मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

रानात सांग कानात आपुले नाते



FM रेडिओवर रेनबो वाहिनीवर सकाळी ५ वाजल्यापासून बऱ्याचदा अतिशय सुंदर मराठी गाणी ऐकवली जातात. काही माहितीतली तर काही प्रथमच ऐकली जाणारी! पण काही गाणी मात्र अशी असतात की आपण ती पहिल्यांदा ऐकताना सुद्धा त्यांच्या प्रेमात पडतो. असेच एक गाणे रानात सांग कानात आपुले नाते. हे गाणे तत्कालीन प्रसिद्ध गाणे असावे. ह्या गाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर खालील संकेतस्थळाला भेट द्या. इथे हे संपूर्ण गीत लिखित स्वरुपात आणि गजानन वाटवे यांच्या स्वरातही उपलब्ध आहे. http://www.aathavanitli-gani.com/Song/Ranat_Sang_कानात
आता प्रेमिक फार पूर्वीपासून प्रेमात पडतात. प्रेमात पडताना दोन भाग असावेत. एक म्हणजे प्रियकर / प्रेयसी आवडणे, आणि दुसरा म्हणजे प्रेमभावनेचा! ही प्रेम भावनाच अतिशय कोमल, सुखकारक असावी. ह्या गीतात ही सुंदर भावना निसर्गातील सुंदर, प्रसन्न गोष्टींच्या मदतीने कशी सुंदर फुलवली आहे पहा ना! सर्व काही कसे सूचक! पहाटेच्या रमणीय अशा निसर्गात कवीने फुलविलेली सुंदर प्रेमभावना आणि नादमय शब्दांचे जुळलेले यमक! आता ह्या गीतात प्रियकर / प्रेयसीला दुय्यम स्थान मिळाले म्हणून खंत करणारा तो खरा अरसिक! आता ही प्रेम करायची लाजरी रीत पहा ना! आधीच जायचे रानात जिथं कोणी नसणार आणि तरी तिथे सुद्धा कानातच आपलं नाते सांगायचं आणि ते सुद्धा भल्या पहाटे ! आपल हे गुपित कोणाला कळू नये यासाठी किती ही प्रयत्नांची पराकाष्टा! हे गाणे गजानन वाटवे आणि रंजना जोगळेकर ह्या दोघांच्याही सुमधुर स्वरात गायले गेले आहे. ह्या आठवड्यात एके दिवशी सकाळी हे गाणे ऐकताना इतके प्रसन्न वाटले! आता ह्या गाण्यातील काही मराठी शब्दांचा अर्थ समजला नाही ही खंत करण्याची गोष्ट! असेच कित्येक मराठी शब्द कसे न वापरत असल्याने दैनंदिन व्यवहारातून गायब होत असावेत! असो आपल्याला देखील ह्या गाण्याचा आनंद लुटता यावा करिता ग दि माडगुळकरांचे हे गीत मी इथे उदधृत करीत आहे!
रानात सांग कानात आपुले नाते मी भल्या पहाटे येते पाण्यात निळ्या गाण्यांत भावना हलते हळुहळु कमलिनी फुलते
आभाळ जगाचे भाळ मळवटी नटते उगवतीस हासू फुटते ज्या क्षणी विरहि पक्षिणी सख्याला मिळते
हरभरा जिथे ये भरा शाळु सळसळते वाऱ्यात शीळ भिरभिरते, त्या तिथे तुला सांगते, हरळिणी देते बोलावुन तुजसी घेते, हा घेते, हा घेते
आनंद पुढे पाणंद, सभोवती शेते पूर्वेस बिंब तो फुटते, हा फुटते, हा फुटते त्या तिथं तुला सांगते, हरळिणी देते बोलावुन तुजसी घेते, हा घेते, मी घेते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...