मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

कट्यार काळजात घुसली!!






बरेच दिवस बघायचा राहून गेलेला "कट्यार काळजात घुसली" हा चित्रपट पाहायचा योग आज आला. तसा योग गेल्या शनिवार रविवारी सुद्धा आला होता पण 'कट्यार काळजात घुसली' चित्रपट पाहायचा की 'मुंबई पुणे २' बघायचा ह्या चर्चेत कोणताही चित्रपट न पाहता सुट्टी तशीच गेली. पण आज सकाळी वर्तमानपत्रे उघडताच लक्षात आलं की मुंबई पुणे तर चित्रपटगृहातून गायब झाला आहे आणि 'कट्यार काळजात घुसली' अगदी मोजक्या चित्रपटगृहात सुरु आहे त्यामुळे अधिक विलंब न लावता इंटरनेट वरून त्याची तिकिटे बुक करून ठेवली. ह्या माध्यमातून तिकीट आरक्षित करताना काही जास्तीचा अधिभार लावला गेला. काळाची पावले ज्या दिशेने चालली आहेत ते पाहता हे चुकीचं वाटलं. 

चित्रपट निव्वळ अप्रतिम! ह्या चित्रपटाचं सौंदर्य अनेक निकषांवर खरं ठरणारं ! चित्रपटातील वातावरणनिर्मिती ज्याप्रकारे केली ते सुंदर आणि चित्रपटातील प्रत्येक फ्रेममध्ये जे एक सुसंस्कृत वैभव / श्रीमंती दाखवली गेली ती मनाला मोहवून गेली. चित्रपटाचा आरंभच "सूर निरागस होवो गणपती" ह्या शंकर महादेवन ह्यांच्या अप्रतिम गीतानं होतो. ह्या गीताचे सुरेल सूर कानात साठवावेत की की त्या सुंदर नृत्याला आणि श्रीमंती वैभवाला नयनात साठवून घ्यावं हा पडलेला प्रश्न!

बहुतेक सर्वच मराठी दर्दी रसिक ह्या कथानकाशी परिचित असल्याने ही कथा सविस्तरपणे सांगण्याची तशी गरज नाही. पंडित भानूशंकर शास्त्री आणि खानसाहेब ह्यांच्यातील स्पर्धेची ही कहाणी. पंडित शास्त्री विश्रामपूर संस्थानाचे राजगायक! खांसाहेबांना खरंतर मीरतहून तेच विश्रामपूरला आणतात. त्यांच्यातर्फे खांसाहेबांना थोडीफार मदत होतेच पण खांसाहेबांची गरिबी मात्र कायमच राहते. पत्नीच्या कटकटीला कंटाळून ते मग पंडित शास्त्रींसोबत राजदरबारात जुगलबंदी करतात. राजगायक ठरविण्यासाठी सुरु असलेली ही जुगलबंदी पंडित शास्त्रीच जिंकतात. आणि मग ही त्यांची विजयाची मालिका पुढील चौदा वर्षं सुरूच राहते. केवळ ही जुगलबंदी जिंकण्यात यश लाभलं नाही म्हणून खांसाहेबांसारख्या एका जातीच्या कलावंताला बाकी कोणत्याच मार्गे काहीच अर्थलाभ होत नाही ही काहीशी न पटण्यासारखी गोष्ट! असो पण ह्या इर्षेने त्यांच्या मनात एक प्रकारचा मत्सर निर्माण होतो. आणि ह्या परिस्थितीचे चटके प्रत्यक्ष सहन करणारी त्यांची पत्नी मग एकदा कट करून पंडित शास्त्रींना शेंदूर खायला देऊन त्यांचं गाणंच कायमच बंद करून टाकते. गाणं म्हणजे जीव की प्राण असणारे पंडित शास्त्री हा धक्का सहन झाल्याने सर्वांपासून दूर निघून जातात. मग मागे उरते ती त्यांची कन्या उमा आणि त्यांच्या शोधार्थ आलेला त्यांचा शिष्य सदाशिव! 
खांसाहेब आपल्या पत्नीला तिच्या दृष्ट कृत्याची सजा म्हणून तलाक देतात. त्यांची मुलगी झरिना हिला हा प्रकार अजिबात पटलेला नसतो. केवळ आपल्या पत्नीला तलाक देऊन राजगायकाचं पद भूषवायचा आणि वैभव उपभोगण्याचा नैतिक अधिकार खांसाहेबांना प्राप्त होत नाही असं तिचं स्पष्ट मत असतं. 
मग सुरु होतो तो आपल्या गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाला पुर्णत्वाला नेण्यासाठीचा सदाशिवचा यज्ञ! उमेकडे असलेल्या काही लिखित नोंदींच्या आणि राजकवीकडे असलेल्या पंडित शास्त्रींच्या ग्रामोफोन रेकॉर्डच्या आधारे तो आपली कला उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत असतो. ह्यातील प्रत्येक माध्यमातील पूर्णत्व गाठल्यावर सुद्धा त्याला समाधानप्राप्ती होत नाही. आपण केवळ पंडित शास्त्री ह्यांची नक्कल करीत आहोत असं त्याला वाटत राहतं. मग येतो राजकवी आणि सदाशिव ह्यांच्यातील कला आणि विद्या ह्यातील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणारा प्रसंग! विद्या ही गुरु शिष्याला शिकवू शकतो पण कला ही आतून यावी लागते. विद्येने माणूस जगाला जिंकू शकतो पण कलेने स्वतःला जिंकतो वगैरे वगैरे!! ह्यातील सर्वच संवाद लक्षात नाही राहिले त्यामुळे काहीसं हे वर्णन माझ्या समजुतीचे असण्याचा संभव!

सदाशिव आणि पंडित शास्त्री ह्यांच्यातील सदाशिवच्या लहानपणातील काही प्रसंग अगदी सुरेख रंगले आहेत. पंडित शास्त्री आपल्या गायनसामर्थ्याने रात्री काजव्यांना प्रकाशित करतात आणि त्या प्रकाशाने सर्व आसमंत प्रकाशून जातो हा त्यातला एक प्रसंग! ह्या प्रसंगाच्या चित्रीकरणातील वैभव अगदी सुखावून जातं. शेवटी स्वयंप्रकाशित काजवे एकत्र येऊन शास्त्रींनी पाण्यात विझवलेल्या दिव्याची ज्योत पुन्हा प्रकाशित करतात ह्यातील काव्यात्मकता केवळ अवर्णनीय!  आणि लहानपणी आपल्या गायनाने काजव्यांना प्रकाशित करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा सदाशिव शास्त्रींच्या शोधात चौदा वर्षांनी ज्यावेळी येतो त्यावेळी उमेला आपली खुण पटविण्यासाठी ह्याच काजव्यांचा वापर करतो हे ही अगदी मस्तच!

ह्या चित्रपटातील राजाच वैभव, संगीतक्षेत्रात असलेलं भारतातील विविध राजघराण्याची समृद्धी हे सारं पाहून मनाला एक प्रश्न पडतो. हे आपण सारं का गमावलं? ह्या चित्रपटातील राजदरबारी दिसणाऱ्या इंग्रजाच्या अस्तित्वाला दोष देत आपण ह्याचं थोडक्यात उत्तर शोधून आपलं समाधान करून घेऊ शकतो. पण खरं उत्तर आहे ते काळाची पावलं ओळखून योग्य ते बदल करण्यात एक समाज म्हणून आपणास आलेलं अपयश! आणि हो उच्चवर्गीयांनी आपल्या समाजातील स्थानाचा आधी करून घेतलेला दुरुपयोग आणि मग बाकीच्या वर्गाने गेले कित्येक वर्षे समाजकारणाचा मिळविलेला ताबा!

मृण्मयी देशपांडे  आधीच माझी आवडती अभिनेत्री! सोज्ज्वळ सौंदर्य आणि अभिनयाची जबरदस्त जाण! चौदा वर्षाने भेटलेल्या आपल्या प्रेमाला म्हणजेच सुबोधला भेटल्यानंतर होणारी मनःस्थिती तिनं आपल्या बोलक्या डोळ्यांनी अगदी अचूक व्यक्त केली आहे. ह्यात आपल्या प्रियकरापासून दूर राहिलेल्या प्रेयसीला विरह संपल्याने होणारा जसा आनंद आहे तसंच आपल्या पित्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेऊ शकणारा साथीदार आला ह्याची लढाऊ वृत्ती देखील आहे. 

सुबोध भावेच्या देखणेपणावर काय बोलावं! एक राजबिंडा कलाकार. गाण्याच्या लयी, ताल आपल्या हावभावातून आणि मुद्राभिनयातून त्याने ज्या प्रकारे व्यक्त केली आहे त्याविषयी त्याची दाद द्यावी तितकी थोडी! ह्या दोघांतील प्रणयाला कथानक वाव देत नाही आणि आविष्कारस्वातंत्र्याच्या नावाखाली दिग्दर्शकाने तसा प्रयत्न केला सुद्धा नाही ही बाब वाखाणण्याजोगी!  नाहीतर मग भावे आणि भन्साली ह्यांच्यात फरक काय तो राहिला! 

पुढे कोणी तरी ह्या दोघांना घेऊन एक रोमॅंटिक चित्रपट काढावा ही आपली मनातील इच्छा! ह्या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाला वाव देणाऱ्या मालिका, चित्रपट तिला मिळाले पण तिच्या सौंदर्याला पूर्ण वाव देणारा चित्रपट कोणीतरी काढावा!

