मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

जन पळभर म्हणतील हाय हाय!


 

जुन्या काळच्या ह्या प्रसिद्ध ओळी! एकंदरीत जगाचे रहाटगाडे कोणाच्या जगण्यावर अवलंबून नाही, जगी जन्मलेला प्रत्येक जीव कधी ना कधी मृत्यू पावणार, आणि त्यामुळे आपल्याशिवाय कोणाचे अडून राहील असा कोणी समज करून घेऊ नये असा ह्या ओळींचा मतितार्थ! ह्या ओळींत जगाच्या स्वार्थीपणाकडे थोडासा कल झुकला असावा असा मला नेहमीच संशय येत राहिला आहे. लोकांना तुमच्याकडून केल्या जाणाऱ्या कामाशी मतलब आहे, तुमच्याशी नाही असंही कविला म्हणायचं आहे असं कधी कधी मला वाटतं. शेवटी कवी म्हणतो की अशा ह्या दुनियेच्या मोहात पडू नये आणि ईश्वराच्या आराधनेत मग्न व्हावे कारण तेच अंतिम सत्य आहे!

माहिती आंतरजालावरून घेतलेलं ह्या गीताचं पूर्ण रूप!

जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहील कार्य काय ?

सुर्य तळपतील, चंद्र झळकतील
तारे अपुला क्रम आचरतील
असेच वारे पुढे वाहतील
होईल काही का अंतराय ?

मेघ वर्षतील, शेते पिकतील
गर्वाने या नद्या वाहतील
कुणा काळजी की न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय

सखे सोयरे डोळे पुसतील
पुन्हा आपुल्या कामी लागतील
उठतील बसतील, हसूनी खिदळतील
मी जाता त्यांचे काय जाय ?

अशा जगास्तव काय कुढावे
मोही कुणाच्या का गुंतावे
हरीदूता का विन्मुख व्हावे
का जिरवू नये, शांतीत काय ?
 

आज हे गीत आठवायचं कारण की गेल्या काही दिवसात नात्यामध्ये अनेक दुःखद घटना घडल्या. काही तर अगदी जवळच्या!  एका महिन्यात जवळजवळ अशा दहा बातम्या आल्या. आणि धर्मसंकट असे होते की अगदी जवळच्या नात्यात एका वर्षापासून ठरविलेलं लग्नही होतं. आणि दुःखद बातम्या एकाच बाजूच्या नव्हे तर वरपक्ष आणि वधूपक्ष ह्या दोन्ही बाजूच्या!दोन तीन देशातून ह्या लग्नासाठी मंडळी तिकिटे आरक्षित करून आली होती. अशा वेळी मोठा बिकट प्रसंग होता. हल्लीच्या काळात लग्नाची सर्व तयारी जुळवून आणायचं म्हणजे मोठी कसरत! सर्व मंडळींनी मग अगदी संयमाने वागून लग्न व्यवस्थित पार पडलं. अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा छातीवर दगड ठेवून लग्नसमारंभाला उपस्थिती लावून गेले. एकदाचं लग्न आटपलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला! आता आनंदाचा क्षण किती प्रमाणात साजरा करायचा ह्या प्रश्न ज्याचा त्याचा!
पूर्वीच्या काळात कदाचित हे लग्न पुढे ढकललं गेलं असतं पण हल्लीच्या इतक्या गुंतागुंतीच्या जगात हे काही शक्य नव्हतं. 

आता ह्या घटनेवरून मी ह्या गीताशी पूर्णपणे असहमती दाखवू इच्छितो. दुनियेला आपला कार्यभार सांभाळावाच लागतो. मनात कितीही दुःख असलं तरी कर्तव्य कोणाला चुकलंच नाही. जेव्हा कोणाच्याही मृत्यूची बातमी येते त्यावेळी बहुतेकजणांच्या मनात आपलंही कधीतरी असे होणारच आहे हा विचार क्षणभर येऊनच जातो. पण त्यानंतर मात्र ह्या निष्ठुर दुनियेतील आपल्या जबाबदाऱ्या हा विचार मागे टाकून देतो. 

बाकी आमच्या गावातील दोघाजणांचा खास उल्लेख ह्या पोस्ट्मध्ये! त्यांना त्यांची नावे घेतलेली सुद्धा आवडणार नाही. पण आनंदाचा क्षण असो वा दुःखाचा! दोघंही जण सर्व विधी व्यवस्थित पार पडले जात आहेत की नाही ह्याची पूर्ण जबाबदारी घेणार! अगदी बारीकसारीक गोष्टींवर पूर्ण लक्ष ठेवून असणार! गावातील लग्नघरी ह्या दोघांचं आगमन झालं कि यजमान निश्चिंत! आणि उपलब्ध परिस्थितीत हे दोघं हमखास मार्ग काढणार. ते सुद्धा अधिकारवाणीने!पण लग्न आटोपल्यावर समजा कोणी छोटासा भोजनसमारंभ आयोजित केला तर मात्र ते तिथे अजिबात येणार नाहीत!

लेखाच्या शेवटी पाकिस्तानातील त्या निष्पाप बालकांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. इतकं क्रूर कृत्य कोणी माणूस कसा करू शकतो? जरी तुम्ही स्वतःचा जीव घेणार असाल तरीही ज्यांनी स्वतः आणि त्यांच्या आईवडिलांनी इतकी स्वप्नं पाहिली आहेत त्यांचा असा निष्ठुरपणे चोळामोळा करण्याचा कोणालाच अधिकार नाही. ह्या घटनेनंतर मात्र कवीचे बोल खरे वाटू लागतात!

1 टिप्पणी:

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...