मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने



माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने - भाग


१९९५ - ९६ च्या सुमारास पारंपारिक अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरींच्या बाबतीत काहीसे मंदीचे वातावरण होते. मुंबईतील चित्र पाहता VJTI आणि सरदार पटेल अभियांत्रिकी ह्या सरकारी अभियांत्रिकी विद्यालयात नावाजलेल्या कंपन्या मुलाखतीसाठी येत परंतु शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचे त्यांचे प्रमाण काहीसे कमी टक्के होते. त्यामुळे ज्यांना ह्या नोकऱ्या मिळत नसत त्यांना नोकरीसाठी बाहेर बऱ्यापैकी संघर्ष करावा लागत असे.आणि पगारही त्याकाळी प्रतिमहिना ८ - १० हजाराच्या आसपासच असत. त्यामुळे GRE सारख्या परीक्षा देऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी जाणे, GATE देऊन भारतात पदव्युत्तर शिक्षण घेणे किंवा MBA च्या परीक्षा देणे ह्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचा ओढा असे. नक्की आठवत नाही पण १९९७ च्या आसपास Y2K चा झंझावात आला आणि त्याने हे चित्र बऱ्याच प्रमाणात बदलले. ह्या बागुलबुवाने भारतीय IT कंपन्यांना अगणित प्रोजेक्ट मिळवून दिले आणि त्यांना प्राथमिक पातळीवरील संगणकीय ज्ञान असलेल्या लोकांची प्रचंड गरज भासू लागली. वर उल्लेखलेल्या पारंपारिक अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक अभियंत्यांनी ही संधी साधून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चंचूप्रवेश केला. ह्यामध्ये ह्या अभियंत्यांच्या दीर्घकालीन कारकिर्दीविषयी ना त्या अभियंत्यांनी विचार केला होता न त्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांनी. ह्यामुळे अजून एक घटना झाली ती म्हणजे पारंपारिक क्षेत्रातील उरलेल्या अभियंत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील हे गुलाबी चित्र पुढे ८ ते १० वर्षे कायम राहिले. ह्या क्षेत्रातील बहुतांशी लोकांना परदेशगमनाची संधी मिळाली. त्यातील काहींना कायमस्वरुपात राहण्याची मिळाली तर काहीना कालांतराने परत यावे लागले तर काहींनी स्वतःहून परत येण्याचा निर्णय घेतला. परदेशगमनाच्या ह्या संधींमुळे ह्या लोकांची आर्थिक स्थिती बर्याच प्रमाणात उंचावली. त्यामुळे आणि ह्या लोकांना परदेशी राहण्याच्या गरजेमुळे त्यांच्या जीवनसाथी असलेल्या सुविद्य पत्नींना आपल्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या. मागील एका ब्लॉगमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे एकंदरीतच आपल्या देशाच्या कुशल मनुष्यबळाच्या नियोजनाबाबत आनंदीआनंदच आहे. आपण सद्यपरिस्थिती दीर्घकाळ कायम राहणार आहे असे मानून आपले बरेचसे निर्णय घेतो आणि मग काहीशी फसगत होते. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात उच्चपदावर जाण्यासाठी पिरामिड संकल्पना लक्षात घेणे आवश्यक आहे. प्राथमिक पातळीवर बहुसंख्य लोक असतात परंतु व्यवस्थापनाच्या उच्च पातळीवर जावे तशी ह्या व्यवस्थापकांची संख्या झपाट्याने घटते. त्यामुळे केवळ अनुभवांची वर्षे वाढली म्हणून सदैव बढत्या मिळणे कठीण होत जाते. अमेरिकन लोकांना वर्षोनवर्षे आज्ञावली लिहिण्यात काही वावगे वाटत नाही. उलट ते आनंदीच असतात परंतु आपली मानसिकता इथे आड येते. सामाजिक प्रतिष्ठेच्या आपल्या भ्रामक कल्पनांनी आपणास व्यावसायिक बढती मिळविण्याचे अदृश्य दडपण येते. सर्वांनाच हे जमत नसल्याने एका प्रकारची उदासीनता अशा लोकांच्या मनात येते. आता आपण गेल्या ४-५ वर्षात ह्या क्षेत्राकडे वळलेल्या लोकांकडे पाहूयात. आता चित्र पालटले आहे. पारंपारिक क्षेत्रात कुशल अभियंत्यांची गरज वाढल्याने त्या क्षेत्रातील पगार आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या बरोबरीचे झाले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील परदेशगमनाच्या संध्या झपाट्याने कमी झाल्या आहेत. त्यामुळे सुविद्य पत्नींनी नोकरी सोडण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या काही वर्षात आर्थिक स्थितीच्या निर्माण केल्या गेलेल्या आभासी चित्राने जीवनावश्यक गोष्टींचे दर प्रमाणाबाहेर गेले आहेत आणि त्यातच ह्या क्षेत्रातील लोकांनी आपला जीवनस्तर परत वळण्याच्या पलीकडच्या पातळीवर उंचावून ठेवला आहे. ह्याचे परिणाम वैयक्तिक जीवानांवर सुद्धा होत आहेत. एकंदरीत आपण एका नवीन स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभे आहोत. परंतु पुढील १० - १५ वर्षांसाठी चांगले क्षेत्र कोणते हे सांगण्याचा विश्वास आपल्या दूरदृष्टीच्या अभावामुळे आपल्याकडे नाही. चौथीत असलेल्या माझ्या मुलासाठी चांगले क्षेत्र कोणते ह्या प्रश्नाचे उत्तर आज माझ्याकडे नाही. आणि त्यामुळेच IPL मुळे ऑस्ट्रेलियन संघांच्या कसोटी फलंदाजीवर परिणाम झाला असे टेलर जेव्हा म्हणतो तेव्हा IPL हा आपल्या मुलासाठी एक पर्याय ठेवावा असा विचार मी करू लागतो. आज इथे थोडा हा खोलात जाण्याचा प्रयत्न! आज्ञावली लिहिण्यासाठी कोणत्या कौशल्यांची गरज आहे ह्याचा आपण आढावा घेवूयात १> गणिती डोके. बर्याच वेळा क्लिष्ट आकडेवारी करण्यासाठीची आज्ञावली लिहावी लागते. ही आज्ञावली लिहिण्याचा एक अचूक मार्ग असतो आणि अनेक अपरिणामकारक मार्ग असतात. अचूक मार्गाने आज्ञावली लिहिण्यासाठी गणिती डोके आवश्यक आहे. जसजसे एखादी कंपनी ह्या क्षेत्रातील प्रगल्भतेच्या पायऱ्या ओलांडू लागते तेव्हा तिला अचूक मार्गाने आज्ञावली लिहिणाऱ्या संगणक प्रोग्रामरची गरज भासते. २> Domain Knowledge - अर्थात एका विशिष्ट क्षेत्रातील व्यावसायिक ज्ञान. साधारणतः ३ - ४ वर्षे प्रोग्रामिंग केलेल्या संगणकीय व्यावसायिकास एखादया विशिष्ट क्षेत्रातील सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. ह्या ज्ञानाचा वापर तो अस्तित्वात असलेल्या आज्ञावलीत क्लिष्ट व्यावसायिक तत्वे (business logic) सहजतेने समजून घेण्यासाठी करून घेवू शकतो. त्याचप्रमाणे एखादी नवीन व्यावसायिक गरज (business requirement) आल्यास ती कितपत व्यवहार्य आहे आणि ती आज्ञावलीत समाविष्ट करण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांचा अचूक अंदाज हा व्यावसायिक देवू शकतो. वरीलपैकी पहिला घटक हा बर्यापैकी तुमच्या नैसर्गिक गुणवत्तेवर अवलंबून असतो. फार तर एखादी संगणकीय भाषा अधिकाधिक अचूकपणे शिकून तुम्ही त्यात थोडीफार सफाई आणू शकता. आणि दर वर्षी हा घटक असणारे हजारोजण ह्या क्षेत्रात प्रवेश करीत असतात त्यामुळे आपले वेगळेपण टिकविण्यासाठी हा घटक फार काळ तुमची साथ देवू शकत नाही. दुसर्या घटकासाठी चिकाटीची आवश्यकता असते. तात्कालिक प्रलोभने (जशी की दुसर्या क्षेत्रातील परदेशगमनाची संधी) तुम्हांला विचलित करीत असतात. परंतु जर तुम्हास खरोखर दीर्घकाळ माहिती आणि तंत्रज्ञान ह्या क्षेत्रात राहायचे असेल तर ह्या विचलीत करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ (SME) बनणे अत्यावश्यक आहे. वरील सर्व चर्चेत तुम्ही TCS, INFOSYS सारख्या संगणक तज्ञ पुरवणाऱ्या कंपन्यात काम करीत आहात की मोठ्या आर्थिक कंपन्याच्या भारतीय शाखेत (CAPTIVE) काम करीत आहात हा महत्वाचा मुद्दा येतो. एकंदरीत सुरुवातीची पाच सहा वर्षे ह्या क्षेत्रात काढल्यावर बर्याच जणांना आज्ञावली लिहिणे नकोसे वाटू लागते. नवीन लोकांशी करावी लागणारी स्पर्धा, वैयक्तिक जीवनात वाढलेल्या जबाबदार्या, वाढलेल्या आर्थिक लाभाचा कंपनीला केवळ आज्ञावली लिहून मोबदला देवू शकण्याच्या आत्मविश्वासाचा अभाव अशा बर्याच कारणांमुळे असे घडते. मग हे लोक वेगवेगळे मार्ग अवलंबितात. त्यांचा उहापोह पुढील लेखात! मागील लेखात एका मुद्द्याचा उल्लेख करायचा राहून गेला. आज्ञावली लिहिण्याच्या पलीकडे काही संधी उपलब्ध असतात. Business Analyst - BA (व्यावसायिक पृथ्थकरण करणारे) आणि Quality Analyst QA (नवनिर्मित आज्ञावलीवर विविध चाचण्यांची तपासणी करून पाहणारे) हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. साधारणतः Y2K खूळ ओसरल्यानंतर ह्या पर्यायांची खोलवर जाणीव भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिरली. BA वर्गातील व्यावसायिक एखाद्या प्रोजेक्टच्या पुरस्कर्त्याकडून त्यांच्या व्यावसायिक गरजा समजावून घेवून त्या योग्य भाषेत आज्ञावली लिह्णाऱ्या गटापर्यंत पोहोचवितात. ह्या वर्गाला जशी प्रोजेक्टच्या पुरस्कर्त्याच्या खऱ्या गरजांची जाणीव असणे आवश्यक असते त्याचप्रमाणे ही गरज पूर्ण करण्यासाठी विकसित कराव्या लागणाऱ्या आज्ञावलीसाठी येऊ शकणार्या अडचणींचे भान असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे दोन वेगळ्या गटांशी समन्वय साधण्यासाठी ह्या वर्गाकडे अत्यंत उत्कृष्ट असे लिखित आणि मौखिक संभाषणकौशल्य असणे आवश्यक आहे. आणि व्यावसायिक संकल्पनांची सखोल जाणीवसुद्धा! हल्ली काही आज्ञावली विकसित करणारे व्यावसायिक एक पळवाट म्हणून ह्या मार्गाचा विचार करू इच्छितात त्यांनी ह्या पर्यायासाठी लागणारे गुणधर्म आपण बाळगून आहोत की नाही ह्याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. QA गटातील व्यावसायिक नव्याने विकसित केलेल्या अज्ञावालीवर विविध चाचण्यांचा मारा करून त्यातील दोष हुडकून काढण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. ह्यात नव्याने विकसित केलेली आज्ञावली आधीपासून अस्तित्वात असलेल्या FUNCTIONALITY वर काही विपरीत परिणाम तर करीत नाही ना आणि नव्याने दिलेल्या गरजा पूर्णपणे समाधानकारकरीत्या पार पाडत आहे की नाही ह्या दोन प्रकारांच्या चाचण्यांचा समावेश होतो. ह्या ही पर्यायाकडे वळु पाहणाऱ्या व्यावसायिकानी दीर्घकाळ केवळ चाचण्यांचे परीक्षण करण्याचा संयम आपण बाळगून आहोत की नाही ह्याचे परीक्षण करावे. ह्यात MANUAL (प्रत्येक सूचना माणसाद्वारे अमलात आणून) आणि AUTOMATED (सूचनांना एका स्वयंचलित आज्ञावलीद्वारे अमलात आणणे) असे दोन प्रकार पडतात. अजून एक थोडासा कमी प्रमाणात आढळणारा वर्ग म्हणजे DBA (माहिती भांडाराचा पहारेकरी). हा वर्ग PRODUCTION वातावरणात अस्तिस्वात असलेल्या माहिती भांडारात काही प्रश्न निर्माण झाल्यास किंवा त्यातून माहिती हुडकून FRONT END ला पोहोचविण्यात विलंब होत असल्यास तत्काळ सक्रीय होवून लीलया समस्येचे मूळ कारण शोधून काढतो. त्याच प्रमाणे माहिती भांडाराच्या संरचनेत बदल होत असल्यास नवीन संरचना कशी प्रतिसादासाठी लागणाऱ्या अवधीच्या बाबतीत कशी उत्कृष्ट राहील ह्याची काळजी घेतो. ह्या सर्व गटांवर लक्ष ठेवणारा एक PM (व्यवस्थापक) असतो. प्रोजेक्टच्या पुरस्कर्त्यांनी दिलेल्या सर्व गरजा त्यांच्या मूळ रुपात प्रोजेक्टच्या संपूर्ण कालावधीत कशा टिकून राहतील, नव्याने निर्माण झालेल्या गरजांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा अंदाज घेवून त्यासाठी पुन्हा नव्याने नियोजन करणे, प्रोजेक्टमध्ये निर्माण होवू शकणार्या संभाव्य धोक्यांना आधीपासून ओळखून त्यांचा परिणाम कमी करण्यासाठी उपाय ओळखून ठेवणे, त्याचप्रमाणे QA गटाने शोधून काढलेले दोष कसे योग्य प्रकारे वेळीच निस्तरले जात आहेत ह्याची खात्री करून घेणे ह्या सर्व गोष्टींसाठी हा इसम जबाबदार असतो. हा इसम मनुष्यबळाचा अंदाज आणि प्रत्यक्षातील वापर, QA ने हुडकून काढलेले दोष अशी सर्व आकडेवारी आलेखाच्या रुपात जगासमोर मांडण्याचे इतर गटांना न आवडणारे काम करतो. त्यामुळे बाकीच्या गटांत उगाचच अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि ते ह्या माणसास टाळू लागतात. एकंदरीत आज थोडे विषयांतर झाले. पुढील भागात परत आज्ञावली निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांच्या पुढील मार्गाविषयी बोलूयात! ह्या लेखमालिकेतील दुसरया भागाचा शेवट ह्या क्षेत्रात पाच सहा वर्षे काढलेल्या एका पारंपारिक मनोवृत्तीच्या भारतीय व्यावसायिकाच्या उदाहरणाने केला होता. ह्या व्यावसायिकास विविध कारणांमुळे आज्ञावली लिहिणे नकोसे होऊ लागते. ह्या सर्व प्रकारात ज्या प्रकारची प्रोजेक्ट तुमची कंपनी घेत असते हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असतो. समजा कंपनीकडे बहुतांशी प्रोजेक्ट अशी आहेत ज्यात अनुभवी , आज्ञावलीतील खाचाखोचा माहित असलेल्या लोकांची गरज नाही, तर मग साहजिकपणे