मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १ मे, २०१६

वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ७





वीणा वर्ल्डच्या इतिहासात आम्ही प्रथमच आंघोळ न करता बाहेर पडणार होतो. जंगलात भयंकर धुळ उडण्याची शक्यता लक्षात घेता सफारी नंतर परतल्यावरच आंघोळ करणे कसे सयुक्तिक ठरेल ह्यावर सचिनने अख्खी अडीच मिनिटे खर्च केली होती. सकाळी साडेपाच वाता नाही म्हणा कितीजणं आंघोळ करून तयार झाली असती हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. 

इतक्या भल्या पहाटे उठण्याची सवय नसल्याने काहीसे संभ्रमावस्थेत असलेले  चेहरे! 

 

सचिन मानगावकर ह्याची मी गेले एक दोन भाग काहीशी थट्टामस्करी करतोय. तो बिचारा ह्या सर्व पोस्ट्स वाचुनसुद्धा खिलाडूवृत्तीने दाद देतोय. ह्याबद्दल त्याचे खास आभार! आता असे आभार मानल्यावर ह्या भागात सुद्धा थट्टामस्करी करण्याचा हक्क मला प्राप्त होतोय, हो की नाही सचिन!

तर मग आदल्या रात्रीच्या मॅरेथॉन वर्णनात त्याने अजुन एक उल्लेख केला होता. नवरा - बायको, मुलं सर्वजण एकाच जीपमध्ये असतील ह्याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. हे सर्व काही वन्यअधिकाऱ्यांच्या हातात असतं. त्यामुळे सकाळी हॉटेलच्या बाहेर निघताना जशी नावे घोषित होतील त्याप्रमाणे मुकाट जीपमध्ये बसा असे त्यानं सांगितलं होतं. "बायको बसलेल्या जीपवर वाघाचा हल्ला आणि नवऱ्याची जीप दुर असल्याने तो असहाय्य!" किंवा "नवरा आणि वाघाचा जोरदार संघर्ष आणि दुरवर असलेल्या बायकोची जोरदार आरडाओरड!" असा मुंबई सकाळमधील संभाव्य मथळा आमच्यापैकी किती जणांच्या नजरेसमोर झळकला देव जाणे!

सहा वाजता येणाऱ्या जीप येता येता सव्वा सहा झाले. सचिन आणि मीनल तारकर एका जीपमध्ये आणि श्रीया दुसऱ्या जीपमध्ये अशी विभागणी झाल्याने तारकर जोडपं थोडं व्याकुळ झालं. आधुनिक पिढीची प्रतिनिधी श्रीया मात्र बिनधास्त होती. आम्हांला सात क्रमांकाची जीप मिळाली होती आणि बाकीच्या जीपमध्ये सर्वजण स्थानापन्न झाले तरी आमच्या जीपचा पत्ता नव्हता. सर्व जीप सुटून आम्हीच फक्त आवारात राहिलो. आणि मग शेवटी एकदाची आमची जीप आली. आमच्या जीपमध्ये आम्ही तिघे, आतीष आणि सातारकर कुटुंबियातील दोन आजीबाई होत्या. आमचा ड्रायव्हर हाच पुढे आमचा मार्गदर्शक बनला. 

फक्त सचिनच नव्हे तर विक्रांत आणि आतीष सुद्धा आम्हांला गर्भित धमक्या देण्यात अधुनमधून सामील होत. आपलं हॉटेल अगदी थेट जंगलात आहे. रात्री सात वाजल्यानंतर हॉटेलच्या कंपाउंडच्या बाहेर पडू नकात. वन्य प्राण्यांचा संचार इथं जाणवतो. त्यांनी आम्हांला आदल्या दिवशी रात्रीच सांगितलं होतं. त्यामुळे त्या कंपाउंडकडे मी मोठ्या आदराने पाहुन घेतलं होतं. सकाळी पावणेसहा वाजता सर्व एकत्र जमल्यावर काल रात्री बराच उशिरापर्यंत कंपाउंडच्या बाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता असे विक्रांत छातीठोकपणे सांगत होता. तिथं काहीतरी "Wildlife activity" चालली होती असं तो म्हणाला. मला activity ह्या शब्दाचा असला वापर भारी आवडला. हल्ली सोहम अभ्यासाला बसला की मी त्याची "अभ्यास activity चालली आहे" असे म्हणतो. माझं आणि प्राजक्ताचा विवाद चालु असताना "आपली शाब्दिक चकमक activity चालली आहे" असं म्हणण्याचा मला जबरदस्त मोह होतो. पण त्यामुळे ही शाब्दिक चकमक गंभीर स्वरुप धारण करण्याचा धोका असल्याने ते मी टाळतो. 

