मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

सापुतारा प्रवास



आधुनिक जीवनशैली आपण सर्वजण जमेल तशी स्वीकारतो. ही जीवनशैली कशी असावी ह्याविषयी लिखित स्वरुपात कोणतेही साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्या कानी पडेल, आपल्या भोवतालचा मित्र, नातेवाईक परिवार जसा वागेल त्यावरून आपण आधुनिक जीवनशैलीचा निष्कर्ष काढतो. आता आपण म्हणजे बहुतेकांच्या बाबतीत नवरा बायको आणि एक - दोन मुले असा परिवार होतो. सध्या मध्यमवयीन वर्गात मोडणार्यांचे आई-वडील सत्तरीपलीकडे पोहोचले असल्याने ते आधुनिक जीवनसरणीच्या फंदात पोहोचत नाहीत. नवरा बायको ह्यांचे आधुनिक जीवनशैली ह्या विस्तृत शीर्षकाअंतर्गत येणाऱ्या विविध प्रकारांविषयी एकमत होण्याची शक्यता कमी असते. एकंदरीत हल्ली मतभेद  असले तरी सामंजस्य वाढल्याने तोडगा काढला जातो. असाच आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणजे उन्हाळी सहल! वसईत वाढलेल्या बऱ्याच जणांना घरीच मे महिन्यातील सुट्टी घालवावयास आवडते. त्यात मीही समाविष्ट आहे. साधारणतः १५ वर्षांपूर्वीच्या कालावधीपर्यंत  मला वडील - काका आणि समाजातील वरिष्ठ वर्गाकडून 'आमच्या वेळी' ह्या दोन शब्दांनी सुरु होणाऱ्या बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळायच्या. मधल्या काही कालावधीनंतर आता मी बऱ्याच वेळी मुलाला अशा काही गोष्टी सांगतो. त्यात काहीसे पूर्वीच्या पिढीच्या गोष्टींची पुनोरोक्ती असते. जसे की आंबे गोळा करणे, विहिरीत पोहोणे (मी हा प्रकार खूप कमी केला), क्रिकेट, गोळेवाल्याकडून १० पैशातील गोळा असे अनेक प्रकार. वसईतील बरीच माणसे मोठी झाली तरी आपले बालपण टिकवून ठेवतात आणि योग्य संधी मिळाली की ते बाहेर काढतात. एकंदरीत ह्या सर्व प्रस्तावनेवर मला फारशी बाहेर जाण्याची इच्छा नव्हती हे सुज्ञ वाचकांनी ओळखले असेलच. तरीही आधुनिक जीवनशैलीचा भाग म्हणून आणि मे महिन्यात काय केले ह्याचे उत्तर असावे म्हणून आम्ही मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मिळालेल्या सुट्टीत  सापुतार्याला जायचे ठरविले. वसईहून आम्ही स्वतःची गाडी घेवून जाण्याचे ठरविले. मुंबई- आग्रा महामार्गाद्वारे नाशिक आणि तेथून सापुतारा असा एक मार्ग होता. परंतु नशिबाने माझ्या मेव्हण्याच्या सासुरवाडीच्या लोकांनी आम्हाला वापिहून सापुतार्याचा मार्ग सुचविला. एकंदरीत हे अंतर सुद्धा पहिल्या मार्गाच्या आसपासच होत होते. एकूण अंतर २७५ किमी झाले. सोमवारी सकाळी आम्ही साडेपाचच्या सुमारास वसई गावातून निघालो. मध्ये गाडीला काही प्रश्न उद्भवल्यास मला त्या विषयात ओ कि ठो माहित नसल्याने आम्ही सोबतीला ड्रायव्हर घेण्याचे ठरविले होते. सकाळी पाचला निघण्याचे ठरविले असताना प्रथम कुटुंबाने १५ मिनिटे आणि मग ड्रायव्हरने अजून अर्धा तास विलंब केला. माझ्या  कार्यालयात माझे एक बॉस  आहेत. ते कधीच