त्या रात्रीनंतर जोशी कुटुंबाचं जीवन अगदी बदलूनच गेलं. नारायणरावांच्या बैठकीवर ब्रिटिशांनी छापा घातला खरा पण त्याची कंपूला अगदी शेवटच्या क्षणी खबर लागली आणि सर्वांनी तिथून पोबारा केला. परंतु पळताना सर्व पुरावा नष्ट करण्याची संधी मात्र त्यांना मिळाली नाही. आणि मग गोपाळरावांच्या नावाची कागदपत्रे तिथेच राहून गेली. सरकारी नोकरीत असलेल्या शिक्षकाने इंग्रजांविरुद्धच्या कटात भाग घेणं म्हणजे मोठे पातक होते. गोपाळराव रात्री येणार नाहीत असा निरोप मिळाल्यावर सगुणाबाईच्या काळजात धस्स झालं. इतक्या शिस्तीच्या गोपाळरावांना बाहेर रात्र काढावी लागणार ही फार बिकट गोष्ट होती. पानावर लोणच्याची जागा तसूभर जरी बदलली तरी अस्वस्थ होणारे गोपाळराव आज जेवतील कोठे? हा विचार त्यांना छळत राहिला. घरात फक्त त्या तिघीजणीच होत्या. यमुनाबाई अगदी वार्धक्याला टेकलेल्या आणि छकुली इंद्रायणी अजून हे सारं समजण्याच्या पलीकडे होती. त्या दोघींची कशीबशी समजूत काढत त्यांना सगुणाबाईनी जेवायला लावलं. त्या दोघीजणी झोपल्या खऱ्या पण सगुणाबाईंना मात्र डोळ्याला डोळा लागेना. जेवायची तर इच्छाच नव्हती. तांब्याभर पाणी पिऊन त्या रात्र जागवत बसल्या.
त्या दिवसानंतर घरी पोलिसांच्या अधूनमधून फेऱ्या सुरु झाल्या. गोपाळरावांची घरी फेरी झाली वगैरे की नाही ह्याची कसून चौकशी केली जायची. यमुनाबाईनी ह्या सर्व प्रकरणाचा इतका धसका घेतला की त्या अंथरुणालाच खिळल्या. आताशा घर चालविण्याची जबाबदारी सुद्धा कठीण होऊन बसली होती. वाडीतील उत्पन्न असलं तरी त्या कामात सगुणाबाईंना मोजका अनुभव होता. आणि ह्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यापासून सर्व नातलग सुद्धा चार पावलं दूरच राहत होते. पगार बंद झाल्याने हातात पैशाची चणचण भासू लागली होती. शेवटी एक दिवस मन धीट करून त्या वाडीतील भाजी घेऊन विकायला बाजारात घेऊन गेल्या. थोडेसे पैसे मिळाले आणि लोकही भेटली त्यामुळे मन कसं थोडं हलकहलक झालं.
