मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०१४

पट मांडला - एक राजकीय कथा!


घरची सभा संपल्यावर कार्यकर्त्यांना घेवून जाणारी जीप जशी नजरेआड झाली तशी संपतरावने सुटकेचा निश्वास टाकला. विधानसभेची निवडणूक घोषित होणार होणार म्हणून जी काही इतके दिवसाची अनिश्चितता होती ती एकदाची काल संपुष्टात आली. पुढच्या महिन्याच्या १२ तारखेला विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या. संपतराव इतके दिवस लपूनछपून मोर्चेबांधणी करीत होता. आपल्याला स्थानिक पातळीवर किती पाठिंबा आहे याची चाचपणी करीत होता. ही सर्व चाचपणी करताना भाऊरावांना त्याचा सुगावा लागणार नाही याची कसोशीने काळजी घेत होता. दिवेपूर मतदारसंघ तसा मोक्याचा होता. सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार भाऊराव मागच्या दोन खेपेला निवडून आले होते. आणि गेल्या दहा वर्षात सत्ताधारी पक्षात त्यांनी तसे मोक्याचे स्थान बनविले होते. मंत्रिमंडळाच्या मागच्या खेपेच्या विस्तारात भाऊरावांची वर्णी लागणार अशी जोरदार बातमी होती. संपतराव बिचारा पाण्यात देव बुडवून बसला होता. एकदा का भाऊराव मंत्री बनले की आपल्या आमदारकीच्या स्वप्नांना कायमचा सुरुंग लागणार हे तो ओळखून होता. तसे त्याला एकदोन वेळा विरोधी पक्षाकडून निरोपही आले होते. परंतु एवढी मोठी जोखीम घ्यायची त्याची तयारी नव्हती. आणि मग ज्यावेळी मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली आणि त्यात भाऊ रावांचा समावेश झाला नाही त्यावेळी संपतने सुटकेचा निश्वास टाकला. 'कसला विचार करत बसलात, जेवण वगैरे घ्यायचे कि नाही? आता तर निवडणुका नुसत्या जाहीर झाल्या आहेत! ' सगुणाबाईच्या ह्या शब्दांनी संपतराव भानावर आले. पुढचे विचार मनातच ठेवत त्यांनी हातावर पाणी टाकले आणि ते पानावर बसले. सगुणाबाई जिल्ह्याच्या सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाच्या कन्या. त्या संपतरावांच्या आयुष्यात आल्या आणि संपतरावांचे आयुष्य पुरते पालटून गेले. कारखान्याच्या कार्यालयात सर्व हिशोब कसोशीने सांभाळणारा हा चुणचुणीत पदवीधर विश्वासरावांना आधीपासूनच आवडायचा. एकदा आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशोबाचा ताळमेळ लावताना मोठा बाका प्रसंग उद्भवला. कार्यालय नियोजित वेळेच्या पुढे चालू ठेवले तर काहीतरी गडबड आहे हे साऱ्यांच्याच लक्षात यायचे. तसे व्हायला नको म्हणून विश्वासरावांनी सर्व कारभार घरी हलवायचा हुकुम दिला. संपतराव आणि कर्मचारीवर्ग विश्वासरावांच्या बंगल्यावर दाखील झाला. रात्रभर सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आणि त्यांच्या कामाची तपासणी करीत, सकाळपर्यंत संपंतरावने परिस्थिती आटोक्यात आणली. ह्या सर्व प्रकारात संपतने विश्वासरावांचा विश्वास तर संपादन केलाच आणि त्याच बरोबर सगुणाच्या नजरेतही ते भरले. आपल्या वडिलांना बिकट परिस्थितीतून बाहेर काढणारा हा सावळासा तरुण सगुणाला आवडून गेला. पुढे संपतचे बंगल्यावर कामानिमित्त येणेजाणे वाढत गेले. आणि एकंदरीत परिस्थिती ध्यानात येण्यास चाणाक्ष विश्वासरावांना वेळ लागला नाही. सुरुवातीला ह्या नात्याला फारसे अनुकूल नसणाऱ्या विश्वासरावांनी आधुनिक काळातील परिस्थिती ध्यानात घेत ह्या जोडीस आपली अनुकुलता दर्शविली. लग्नसमारंभ मोठ्या थाटात झाला. आपल्या लग्नात एवढी मोठी नेते मंडळी येतील असे संपतने स्वप्नातही पाहिले नव्हते. आमदार शंकरराव, जिल्ह्याचे राज्यमंत्री ह्या सर्वांनी त्यांच्या लग्नसमारंभास उपस्थिती लावली. विश्वासरावांनी गावजेवण घातले. लग्नानंतर काही दिवसांनी फुरसत मिळाल्यानंतर संपतने आपल्या परीने लग्नखर्चाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत आपली ही नोकरी आपण आयुष्यभर जरी केली तरी असे लग्न आपण आयोजित करू शकणार नाही याची त्याला खात्री त्याला पटली. मग अचानक बातमी आली ती शंकररावांच्या हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यूची! त्यांचे गाव दिवेपुरच्या बाजूचेच! त्यांच्या मृत्यूचा शोक सरतो न सरतो इतक्यात आमदारकीच्या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली. त्या भागातील मोठे उस शेतकरी असलेल्या भाऊरावांनी आपली प्यादी व्यवस्थित मांडून ठेवली होती. त्यांचे वजीर होते ते विश्वासराव! एकदंरीत सर्व काही मनाजोगते होवून गेले आणि भाऊरावांची आमदारपदी वर्णी लागली. ह्या सर्व घडामोडीत नवा जावई संपत बैठकीत आजूबाजूलाच असायचा. एकंदरीत संपतला हे क्षेत्र आवडते हे जसे विश्वासरावांनी जाणले तसे सगुणानेही. थोड्याच दिवसात संपतने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. मग आलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संपत बिनविरोध निवडून आला आणि संपतराव सरपंच म्हणून विराजमान झाले. एकदा सरपंच झाल्यावर संपतरावांनी मागे वळून पाहिलेच नाही. गावातील माध्यमिक शाळेला जोडून उभे केले गेलेले महाविद्यालय, मातीच्या रस्त्यांची जागा घेतलेले डांबरी रस्ते असो अथवा जवळच बांधल्या जाणाऱ्या प्रस्तावित धरणाची जागा असो सर्वांमध्ये त्यांचा पुढाकार राहिला. आतापर्यंत सर्व कसे सुरुळीत चालले होते, संसारवेलीवर दोन सुंदर फुलेही फुलली होती. एक मुलगा आणि एक मुलगी. मध्येच येऊन गेलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाऊरावांना निवडून आणून देण्यात विश्वासरावांबरोबर संपतरावांनी खांद्याला खांदा लावून काम केले. निवडणुकीत विरोधी पक्षाचा धुव्वा उडविल्यावर मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. त्याचे नियोजनही अर्थात संपतरावांनी केले. म्हणायला तसे एक गालबोट लागले ते मिरवणुकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयसभेच्या वेळी. व्यासपीठावर आपली जागा संपतरावांनी गृहीतच धरली होती. परंतु ऐनवेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आले आणि संपतरावांचे व्यासपीठावरील स्थान हुकले. त्यांच्या मनाला हे कुठेतरी लागून राहिले. विधानसभा निवडणुकीनंतर दोन वर्षातच विश्वासरावांचा संचालकपदाचा कालावधी संपला. भाऊराव आणि विश्वासरावांच्या बैठकी आता परत जोरात रंगू लागल्या. संपतराव सुद्धा त्यात असायचेच परंतु चर्चा होतेय ती फक्त बुजुर्गात आणि आपण केवळ नावापुरते तिथे असतो हे लक्षात आल्यावर संपतरावांनी तिथे आपले जाणे कमी केले. आता हळूहळू संपतरावांनी आजूबाजूच्या गावाकडे मोर्चा वळविला. निर्मळ गावाच्या प्रचारात त्यांना भाग घेण्याचे आलेले आमंत्रण त्यांनी खुशीने स्वीकारले. त्या गावातील पक्षाच्या विजयाचा आनंद त्यांनी स्वतःच्या विजयापेक्षा जास्त खुशीने साजरा केला. झाई गावाच्या निवडणुकीत अटीतटीचा सामना होता आणि त्यावेळी त्यांना प्रचारासाठी खास बोलावणे आले. इथेही आपल्या वक्तृत्वशैलीच्या जोरावर आणि केलेल्या कामगिरीची उदाहरणे देत त्यांनी गावकऱ्यांना जिंकून घेतले. ही ग्रामपंचायत जिंकताच संपतराव हे नाव परिसरात मोठ्या आदराने घेवू जावू लागले. इथे भाऊराव मात्र राज्यपातळीवरील राजकारणात गुंग झाले होते. मुख्यमंत्री अण्णासाहेबांच्या विरोधात सुजीतकुमार सक्रियपणे पक्षांतर्गत आघाडी चालवत होते. अण्णासाहेबांच्या खुर्चीवर त्यांचा डोळा होता. अण्णासाहेबांच्या वा त्यांच्या सहकार्यांच्या कारभारात कुठे काही खुसपट काढता येईल का याची ते कधीपासून वाट पाहत होते. त्यांनी ह्या कामासाठी स्थापन केलेल्या खास गटात भाऊरावांना आघाडीचे स्थान होते. परंतु ह्या कामानिमित्त आपल्याला मुंबईतच सतत राहावे लागते ह्याची खंत भाऊरावांना लागून राहिली होती. त्यांची अस्वस्थतता वाढली जाण्याचे अजून एक कारण होते ते जिल्ह्यातून येणाऱ्या संपतरावांच्या कामगिरीच्या बातम्या. दुसरा दिवस उजाडला. संपतराव सकाळची आन्हिक आटपून पेपर चाळत चहाचा घोट घेत बसले होते. इतक्यात महादेव जोरात आपली बाईक घेवून घराच्या दिशेने येताना त्यांना दिसला. महादेव त्यांचा सच्चा कार्यकर्ता. नवीन युगाशी, त्यातील सगळ्या नवनवीन गोष्टींशी नाते जोडून असणारा. महादेवने बाईक घाईघाईतच अंगणात लावली आणि तो संपतरावांकडे आला. 