आपला पारा चढून  देत नाहीत. त्यांचे स्मरण करून मी शांत राहण्यात यश मिळविले. सावंत ह्यांनी मग झालेला विलंब भरून काढण्याचा निर्धार केला आणि गाडी जोरदार वेगाने पळविली. विरार, केळवा, पालघर हे सर्व फाटे आम्ही वेगाने पार केले. गेल्या एक महिन्यापर्यंत मी रेनबो FM वाहिनी सकाळी ऐकत असे. ह्या वाहिनीवर सुमधुर गाण्यासोबत सुरेख निवेदनही ऐकावयास मिळते. पण त्यांनी गाण्यांचे वैविध्य राखण्याच्या नादात काहीशी सकाळच्या वेळेत न बसणारी गाणी ऐकावावयास सुरुवात केली आणि त्याचवेळी ओये फिल्मी असे काहीसे टपोरी नाव असणाऱ्या वाहिनीने सुरेख गाणी ऐकावावयास सुरुवात केली. ओयेचा प्रोब्लेम एकच, म्हणजे दोन अतिसुंदर गाण्यामध्ये कावकाव करणारे त्यांचे निवेदक. तरीही त्या सुंदर गाण्यांपायी मी त्यांना झेलतो. सावंत तसे माहितगार, डहाणुच्या महालक्ष्मी देवळाचा पुजारी कसा मध्यरात्री जावून डोंगरमाथ्यावर झेंडा रोवतो ह्याची सुरस कहाणी त्यांनी आम्हाला सांगितली. त्या गोष्टीने सोहम त्यांचा चाहता बनला. गाडी किमान १०० चा वेग राखून होती. बघता बघता गाडीने गुजरातमध्ये प्रवेश केला. मग आमचे लक्ष वापी कधी येते आणि सापुताराचे वळण कधी घ्यायचे ह्याकडे लागले. अनुभवी सावंत ह्यांनी एक वळण निवडून हेच सापुताराचे वळण असावे हे घोषित केले. स्मार्टफोन वरील दिशादर्शक यंत्रणा काही वेळ काम करीत नव्हती आणि बाकीचा वेळ गोंधळवून टाकणाऱ्या सूचना देत होती. ते वळण घेताच एका हॉटेलात आम्ही थांबलो आणि हे योग्य वळण असल्याची खात्री करून घेतली. आमच्या कुटुंबाने (सुविद्य पत्नी माझे ब्लॉग चुकुनही वाचत नसल्याने तिला कुटुंब म्हणून संबोधण्याचे धाडस मी करीत आहे), सकाळी उठून बनविलेली बटाटा सुकी भाजी, स्लाईस ब्रेड आणि बटर मिळून रुचकर SANDWITCH चा नास्ता आम्ही केला आणि गुजरातेतील पहिला चहा घेतला. एव्हाना सकाळचे साडेसात वाजले होते. २७५ किमीच्या एकूण टप्प्यापैकी आम्ही १२८ किमी अंतर पार केले होते.
 थोडेसे अंतर सरळ जावून मग डावे वळण घ्यायचे होते. तोवर जरा रहदारीचा रस्ता होता. मग ते वळण घेतल्यावर थोडासा गुंतागुंतीचा रस्ता आला, माझ्या हिंदीतील प्रश्नांना फारशी उत्साहवर्धक उत्तरे मिळत नाहीत हे पाहून सावंत पुढे सरसावले आणि त्यांनी आपल्या गुजराथी भाषासामर्थ्याचे प्रदर्शन करण्यास सुरवात केली. त्यांना नक्कीच चांगला प्रतिसाद मिळाला आणि नानापोंडा पर्यंत सरळ जायचे असे आम्हास सांगण्यात आले. नानापोंडाच्या आधी मोठापोंडा हे गाव होते. सोहमला पोंडा हा शब्द खूप आवडला. हा रस्ता एकेरी लेनचा होता. परंतु रस्त्याची स्थिती अतिउत्तम होती. रस्त्याच्या दुतर्फा डेरेदार वृक्षांची लागवड केली गेली होती. आपल्याला आपल्या देशातील चांगल्या गोष्टींची स्तुती करण्याची सवय नाही. एकंदरीत वसई ते सापुतारा ह्या प्रवासात अतिउत्तम रस्ते अनुभवयास मिळाले मग ते राष्ट्रीय महामार्ग असोत की राज्य महामार्ग!
गेले काही महिने मी जमेल तशी मीना प्रभूंची प्रवासवर्णनाची पुस्तके वाचतोय, दक्षिणरंग, इजिप्तायन, मेक्सिकोपर्व ह्या पुस्तकातील त्यांनी फारशा ज्ञात नसलेल्या प्रदेशात केलेल्या धाडशी प्रवासाचे वर्णन माझ्या आणि कुटुंबाच्या मनावर फार प्रभाव करून बसलंय. गुजरातच्या ह्या ग्रामीण भागात प्रवास करताना आम्ही काहीसा चाकोरीबाहेरचा प्रवास करतोय अशी माझी भावना होत होती. अशाच एखाद्या शहरी जीवनापासून दूर गावात जाऊन वास्तव्य करण्याचा मनात दडलेला विचार मग अशा वेळी उफाळून बाहेर निघतो. असा प्रवास अनुभवताना नानापोंडा मागे गेले, मग धरमपूर, लकडमल,मालनपाडा, खानपूर, नवसारी, तकरबारी, अंकला, वंजारवाडी, कावदेज, लीमझार, गंगपूर, मिन्धाबरी, जमालीया, वनारसी, महुवास, आंबावडी, वासोंदा NATIONAL पार्क,  खाम्भला, सदरदेवी अशा  नयनरम्य गावांतून  प्रवास करीत आम्ही डांग जिल्ह्यात प्रवेश केला. एव्हाना थोडीफार चढण सुरु झाली होती. सापुतारा आणि महाबळेश्वर अथवा माथेरान अशी तुलना हिरवाईच्या बाबतीत होवू शकत नाही. हे ऐकून होतो परंतु प्रत्यक्ष बघून खात्री झाली. वासोंदाच्या आसपास थोडीफार झाडी दिसली खरी. सापुतारा येण्यास ३ - ४ किमी बाकी राहिले असताना खरी चढण सुरु झाली. आणि पत्नीला चढणीचा थोडाफार त्रास होवू लागल्याने आम्ही ५ मिनटे थांबलो. मग पुन्हा प्रवास सुरु झाला. सापुतारा गावात प्रवेश करताना आम्ही प्रवेश फी भरली. सापुतारा गाव तसे छोटेसे. मुख्य चौकात आम्ही हॉटेल चित्रकुटची चौकशी केली तर आम्हास समोरचा रस्ता दाखविण्यात आला. त्या रस्त्यावर थोडे पुढे जाताच हॉटेलसाठी दोन खुणा होत्या. एक खालच्या दिशेने आणि दुसरी वरच्या दिशेने. आम्ही खालच्या दिशेने जावून गाडी पार्क केली. एव्हाना सव्वा अकरा झाले होते. स्वागतकक्षात जावून आम्ही रूमची चौकशी केली.  आमची रूम वरच्या पातळीवर होती. आम्ही पुन्हा गाडी वळवून वरच्या पातळीवरील पार्किंग झोनमध्ये ठेवली. तोवर आमचे सामान खोलीत घेवून जाण्यासाठी कर्मचारीवर्ग हजर झाला होता. हॉटेलचा परिसर एकदम निसर्गरम्य बनविण्यात आला आहे. हिरवीगार झाडे, हिरवळ (दुर्वा), खेळण्यासाठी हॉल अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. रुमच्या समोरील वऱ्हांड्यातून समोरील डोंगरांचे आणि त्यात सामावलेल्या सरोवराचे नयनरम्य दर्शन होत होते. वॉश वगैरे घेवून झाल्यावर सोहम आमच्या मनातील प्रश्न विचारता झाला, 'बाबा जेवण कधी मिळणार?' आम्हाला आता १२ वाजेपर्यंत वाट पाहणे भाग होते! 

आपल्या मुलांच्या चालण्याबोलण्याचे जवळून निरीक्षण केल्यास आपल्या स्वभावातील काही गुणधर्म त्यात जवळून दिसून येतात. सहलीनिमित्त बाहेर गेल्यास अशी संधी जवळून मिळते. केरळ प्रवासातही हे मला जाणवले होते. त्यावेळी ड्रायव्हर आपल्यासोबत जेवायला येत नाही, त्याला झोपायला आपल्यासारखी रूम मिळत नाही अशी निरीक्षणे सोहमने मांडली होती. आता तो थोडा मोठा झाला असला तरी ही निरीक्षणे बर्याच प्रमाणात कायम राहिली. इथे सावंत ह्यांची जेवण्याची सोय आमच्याबरोबरच होती. परंतु ते आपल्या टेबलवर का बसले नाहीत असा प्रश्न सोहम विचारता झाला. मी काहीतरी सांगून वेळ मारून नेली. थोडा विचार केल्यावर आमची ओळख ६ तासांची आणि त्यांना आमच्याबरोबर जेवायला काहीसे अवघडल्यासारखे होण्यापेक्षा त्याना मोकळेपणाने स्वतंत्रपणे जेवून देणे उत्तम असा सोयीस्कर विचार मी केला. प्रत्येक कुटुंबाची प्रवास करण्याची एक पद्धत जाणते अजाणतेपणी विकसित होत असते. काहींना बरीच स्थळे थोड्या दिवसात आटपणे जमते तर काहींना मोजकी स्थळे अभ्यासूवृत्तीने पाहणे आवडते. आम्ही ह्या दोन्ही वर्गात मोडत नाही! आम्हाला अशा हिल स्टेशनच्या हॉटेलमधील जेवण, नाश्ता हादडणे आवडते. असल्या दोन हादडण्याच्या वेळांमध्ये झोप काढून उरलेला मोकळा वेळ आम्ही स्थळदर्शनासाठी वापरतो. महाबळेश्वर, माथेरानची हॉटेल्स ह्या बाबतीत माणसाला अधिक लाडावतात. तिथल्या मेनुचे वैविध्य अफाट असते. आणि वर्षभर आहारात शिस्त पाळण्याचा प्रयत्न करणारे आम्ही अशा वैविध्याला बळी पडतो. हीच गोष्ट कंपनीच्या पार्टीमध्ये घडते. सोहमला हे सर्व खात असताना तिथल्या सेवकवर्गाची दया आली. ते पहा कसे बिचारे आपल्याला सर्व काही आणून देतायेत. मग मी त्याला सांगितले की आपल्या देशात त्यांच्याहून अनेक गरीब लोक आहेत ज्यांना एक वेळेला सुद्धा पोटभर जेवावयास मिळत नाही. सोहमला हे तत्वज्ञान देताना गरजेपेक्षा बरेच अधिक पदार्थ खाणाऱ्या माझ्या दांभिकपणाची मला बरीच खंत वाटली. पण ही खंत केवळ वाटण्यापुरता आणि इथे लिहिण्यापुरता मर्यादित आहे हे कटू सत्य आहे. पूर्वी कधी एकदा वाचले होते कि आदिमानवाला अन्न मिळण्याची शाश्वती नसायची त्यामुळे जेव्हा केव्हा अन्न मिळेल त्यावेळी ते सर्व ग्रहण करण्याची त्याची वृत्ती असायची. आपल्या कोणत्याही कृतीचे समर्थन करण्यासाठी अंतर्मनाकडे एखादा तरी मुद्दा शोधून काढण्याची क्षमता असते नाही का? हॉटेलच्या स्वच्छतेच्या मापदंडानी आमची निराशा केली. न्हाणीघर म्हणावे तितके स्वच्छ नव्हते. बिछान्यावर काही बारीक झुरळ सदृश प्राणी आढळले. त्यामुळे पुन्हा एकदा महाबळेश्वर, माथेरानलाच जायला हवे होते असा विचार मनात डोकावला. सकाळी लवकर उठल्यामुळे आणि भरपेट जेवणामुळे दुपारी आम्ही व्यवस्थित झोपलो. हॉटेलच्या वरच्या बाजूने डोंगरावर जाण्यासाठी रस्ता बनविला जात आहे. तिथे माती खणण्याचे मोठे मशीन आवाज करून आमची झोप अधून मधून उडवत होते. चार साडे चारला उठून रूम सर्विसद्वारे चहा मागविला. पुढच्या पिढीचे काही खरे नाही आपण त्यांना अशा सवयी लावत आहोत ज्या आयुष्यात आरामात मिळतात असा त्यांचा समज होवू शकतो. चहा प्यायला तर खरे पुन्हा डायनिंग रुममध्ये जायला हवे पण बहुदा जेवणांनी जडावलेल्या देहांना तितकेही कष्ट घ्यायची इच्छा नसावी. ऐदीपणाने  भारताच्या मध्यमवर्गात केवळ शिरकाव केला नाही तर त्याने चांगलेच बस्तान मांडले आहे असा विचार मनात डोकावला. इथवरील लेखावर आताच नजर टाकली. प्रवासवर्णनापेक्षा मनुष्यस्वभावाचेच वर्णन चालू आहे. बाकी जास्त काही फिरणे केलेच नाही तर मग हेच होणार नाही का? चहाप्राशनानंतर आम्ही तलावाकडे कूच केले. मी सध्या कंपनीत दिवसाला दहा हजार पावले परिक्रमण्याच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यामुळे आम्ही चालणेच पसंत केले. मधली दोन संग्रहालये पत्नीला खुणावत होती परंतु त्यांना भेट देण्याचा तिचा मानस माझ्यापेक्षा सोहमने मोठ्या हिरीरीने हाणून पाडला. अस्मादिक धन्य झाले.  आधुनिक हिल स्टेशनला आवश्यक असलेली ठिकाणे म्हणजे संग्रहालये, सरोवर, सूर्योदय, सूर्यास्त बिंदू, घोड / उंट सवारी, उंच ठिकाणी सापडणारी स्ट्रोबेरी आणि सदृश्य फळांच्या बागा, आणि हल्ली नव्याने उदयास आलेला प्रकार म्हणजे तकलादू राइड्स आणि तितकेच तकलादू खेळ. ह्यातील बरीच आकर्षणे सापुतार्यात आहेत. तलावातील फेरफटक्यात काही विशेष नव्हते. पत्नीचे आणि सोहमचे विविध फोटो काढण्यात मी गुंग होतो. एक मोठा गुजराथी गट बोटीत शिरला. त्यामुळे बोटीच्या संतुलनाची काळजी करण्यात आमचा सुरुवातीचा काही वेळ गेला. त्या फेरीत आमच्या बोटीला दुसऱ्या बोटीने मागे टाकण्यात जवळजवळ यश मिळविले. त्यावेळी आमचा नाविक गुजराथी आहे आणि त्यात आम्ही तिघे मांसाहारी आहोत याउलट बाजूच्या बोटीचा नाविक मांसाहारी आहे आणि बाकी सर्व प्रवासी गुजराथी आहेत त्यामुळे असे झाले असावे अशी हसतखेळत टिपण्णी आमच्या सहप्रवाशाने केली. बोटीच्या फेरफटक्यानंतर मका कणीस खावून आम्ही हॉटेलला परतलो. आता हवा मस्त गार झाली होती आणि हॉटेलचा परिसर रमणीय भासू लागला होता. संध्याकाळच्या  मेनूत चायनिस पदार्थ असल्याची कुणकुण लागल्याने आम्ही सर्वच जोरात चालण्यात गुंग झालो. जेवण सुरेख होते पुन्हा एकदा पोटावर  अत्याचार करून आम्ही रूमवर परतलो. प्राजक्ता बहुदा खुश असावी त्याचा फायदा घेत मी champions ट्रॉफीच्या फार जुन्या सामन्याची क्षणचित्रे तासभर पाहण्यात यश मिळविले. दुसऱ्या दिवशीच्या सकाळी खोलीच्या वऱ्हांड्यातून एक नयनरम्य दृश्य पहावयास मिळाले. काळ्या नभांनी आजूबाजूच्या डोंगरांना व्यापले होते आणि त्यातील काही खट्याळ ढग हॉटेलच्या परिसरात उतरले होते. एकदम दिल खुश झाले. अंघोळ वगैरे आटपून आणि बटाट्याची भाजी घातलेला सामोसा, उपमा आणि ब्रेड बटर असा भरपेट नास्ता करून आम्ही जैन मंदिराकडे प्रस्थान केले. सावंत ह्यांचा चांगला कंपू