मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १० जानेवारी, २०१५

अलिप्ततावाद!!


 
मागील शनिवारी विक्रम गोखले ह्यांचं चतुरंग मधील सदर वाचलं. आपल्या वडिलांनी आपल्याला जीवनातील तत्त्वज्ञानाचे धडे कसे दिले हे त्यांनी अगदी सुंदरपणे मांडलं होतं. त्यांचं एक वाक्य खूप लक्षात राहिलं. "पन्नाशीच्या आसपास केव्हातरी अलिप्ततावाद लक्षात आलेला मी  एक पुरुष आहे!" 
ह्या वाक्याने मनात आलेले हे विचार! विक्रम गोखले ह्यांना ह्यातील कोणता अलिप्ततावाद अभिप्रेत होता ह्यावर भाष्य करण्याचं धाडस मी करणार नाही.
लहानपणी आपण प्रत्येक गोष्टीत अगदी रस घेत असतो. ह्या नाविन्यपूर्ण जीवनातील प्रत्येक गोष्ट शिकण्याची उमेद आपण बाळगून असतो. हळूहळू आपण आयुष्यातील अनुभवाला सामोरे जाऊ लागतो. काही सुखदायक तर काही कटू! प्रत्येकाची हे अनुभव पचविण्याची क्षमता वेगवेगळी असते. काहींना पहिल्या काही कटू अनुभवांतच वैराग्य येतं तर काहीजण संकटाचे, दुःखाचे पहाड पेलून सुद्धा आयुष्यातील उत्साह राखून असतात. 
एखाद्या व्यक्ती सभोवतालच्या परिस्थितीपासून, समाजापासून अलिप्त बनून का वागू लागते? ज्या क्षणी एका व्यक्तीचे सभोवतालच्या व्यक्तींच्या स्वभावाशी प्रथम मतभेद होतात, त्या क्षणी दोन प्राथमिक शक्यता असतात. एकतर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवायला पाहू शकते किंवा दुसऱ्या व्यक्तीला आपल्यावर नियंत्रण मिळवू देऊ शकते. समजा अशा ताणतणावाच्या प्रसंगांची वारंवारता वाढत गेली तर मग ती व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला टाळण्याची मानसिकता दाखवते. हीच स्थिती एखाद्या व्यक्तीबाबत सभोवतालच्या परिस्थिती किंवा समाजासोबत निर्माण होऊ शकते. एखादी व्यक्ती भोवतालच्या परिस्थितीशी पूर्णपणे मिसळून घेऊ शकत नाही. मग ती ह्या परिस्थितीला टाळू लागते. अशी परिस्थिती 
वैयक्तिक, व्यावसायिक किंवा सामाजिक जीवनात येऊ शकते. 
वैयक्तिक जीवनात समजा जीवनसाथी अचानक काही कारणांमुळे अलिप्तपणे वागू लागला तर? काही वेळा दोघही अलिप्तपणे वागतात तर काही वेळा एकच अलिप्तपणे वागतो. अशा वेळी दुसऱ्या जोडीदाराची अवस्था बिकट होऊ शकते. काही वेळा एखादा जोडीदार बाकीच्या कुटुंबियांशी अलिप्तपणे वागू लागतो. भारतीय विवाहसंस्थेत अशी अलिप्तता आयुष्यभर घेऊन जगणारी अनेक जोडपी असू शकतात. हा फार मोठा गहन विषय आहे जो एका पोस्टमध्ये हाताळण्याजोगा नाही. गेल्या काही वर्षात प्रसिद्ध पुरुषांच्या पत्नींनी विवाहात आयुष्यभर झालेली आपली घुसमट पुस्तकरुपात प्रसिद्ध करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. पुरुष मात्र अशा गोष्टीमुळे बहुदा घुसमट करून घेत नाहीत. एकतर त्यांचा मित्रपरिवार मोठा असतो. पुरुषांना त्यांच्याशी बराच वेळ घालवता येतो आणि मग वैयक्तिक जीवनातील अलिप्तपणाची कसर भरून काढण्याचे माध्यम त्यांना उपलब्ध होते. नोकरी न करणाऱ्या स्त्रियांना मात्र काही वेळा असे माध्यम उपलब्ध न झाल्याने मग मोठा प्रश्न निर्माण होतो. 
व्यावसायिक जगात सुद्धा असे प्रश्न निर्माण होतात. माणसं चुकीच्या ठिकाणी नोकरीस आणि मग दुसरा पर्याय नसल्याने अशा ठिकाणी अडकून बसतात. एकतर ती आवश्यकतेपेक्षा जास्त पात्रता बाळगून असतात किंवा कमी! आता तुम्ही म्हणाल की आवश्यकतेपेक्षा जास्त पात्रता बाळगून असणाऱ्या लोकांनी अडकून बसायचे कारण काय? आर्थिक, कौटुंबिक कारणं अशा गोष्टींमुळे असे प्रसंग उद्भवतात. कधी कधी कार्यालयातील प्रभावी गटाशी न जुळल्याने मग लोक आपलं अलिप्ततेचे एक घरटे बनवून राहतात. 
वरील दोन प्रकारच्या अलिप्ततेपेक्षा कमी गांभीर्याची अलिप्तता म्हणजे सामाजिक अलिप्तता! आजूबाजूच्या सामाजिक रूढीशी, चालीरितींशी आपलं जमत नाही असं एखाद्याला वाटू शकतं आणि मग तो सामाजिक समारंभात मिसळणे टाळू लागतो किंवा कमी करतो. कधी कधी आर्थिक, शैक्षणिक पात्रतेच्या कमाल किंवा किमान पात्रता गाठल्याने सुद्धा काही जण सामाजिक दृष्ट्या अलिप्त राहणे पसंत करतात. 
काही वेळा एखादा समाजच बाकीच्या समाजापासून अलिप्त राहू लागतो. सामाजिक जीवनात आपल्यापेक्षा कमी बौद्धिक पातळीच्या लोकांनी कब्जा करून गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्यास बुद्धीजीवी वर्ग सामाजिक जीवनात अलिप्ततेचे धोरण स्वीकारतो. 
पुन्हा एकदा वैयक्तिक अलिप्ततावादाकडे! म्हणायला गेलं तर मनुष्य समाजप्रिय, संवादप्रिय प्राणी! वैयक्तिक जीवनात अलिप्ततावाद स्वीकारायला लागल्यास अर्थात संवाद कमी होतात. एकमेकांशी व्यवहार अगदी गरजेपुरता होतात. काहींना हे झेपतात कारण त्यांचा स्वभाव मुळी असतोच तसा! पण काहींना मात्र हे बाह्यस्वरुपात स्वीकारलेलं अलिप्ततेचे धोरण आतून अगदी छळत असतं. पण पर्याय नसतो!
शेवटी वयानुसार आलेला अलिप्ततावाद! "भौतिक सुखांचा उपभोग घेण्याचं माझं वय निघून गेलं, आता मला बाह्यजगातील सुखापासून अलिप्त राहिलं पाहिजे", "माझ्या अवतीभोवती तरुण मंडळी आहेत त्यांना माझा त्रास नको" असे विचार काही जणांच्या मनात ठराविक वयानंतर येऊ लागतात आणि मग अशी माणसं भोवतालच्या व्यवहारातून अंग काढून घेत मनुष्यजातीला ज्ञात असलेल्या पुढच्या मार्गाची तयारी म्हणून अध्यात्ममार्गाला लागतात!
बाकी इतक्या उत्साहाने ब्लॉग पोस्ट्स लिहिणाऱ्या नवोदित लेखकाला प्रतिक्रिया देताना मात्र आपण सारी मंडळी अलिप्ततावाद दाखवतोच की!