'परवा केंद्रीय शिष्टमंडळ मुंबईला येतेय', संपतरावांनी दिलेल्या खुर्चीवर बसता बसता महादेव म्हणाला. 'अरेच्चा पण हे सगळे पेपर तर मी चाळून काढले पण ही बातमी कोठे दिसली नाही! आश्चर्य चकित होवून संपतराव म्हणाले. 'इंटरनेटवर बातमी आलेय' असे महादेव म्हणताच संपतरावांचे आश्चर्य ओसरले. जी काही धडपड करायची ती येत्या दोन दिवसातच ह्याची जाणीव त्यांना झाली. केंद्रीय शिष्टमंडळाला भेटायला जाणाऱ्या जिल्ह्यातील पक्षाच्या गटाचे नेतृत्व विजयराव करणार हे माहित करून घ्यायला संपतरावांना फारसा वेळ लागला नाही. दुपारचे जेवण घाईघाईतच आटपून ते आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी जायला निघाले. 'जाताना आबांना भेटून जा' हा सगुणा बाईंनी त्यांना दिलेला सल्ला त्याच्या कपाळावर आठ्या उमटवून गेला हे सगुणा बाईंच्या लगेच लक्षात आले. नाईलाजास्तव त्यांनी आपली गाडी विश्वासरावांच्या बंगल्याकडे वळविली. 'साहेब आताच बाहेर कामानिमित्त गेले आहेत' हे सासू बाईंच्या तोंडचे उद्गार ऐकताच खुश होवून त्यांनी सासू बाईंचे आशीर्वाद घेतले आणि ते तडक निघाले. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात तुफान गर्दी होती. विजयरावांनी विविध मतदारसंघांचे क्रम आखून दिले होते. दिवेपुरचा क्रमांक बराच मागे होता. इतर मतदारसंघांची चर्चा अपेक्षेपेक्षा जास्तच लांबली. एकेका मतदार संघात ५ - ५ इच्छुक मंडळी होती. सर्वांचे म्हणणे ऐकून घेताघेता विजयरावांच्या नाकी नऊ आले. दिवेपुरचा क्रमांक आला त्यावेळी रात्रीचे ११ वाजून गेले होते. संपतरावांना पाहताच विजयरावांची कळी खुलली. ह्या तरुण कार्यकर्त्याविषयी ते बरेच ऐकून होते. महादेवने बनवून दिलेले संपतरावांच्या कामगिरीचे पॉवर पॉईटचे प्रेसेंटटेशन पाहून विजयराव अत्यंत खुश झाले. त्यांची ही खुशी पाहून संपतरावांना खूप बरे वाटले. त्या खुशीतच ते आपल्या सहकार्याच्या निवासस्थानी झोपावयास गेले. बिछान्यावर पहुडता पहुडता आपल्या मतदारसंघातून दुसरे कोणीच इच्छुक कसे आले नाहीत याचा त्यांना अचंबा लागून राहिला. सकाळ सकाळी विजय रावांच्या दूरध्वनीची बेल खणखणली तेव्हा त्यांनी अगदी वैतागून फोन उचलला. रात्री झोपताना त्यांना दोन वाजले होते आणि मुंबईला घेवून जाणारी जीप सकाळी १० वाजता निघणार होती. तोपर्यंत चांगली झोप काढावी असा त्यांचा मनसुबा होता. पण समोर भाऊराव आहेत हे समजताच त्यांचा नाईलाज झाला. बाकीच्या मतदारसंघांचा आढावा घेत चर्चेचा ओघ दिवेपुरकडे वळला. आता मात्र विजय रावांच्या बोलण्यात नवीन चैतन्य आले. संपत रावांची स्तुती करतांना त्यांना जणू काही शब्द कमी पडत आहेत असा भाऊरावांना भास झाला. आपला राग मोठ्या मुश्किलीने आवरून त्यांनी फोनवरील बोलणे आटोपते घेतले. हा फोन संपताच त्यांनी सुजितकुमारांना फोन लावला. सुजित कुमारांनी फोन उचलल्यावर त्यांच्या स्वरात नेहमीचे चैतन्य नाही अशी संशयाची पाल भाऊरावांच्या मनात चुकचुकली. 'भाऊराव, श्रेष्ठींनी यंदा नवीन रक्ताला वाव द्यायचे ठरविले आहे' हे सुजितकुमारांचे शब्द तप्त आगीच्या गोळ्याप्रमाणे त्यांच्या कानी पडले. पुढचे सुजीतकुमारांचे बोलणे ऐकण्याच्या मनःस्थितीत ते नव्हतेच. हा फोन संपताच ते रागारागाने अंगणात फेऱ्या मारू लागले. इतक्यात त्यांच्या मनात असे काही विचार आले की त्यांची मुद्रा खुशीने उजळून निघाली. त्यांनी तडक विश्वासरावांना फोन लावला. आजूबाजूचे बोलणे झाल्यावर त्यांनी मुद्द्याला हात घातला. 'विश्वासराव, तुम्ही बघा इतकी वर्ष साथ दिलीत आम्हाला! आता यंदा तुम्हीच निवडणुकीला उभे राहावे असे म्हणतो मी!' त्यांचे हे अनपेक्षित बोलणे ऐकून विश्वासराव प्रथम थोडे आश्चर्यचकित झाले पण आपल्या मनातली भावना कोणीतरी ओळखली ह्याचा त्यांना जबर आनंद झाला. 