दोन तीन महिने असेच निघून गेले. तिचा तिसरा वाढदिवस येऊनही गेला. गोपाळराव घरी असते तर त्यांना समजला तरी असता. पण आता तर काही कोणाला समजायचा वावच नव्हता. छोट्या इंद्रायणीला हा सर्व प्रकार कळेनासा झाला होता. तिचे लाडके बाबा बरेच दिवस घरीच आले नव्हते. आईच्या डोळ्यात बराच वेळ पाणीच असायचं. आणि आजीतर बराच वेळ झोपूनच असायची. आई तिच्या परीने इंद्रायणीची काळजी घ्यायची पण त्यात आता बराच फरक पडला होता. हल्ली आई आपले लाड करू शकत नाही हे इंद्रायणीने कधीच ओळखलं होतं. पण समंजस असल्याने ती गप्प असायची. ह्या परिस्थितीत तिची बाहुली आता तिला जवळची वाटू लागली होती. तिच्या बोबड्या बोलांच कौतुक करणारे बाबा घरी नसल्याने तिचे बोबडे बोलही आता हळूहळू
आज सगुणाबाईंची मनःस्थिती अगदी खिन्न झाली होती. मागच्या बाजाराच्या वेळी मिळालेले सर्व पैसे संपून गेले होते. काल वाडीत जाऊन काही विकायला योग्य अशी काही भाजी वगैरे मिळेल का ह्याची पाहणी करून त्या आल्या होत्या. पण फारसं काही मिळालं नव्हतं. आणि अशातच सकाळी इंद्रायणी उठतच नव्हती. बाजारात जायच्या आधी तिला उठवून घरावर लक्ष ठेवायला सांगायचा त्यांचा विचार होता. पण ती उठतच नसल्याने शेवटी चिडून त्यांनी तिला एक चापटी मारली. इंद्रायणीला आतापर्यंत कोणीच रागानं ओरडलं सुद्धा नव्हतं आणि अचानक आता आईने अशी रागाने चापटी मारली तेव्हा तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आज कसं तिला अस्वस्थ वाटत होतं. पण तिला सांगता येत नव्हतं. ती गप्प उठून बसून राहिली. तिला उठलेली पाहून सगुणाबाई बाजारात निघाल्या.
इंद्रायणी बाहुलीला घेऊन पुन्हा खाटेत शिरली.
"आज न मला बरं वाटत नाहीय!" ती बाहुलीला म्हणाली.
"आईने मला आज मारलं! बाबा असते तर कधीच मारलं नसतं!" डोळ्यात अश्रू आणत ती म्हणाली.
"बाबांची मला खूप खूप आठवण येतेय! बाबा कधी येणार तुला माहितेय का ग?" अबोल बाहुलीच्या डोळ्यातील भाव बदलतायेत असं उगाचच इंद्रायणीला वाटून गेलं.
बाबांची तिला आज खूप खूप आठवण येत होती. बरं वाटत नसताना सुद्धा ती उठून वाडीत निघाली. पूर्वी तिला एकटीने ह्या वाडीत जायला खूप खूप भिती वाटायची. पण हल्ली मात्र इंद्रायणी खूप धीट बनली होती. ती एकटीच वाडीत जायला अजिबात भ्यायची नाही. फणसाचे झाड येताच ती त्या झाडाच्या गर्द छायेत बसली. पावसाळा अगदी तोंडाशी येउन ठेपला होता. काटेरी फणस कसे सुंदर दिसत होते. पण पुन्हा एकदा शंकरकाका ह्या सर्व फणसांना काढून नेणार ह्या विचारांनी ती दुःखी झाली. "बाबा आले ना की मी त्यांना सांगणार आहे, ह्या सगळ्या फणसांना इथेच राहून द्या म्हणून!" फणसाच्या झाडाला तिने आश्वासन दिलं. त्या झाडाला आपल्या नाजूक हातांनी तिने मिठी मारली. थोड्या वेळ तिथेच बसून मग ती घरी परतली.
सगुणाबाईंना बाजारात भाजी विकून काही पैसे मिळाले. लगबगीने त्या घरी आल्या. छोट्या इंद्रायणीला उंबरठ्यावर बसून आपली वाट पाहत असलेली पाहून त्यांना गहिवरून आलं. त्यांनी टोपलं तसंच बाजूला ठेवत तिला कुशीत घेतलं. तिच्या अंगाचा स्पर्श त्यांना अगदी गरम लागला. कपाळाला हात लावला तर चांगलाच ताप होता तिला! त्यांनी मोठ्या अपराधी भावनेनं तिला तत्काळ खाटेवर झोपवलं. डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवल्या. गरमागरम कणेरी करून दिली इंद्रायणीला.
