मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

मन वढाय वढाय!


गेल्या आठवड्यात एक मित्र म्हणाला, "हल्ली बऱ्याच वेळा एकटेपणा मिळतो, आणि हल्ली हा एकटेपणा हवाहवासा झाला आहे!" एकटेपणाची कारणे अनेक! "नोकरीधंद्यानिमित्त एकट्यालाच दुसऱ्या शहरात राहायला लागणे हे मुख्य कारण!
माझे मन २००६ च्या नोव्हेंबर महिन्यात गेले. आम्ही न्यू जर्सीला वास्तव्याला होतो. आई वडील सप्टेंबर महिन्यात भेटीस आले. पत्नीने २००५ च्या हिवाळ्याचा धसका घेतला होता. आई वडिलांच्या सहा आठवड्याच्या भेटीचा शेवट जसजसा जवळ येत चालला तसं तिने माझ्या मागे तिचे आणि मुलाचे परतीचे तिकीट आरक्षित करण्याचा आग्रह सुरु केला. आणि मी तो मानलाही. आणि मग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्वजण भारतात परतले. त्यांना विमानतळावर सोडून घरी आल्यावर दरवाजा उघडल्यानंतरचा क्षण अजूनही लक्षात आहेचार तासांपूर्वी अगदी भरलेलं ते घर आता भकास वाटू लागलं होतं. माझ्यासाठी अगदी रुचकर जेवण बनवून ठेवलं गेलं होतं. ते स्वतःच्या हातांनी वाढून घेताना जाणवलं की बऱ्याच दिवसांनी स्वतःने वाढून घ्यायची वेळ आली आहे. आणि उद्यापासून तर दोन्ही वेळचं जेवण स्वतःला बनवायला लागणार होतं.
मला अमेरिकेत येऊन दीड वर्षे झाली होती आणि परतायचं कधी हे नक्की ठरलं नव्हतं. व्हिसाचा तसा काही प्रश्न नसल्याने मी अजून काही वर्ष तरी राहीन असा एकंदरीत समज माझा आणि कंपनीचा होता.
हे सर्वजण गुरुवारी परतले. शुक्रवार तसा मी आरामात काढला. संध्याकाळी येऊन चिकन वगैरे बनवलं. रात्री चित्रपट पाहिले. शनिवार सुद्धा तसा कामात गेला. त्यावेळी PMP परीक्षेचे दूरध्वनीवरून शनिवारी क्लास असत. ते दहा वाजता सुरु होतं. आणि पर्यंत चालत. त्यावेळी स्पीकरफोन चालू करून मी जेवण वगैरे बनविले. मग जेवता जेवता लक्षात आलं. अरे आठवड्याचे कपडे धुणे बाकी आहे. हिवाळा तसा सुरु झाल्याने, त्या कॉलनीतील सामायिक धुणीघरात कपडे धुवायला जायचे म्हणजे जय्यत तयारीनिशी जावे लागे. माझ्या एका मित्राच्या शब्दात सांगायचं म्हणजे अगदी युद्धाला जावं तशी तयारी करावी लागे. जॅकेट, हातमोजे वगैरे वगैरे. आणि एकदा धुण्याच्या यंत्रात, मग वाळवण्याच्या यंत्रात आणि मग शेवटी परत आणायला अशा तीन फेऱ्या मारायला लागत. एक दोन आठवड्यात मी शनिवारचे वेळापत्रक खास बनविले. कपडे धुणे, शनिवारचा दोन वेळचा स्वयंपाक, आठवड्याची भाजी, चिकन, दुध आणि पाणी आणणे ही सर्व कामे  मी PMP क्लासच्या आजूबाजूला आटपत असे. क्लासचे ज्ञान घेता घेता मग मी जेवणही आटपे.
अशाप्रकारे आठवड्याभराची माझी सर्व कामे शनिवारी दोन वाजता आटोपलेली असत. हिवाळ्यातील सूर्याची अगदी कोवळी किरणे (अगदी आपल्याकडल्या पाच वाजता सारखी) बेडरूम मध्ये आलेली असत आणि त्यात मी सर्व ब्लॅंकेट एकत्र करून दुपारची एक मस्त झोप काढत असे. जर झोप व्यवस्थित लागली तर जेव्हा साडेचारच्या आसपास जाग येई तेव्हा सूर्याने त्या दिवसापुरता निरोप घेतला असे. मग संध्याकाळचा चहा अगदी रात्रीलाच घ्यावा लागे.
समोर एक मस्त रस्ता होता आणि पुढे एक पार्क होता. हे दृश्य ऋतूमनाप्रमाणे अगदी बदलत जाई. त्याच्या ह्या दोन झलकी! 