'आता बघा तशी काही माझी इच्छा नाही पण जर तुम्ही म्हणत असालच तर मी तयार आहे' विश्वासरावांचे हे बोलणे ऐकून मागे उभ्या असलेल्या इंदुमती बाई एकदम चकित झाल्या! केंद्रीय मंडळाचे संध्याकाळी मुंबईत आगमन झाले. शिष्टमंडळाचे नेतृत्व स्वरूपसिंग करीत होते. स्वरूपसिंगांच्या स्वागताला अण्णासाहेब आणि सुजितकुमार दोघेही विमानतळावर उपस्थित होते. ठेवणीतल्या शाब्दिक कोट्या, पत्रकारांसाठी / छायाचित्रकरांसाठी खास राखून ठेवलेल्या हास्यमुद्रा ह्यांना उधाण आले होते. पक्षात सर्व काही आलबेल आहे असा कोणाही पाहणाऱ्याचा समाज झाला असता. मंडळींचे रात्रीचे जेवण पंचतारांकित हॉटेलात आटोपल्यावर सुजीतकुमार म्हणाले, "मी सोडतो स्वरुपसिंगांना, त्यांच्या हॉटेलावर!" अण्णासाहेबांना काही पर्याय आहे कि नाही हे तात्काळ लक्षात न आल्याने त्यांनी मान डोलावली. स्वरुपसिंगाच्या हॉटेलावर सुजीतकुमारांची गाडी पोहचली. "आता इथपर्यंत आलात तर दोन मिनटे रूमवर या की!" स्वरूपसिंग उद्गारले! सुजीतकुमारांनी पडत्या फळाची आज्ञा मानून चालकाला गाडी पार्क करण्यास सांगितले. खोलीवर थोड्या वेळातच मदिरेने प्रवेश केला आणि वातावरणात जान आली. 'दिल्ली काय म्हणतेय?' सुजीतकुमार उद्गारले. स्वरुपसिंगांनी एक मोठा श्वास घेतला आणि मग दिल्लीची कहाणी सांगण्यास आरंभ केला. पक्षाचे युवा नेते मुकुल हे गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने प्रबळ बनत चालले होते. पंतप्रधान जीवनरामांची त्यांनी खास मर्जी संपादन केली होती. ह्याचाच पुरावा म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सारी सूत्रे मुकुल हे हलवीत होते. पक्षातील जेष्ठ नेत्यांमध्ये ह्यामुळे नक्कीच नाराजीचे वातावरण पसरले होते. तरुणांना राजकारणातील काय कळते असा त्यांचा पक्का समज होता. परंतु एकदा आपटी खाल्ल्याशिवाय ह्यांना काही समजणार नाही असे ठरवून ही जेष्ठ मंडळी शांत बसून सारा खेळ पाहत होती. मध्येच एक भाऊरावांचा फोन आला परंतु तो सुजीतकुमारांनी न घेता भ्रमणध्वनीला शांत (silent) अवस्थेत करून ठेवले. 'पण पैश्याशिवाय गाडी चालायची कशी? नवीन रक्त थोडेच पैसा पुरविणार आहे?' सुजीतकुमार विचारते झाले. 'आता नियमाला अपवाद असतातच की, तुमची अशी काही खास माणसे असतील आपण बघूयात' स्वरुपसिंगांच्या ह्या आश्वासनाने सुजीतकुमार थोडे शांत झाले. संपतराव सकाळीच परत आले होते. स्वारी एकंदरीत खुशीत असल्याचे सगुणाबाईंच्या केव्हाचेच ध्यानात आले. मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी संपतरावांनी स्वतः हून स्वीकारली. आकाशवाणीवर मराठी गाणी ऐकणारे संपतराव आज किशोरकुमारची गाणी ऐकत बसले होते. अशा प्रसन्न वातावरणातच दुपार गेली. चार वाजता मुले शाळेतून परत आली आणि त्यांनी बाबांमागे बाहेर जाण्याचा आग्रह धरला. 'कुठे जायचे फिरायला' असे संपतराव म्हणत असतानाच फोनची बेल खणखणली. आईचा आवाज ऐकताच सगुणाबाईंचा चेहरा खुलला. 'आज संध्याकाळी तुम्ही सर्वांनी जेवायलाच यायचे असे इंदुमतीबाई म्हणत होत्या. 'थांब ह्यांना विचारून बघते' असे सगुणाने म्हणताच. 'कशाला विचारायला पाहिजे? आम्ही तुमची वाट पाहत आहोत' असे म्हणून इंदुमतीबाईंनी फोन ठेवला. आश्चर्याची बाब म्हणजे संपतरावांनी सुद्धा फारसे आढेवेढे घेतले नाहीत. सुगरण इंदुमतीबाईंनी खास स्वयंपाकाची तयारी चालवली होती. 'या संपतराव या' असे म्हणत विश्वासरावांनी त्यांचे स्वागत केले. हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर नातवंडांनी विश्वासरावांचा ताबा घेतला. आजोबांच्या तोंडून ऐतिहासिक गोष्टी ऐकणे त्यांचा आवडता छंद होता. सगुणाबाई आपल्या आईला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात शिरल्या. संपतरावांनी दूरदर्शनसंच सुरु केला. प्रादेशिक बातम्या सुरु होत्या. 'सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन' दूरदर्शनवरील निवेदिका सांगत होती. संपतराव स्वतःशीच हसले. तसे म्हणायला गेले तर ही बातमी ही गेले कित्येक वर्षे काही महिन्याच्या कालावधीनंतर सतत येणारी! निमित्त वेगवेगळी असोत पण केंद्रीय शिष्टमंडळाशिवाय आपले पानही हलायचे नाही हे जाणवून संपतरावांना हसू आले. पण ह्या वेळचे शिष्टमंडळ आपल्या भवितव्याची किल्ली घेवून आले आहे ह्या जाणीवेने ते थोडे अस्वस्थ झाले. सगुणाबाई मात्र एकदम प्रसन्न मुद्रेत होत्या . जीवनात ही घडी अशीच राहू दे हे आपल्या आवडीचे गाणे गुणगुणत होत्या. इंदुमतीबाई मात्र थोड्याशा अस्वस्थ होत्या. ज्यावेळी विश्वासरावांनी जावयाला सहकुटुंब जेवायला बोलाविले तेव्हा ते सकाळच्या भाऊरावांच्या फोनविषयी चर्चा करायला असे त्यांना वाटले होते. पण इथे तर अशी काही चिन्हे दिसत नव्हती. आणि आपण हा विषय काढला तर विश्वासरावांना आवडेल की नाही ह्याची खात्री नसल्याने त्या गप्प राहिल्या. जेवणे एकदम प्रसन्न वातावरणात पार पडली. 'संपतराव, बाकी तुमचे वजन हल्ली वाढत चालले आहे' ह्या विश्वासरावांच्या वाक्यावर संपतराव मनापासून खुश झाले. आपल्या राजकीय प्रभावाची सासऱ्याने केलेली ही स्तुती आहे असे वाटून त्यांनी दोन घास अधिक घेतले. रात्री घरी परतताना अकरा वाजून गेले. सगुणाबाई मुलांना झोपवीत असताना सवयीनुसार संपतरावांनी दूरदर्शन संच लावला. आणि त्यावरील ब्रेकिंग न्यूज पाहून ते हादरून गेले. 'सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजयराव ह्यांच्या जीपला मुंबईला जाताना अपघात, विजयरावांचे अपघाती निधन!' इन्स्पेक्टर जाधव आणि त्यांच्या हवालदारांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली होती. अपघाताचे कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. जीपचा साफ चेंदामेंदा झाला होता. रस्त्यावर दुभाजक नव्हता आणि जीप आपली बाजू सोडून समोरून येणाऱ्या ट्रकला आदळली होती.आदळल्यावर जीप बाजूच्या थोड्या खोल असणाऱ्या भागात जावून पडली होती. ट्रकवाल्याने स्वतःहून पोलिसांना खबर दिली होती. त्यालाही बराच मार लागला होता. पंचनामा करून सर्व सोपस्कार आटोपल्यावर जीपचे भग्न अवशेष अधिक तपासणीसाठी पाठवून देण्यात आले. मुंबईत मात्र मोठे उदास वातावरण होते. स्वरुपसिंग मोठ्या विचारात पडले होते. विजयराव तसे पक्षाचे उभारते नेते. ह्या निवडणुकीनंतर त्यांच्यावर अधिक जबाबदारी सोपविण्याचा श्रेष्ठींचा मनसुबा होता. त्यांच्या अशा ह्या अचानक जाण्याने सर्वच समीकरणे कोलमडून पडणार होती. आणि त्यांच्या जिल्ह्यातील पक्षात एक मोठी पोकळी निर्माण होणार होती. ह्या सर्व दीर्घकालीन समस्या होत्या. तत्कालीन समस्या होती ती जिल्ह्यातील उमेदवारी अर्जांच्या छाननीची! विजयरावांनी सर्व उमेदवारांच्या भेटी घेऊन आपला अहवाल बनविला होता. अहवालाचा विचार येताच एकदम स्वरुपसिंग उठून बसले, सुजीतकुमारांना त्यांनी हळूच विचारले, अपघातस्थळी अहवाल सापडला का? ह्या प्रश्नाने सुजितकुमारांचा चेहरा काहीसा उतरल्यासारखा त्यांना वाटला. परंतु सुजितकुमार सावरून म्हणाले, मी दिवेपुरला फोन करून विचारतो. सुजीतकुमार बाहेरच्या कक्षात आले आणि त्यांनी तात्काळ भाऊरावांना फोन लावला. भाऊरावांनी फोन काही उचलला नाही. नाईलाजाने त्यांनी विश्वासरावांचा फोन लावला आणि इन्स्पेक्टर जाधव ह्याच्याकडे अहवालाची चौकशी करण्यास सांगितले. हे भाऊराव गेले तरी कोठे असा विचार करीत, सुजीतकुमार पुन्हा स्वरुपसिंगांच्या कक्षात आले. एव्हाना अण्णासाहेबांचे आगमन झालेच होते. निवडणूक अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस होता आणि सर्व उमेदवारांना अर्ज भरण्यास वेळ मिळावा म्हणून आजच यादी जाहीर करण्याचा श्रेष्ठींचा आदेश होता. एकदमच काही अपवादात्मक परिस्थिती असेल तर मोजक्या जागांचा निर्णय दुसऱ्या दिवसावर थोपवून धरण्याची परवागनी देण्यात आली होती. इथे इन्स्पेक्टर जाधव विजयरावांच्या बंगल्यावर पोहचले होते. अतिशय शोकाकुल वातावरण होते तिथे. विजयरावांच्या पत्नीची आणि मुलांची स्थिती तर पाहवत नव्हती. कार्यकर्त्यांची पण ही गर्दी उसळली होती. जाधव तिथे पोहचल्यावर एका कोपऱ्यात जर शांतपणे जाऊन परिस्थितीची पाहणी करीत उभे राहिले. सदैव गावात ड्यूटी लागणाऱ्या इन्स्पेक्टरच्या मानाने त्यांचा स्वभाव तसा सौम्यच. इतक्यात एक विश्वासू कार्यकर्ता त्यांच्याकडे येत झाला. त्यांना एका बैठकीच्या खोलीत नेण्यात आले. जाधवांनी त्याला विजयरावाविषयी त्यांना विचारायचे होते ते प्रश्न विचारून घेतले. थोड्या वेळाने त्यांना विजयरावांच्या पत्नी आणि मुलांशीही बोलण्यास मिळाले. पत्नी तर धाय मोकलून रडत होती. सकाळीच मी नऊ वाजता ह्यांच्याशी बोलले आणि दहा वाजता निघायचे म्हणून हे काही जास्त बोलले नाही. मला काय माहित हे शेवटचेच बोलणे असणार आहे, रडता रडता ती बोलत होती. जाधव तिची समजूत घालून निघाले. पण आता मात्र ते अस्वस्थ झाले होते. सकाळी दहा वाजता निघणारी जीप इतक्या उशीरा का निघाली हे त्यांना समजत नव्हते. जीपमधील कोणीच व्यक्ती जिवंत न राहिल्याने माहितीचा तो स्त्रोत उपलब्ध नव्हता. जाधवांनी आपला मोर्चा विजयराव ज्या हॉटेलात उतरले होते तिथे वळविला. इतक्यात त्यांच्या फोनची घंटा खणखणली. विश्वासरावांचा फोन होता, जीपमध्ये काही कागदपत्रे वगैरे सापडली का असे ते विचारात होते. जाधवांनी त्यांना नकारार्थी उत्तर देवून फोन ठेवला खरा, पण आता मात्र त्यांचा मेंदू पूर्ण सक्रिय झाला होता. हॉटेलच्या स्वागतकक्षात त्यांच्या आगमनाने थोडीशी धांदल उडाली. पण मग व्यवस्थापकाने येवून तो त्यांना खोलीत घेऊन गेला. विजयरावांना हॉटेलातून निघण्यास उशीर होण्याचे कारण काय? जाधवांनी थेट मुद्द्याला हात घातला. उशीर कसला उशीर? ते तर बरोबर १० वाजता इथून निघाले. व्यवस्थापक उद्गारला. जाधवांना आता मात्र एकदम संशयास्पद वातावरण वाटू लागले होते. त्यांनी हॉटेलातील नोंदींची पाहणी केली त्यातही विजयरावांनी १० वाजता हॉटेल सोडल्याची नोंद होती. जाधव हॉटेलबाहेर उतरले. आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी करू लागले. जिल्ह्यातील ठिकाणी जितकी वर्दळ दिसावसाय हवी तितकी इथेही दिसत होती. त्यांची नजर समोरच्या पानवाल्याकडे गेली. इन्स्पेक्टरचा मोर्चा आपल्याकडे येतोय हे पाहताच तो बिचारा बावरला. विजयरावांची जीप जाताना पाहिली का रे? जाधवांनी त्याला विचारले. आपल्या छोट्याशा मेंदूला ताण देत त्याने हे विजयराव कोण हे आठवण्याचा प्रयत्न केला. मग त्याला आठवली ती कालच सकाळी आपल्या दुकानासमोरच बंद पडलेली जीप. तो म्हणाला विजयरावांची का काय माहित नाही पण एक जीप काल बंद पडलेली मी पाहिली इथे. ड्रायव्हरने कशी बशी चालू केली पण त्याने मला गराजचा पत्ता विचारला म्हणून माझ्या लक्षात राहिली ती. गराज कोठे आहे, जाधवांनी त्याला दरडावूनच विचारले. ह्या पहिल्या नाक्यावर डावे वळण घेतले कि सरळ जावा, शंभर मीटर गेलात की एक चहाची टपरी लागेल, त्याच्याच बाजूला आहे गराज, पानवाला उद्गारला. जाधव घाईघाईने गराजवर पोहचले. सर्व काही आलबेल होते. म्हणजे गाड्यांच्या दुरुस्तीची कामे जोरात चालू होती. तिथला मालक पुढे आला. जाधवांनी त्याच्याकडे कालच्या जीपविषयी विचारले आणि ती आली कधी, त्यात काय प्रॉब्लेम होता आणि तसा कसा दुरुस्त केला असा प्रश्नांचा मारा केला. 'साहेब काय सांगू, रमाकांतने गाडीवर काम केले आणि तोच काल संध्याकाळपासून बरे नाही वाटत म्हणून घरी गेला तर त्याचा काही पत्ताच नाही बघा' रमाकांतच्या घराचा पत्ता घेऊन जाधवांची बाईक सुसाट निघाली. रमाकांत घरी सापडेल अशी जाधवांनी आशाच केली नव्हती. परंतु त्याला जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केल्याची बातमी त्यांच्यासाठी सुद्धा धक्कादायक होती. तातडीने ते जिल्हा रुग्णालयाकडे निघाले. निघण्याआधी रुग्णालयावर पहाऱ्यासाठी २ हवालदार पाठवून देण्याचा फोन त्यांनी ठाण्यात केला. रुग्णालयातील निवासी डॉक्टरने त्यांचे स्वागत केले. रमाकांतला अन्नातून विषबाधा झाली असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तो म्हणाला. जाधवांनी बाहेरूनच रमाकांतकडे नजर टाकली. दोन हवालदार तिथे पोहोचताच केवळ रमाकांतच्या पत्नीसच त्याला भेटण्याची परवानगी द्यायचे बजावून जाधव निघाले. रुग्णालयाच्या जनरल वार्डात कालच दाखल झालेल्या एका रुग्णाकडे नर्स उषा खास लक्ष ठेवून होती. साधारणतः चाळीशीच्या आसपास असलेला हा रुग्ण छातीत दुखल्याची तक्रार घेवून तिथे दाखल झाला होता. पण नातेवाईक दाखल झाल्याशिवाय कोणतीही तपासणी करून द्यायला नकार देत होता. आता त्याला फोनवर बोलताना पाहून मात्र तिचे माथे सणकले. कसले बोलणे चाललंय फोनवर ह्या तिच्या दामटवून विचारण्याकडे त्याने चक्क दुर्लक्ष केले. 'साहेब, रुग्णालयापर्यंत पोलिस येवून पोहोचलेत की!, तो दबल्या आवाजात पलीकडील व्यक्तीशी बोलत होता. समोरून खास ठेवणीतले शब्द ऐकल्यावर त्याने बोलणे आटोपते घेतले. पलीकडील व्यक्ती मात्र प्रचंड अस्वस्थ झाली होती. तिने ताबडतोब मुंबईला फोन लावला. तीन चार वेळा समोरून फोन कट झाला. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी केलेला पाचवा प्रयत्न मात्र यशस्वी ठरला. 'महत्वाची बैठक चाललेय, समजत नाही का?' समोरून रागीट आवाज आला. 'महत्वाची बातमी होती म्हणूनच फोन केला, रुग्णालयात पोलिस येऊन पोहोचलेत' हे ऐकताच मात्र मुंबईची व्यक्ती सावध झाली. 'तुम्ही कसलं झेंगट लावून दिलत असे त्रासिक स्वरात बोलत इन्स्पेक्टरचे नाव घेवून तिने फोन ठेवून दिला. जाधवांनी घरी पोहचल्यावर झटपट जेवण आटोपले आणि आरामखुर्चीत बसत ते सर्व विखुरलेले तुकडे एकत्र जोडण्याचा प्रयत्न करीत होते. इतक्यात त्यांच्या भ्रमणध्वनीची घंटा खणखणली. मोठ्या साहेबांचा फोन होता. 'काय जाधव, एका मेकानिकच्या मागे तुम्ही इतकी शक्ती काय वाया घालविता? साहेबांनी सुरुवात केली. 'बर ते जाऊ द्यात, उद्या जामपुरला शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. तिथली जबाबदारी तुमच्यावर लागली' साहेबांच्या ह्या बोलण्याने जाधव एकदम बुचकळ्यात पडले. जामपूर होते १०० किलो मीटर अंतरावर आणि त्यासाठी आपली निवड का व्हावी हे कोडे त्यांना उलगडेना. साहेबांनी फोन ठेवून दिल्यावर त्यांना निराशेने ग्रासले. त्या आरामखुर्चीतच सुन्नपणे त्यांची संध्याकाळ गेली. तिकीटवाटपाच्या चर्चेचे काम जोरात चालले होते. स्वरुपसिंग, अण्णासाहेब, सुजीतकुमार आणि शिष्ठमंडळांची बैठक जोरात चालली होती. युवाशक्तीचा जोर तिकीटवाटपात दिसतोय की नाही ह्याची मुकुल दिल्लीहून फोन करून अधूनमधून खात्री करून घेत होते. काही जागांच्या बाबतीत एकमत होत नव्हते. त्या जागा नंतरच्या चर्चेसाठी राखून ठेवण्याचे ठरले. विजयरावांचा अहवाल हाती नसल्याने त्या जिल्ह्याचे कामही बाजूला राहिले होते. दुपारनंतर अचानक स्वरुपसिंगांनी त्या जिल्ह्याच्या चर्चेला हात घातला त्यावेळी सर्वांना जरा आश्चर्यच वाटले. सुजीतकुमार आधी थोडे बावचळले पण लगेचच त्यांनी सावरले. 'आतापर्यंत १४० जागांचा निर्णय आपण पक्का केला त्यात युवा नेते १००, म्हणजे जवळजवळ 70 टक्के युवकांना प्राधान्य. आता निवडणूक निधीचे कसे बघायचे? तेव्हा अशी काही मंडळी विचारात घेतलेली बरी' त्यांच्या ह्या अनपेक्षित विधानाने सर्वच जरा आश्चर्यचकित झाले. परंतु मग त्यांनी आणि स्वरुपसिंगांनी मिळून चर्चेला अशी कलाटणी दिली की बघताबघता दिवेपुरच्या जागेवर विश्वासरावांची निवड पक्की झाली. सत्ताधारी पक्ष इतक्या सुसूत्रपणे काम करत असताना, विरोधकांची हालत खराब होती. युतीची अनेक समीकरणे बनली होती आणि त्यातले कोणते उद्या निश्चित होणार ह्याची भगवंतालाही खात्री नव्हती. संपतरावांचा दिवस एकदम व्यग्र गेला होता. विजयरावांच्या गावीच त्यांचा मुक्काम होता. विजयरावांच्या घरच्या माणसांच्या जोडीला काम करत त्यांनी पुढील दिवसांच्या विधींची सोय तर लावलीच आणि विजयरावांच्या आर्थिक व्यवहाराची सोय लावण्यासाठी एका सल्लागाराची नेमणूक करून ते आले. संध्याकाळी घरी परतल्यावर ते जरा निवांतपणे पहुडले होते की महादेव धावत धावत घरी आला. त्याचे स्वागत सगुणाबाईंनी केले. 