नंतर मग जबरदस्त धुळ वगैरे उडाली तर मग फोटो खराब येतील आणि मग फेसबुकवर वगैरे टाकता येणार नाहीत म्हणुन आधीच एक सेल्फी काढुन घेतला. पाच सहा दिवस संगणकापासुन दुर राहिल्यानं आणि वीणा वर्ल्डच्या सकस आहारामुळे चेहऱ्यावर टवटवी आली होती.




सकाळचे वातावरण अगदी प्रसन्न होते.


मध्येच एका वृक्षावर मधमाशांनी केलेली असंख्य मधाची पोळी!


अमेरिकन इमिग्रेशनच्या कठोरतेला तोडीस तोड अशी ज्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे त्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कातील सुरक्षा अधिकाऱ्यांची छावणी! माझा आधार कार्डावरील फोटो आधीच संशयास्पद! त्यात हे असे अधिकारी त्यामुळे मी काहीसा चिंतेत पडलो होतो पण एकदाची ही तपासणी पार पडली आणि आमची जीप जिम कॉर्बेट अभयारण्यात शिरली.





एक प्रसन्न मुद्रा!


एक Random Click!


जीप भरमसाट वेगाने जंगलात सुसाट निघाली होती. इथं पायी चालणं धोक्याचं आहे अशा पाट्या सुरुवातीला काही ठिकाणी दिसल्या पण त्यानंतर मात्र ह्या पाट्या गायब झाल्या. मागच्या रस्त्याचं हे एक विहंगम दृश्य! "इस मोड से जाते है कुछ सुस्त कदम रस्ते" ह्या गाण्याची आठवण करुन देणारं!


अचानक आमच्या जीपच्या उजव्या बाजुला आम्हांला दुरवर एक तस्कर (रानटी हत्ती) दिसला. हा मस्तपैकी झाडाची पाने आपल्या सोंडेने खात होता. त्याच चित्र घ्यायचं राहुन गेलं. 


आणि मग तो चित्तथरारक प्रसंग आला. आमच्या पुढे गेलेल्या पाच सहा जीप्स अगदी निःशब्दपणे थांबल्या होत्या. सर्वांचे लक्ष उजवीकडे होते. आमच्या गाईड कम ड्रायव्हरने आपली जीप थांबवली. आणि आम्हांला वाघाची जोरदार डरकाळी अगदी जवळून ऐकायला आली. वाघ अगदी पाच ते सात मीटर अंतरावर ह्या चित्रातील झुडूपात होता. आणि अगदी काही क्षणातच हरीण्याच्या केविलवाण्या ओरडण्याचा आवाज आला. त्या वाघाने त्या हरिणाला पकडलं होतं काय? हो नक्कीच असे मानण्यास पुर्ण वाव होता. पण प्रत्यक्ष नजरेने पाहिल्याचा पुरावा नसल्याने मी तसला दावा करणार नाही.  काही क्षणात वाघाची अजुन एक डरकाळी ऐकण्यास आली. मन धन्य धन्य झालं.