दिवसभर आई मग इंद्रायणीच्या बाजूलाच बसून राहिली. आई बाजूला बसली म्हणून किंवा तिच्या उपचारांचा प्रभाव म्हणून संध्याकाळपर्यंत इंद्रायणीचा ताप अगदी उतरून गेला. इंद्रायणीचा ताप उतरलेला पाहून सगुणाबाईंना हायसं वाटलं. बऱ्याच दिवसांनी त्याही दोन घास व्यवस्थित जेवल्या.
रात्री सर्व आटपून, कडी कोयंडे लावून सगुणाबाई झोपायला आपल्या जमिनीवरील कांबळीवर पहुडल्या. गार वारं सुटलं होतं. पावसाला केव्हाही सुरुवात होणार होती.
इतक्या दिवसात फक्त दोनदा गोपाळरावांचे गुप्त संदेश आले होते. मी आता पूर्णवेळ स्वातंत्र्यलढ्यात झोकून द्यायचं आहे म्हणून! बाजारात एखादा माणूस भाजी घ्यायला आला कि पैशासोबत ही चिठ्ठी सोपवायचा. गेल्या चार महिन्यात अशी चिठ्ठी दोनदा आलेली पाहून सगुणाबाईंचा धीर वाढला होता. आपल्या मातृभूमीसाठी गोपाळराव इतके कठोर श्रम घेत असतील तर आपणास सुद्धा कष्ट करायलाच हवे असा मनोमन निग्रह त्यांनी केला होता. इंद्रायणीला पुढच्या वर्षी शाळेत प्रवेश मिळवायला हवा असाही त्यांनी विचार केला.
अचानक पावसाच्या जोरदार सरींचा आवाज सुरु झाला. ओल्या मातीचा पहिला गंध वातावरणात पसरला. गोपाळरावांना हा मृद्गंध खुप आवडायचा. त्यासाठी ते खास पहिला पाऊस पडला की बाहेर पडायचे. एकदा तर त्यांनी नजरेने सगुणाबाईंना तू ही चल माझ्यासोबत हा मृद्गंध घ्यायला असेही सुचवले होते. आपल्या अगदी कडक जीवनात अशा मृदुल क्षणाचे अगदी क्वचितच होणारे शिडकावे सगुणाबाईंच्या कायम लक्षात राहिले होते.
अचानक मागल्या दारावर कडी ठोठावल्याचा आवाज ऐकू आला. सगुणाबाई दचकल्या. काही वेळ पुन्हा शांत गेला. कदाचित आपल्याला भास झाला असेल म्हणून त्यांनी झोपायचं ठरवलं. पावसाने अगदी जोर धरला होता. पहिला पाऊस इतक्या जोरात क्वचितच होत असे. आज काहीतरी वेगळंच घडणार आहे कि काय असे सगुणाबाईंना राहून राहून वाटू लागलं. पुन्हा एकदा मागल्या दारची कडी ठोठावली गेली. आता मात्र सगुणाबाई उठल्या. मनात भय तर होतंच पण हातात एक कोयता घेऊन त्या पुढे निघाल्या. दिवा केव्हाचा विझला होता. दाराजवळ येताच त्यांनी हळूच कानोसा घेतला. काही क्षण असेच शांत गेले. "सगुणा मी आहे!" अशी गोपाळरावांची हाक त्यांच्या कानी पडताच त्यांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. अगदी घाईघाईने त्यांनी कडी उघडली. समोरची व्यक्ती पाहताच मात्र त्या अगदी हादरून गेल्या. दाढी वाढलेली, अगदी कृश देह, अंगावर पावसाने ओले झालेले, फाटके पण स्वच्छ कपडे - ही समोर उभी असलेली व्यक्ती गोपाळरावच आहे ह्यावर त्यांचा विश्वासच बसेना. पण त्या घाऱ्या डोळ्यातील चमक मात्र कायम होती. "गोपाळराव!" मोठ्यांने हंबरडा फोडून सगुणाबाईंनी त्यांच्या पायांना घट्ट मिठी मारली.
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा