यात बदलत राहते; शालेय जीवनातील गुणवत्ता बाह्य जीवनात त्याच पातळीवर सतत राहू शकत नाही.
परुळेकर सरांची शिकविण्याची पद्धती वेगळी होती. त्यांचा दहावीचा क्लास सकाळी सहा वाजता सुरु होऊन बहुदा साडेदहाच्या आसपास चालू राहायचा. विद्यार्थ्यांना विषय पुर्णपणे समजायला हवा ह्यावर सरांचा खास भर असायचा. त्यामुळे एकाही विद्यार्थ्याला एखादी शंका असली तर तिचे पुर्णपणे निरसन झाल्याशिवाय ते पुढे जात नसत असे ऐकिवात आहे. सकाळी सहा वाजता उठुन चार तास क्लासमध्ये बसायला लागणारी मुले अधुनमधून पेंगुळत! मुलांना त्यांच्या आडनावाने आदरार्थी संबोधिण्याची त्यांची पद्धती असायची असे माझ्या भावाकडून मी ऐकलं होतं. आणि त्यामुळे "पाटील - आपण आता झोपू नये!" असे ते म्हणाले असतील असं मला उगाचच वाटत राहते.
भिडे सर त्यावेळी सुद्धा आमच्याशी अगदी मस्त कनेक्ट व्हायचे. ते आपल्या वयाचेच आहेत अशा प्रकारे त्यांच्या बोलण्यात मोकळेपणा असायचा. आज इतकी वर्षे झाली तरी त्यांचा मनाचा चिरतरुणपणा कायम आहे. आयुष्यातील प्रत्येक दिवस उत्साहाने जगण्याची उमेद शिकावी ती सरांकडून! मध्यंतरी माझ्या ब्लॉगमध्ये निराशावादी विचारांचा प्रभाव दिसल्यावर त्यांनी माझ्या आईवडिलांना भेटुन आदित्यावर लक्ष ठेवा असं खास बजावुन सांगितलं होतं. त्यांनी शिकविलेल बीजगणित, भुमिती अजूनही इतकं पक्कं आहे की मुलाचा अभ्यास मी आत्मविश्वासाने घेऊ शकतो.
मोदगेकर सरांच्या क्लास मध्ये स्वतः सर, सापळे मॅडम, राऊत सर, पाटील सर ह्या सारखे दिग्गज शिक्षक होते. ह्यातील प्रत्येक सर हे आपआपल्या विषयात ऋषीतुल्य होते.
कालच्या चर्चेत थोडी अ वर्ग विरुद्ध ब वर्ग अशी पण गमतीदार चर्चा झाली. मजेशीर बाब म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा ह्या गोष्टी काहीजणांच्या लक्षात राहतात. शालेय जीवनातील गुण ही आयुष्यात तुमची कामगिरी ज्यावर मोजली जाऊ शकते अशा शेकडो गोष्टीपैकी एक आहे. पुढील आयुष्यात प्रत्येकजण आपल्याला हवा तो मार्ग स्वीकारतो आणि आपआपल्या परीने यशस्वी होतो! आमच्या शाळेत अगदी द्वाड समजला जाणारा अभिजित आज ऑस्ट्रेलियात एका नामांकित पंचतारांकित हॉटेलात चीफ शेफच्या भूमिकेत काम करतो आणि तेंडूलकर आणि सर्व भारतीय संघांशी ओळख ठेऊन आहे.
शेवटी आयुष्याची वर्षे जसजशी सरत जातात तसतशी जो माणुस रात्री सुखाने झोपु शकतो तो सर्वात सुखी अशा निष्कर्षापर्यंत आपण येतो! असो पुज्य अशा गुरुजनांची आठवण करुन देणाऱ्या परवाच्या त्या whatsapp चर्चेचे आभार!
|
गुरुवार, ९ जून, २०१६
दहावीची शिकवणी !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ज्ञानामृताचे (हेवी) डोस
दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...
-
लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर जुन्या आठवणी जागृत झाल्या. २००० साली प्रथमच परदेशी दौऱ्यावर हीथ्रो विमानतळावर उतरलो होतो. त्यावेळी स...
-
नुकत्याच आटोपलेल्या बारा दिवसांच्या युरोप दौऱ्यानंतर मनात अनेक सकारात्मक भावना दाटल्या आहेत. भव्य ऐतिहासिक वास्तू, निसर्गाची डोळ्यात साठवून ...
-
युरोप सहलीचा बेत खरं तर २०२० मध्ये आखला होता. त्यावेळी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडचा व्हिसा मिळाला सुद्धा होता. शेंघेन व्हिसासाठी कागदपत्रांची ...
छान लिहिलंय.
उत्तर द्याहटवाएकदम जुन्या जमान्यात घेऊन गेलास रे!! मस्त!!
उत्तर द्याहटवाBeautiful ...
उत्तर द्याहटवा