बनला होता. त्या सर्वांची झोपण्याची सोय एका हॉलमध्ये करण्यात आली होती. तिथे कॅरम, टेबल टेनिस, पूल अशा खेळांची सोय होती. एक नवीन ड्रायवर आला होता ज्याला चढणीवर गाडी चालविता येत नव्हती आणि म्हणून मालकानेच गाडी चढणीवर चालविली होती. त्याच्या सारथ्यकौशल्यावर सावंतांनी नाराजी व्यक्त केली. जैन मंदिरातील कलाकुसरीच्या कामाचे आम्ही आपल्या मर्यादेनुसार कौतुक केले आणि अचंबाही व्यक्त केला. त्यानंतर उन्ह वाढीला लागली होती. आम्ही मधमाशी पालन केंद्रास धावती भेट दिली. एव्हाना सोहम आणि सावंत चांगले दोस्त बनले होते आणि त्यामुळे त्याने पुढील सीट पटकावली होती. सावंतांनी त्याला आधीच मधमाशीपालन केंद्राच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली त्यामुळे आम्ही लगेचच चॉकलेट खरेदीकडे मोर्चा वळविला. त्यांनतर आम्ही गाडीतून आजूबाजूच्या ठिकाणाचा धावता दौरा केला. दुपारचे जेवण प्रयत्न करूनही मला कमी जेवता आले नाही. आता जेवणात तोचतोच पणा जाणवू लागला होता. थोड्या निद्रेनंतर आम्ही तरणतलावाकडे प्रस्थान केले. सोहमला रबरी ट्यूबच्या सहाय्याने पोहोण्यास यश मिळाले. त्यामुळे पुढील तासभर सोहमने खूप आनंदात पोहणे केल. संध्याकाळी आम्ही सूर्यास्त बिंदू, घोडासवारी अशा ठिकाणांना भेटी दिल्या. बरेचसे सापुतारा पाहून झाले होते आणि अजून एक दिवस बाकी होता.  आम्हासर्वांनाच थोडा कंटाळा आला होता  हॉटेलच्या व्यवस्थापकाने एका दिवसाचे आरक्षण अर्ध्या भाड्याच्या भुर्दडावर रद्द करण्याची तयारी दर्शविली. सावंतानी सप्तशृंगी आणि शिर्डी असे पर्याय सुचविले. त्यावर विचार चालू असताना वसईला फोन केला. आईने तुम्ही उद्या परत येत असल्यास होळी बाजारातून मासे आणते असा पर्याय सुचविला. मग आमची / माझी मती भ्रष्ट झाली. बुधवारी सकाळी नास्ता आटपून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत रस्त्याच्या कडेला उसाचा रस प्यालो. केसरचे ६० रुपये दराने आंबे घेतले. प्राजक्ता गाडीतच बसल्याने हा भाव चागला की वाईट हे कळायला मार्ग नव्हता. परंतु हे आंबे अगदी सुरेख निघाले आणि कमीत कमी १० किलो आणायला हवे होते असे आई म्हणाली. पुढे वापिपर्यंतच्या रस्त्यात एक अपघात दिसला. सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. वापिपासून पुढे मात्र अपघातांची रांगच लागली होती. सर्वात भीषण अपघात चारोटी नाक्यानंतर दिसला रस्त्यावरील दुभाजक ओलांडून आलेल्या ट्रेक्टरने विरुद्ध बाजूने येणाऱ्या बसमधील १४ दुर्दैवी जीवांचा बळी घेतला होता. अपघाताला आठ तास होवून सुद्धा त्या अपघाताची भीषणता कळून येत होती. १४० वेगमर्यादा गाठणाऱ्या सावंतांना आम्ही सबुरीचा सल्ला दिला. दोन वाजता रात्रीच्या पावसानंतर अधिकच उकडणाऱ्या वसईत पोहोचून आईने बनविलेल्या सुरेख पापलेट कालवणाच्या जेवणाचा आस्वाद घेत आम्ही ह्या सहलीची सांगता केली. 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...