चहा घेतल्यावर आणि सोफ्यावर बसून टीव्ही सुरु केला की मला जाणवे की इथे ह्या क्षणी मी आणि माझी तनहाईच आहे. म्हणायला तसा PMP चा अभ्यास, ऑफिसचे काम आणि नेटफ्लिक्स च्या DVD असत. पण मी बऱ्याच वेळा त्या विचारचक्रात गुंतून जाई. असेच लहानपणापासूनचे क्षण डोळ्यासमोर उभे राहत. पुढे असे पाच महिने आणि त्यातील २० -२२ साप्ताहिक सुट्ट्या मी अशा माझ्या तनहाई बरोबर घालविल्या. त्याचे वर्णन पुढील भागात!


संध्याकाळी - वाजता अंधार पडणे  ही गोष्ट भल्या भल्या लोकांना मानवत नाही. त्यानंतर एक भली मोठी रात्र आपल्यासमोर उभी ठाकलेली असते. रात्रीच्या जेवणाखाण्याच्या वेळांचे ताळतंत्र बिघडू शकते. त्यात हे एकटेपण! म्हटलं तर ह्या एकटेपणावर उपाय होता. काही मंडळी माझ्याबरोबर येऊन राहायला तयार होती. आधीच्या परदेशीवारीमध्ये मी असा काहीजणांबरोबर राहिलो होतो. परंतु आता ह्या शेयर करण्याची सवय मोडली होती. त्यामुळे मी एकटे राहण्याचं ठरविले.
शनिवार किंवा रविवारच्या संध्याकाळी सलग असा खूप वेळ मिळे. अशा वेळी जर तुम्ही संगणक, टीव्ही, भ्रमणध्वनी ह्यापासून अलिप्त राहू शकलात तर मोकळ्या वेळात तुम्ही अगदी स्वतःशी मग्न होऊ शकता. ही मग्न होण्याची पातळी वेळेनुसार अधिकाधिक खोल होत जाते. ठरवलं तर तुम्ही अंतर्मनाशी खोलवर संवाद साधू शकता. माझं मन असंच आठवणीच्या हिंदोळ्यात गुरफटल जायचं.
मला घराची, घरच्या लोकांची आठवण यायची का? हो यायची. पण त्या आठवणींनी मी कासावीस व्हायचो का? ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र नकारार्थी होतं. ह्याचं मला राहून राहून आश्चर्य वाटायचं. आपण इतके कसे भावनाशून्य झालोत. अजून जास्त विचार केल्यावर उत्तर सापडलं, महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर जो नोकरीबाबतीत अनिश्चिततेचा काळ मी अनुभवला होता त्याने कोठेतरी माझ्यावर खोलवर परिणाम केला होता. व्यावसायिक जग क्रूर असतं. तिथं एखाद्या जागेसाठी अनेकजण तयार असतात. कष्ट करून मिळविलेलं स्थान सहजासहजी गमवू नये असा माझ्या अंतर्मनात माझ्या नकळत कोठेतरी निर्णय झाला होता. आणि त्यामुळेच मी ठामपणे असा एकटा राहिलो. १९९६ - ९७ च्या आधीचा अभ्यासू मी त्यानंतर व्यावहारिक बनलो होतो. ही तशी जाणविण्यासारखी गोष्ट, ह्या कालावधीत मला समजली.
परदेशी राहणाऱ्या लोकांच्या भारतात फोन करण्याच्या विविध तऱ्हा असतात. काहीजण शनिवार- रविवारी फुरसतीत फोन करतात. हा फोन तास दीड तास चालतो. मग त्यात कांदे बटाट्याच्या भावापासून, गावच्या वसंतरावांच्या  कुमुदच्या लग्नापर्यंत सर्व गोष्टी चर्चिल्या जातात. माझी पद्धत थोडी वेगळी होती. मी पाचच मिनिट पण दररोज फोन करायचो. वडील जास्त बोलायचे नाहीत, बरा आहेस ना इतके विचारायचे. प्राजक्ता फोनवर बोलण्यात तशी बेताचीच. फक्त घरातील सामानाची चौकशी करायची. पण काही काळानंतर तीही थोडी एकटेपणाला कंटाळू लागली होतीह्या फोनमध्ये आईला सर्वात जास्त रस असे. आज जेवायला काय केलंस, सालमंड, तिलापिया मासे आणले की नाही वगैरे तिच्या चौकश्या असत. सर्दी खोकला वगैरे तर झाला नाही हा दररोजचा प्रश्न असे. मी नित्यनेमाने हा सकाळी ऑफिसात जाण्याआधी हा फोन करे.
PMP