आमच्या पुढच्या जीप्स काही मिनिटे आधी येऊन थांबल्या होत्या. त्यातील काही जणांनी वाघाच्या डोक्याचा मागचा भाग दिसल्याचा दावा केला. ह्यात खऱ्या वाघाचा भाग किती आणि त्यांच्या कल्पनाशक्तीचा वाटा किती देव जाणे!  आशावादी माणसे पुढील दहा मिनिटे वाघाची वाट पाहत राहिली. पण बहुदा तो आतल्या भागात गेला असावा. काहीशा निराश मनाने पुढे जाण्याच्या गाईडच्या प्रस्तावाला आम्ही मान्यता दिली.

समजा हा वाघ बाहेर निघाला आणि जीपवर त्याने हल्ला केला तर? आतापर्यंत असं झालं नाही म्हणुन आपल्याबाबतीत असे होणार नाही अशा गृहितकावर आपण सर्व उघड्या जीपमधुन घनदाट जंगलात जाण्याचे धारिष्ट्य करतो. बाकी सहजासहजी हरीणांचे खाद्य उपलब्ध असल्याने वाघ माणसाच्या मागे जाणार नाही असाही एक विचारप्रवाह!


नुकत्याच उगवलेल्या सुर्याचे एक लोभस दर्शन!




मग रानडुकरांनी (Wild Boar)आम्हांला दूरवरून दर्शन दिलं.







जंगलातील रानकोंबडा! सफरीच्या आरंभीच्या भागात हे असे अनेक वेळा दिसत राहिले.



आतल्या बाजुने गेलेल्या ओहोळाच्या निर्जल पात्रात दिसलेला हा मोर! ह्या मोराचे दर्शन घेण्यात आम्ही रंगलो असता त्याच्या मागुन येऊन एक मोठाले हरीण हा ओहोळ पार करुन गेलं. 



असाच एक पक्षी टिपण्याचा हा प्रयत्न!



जसजसं जंगलात आत गेलो तसतसं पक्षी रस्त्याच्या मधोमध येऊन आम्हांला दर्शन देताना आढळले.


आता पाणवठ्याची जागा जवळ येऊ लागली होती. त्याआधी आमच्या मार्गदर्शकाच्या म्हणण्यानुसार वाघाचे हे ठसे!


रस्ता पार करणारा मोर!





हा दिसलेला एक पक्षी!




आता दिसलेली ही पाणवठ्याची जागा! इथं जर तुम्ही बराच वेळ थांबुन बसलात तर तुम्हांला वन्यप्राणी नक्कीच दिसणार!





इथ आम्हांला हरीण आणि तिच्यापासुन दुरावलेलं तिचं बछडे हे दोन्ही दिसत होते. जीपच्या आवाजाने माता हरीण दूर जात होते.
एकंदरीत सुमारे तीन तासांच्या सफारीतील दीड तास होत आला होता आणि एका विश्रांती थांब्याची वेळ झाली होती. विश्रांती थांब्याच्या ठिकाणचे हे छायाचित्र!

पुन्हा आम्ही सफारीसाठी सज्ज झालो होतो.


लांडोरीला प्रभावित करण्यासाठी आपला पिसारा फुलवून नाचण्याच्या तयारीत असणारा मोर!


पाणवठ्याच्या पात्रातून दुसऱ्या बाजुने जाताना दिसलेला हरणांचा कळप!


माकडांची भरलेली सभा!

एकमेकांत गुंतलेल्या झाडांचं हे छायाचित्र!


selfi in core jungle !





आम्ही अगदी बाहेर पडायला येणार त्यावेळी आम्हांला अनेक जीप्स थांबलेल्या दिसल्या. हत्तींच्या कळपाने नुकताच रस्ता पार केला होता. नंतर जेवताना तारकर म्हणाले की त्यांच्या मार्गदर्शकाने फार लांबुनच फांद्या मोडत येणाऱ्या हत्तींच्या कळपाची चाहूल घेतली होती. त्यामुळे त्यांनी मग जीप्स आधीच थांबविल्या. आम्हांला येण्यास पाच मिनिटांचा उशीर झाला होता. 
ह्या हत्तींच्या कळपांना माणसांचे जंगलातील वास्तव्य आवडत नसावे. ह्या कळपांनी सफारी जीप्सचा पाठलाग केल्याच्या बऱ्याच घटना ऐकायला मिळतात. हे ड्रायव्हर तज्ञ असतात आणि त्यामुळे असा हल्ला झाल्यास गाडी जोरात रिवर्स गेर मध्ये घेऊन हत्तींपासून आपला बचाव करुन घेण्याचे तंत्र त्यांनी अवगत करुन घेतलं असतं. 

