मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०१४

इंद्रायणी - ४


 
रात्रीची वेळ असल्याने इंद्रायणी आणि यमुनाबाई झोपल्या होत्या. मी घरी परतलो आहे हे कोणालाच कळता कामा नये अशी सक्त ताकीद गोपाळरावांनी सगुणाबाईंना दिली होती. त्यामुळे अर्थातच इंद्रायणी आणि यमुनाबाईंनासुद्धा ह्या गोड बातमीपासून वंचित ठेवावं लागणार होतं. गोपाळराव स्वच्छ आंघोळ करून आले. कांबळीवर झोपलेल्या आपल्या लाडक्या इंद्रायणीला पाहून त्यांना अगदी गहिवरून आलं. "तीन महिन्यात आपली छकुली किती मोठी झाली नाही?"  त्यांनी सगुणाबाईंना म्हटलं. असा थेट संवाद आपल्याशी कधी साधला असेल ह्याच्याच विचारात पडलेल्या सगुणाबाई आपल्या स्वामीकडे एकटक पाहत होत्या. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाकडे खरंतर त्यांचं लक्षही नव्हतं. पण डोळ्यातील भावातून त्यांनी ओळखलं की ते इंद्रायणीविषयीच काहीतरी कौतुकाने बोलत असावेत. मानेनेच त्यांनी त्यांना हो म्हटलं. आपल्या धन्याच्या खंगलेल्या प्रकृतीकडे पाहून त्यांचे डोळे सारखे भरून येत होते. गोपाळरावांनी न राहवून इंद्रायणीच्या कपाळावरून हात फिरवला. गाढ झोपेतल्या इंद्रायणची झोप काहीशी चाळवली गेली. तिने कूस बदलली. गोपाळराव सावधपणे मागे अंधारात गेले. आणि काही क्षणातच इंद्रायणीने डोळे उघडले. "बाबा, बाबा!" तिची चौकस नजर सर्वत्र भिरभिरत होती. "नाही ग! बाबा कोठे आहेत! तुला भास झाला असेल!" सगुणाबाईंनी प्रसंगावधान राखून दिवा विझवता विझवता तिला म्हटलं. इंद्रायणीची  समजूत काही झाली नाही. बराच वेळ ती अंधारात चाहूल घेत राहिली. "बाबा खरंच येऊन गेले, त्यांनी माझ्या डोक्यावरून हात सुद्धा फिरवला!" असंच काही वेळ पुटपुटत शेवटी ती निद्राधीन झाली. 

गोपाळरावांनी असेच दोन दिवस मागच्या पडवीत लपून काढले. इंद्रायणीला त्यांच्या अस्तित्वाचा राहून राहून भास होत राहिला. चुकून एकदा गोपाळरावांची वहाणा सुद्धा तिच्या नजरेस पडली. पण सगुणाबाईंनी काहीतरी सांगून वेळ मारून नेली. यमुनाबाईंची चौकस नजर मात्र चाहूल घेत राहिली. अख्खं आयुष्य ज्याच्या आसेवर काढलं तो पोटचा गोळा इतका जवळ आजूबाजूला वावरत असताना त्यांना कळणार नाही हे शक्यच नव्हतं. जेवायला भात ठेवताना सगुणाबाईचं वाढीव माप त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. न राहवून त्यांनी सगुणाबाईंना नजरेनेच विचारलं. सगुणाबाईंच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंनी त्यांना उत्तर दिलं. "कसा आहे तो!" त्यांनी गदगदल्या स्वरांनी सगुणाबाईंना विचरलं. "ठीक आहेत, पण खूप कृश झालेत!" सगुणाबाईंनी उत्तर दिलं. "भेटेल का ग तो मला?" परिस्थितीची पूर्ण जाणीव असलेल्या यमुनाबाईंनी त्यांना विचारलं. "बघुयात आज रात्री! खूप काळजी घ्यावी लागतेय" सगुणाबाई म्हणाल्या. 
इंद्रायणी खेळायला तिच्या मैत्रीण, सुधाकडे आली होती. पण तिचं लक्षच लागत नव्हतं. राहून राहून बाबा घरी आलेच आहेत असंच तिला वाटत होतं. दोघीजणीचा नेहमीप्रमाणे भातुकलीचा खेळ चालला होता. "मी किनई आज मस्तपैकी वरणभात भाजी बनविली आहे, आई, बाबा, आपण सर्व जेवायला बसुयात!" सुधा म्हणाली. बाबा हे शब्द ऐकताच इंद्रायणीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. छोट्या सुधेला पट्कन काय करावं सुचेनासं झालं. तिने मग इंद्रायणीला म्हटलं, "रडू नकोस! आपण दुसरा काही खेळ खेळुयात!" "आता राहू देत, नंतर खेळुयात! मी येते नंतर!" असं म्हणून इंद्रायणी घराकडे निघाली. 
इंद्रायणी घरी परतली. आई स्वयंपाकघरात जेवण बनविण्यात तर आजी देवघरात पूजेत मग्न होत्या. इंद्रायणीच्या मनात खूप विचार येत. पूर्वी बाबांशी ती मनातले हे सर्व विचार बोलून दाखवायची. बाबांच्या उत्तराने मग तिचं विचारचक्र अजून पुढे जायचं. आता तिला ह्या संवादांची खूप खूप
आठवण यायची. ती बाहुलीशी, बागेतल्या झाडांशी संवाद साधायची. पण हा एकतर्फीच असायचा. मन मोकळं व्हायला हा संवाद बरा पडायचा. 