चा अभ्यास मला नेहमीच्या जगात आणून सोडे. ह्या परीक्षेसाठी मी जानेवारीच्या पहिल्या आठवड्याची तारीख घेतली होती. आधी अभ्यास करून मग तारीख घ्यायची की तारीख घेऊन मग अभ्यास करायचा ह्यात दुसऱ्या पर्यायाचा विजय झाला होता. त्यामुळे परीक्षेचा कसोशीने अभ्यास करणे आवश्यक बनले होते. मेंदू त्यात गुंतला असला तरी मन गुंतलं होत की नाही हे माहित नाही. ह्या अभ्यासाच्या चर्चेसाठी आशिष आणि मी एकमेकांच्या घरी जात असू. डिसेंबरच्या मध्यात आम्ही सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यास सुरुवात केली. आशिष इतका पद्धतशीर माणूस की तो सराव परीक्षा द्यायला सुद्धा सुट्टीच्या दिवशी ऑफिसात जायचा. एकदा तर त्याने हद्द केली. उणे १० डिग्री तापमानात तो शनिवारी रात्री वाजता सराव परीक्षा देण्यासाठी मैलावरील ऑफिसात जाऊन बसला. पण आशिष एक जिद्दी माणूस. आज TCS मध्ये एका मोठ्या हुद्द्यावर तो जाऊन पोहोचला आहे. डिसेंबरच्या ३० तारखेला एक दुःखद घटना घडली. माझे काका ह्या दिवशी निवर्तले. मी ज्यावेळी घरी फोन केला होता त्याच वेळी नेमकी ही घटना घडली. हा क्षण सर्वात कठीण होता. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता मी तत्काळ भारतात येऊ शकलो नाही. काकांच्या आठवणी पुढे बरेच दिवस तिथे येत राहिल्या.
जानेवारीला PMP परीक्षा होती. परीक्षेचे ठिकाण १०-१२ मैलावर होते. शिस्तबद्ध आशिषने आपण हे ठिकाण आदल्या दिवशी बघून येवूयात असे सुचविले. मी चालकाची भूमिका बजावत त्या गावी पोहोचलो. नकाशानुसार ते ठिकाण अगदी जवळ असूनसुद्धा आम्ही त्याच्याभोवती घिरट्या घालत बसलो होतो. शेवटी ते ठिकाण मिळाले. आदल्या दिवशी ठिकाण बघून येण्याचा निर्णय योग्यच होता म्हणायचा! ह्या मागचे तत्व दुसऱ्या दिवशी परीक्षेला जाता जाता आशिष म्हणाला. परीक्षेच्या दिवशीच्या सर्व घटना तुम्हाला आधीपासून डोळ्यासमोर आणता आल्या पाहिजेत. जसे की मी पाचला उठणार, सातला घराबाहेर निघणार हा रस्ता घेणार. ह्या सर्व प्रकारात परीक्षाकेंद्राची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर असली की बराच फायदा होतो. मी ह्या वर्गात बसणार, पाठ केलेली सूत्र कच्च्या कागदावर लिहून काढणार वगैरे वगैरे. आयुष्यात सर्वांनाच सदैव इतकं पद्धतशीर बनता येत नाही पण ज्याची इच्छा असेल त्याने जमेल तितकं बनाव! त्या दिवशी सकाळी सुरु झालेला जोरदार पाऊस आम्ही कल्पिलेल्या चित्रात नव्हता. अमेरिका झाली म्हणून काय झालं, पावसामुळे वाहतूक तिथेही मंदगती होणारच! "ह्यासाठीच आपण अर्धा तास आधी निघालोत", आजूबाजूच्या वाहनावर करडी नजर ठेवणारा आशिष मला म्हणाला.
ही संगणकावर घेतली जाणारी परीक्षा होती. आम्ही वेळेआधी पोहोचलो होतो पण आम्हाला लगेचच परीक्षा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. २०० गुणाच्या चार तासाच्या ह्या बहुपर्यायी उत्तरांच्या परीक्षेत मध्ये सलग ४०-५० प्रश्न मला गोंधळवून टाकणारे होते. ह्यातील प्रत्येक प्रश्नाची दोन दोन उत्तर मला बरोबर वाटत होती. त्यामुळे मी संभ्रमावस्थेत पडलो होतो. चार तासाला वीस मिनटे वगैरे बाकी असताना माझी नजर आशिषकडे गेली. त्याच्या चेहऱ्यावर ख़ुशी ओसंडून वाहत होती. पट्ठ्याने बहुदा परीक्षा पास केली तर! मी कयास बांधला. परीक्षेचा निर्णय तत्काळ मिळत असे. मी पुन्हा सर्व उत्तरं तपासून शेवटी 'सबमिट' कळ दाबली. निर्णय येईपर्यंतची ती दोन मिनिटे अगदी मला अनादी काळासारखी वाटली. शेवटी संगणकराजाने गोड बातमी दिली. मीही उत्तीर्ण झालो होतो. परीक्षा संपल्याचा आणि उत्तीर्ण झाल्याचा आनंद एकदम देणारी ही परीक्षा मग मला खूप आवडून गेली.
आता मात्र वेळ खायला उठला होता. सोहम असताना आम्ही बाजूच्या पार्कात सदैव जात असू.

मग मी तिथे जाण्यास सुरुवात केली. सोहमबरोबर तिथल्या तळ्यात खरेतर परवानगी नसताना आम्ही तिथल्या बदकांना ब्रेड वगैरे खायला देत असू.


मी एकटा गेल्यावर सुद्धा ही बदके मोठ्या आशेने माझ्याकडे येत.

वसईचा होळीवरचा आशय हा ही माझ्या अगदी जवळ राहायचा. आमचे एकमेकांकडे येणेजाणे असे. त्याचाही मोठा मित्र परिवार होता. आशय मोठा दर्दी माणूस, मूडमध्ये असला की भरपूर खाद्यपदार्थ आणून मित्रमंडळींना बोलावयाचा. जेवणानंतर भरपूर चर्चा होई. अशाच एका चर्चेत विषय निघाला, "मोकळ्या वेळात आपण काय करतो?" हे प्रत्येकाने सांगायचं होतं. माझीवेळ येताच मी म्हणालो, "मला आयुष्यातील प्रवासाकडे मागे वळून पाहायला आवडतं. कोणत्या टप्प्यावर कोणते निर्णय घेतले, त्यावेळी दुसरे कोणते पर्याय उपलब्ध होते, त्यातील दुसरा एखादा निर्णय घेतला असता तर काय झालं असतं" वगैरे वगैरे! मंडळी क्षणभर स्तब्ध झाली!