सचिन ह्यांनी साकारलेली खांसाहेबांची भुमिका , त्यांचा अभिनय अवर्णनीयच! खरंतर कथा लिहिताना खांसाहेबांच्या व्यक्तिरेखेवर काहीसा अन्यायच झाला असं वाटून घेतच मी चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो. सतत चौदा वर्षे हरल्यावर ते जिंकतात ते सुद्धा कपटाने, सदाशिवला सुद्धा हरवितात ते त्याचा घसा ऐनवेळी बसल्याने असं काहीसं त्यांच्या दर्जात्मक कलेला वाव न देणारी व्यक्तिरेखा त्यांच्या वाट्याला आली आहे. पण ह्या व्यक्तीरेखेतील जे खानदानीपण अपेक्षित आहे ते निभावून नेण्यासाठी सद्यकालीन अभिनेत्यांमध्ये सचिनशिवाय दुसरं कोणी योग्य ठरलं नसतं हे चित्रपट पाहून आल्यावर जाणवतं. पडत्या काळातील एका जाणकार कलाकाराला पदोपदी होणाऱ्या अपमानाने वाटणारी खंत त्यांनी आपल्या केवळ नजरेतून व्यक्त केली आहे. खरंतर सचिन ह्यांनी मध्यंतरी विविध मालिकांतून जे महागुरू प्रकरणाचे खूळ माजवलं होतं त्यामुळे मी त्यांच्या चाहतेपणापासून काहीसा दूर गेलो होतो पण आज हा चित्रपट पाहून अगदी जाणकार सचिन भेटल्याचा आनंद झाला.  सदाशिव आपल्या घराण्यातील एक चालीला उचलून ती दरबारात पेश करतो त्यावेळी त्यांना होणारा राग त्यांनी अगदी आवेगाने व्यक्त केला आहे. बाकीच्या लोकांसाठी ही एक मामुली गोष्ट असेल पण जसं साता समुद्रांचे मंथन करून एक शिंपला शोधून काढला जातो त्याचप्रमाणे अनेक पिढ्यांनी वर्षोनुवर्षे रियाज करून एखाद्या गाण्यातील एक जागा, एक लय शोधून काढली असते ती जर सहजासहजी कोणी चोरत असेल तर संताप तर येणारच! मला सचिनच आणि खांसाहेबांच म्हणणं अगदी सोळा आणे पटलं!

शंकर महादेवन एक उत्तम गायक! अभिनयाचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न! पहिलाच प्रयत्न ते जाणवत. असो हळूहळू प्रगती होईल!

खरं म्हटलं तर ह्या चित्रपटाचं विश्लेषण लिहायचं म्हटलं तरी संगीताची थोडीतरी जाण असावी नाहीतरी असला अनाठायी प्रयत्न करू नये! पण म्हटलं इतकं सौदंर्य अनुभवलं तर आपल्या अकलेने का होईना दोन शब्द तर लिहावेत! साडेसातला चित्रपट संपल्यावर भूगर्भात दोन मजले खाली विसावलेल्या गाडीला बाहेर काढून शनिवारच्या तुलनेने कमी असलेल्या मुंबईच्या वाहतुकीतून घरी पोहोचण्यास सव्वाआठ झाले. परतताना गाडीतलं वातावरण अगदी भारावलेलं होतं. "सूर निरामय होवो" हे सुरात म्हणण्याचा प्रयत्न सोहम उघडपणे करत होता तर मी मनातल्या मनात! माझं हे भारावलेलं पण गेले दोन तास टिकून आहे आणि त्यातच ही पोस्ट लिहिली. 

सुबोधच कौतुक करावं तितकं थोडं! आयुष्यातील बराचसा भाग आपण पैसा साठवून ठेवण्याच्या प्रयत्नात घालवतो. आपआपल्या क्षमतेनुसार प्रत्येकानं संस्मरणीय असं आयुष्यात काहीतरी करण्याचा एकदा तरी प्रयत्न करावा! सुबोध, तुझ्या आयुष्यातील एक संस्मरणीय तू नक्कीच घडविलंस! कॉलेजात असताना कधीतरी एका सुंदर मुलीला पाहून मित्र म्हणाला होता, "दिसावं तर हिच्यासारखं! नाहीतर दिसूच नये!" त्याची आज आठवण झाली. बनवावा चित्रपट तर 'कट्यार काळजात घुसली' सारखा नाहीतर बनवूच नये! घरी आल्यावर सवयीने टुकार मालिका लावल्या गेल्या. पण कट्यारीचा प्रभाव इतका होता की दोन मिनिटातच दूरदर्शन संच बंद करण्याची बुद्धी आम्हांस झाली. आज कसं सर्व काही भव्य दिव्य वाटतंय! 

सांगता एका समर्पक अशा नाट्यगीताने!

घेई छंद, मकरंद, प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद स्वच्छंद, हा धुंद

मिटता कमलदल होई बंदी भृंग;
परि सोडिना, ध्यास, गुंजनात दंग


आवडत्या गोष्टीचा ध्यास, आस्वाद अगदी मनापासून मुक्तपणे घ्यावा. हा आस्वाद घेताना कधीही दैनदिन जीवनातील चिंतेला थारा देऊ नये! त्याचप्रमाणे पुन्हा एकदा एका अभिरुचीपूर्ण कलेकडे आपण सर्वांनी वळूयात का?

३ टिप्पण्या:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...