दिवसभराची काम आटपता आटपता रात्र कधी झाली हे सगुणाबाईंना समजलं सुद्धा नाही. यमुनाबाई मात्र दिवसभर आशेने त्यांच्याकडे पाहत राहिल्या.  एकदाची रात्र होताच मात्र सगुणाबाईं हळूच गोपाळरावांना हाक मारावयास गेल्या. पण तिथे त्यांना अजून एक अनोळखी माणूस नजरेस पडला. त्याच आणि गोपाळरावांचं हळू आवाजात बोलणं सुरु होतं. सगुणाबाईना पाहताच त्या माणसाने आपलं बोलणं आटोपतं घेतलं. तो माणूस निघून जाताच गोपाळराव ताडकन उठले. त्यांनी झटपट आपला बाडबिस्तारा आवरला. सगुणाबाई प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत होत्या. "बहुदा इंग्रजांना खबर लागली आहे, मला तातडीने निघावं लागेल!" त्यांनी सगुणाबाईंच्या शंकेचे निरसन केले. "पटकन तितकं सासूबाईंना तरी भेटून जा, त्या समजून चुकल्या आहेत!" सगुणाबाई म्हणाल्या. एव्हाना यमुनाबाई कानोसा घेत मागे पोहोचल्याच होत्या. काठी घेत येणाऱ्या आपल्या वयोवृद्ध आईला पाहताच गोपाळरावांनी स्वतःवर घातलेले सर्व निर्बंध मोडून पडले. ते झटकन आईजवळ गेले. मायलेकराची ही भेट अनोखीच होती. यमुनाबाईंना भावनावेग अनावर झाला होता. "किती खंगलास रे तू!" आपल्या कृश हातांनी गोपाळरावांचे अंग चाचपत त्या म्हणाल्या. "हो ना आई!" गोपाळराव आईशी बोलत असले तरी त्यांचे कान आवाजाचा कानोसा घेत होते. अचानक त्यांना बहुदा कसली तरी चाहूल लागली असावी. "येतो मी!" असे म्हणत एका क्षणात ते मागच्या दाराने उडी मारून वाडीत गायब झाले. "काय ग बाई हा  प्रकार!" यमुनाबाई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या. सगुणाबाई मात्र सावध झाल्या होत्या. त्यांनी घाईघाईने यमुनाबाईंना त्यांच्या खोलीत नेऊन झोपावयास सांगितलं. आणि स्वतःसुद्धा सर्व झटकन आटपून दिवा बंद करून बसल्या. इतक्यात दारावर ठकठक ऐकू आली. सगुणाबाईनी हातात दिवा घेऊन दरवाजा उघडला. पोलिसच होते. पुढील तासभर त्यांनी घराची पूर्ण तपासणी केली. पण त्यांना कसलाच सुगावा लागला नाही. छोट्या इंद्रायणीला जाग येताच त्यांनी तिला सुद्धा विचारलं. "बाबा आले होते का इथे!" इंद्रायणी झोपेतून उठली होती पण तिने लगेचच आईच्या चेहऱ्यावरील भय जाणलं. आणि तिला जरी बाबांच्या वास्तव्याचा सतत भास होत असला तरी तिने प्रत्यक्ष बाबांना पाहिलं नव्हतं. त्यामुळे तिने नकारार्थी उत्तर दिलं. एव्हाना पोलिस सुद्धा वैतागलेच होते. आणि मग त्यांनी तिथून निघायचं ठरवलं. 
४६ चा पावसाळा अगदी जोरात सुरु होता. यमुनाबाईंनी गोपाळरावांचं जे कृश रूप पाहिलं होतं त्याच त्यांच्या मनाला खूप लागून राहिलं. ह्या प्रसंगानंतर यमुनाबाईंनी अंथरूण धरलं! त्यामुळे सगुणाबाईंची खूपच ओढाताण होऊ लागली. उपचारासाठी गावचा वैद्य अधूनमधून यायचा. पण औषधउपचारांसाठी आता सगुणाबाईंकडे   फारसे काही पैसे शिल्लक उरले नव्हते. त्यामुळे दिवसेंदिवस यमुनाबाईंची तब्येत ढासळू लागली होती. इंग्रज अगदी हात धुवून गोपाळराव आणि मंडळींच्या मागे लागले होते. त्यामुळे ही मंडळी कायमची भूमिगतच राहिली होती. सर्व भार एकट्या सगुणाबाईंवरच पडला होता. इतक्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी जिद्द करून इंद्रायणीला गावातल्या बालवाडीत टाकलं. 
छोट्या इंद्रायणीच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला होता. आईने तिला आता हळूहळू बरीच कामे करायला शिकवलं होतं. आळीतील गणपतकाकांकडून सकाळी दुध घेऊन येणं. घरातील कचरा गोळा करणं. आजीला काही हवं नको ते पाहणं. आपल्या इवलाश्या डोळ्यांनी इंद्रायणी सर्व पाहत होती. जमेल तितकी मदत आईला करत होती. सायंकाळी दिवेलागणी झाली की शुभंकरोति म्हणून एका कोपऱ्यात मुळाक्षरे गिरवत बसायची. लाड करून घ्यायची बालसुलभ इच्छा तिला अजिबात होत नसे असंही नव्हतं. पण परिस्थितीने तिला अचानक मोठेपण बहाल केलं होतं. आईचा मायेचा एक स्पर्श आणि बिछान्यावर पडलेल्या आजीची कौतुकाची एक नजर तिला ही जबाबदारी पेलवायची एक नवीन जिद्द देऊन जात असे. तिचं बालपण असं अचानक संपलं म्हणून खंत वाटणारे तिन्ही जीव अगदी असहाय होते. 

(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...