अशा प्रकारे आमची सफारी संपली आणि आम्ही हॉटेलात परतलो. एक त्या दहा मीटरवरुन ऐकलेल्या वाघाच्या डरकाळीव्यतिरिक्त तशी निराशाच झाली. परंतु पहिल्याच फेरीत वाघाचे दर्शन होईल अशी अपेक्षा बाळगणे चुकीचं! काही गाईड जवळपास साठ सफारी करुन सुद्धा त्यांना फक्त तीन वेळा वाघ दिसला आहे तर त्याहून अधिक फेऱ्या मारून सुद्धा वाघाचे दर्शन न होणारी माणसं सुद्धा आहेत. जंगल कसं असतं ह्याचा अनुभव मात्र न विसरण्याजोगा होता. कोणीतरी मध्ये म्हणालं की अचानक इतक्या मोठ्या संख्येने जीप्स जंगलात शिरल्यानं वन्य प्राणी काहीसे अतिदक्ष होतात आणि जीपच्या मार्गापासुन लांब निघुन जातात. सर्वात जास्त wildlife activity सुर्यास्ताच्या आणि सुर्योदयाच्या आसपास होत असावी असा अंदाज आणि त्यामुळे सकाळी जितकं लवकर निघता येईल किंवा सायंकाळी जितकं जास्त रेंगाळता येईल तितकं तुम्ही सुदैवी ठरण्याची शक्यता जास्त. सफारीमध्ये काहीसा व्यावसायिकपणा आलेला असतो. कसंही करुन ठरविला गेलेला मार्ग इतक्या वेळात पार पाडायचा हे उद्दिष्ट असतं. त्यामुळे एखाद्या विशिष्ट स्थळी मनसोक्त वेळ घालविण्याचा पर्याय आपणासमोर नसतो. एक सरकारी निवासस्थान अगदी सफारीच्या आतल्या भागात दिसलं तिथं रात्रीचा मुक्काम केल्यास नक्कीच वन्यप्राण्याचं जीवन अधिक जवळुन पाहता येणार. जिम कॉर्बेटच्या प्रथमदर्शनाने मी खुप खूप प्रभावित झालो हे मात्र खरं! अजुन ह्या ठिकाणी अनेक वेळा यायचं. अगदी कोअर भागात जाण्याची परवानगी घेऊन मनसोक्त फिरायचं असा निर्धार करुन ठेवलाय का बरं मंडळींनो ! आणि हो कॅमेरा सुद्धा जरा जातिवंत असावा! छायाचित्र कोणत्या पक्षी / प्राण्याचे काढले आहे हे सांगण्यासाठी शब्दांचा सहारा घेण्याची गरज भासता नये! 

हॉटेलात आलो होतो. मनसोक्त नाश्ता केला. उन्हात खेळणाऱ्या मुलांना ओरडण्याची खुमखुमी मी प्रयत्नपुर्वक टाळू शकलो नाही. नाराज चेहऱ्याने मुले आपापल्या घरी गेली.