असो आज थोडे विषयांतर झाल्याने हा भाग इथे संपू शकला नाही. पुढील भागात शीर्षकाला न्याय देत नक्की हा अध्याय पूर्ण करीन!


आयुष्यात बरेच क्षण येतात ज्यावेळी आपल्याला उपलब्ध पर्यायातील एक पर्याय निवडावा लागतो. आपण आपल्याजवळ असलेल्या माहितीच्या आधारे, वडिलधाऱ्या माणसांच्या सल्ल्याने आणि कधी काही अज्ञात शक्तीने प्रभावित केलेल्या मनाच्या आधारे त्या वेळी हा निर्णय घेतोह्या बिंदुपासून जाणारे दोन्ही / अनेक मार्ग अगदी वेगवेगळ्या दिशेला जाणारे असतात. मनात विचार येतोच की जर आपण त्यावेळी दुसरा एखादा मार्ग निवडला असता तर आयुष्य कोठे गेलं असतं? मागे वळून पाहता आयुष्यातील असे अनेक बिंदू मला ह्या दिवसात आठवत.
> बारावीला गणित, रसायन आणि भौतिक विषयात २८१ गुण मिळाल्यावर मुंबईत (VJTI /SPCE) स्थापत्य शाखेत प्रवेश घ्यायचा की खाजगी कॉलेजात संगणक शाखेला प्रवेश घ्यायचा की सांगलीला वालचंद कॉलेजात प्रवेश घ्यायचा.  
> १९९५ साली स्थापत्य शाखेतील पदवी घेतल्यावर पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं की व्यवस्थापन शिक्षण घ्यायचं?
> १९९७ साली स्थापत्य क्षेत्रात महिन्यात तीन नोकऱ्या बदलल्यावर अचानक एका मित्राने फोन केल्यावर सहज म्हणून सिंटेलमध्ये मुलाखत देऊन निवड झाल्यावर ज्या क्षेत्रात शिकताना  - वर्षे घालविली त्याला अचानक सोडावे की त्याचाच ध्यास धरावा
> २००० साली इंग्लंडात तीन महिन्यासाठी म्हणून गेल्यावर आठ महिने झाले तरी परतण्याची लक्षणे नाहीत. कंपनीचा आणि क्लायंटचा तिथेच राहण्याचा आग्रह. अशा वेळी घराची आठवण आली म्हणून परत येण्याचा निर्णय, परत आल्यावर दिवसात कंपनीचा पुन्हा परत येण्याचा आग्रह परंतु त्यावेळात लग्न जमल्याने आणि वाग्दत्त वधूच्या मी परत जाऊ नये ह्या मताचा आदर करून परत जाण्याचा निर्णय. आणि मग बरोबरीचा मित्र तिथेच अनेक वर्षे राहून स्थिरस्थावर झाला हे आठवून मनात उठणारे भावनांचा कल्लोळ!
> असेच पुढे परदेशवास्तव्याची संधी आली म्हणून पत्नीचा नोकरी सोडण्याचा निर्णय 
> केवळ मित्रांकडून माहित पडलं म्हणून बदललेल्या दोन नोकऱ्या!
असे हे काही सांगण्यासारखे मुद्दे आणि तसेच काही इतरहे सर्व विचार माझ्या मनात अधूनमधून येत राहत.
त्या कालावधीत मी जुने (म्हणजे अगदी जुने नव्हे!) हिंदी चित्रपट आवर्जून पाहत असे! त्यातील उमराव जान च्या गाण्यांनी माझ्यावर त्या दिवसात फार प्रभाव टाकला! "तमाम उम्र का हिसाब माँगती हैं जिंदगी!" हे एकदा मी असेच मित्रमंडळीत बोलून दाखवले तेव्हा "क्या अभी अस्सी साल के बूढे हो गये हो क्या" असे खास मित्र राम म्हणाला!

