मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

जगी सर्व सुखी असा कोण आहे?



समुद्राच्या लाटांचा किनार्यावरील खेळ बघणे हा सर्वांचा एक आवडता छंद. ही लाट येते आणि आपल्या मार्गावरील सपाट शांत अशा वाळूला उधळून लावते. वाळूचे जीवन अंतर्बाह्य बदलून टाकते. पण ह्या लाटेच्या मर्यादा असतात. त्यापलीकडील वाळू मात्र आपले जीवन शांतपणे जगत असते. असेच काही आपल्या जीवनशैलीतील बदलाबाबत होत असते. हे बदल प्रथम महानगरात पोहचतात. त्यानंतर ही लाट आजूबाजूच्या नगरांना आणि मोठ्या खेड्यांना व्यापून टाकते. त्यापलीकडील छोटी खेडी मात्र आपले जीवन पूर्वीप्रमाणेच जगत राहतात. तथाकथित विकसित भागातील लोकांची नजर मग ह्या दुर्गम भागाकडे पोहचते. ह्या दुर्गम भागातील लोक कसे अप्रगत, अशिक्षित आहेत आणि त्याना कशी विकासाची गरज आहे यावर चर्चा झडतात. बर्याच वेळा ह्या चर्चा पंचतारांकित हॉटेलात होतात ही गोष्ट वेगळी!
असो जोपर्यंत ह्या चर्चा अप्रगत / अशिक्षित ह्या मुद्द्याभोवती घोटाळत राहतात तोपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळी कोणी एखादा महाभाग हे लोक कसे सुखापासून वंचित आहेत असे विधान करतो त्यावेळी मात्र मी विचार करू लागतो. आपली सुखाची व्याख्या काय? प्रत्येक माणसागणिक ही व्याख्या बदलणार, काही जनांनी स्वतःसाठी सुख म्हणजे काय याची व्याख्या ठरविली देखील नसणार. काही लोकांना आपण आयुष्यात कधी सुखी होवू किंवा नाही याची शास्वती देखील नसणार.
आता आपण सुखाचा उहापोह करूयात. काही गोष्टी अशा असतात की ज्यांच्याशिवाय सर्वसाधारण माणसे सुखी होत नाहीत परंतु त्या गोष्टींचे अस्तित्व माणसास सुखी बनविण्यास पुरेसे नसते. ह्या गोष्टींमध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा यांचा समावेश होतो. सर्वसाधारण माणसे ह्या गोष्टींशिवाय सुखी होवू शकत नाहीत. ह्याला अपवाद असतातच जी ह्या मुलभूत गरजाशिवाय सुखी राहू शकतात. असो परत आपण सर्वसाधारण माणसांकडे वळूयात. मनुष्यजातीच्या उत्क्रांतीच्या प्राथमिक स्थितीत मुलभूत गरजांची चिकित्सा करण्याची पद्धत नव्हती. पण माणसाला देवाने बुद्धी दिली त्यामुळे ह्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यामध्ये देखील माणसाने वैविध्य, विविध पातळ्या शोधल्या. ह्या वैविधतेचे दोन पैलू असतात; प्रथम म्हणजे तो मनुष्य खरोखर चोखंदळ असतो आणि दुसरे म्हणजे मनुष्यास आपणच दुसर्यापेक्षा कसे श्रेष्ठ हे दाखविण्याची उर्मी असते. आता पहिल्या प्रकारात माणसास समाधान मिळू शकते परंतु दुसर्या प्रकारात असतो तो केवळ आसुरी आनंद! मुलभूत गरजांच्या पलीकडे बघितले तर मग येतात ते वाहनांचे, आभूषणांचे छंद आणि नाद. यात देखील वरती उल्लेख केल्याप्रमाणे दोन पैलू येतातच. त्यानंतर येतात ते माणसाचे छंद! कला, क्रीडा, वाचन, भटकंती ह्याला वाहून घेतलेली छंदिष्ट माणसे काही कमी नव्हेत. अशा माणसांना त्यांच्या छंदात असीम आनंद नक्कीच मिळतो पण ते सुखी असतात का? कधीतरी त्यांच्या जीवनात लौकिकार्थाने सुखी होण्यात काहीतरी कमतरता असू शकते.
ह्यापलीकडे जावून बघितले तर मग येतात ती माणसाची नाती. माता, पिता, पती, पत्नी, कन्या, पुत्र, बंधू, भगिनी इथून सुरु होणारी ही नाती आपणास सुखसमाधान देतात तसेच कधीतरी दुःखही ! ही नाती असतात मात्र फार क्लिष्ट आणि गुंतागुंतीची! माणूस नात्यांमध्ये किती यशस्वी आहे यावर त्याचे सुख काही प्रमाणात अवलंबून असते. तसेच माणसाच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात ते त्याचे मित्र. हे मित्र त्याच्या सुख दुःखाच्या प्रसंगी हजर असतात. काही बाह्य घटकसुद्धा माणसाच्या जीवनात तत्कालीन सुख / दुःख निर्माण करतात. यात आजारपण, यश, जन्म मृत्यू अशा घटनांचा समावेश होतो.
माणसाचे मन वरील उल्लेखलेल्या सर्व घटकांचे पृथ्थकरण करीत असते. त्यानुसार प्रत्येकजण स्वतःला तात्कालीन सुखी / दुःखी आणि दीर्घकालीन सुखी / दुःखी समजत असतो. माणसाचा स्वभाव देखील यात महत्वाची भूमिका बजावतो. आपल्याकडे नसलेल्या गोष्टीवरच आपण लक्ष केंद्रित केल्यास आपण कधीच सुखी होणार नाहीत. जसजशी माणसाचे क्षितीज उंचावत जाते तसतसे त्याला विश्वातील सुंदर , महागड्या वस्तूंचा परिचय होत जातो. ह्या वस्तूंच्या परिचयानंतर त्या वस्तूंची अभिलाषा निर्माण होते, किंवा त्या उच्चभ्रू वर्तुळात राहण्यासाठी ह्या वस्तूंची त्याला निकड भासते. अशा वस्तूंचा परिचय होऊन सुद्धा त्यापासून विरक्त राहणारा मनुष्य विरळाच! ह्या वस्तू मिळविण्यासाठी केलेल्या संघर्षात माणसे बर्याच वेळा आपल्या प्रकृतीचा ऱ्हास करून घेतात.
सारांश म्हणजे सुखाची व्याख्या माणसागणिक बदलते. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वःतास माहित असावयास हवी. सुखाची ही व्याख्या निरपेक्ष असावी त्यात दुसर्या कोणाशी तुलना केलेली नसावी. त्याचबरोबर मला सुखी व्हायचे आहे की नाही हे ज्याने त्याने ठरवावे! कारण सुखी होणे आणि लौकिकार्थाने यशस्वी होणे ह्या बर्याच वेळा दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. ह्या लेखाचा शेवट संत तुकडोजी महाराजांच्या ह्या कवितेने!

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला भिती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥
’तुकड्या’ मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥८॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...