हॉटेलचा प्रत्येक कानाकोपरा छायाचित्रात आलाच पाहिजे ना हो राव ! 
हॉटेलच्या कंपाउंडच्या पलीकडील प्रदेश! काल रात्री इथं wildlife activity झाली असं मी मनाचं जोरदार समाधान करुन घेतलं.
११ ते १२ धुळीने माखलेल्या कपड्यासहित बिछान्यावर झोप काढली. स्नान वगैरे आटोपून परत डायनिंग विभागात जाताना १२:३० चा मुहूर्त चांगलाच चुकला होता. सर्व मंडळी जेवण आटपून रुमवर परतायच्या तयारीत होती तर आम्ही बॅग्ससहित जेवणास आलो होतो. पुन्हा एकदा स्वादिष्ट जेवण होतं. ह्या टस्कर हॉटेलचा खानसाम्याला खरोखर आदरपूर्वक सलाम! जेवण चविष्ट तर नक्कीच होतं पण त्यात आरोग्यपुर्णता शिगोशिग भरली होती. आज जेवणाचा मेनु चायनीज फ्राइड राइस, चिकन करी, पालक पनीर असा होता आणि मग जोडीला चॉकोलेट आईसक्रीम सुद्धा होतं. बस दोन वाजता निघणार होती. स्वागतकक्षातच फक्त हॉटेलच वाय - फाय नेटवर्क मिळायचं. त्यामुळे बाकीच्या भव्य परिसरात एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणारी मंडळी स्वागतकक्षात आली की अबोल व्हायची! 

बहुदा सोहमची कॅमेरासमोर पोझ देण्याची क्षमता एव्हाना संपुष्टात आली होती. त्यामुळे मी भ्रमणध्वनी घेऊन फोटो घेऊ पाहतोय हे समजताच त्याने घेतलेला पळण्याचा पवित्रा!


आणि ओहो सोहम गायब! 

आता जवळपास एक तासाचा बसचा प्रवास होता. मागच्या भागात वर्णन केल्याप्रमाणे ह्या नॅशनल पार्कची सहा प्रवेशस्थाने आहेत. आमचं कोणतं ते मी विसरलो. पण आता आम्ही दुसऱ्या एका प्रवेशद्वाराकडे निघालो होतो. इथं होतं ते एक प्रसिद्ध म्युझियम ज्यात मृत प्राण्यांच्या देहात भुसा भरुन त्यांना कायमरुपी अस्तित्व प्रदान करण्यात आलं होतं. 

ह्यातील दोन वाघांचे देह महाकाय होते. जवळपास बारा ते तेरा फुटांहून जास्त लांब!


चेंगराचेंगरीत (बहुदा हत्तींच्या) मेलेलं हे बिचारं हत्तीचं पिल्लू !

नैसर्गिकरित्या मरण आलेलं हे हॉग डीअर!


मनुष्यभक्षक पँथरचा हा देह!


हा एक महाकाय वाघ ! ह्याने एका रानटी हत्तीसोबत जवळपास बारा तास घनघोर युद्ध केलं. आणि मग त्याला वीरगती प्राप्त झाली. बारा बारा तास लढाई करण्याचं कारण काय? नसेल जमत तर सोडून द्यावं असला विचार फक्त आपणच करु शकतो. एका अजेय योद्ध्याला युद्धभूमी सोडून पळुन जाणं हे मरणाहुनही कष्टप्रद वाटत असणार आणि म्हणुन मग त्यानं इतकं घनघोर युद्ध केलं असावं! वीरा तुला माझा मानाचा मुजरा!!


अजुन एक महाकाय वाघ !

प्रसन्न मनाने आम्ही ह्या म्युझियम मधुन बाहेर पडलो. आता होता तो नेचर वॉक! बसमधुन म्युझियमच्या दिशेनं येत असताना सचिनने हे दोन्ही कार्यक्रम स्पष्ट केले होते. त्यात नेचर वॉक थोडाफार कष्टप्रद असणार आणि उन्हाचे चटके बसणार ह्याची पुर्वकल्पना त्याने दिली होती. बराचसा भाग हा उघड्याबोडक्या भागातुन असल्याने सचिन तु काय आम्हांला टॅन करायला आणलं का रे असला प्रश्नही तुम्ही विचारण्याची शक्यता आहे असे तो म्हणाला. माझ्या बाजुला बसलेले सातारकर ही सर्व प्रस्तावना ऐकून घेत होते. मग त्यांनी सचिनला जवळ बोलावुन एक गहन प्रश्न केला, " बाबा रे मग हा नेचर वॉक आयोजित करण्यामागे तुमचं नक्की प्रयोजन काय?" सचिन मानगावकर यष्टीचित गोलंदाज सातारकर, प्रेक्षक पाटील!
मग सचिनने थोडावेळ विचार करुन मग सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. 

हा नैसर्गिक चालीचा रस्ता प्रेक्षणीय स्थळांनी भरलेला नक्कीच नव्हता. इथं wildlife activity दिसु शकते का? ही मनात खदखदणारी शंका मी सचिनला बोलुन दाखविली. आपण ज्या वेळात हा नेचर वॉक आयोजित करतो त्यावेळात बहुतेक नाही असं त्यानं उत्तर दिलं. जर तो IBM चा कर्मचारी असता तर त्यानं ५ वेळा  ९ ची म्हणजे ९९.९९९ यशस्वीतेची शक्यता मांडली असती. 

सुरुवातीला थोडा चढ होता आणि तिथं ह्या मंदिराचं दर्शन झालं. 





बाकी ह्या चालीत नदीचे कोरडं पडत आलेलं पात्र, झुलता पुल वगैरे आकर्षण आली. मंडळी एकमेकांचे फोटो काढण्यात दंग होती.







साधारणतः दोन किमीचा ही चाल पुर्ण करुन आम्ही बसमध्ये येऊन बसलो. "माणसा! तुझा गेल्या कित्येक महिन्यातील हा सर्वाधिक चालीचा दिवस आहे!" माझ्या भ्रमणध्वनीतील ऍप मला ओरडुन सांगत होतं. बाकी मग पुढे शॉपिंगसाठी एका दुकानात आम्ही थांबलो. सोहमने वाघाचा टी शर्ट घेतला आणि वाघाचे फोटो असलेले magnet घेतले. इथं बसमध्ये पुन्हा बसायच्या आधी तिथं एक मोर बराच वेळ नाच करताना मंडळींना दिसला. भोळे ह्यांनी ह्याचं चलतचित्रण केलं. हॉटेलमध्ये परतताच सोहम क्रिकेटसाठी माझ्या मागे लागला. त्याच्याबरोबर खेळून मग मी फ्रेश झालो. साडेसात वाजता पहिल्या मजल्यावर गिटारचा कार्यक्रम होता आणि त्याचवेळी भारत वेस्ट इंडीजचा सामना तळमजल्यावरील मोठ्या स्क्रीनवर दाखविला जात होता. माझ्यासाठी निर्णय घेणं सोपं होतं. मी मस्तपैकी सामना पाहत बसलो. विराटने पुन्हा एकदा सुंदर फलंदाजी केली आणि भारताला १९० च्या आसपास मजल मारुन दिली. वरती गिटारच्या संगीतावर मंडळीनी नाच वगैरे केला असे ऐकण्यात आलं. 

रात्रीचे जेवण पुन्हा एकदा रुचकर होते. समोर एक परदेशी पर्यटकांचा गट बसला होता. त्यातील एक युवती किती सुंदर दिसत आहे ही माझ्या मनीची भावना आमच्या टेबलवर कोणीतरी बोलुन दाखविली त्यावेळी मी जोराने मान हलवून त्याला दुजोरा दिला. त्यावेळी प्राजक्ताने संशयास्पद नजरेने माझ्याकडे पाहिलं! 

भारत सामना हरण्याची लक्षणे दिसु लागली होती. दोन नो बॉल महागात पडले होते. आमच्या खोलीतील केबल काही कारणाने क्रिकेटची चॅनेल दाखवत नव्हते. पण इतक्या मनसोक्त प्रवासानंतर क्रिकेटमध्ये फारसा रस दाखविण्यासाठी मी उत्सुक नव्हतो. 

क्रमशः 

आधीच्या भागाच्या लिंक्स 
पहिला भाग 
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post.html  
दुसरा भाग 
 http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_9.html
तिसरा भाग 
 http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_10.html
चौथा भाग 
 http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_17.html
पाचवा भाग
 http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_20.html
सहावा भाग
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_30.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...