त्या कंपनीच्या दृष्टीने अनुभवी माणसांचे महत्व कमी होते. एकंदरीत चाणाक्ष व्यावसायिक ह्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन मग वेगळे पर्याय निवडतो. ह्यात नवीन येणाऱ्या प्रोजेक्टसाठी प्रपोजल लिहिणे, ऑडीट / सेल्स टीम मध्ये सहभागी होणे, किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये डीलीव्हरी मनेजर होऊन बसणे ह्या प्रकारांचा समावेश होतो. आता खरी मेख अशी आहे की वरील उल्लेखलेल्या भूमिकांमध्ये चपलख बसण्याचे गुण काही माणसांत निसर्गतःच असतात. ती माणसे ह्या भूमिकांत आनंदी राहतात परंतु काहीजण असे असतात ज्यांनी लहानपणापासून अभ्यासाव्यतिरिक्त काही केले नसते आणि ह्या व्यवसायातसुद्धा आज्ञावली लिहिणे हे सुद्धा एक अभ्यासाचेच व्यापक रूप आहे. अशा लोकांना वरील भूमिका निभावणे कठीण होऊ लागते. केवळ मेहनतीच्या जोरावर ह्या भूमिकांतील यशाच्या व्याख्या काबीज करणे त्यांना कठीण जाते आणि मग त्यांची ह्या भूमिकांमध्ये कुतरओढ होत राहते. एकंदरीत हे सर्व मुद्दे मांडण्याचा हेतू असा की आतापर्यंतचे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आपले यश आपणास काहीसे आपसूक मिळाले आहे. ह्यात कंपन्या आणि व्यावसायिक हे दोन्ही आनंदी आहेत. परंतु आता ह्या अनुभवी मनुष्यबळाची योग्य काळजी घेणे हे मोठे आव्हान आपल्यासमोर ठाकले आहे. हा प्रश्न पाहिले तर अजून गंभीर होत जाणार. आज मोठ्या कंपनीमध्ये जवळपास दोन लाख व्यावसायिक आहेत. दहा वर्षांनी ह्या सर्वांना व्यवस्थापक पदे मिळणे शक्य नाही. त्यामुळे जमेल तितक्या व्यावसायिकांनी खोलवर ज्ञान मिळविणे अत्यावश्यक आहे. हे क्षेत्र तसे कठोर आहे. इथे २० : ८० नियम लागू होतो. वीस टक्के लोक ८० टक्के महत्वाचे काम करतात आणि बहुदा ह्या लोकांनाच खुश ठेवले जाते. अजून एक गोष्ट, ह्या क्षेत्रात सतत कामगिरी उंचाविण्याचे तुमच्यावर दडपण असते. त्यामुळे बढती मिळून जर तुम्ही वरच्या जागी गेलात आणि दुर्देवाने तिथले काम जमले नाही तर तुम्हांला बहुदा बाहेरचे दार दाखविले जाते. ह्यात अजून एक पर्याय उपलब्ध आहे. साधारणतः १५ - २० वर्षे ह्या क्षेत्रात नोकरी केल्यावर दुसर्या एखाद्या तुलनात्मक दृष्ट्या शांत क्षेत्राची निवड करणे. तितकी प्रगल्भता आपण जोपासणे आवश्यक आहे. असो एकंदरीत ही लेखमालिका इथेच आटोपती घेतोय. ह्या लेखाचा मुख्य रोख मोठी स्वप्ने बाळगून ह्या क्षेत्रात शिरणाऱ्या नवीन पिढीकडे आहे. हे क्षेत्र अजूनही फायदेशीर आहे परंतु सरधोपटपणे सर्वांना यश मिळण्याचा काळ मागे पडला आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या क्षमतेचे, गुणवत्तेचे व्यवस्थित मूल्यमापन करून ह्या क्षेत्रातील आपले करीअर नियीजन करणे अत्यावश्यक बनले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नाच ग घुमा !

  शहरी दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक असणाऱ्या, घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांवर आधारित हा एक सुरेख चित्रपट!  नम्रता संभेराव, मुक्ता बर्वे...