२ टिप्पण्या:

  1. वैयक्तिक जीवनात आपल्या जोडीदारा बरोबरच्या वैचारिक भिन्नतेतून होणाऱ्या वादामुळे बरेच वेळा संवादप्रिय माणससुद्धा अलिप्तता स्वीकारतात. खरतर गरजेपुरता होणारा व्यवहार हा दोघांनाही झेपत नसतो. त्यात दोघांचे ईगो आड आले तर अलिप्तता वाढत जाते. खरतर संवाद थांबवण हा यावरचा उपाय नक्कीच नाही. कितीही मतभिन्नता असली तरी परस्पर सामंजस्याने किवा ठरवून उजाडणारा दुसरा दिवस परत सुसंवादाने सुरु करावा. माझ्या वाचनात आलेल्या शोभा डे यांच्या 'स्पाऊज ' या पुस्तकात वैवाहिक जीवनात कोणत्या गोष्टी टाळाव्या आणि कोणत्या आवर्जून कराव्या ह्या फार छान सांगीतल्या आहेत.
    काही ठिकाणी किवा प्रसंगी अलिप्ततावाद काही प्रमाणात आवश्यक असतोही . जसे एकत्र कुटूंब पद्धतीत दोन हौशी बायका एकत्र आल्या तर काही प्रसंगी आणिबाणीची परिस्थीती उद्भवू शकते. अशावेळी एकीचा अलिप्ततावाद अपेक्षीत असतो. येथे अलिप्तता म्हणजे मन मारून राहणे किंवा काम टाळणे अपेक्षीत नाही तर समंजसपणे आपला सहभाग कमी-अधिक करून परिस्थीतीवर नियंत्रण मिळवणे.
    वयानुसार आलेला अलिप्ततावाद! हाही काही वेळा आवश्यक असतो. खरतर सर्व गोष्टी मर्त्य आहेत हे माहित असूनही माणसाचा जीव प्रत्येक गोष्टीत गुंतलेला असतो. आणि ह्याचा नकळत त्या व्यक्तीला आणि इतरांनाही त्रास होत असतो . हि गुंतवणूक प्रयत्नपूर्वक कमी करण्यासाठी वेळीच प्रयत्न करायला हवेत. लेखिका सौ. मंगला गोडबोले यांच्या एका पुस्तकात त्यांनी म्हंटलय ठराविक वयानंतर तुम्ही फारसे आध्यात्मीक नसलात तरी आध्यात्मीक मार्गाला लागा. काही ठिकाणी तुमचा सहभाग नसण ही इतरांची गरज असू शकते.
    अलीकडेच ओळखीतल्या एक आजी मला भेटायला आल्या. प्रेमाने स्वतः पेंट केलेला रुमाल मला भेट दिला. ह्या वयातही त्यांची नवीन शिकण्याची हौस आणि उत्साह खरच कौतुकास्पद होता.
    खरंतर प्रत्येकाने असा एकतरी छंद जोपासावा जो आपल्याला मानसीक समाधान देईल आणि अशा समाधानी माणसाच सानिध्य इतरांनाही सुखकारक होईल.

    उत्तर द्याहटवा
  2. Makes sense ... sometimes its important to realize what you want in life rather than pleasing people to seek their approval.

    उत्तर द्याहटवा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...