Thanksgiving
च्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीनंतर सुरु होणारी हॉलिडे सीजन ची गाणी माझी आवडती बनून राहिली होती. 'Let it snow', 'Feliz Navidad' 'Rudolph the red nose reindeer' "walking around Christmas tree" आणि अशी अनेक! संगीताचं एक विशेष असतं, ते भाषेच्या पलीकडे मानवी मनांना जोडण्याचं काम करत. ह्या ऐकलेल्या वाक्यावर मुंबई वसईत कधी विश्वास बसला नसता पण तिथे एकट राहताना त्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर मात्र पक्का बसला.

अजून एक विचार यायचा तो म्हणजे पुढच्या आयुष्यात नोकरी कितपर्यंत करायची? बारावीचे भौतिक आणि गणित ह्या विषयांच्या शिकवण्या सुरु करायच्या  असे माझे फार जुने स्वप्न आहे. त्याची मी सतत रंगीत तालीम त्या दिवसात करीत असे.

शालेय कालावधी तर माझ्या आयुष्याचा विसरण्यासारखा भाग! त्यातील आठवणी मला बऱ्याच वेळा आठवायच्या.

ह्या कालावधीत असंच कधीतरी मार्चमध्ये कायमचं परत जाण्याचा निर्णय घेतला आणि मग घर रिकामी करण्याची प्रचंड धावपळ सुरु झाली. बर्फाळ वातावरणात घरातील वस्तू एकतर मित्रांना द्यायच्या किंवा मुख्य कचरा पेटीजवळ नेऊन ठेवायच्या ह्या प्रकारात बरीच धावपळ होत होती. मग हळू हळू माझे मनन कमी होत गेले. राम आणि कंपूशी जास्त मैत्री होऊ लागली. राम चिकन मस्त बनवायचा आणि १५-२० जणांना घरी जेवायला बोलवायचा त्याचा आवडता छंद होता. मी ही ह्या कालावधीत ठीक जेवण बनवायला शिकलो इतके की भारतातून कोणी परत आलं किंवा परतायला लागलं तर त्यांना सहकुटुंब जेवायला बोलवण्याइतका आत्मविश्वास बळावला! आधी कुकरला डाळीच्या शिट्ट्या घेऊन मग मोठ्या पातेल्यात फरसबी, वाटाणे आणि तत्सम भाज्या आणि हाताला लागतील ते मसाले टाकून मी बनवीत असणारा तथाकथित सांबार सर्व कंपूत प्रसिद्ध झाला होता. शेवटी मग एप्रिलच्या तारखेला हा एकांतवास संपवून मी भारतात परतलो!

मागे वळून पाहता ह्या कालावधीने मला बरेच काही शिकविले. मुख्य म्हणजे माणसाची किंमत मला अजून जास्त कळली! कोणाशीही आपले अगदी काही परफेक्ट जमत नाही पण जमवून कसे घ्यायचं हे समजलं. आपण बाहेरच्या माणसांशी किती जमवून घेतो पण मग जवळच्या लोकांशी ह्यातील थोड तरी सामंजस्य दाखवायला आपल्याला कठीण का जात? तसच घराच्या जेवणाला आपण बऱ्याच वेळा नावं ठेवतो पण हे साधे जेवण सुद्धा ताटात येण्यासाठी सुद्धा बरीच मेहनत असते हे पुन्हा एकदा जाणवलं! तरी नशीब ब्लॉग लिखाणाच खुळ त्यावेळी माझ्या मनात त्याकाळी नव्हत! नाहीतर तुमच काही खर नव्हत बर का मंडळी!

आता काहीशी पुनरोक्ती चित्रांच्या बाबतीत. खिडकीतून घेतलेल्या त्या रस्त्याची ही तीन वेगवेगळी रूपं !



असो ह्या तीन भागात शीर्षकापासून मी काहीसा भरकटलो! मनातील वादळापेक्षा बाकीचे अनुभवच जास्त ओळी' खाऊन गेले! होत असं कधी कधी!

 
 
असो ह्या तीन भागात शीर्षकापासून मी काहीसा भरकटलो! मनातील वादळापेक्षा बाकीचे अनुभवच जास्त ओळी' खाऊन गेले! होत असं कधी कधी!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...