'ताई अभिनंदन, बाबांना निवडणुकीचे तिकीट मिळालेय!' महादेवचे हे अनपेक्षित शब्द सगुणाबाईंना धक्का देवून गेले. तोंडदेखले हसून त्यांनी विश्रांतीकक्षात डोकावून पाहिले तर संपतरावांची संतप्त मुद्रा त्यांच्या नजरेस पडली. महादेवचे बोल त्यांच्याही कानी पडले होते तर. त्यांनी खुणेनेच सगुणाबाईंना महादेवला नंतर येण्यासाठी सांगितले. महादेव गेल्यावर विश्रांतीकक्षात जाण्याची हिम्मत सगुणाबाईंना झाली नाही. अभिनंदनाचे फोन घेता घेता विश्वासराव आणि इंदुमतीबाईंचा जीव मेटाकुटीला आला होता. मुली / जावयाकडून फोन आला नाही ह्याची खंत एकदा इंदुमतीबाईंनी बोलूनही दाखवली. विश्वासरावांची मनः स्थिती मात्र द्विधा झाली होती. मोठ्या जिकीरीनेच त्यांनी ह्या निर्णयाला होकार दिला होता. संपतरावांना तिकीट न मिळून देण्यासाठी भाऊरावांनी चंग बांधला आहे हे त्यांना कळून चुकले होते. आणि त्याचवेळी तुम्ही जर नाही म्हणालात तर दुसरा कोणी बाहेरचा बघू असा निरोप ज्यावेळी त्यांना मुंबईहून आला त्यावेळी त्यांनी होकार कळविला. जावयाची उमेदीची वर्षे बाकी आहेत आणि येत्या पाच वर्षात त्याच्यासाठी परिस्थिती अनुकूल करून ठेवू असेही त्यांनी मनोमन ठरविले होते. हे सर्व संपतरावांना बोलवून घेऊन स्पष्ट करून सांगण्याचे त्यांनी मनोमन ठरविलेही होते. परंतु गेल्या एक दोन दिवसात घडलेल्या घटनांमुळे त्यांना अजिबात फुरसतहि मिळाली नव्हती. सुजीतकुमारांनी भाऊरावांना चांगलेच फैलावर घेतले होते. एका दिवसाच्या अज्ञातवासानंतर आज भाऊराव फोनवर आले होते. त्यांचा आवाजही एकदम भयभीत वाटत होता. 'आपले ठरले होते काय, आणि तुम्ही काय करून बसलात? फक्त अहवाल गायब करायला मी तुम्हाला सांगितला होता आणि तुम्ही आखखा माणूसच गायब केलात?' सुजितकुमारांचा पारा एकदम वर चढला होता. चुकीच्या माणसाकडे काम सोपविल्याचा भाऊरावांना पश्चाताप होत होता. 'त्या रमाकांतचे काय करायचे आता?' भाऊरावांच्या ह्या प्रश्नाकडे सरळ दुर्लक्ष करून सुजीतकुमारांनी फोन ठेवला होता. हे प्रकरण आपल्या अंगावर एकदम मोक्याच्या क्षणी शेकणार अशी अनामिक भीती त्यांना वाटू लागली. संध्याकाळी सातच्या सुमारास आलेला महादेवचा फोन अखेरीस संपतरावांनी उचलला. त्यांची समजूत कशी घालायची ही कला महादेवाला चांगलीच अवगत होती. 'चला नदीकाठच्या धक्क्यावर जावून बसुयात', महादेवची ही विनंती संपतरावांना अव्हेरता आली नाही. तयारी करून ते तसेच निघाले. अशा प्रसंगी शांत राहणेच शहाणपणाचे असते हे सगुणाबाई अनुभवाने शिकल्या होत्या. महादेव तोपर्यंत अंगणात येवून पोहचलाच होता. त्याच्या बाईकवर मागे बसून जोडी नदीकाठी निघाली. रस्ता बाजारातून जात होता, तिथे नेमके ओळखीचे विश्वासू कार्यकर्त्ये भेटले. त्यांनी आग्रहाने त्यांना उपहारगृहात चहासाठी नेले. उपहारगृहाच्या एका कोपऱ्यात चहाला सर्वजण बसले. ते बसले त्यावेळी आजूबाजूची बाकडी रिकामीच होती. विश्वासू कार्यकर्त्याबरोबर बोलताना हळूहळू संपतरावांच्या जखमेची खपली पूर्ण निघाली आणि त्यांनी आपल्या मनातील शल्याला मोकळी वाट करून दिली. आपण गेले कित्येक वर्षे कसे खपलो, कसा आजूबाजूच्या भागाचा आणि त्याचबरोबर पक्षाचा ग्रामीण भागात विकास केला' हे ते मोठ्या उद्वेगाने कार्यकर्त्यांच्या ह्या गटास सांगत होते. ह्या सर्व गप्पामध्ये मागच्या बाकड्यावर येवून बसलेल्या एका माणसाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. थोड्यावेळाने सगुणाबाईंचा फोन आला तसे संपतरावांनी आपले बोलणे आटोपते घेतले आणि सर्वजण बिल चुकते करून निघाले. ते जाताच वसंतराव आपल्या जागचे उठले. हॉटेलबाहेर येताच त्यांनी मुंबईला फोन लावला. युतीच्या जागावाटपाची गणिते सोडवून शांत झालेल्या विरोधी पक्षाच्या जितेंद्ररावांनी फोन उचलला. 'दिवेपुरचा उमेदवार मिळाला आपल्याला' वसंतरावांचे बोलणे ऐकताच पुढील काही प्रश्न न विचारता हवापाण्याची चौकशी करून जितेंद्ररावांनी फोन ठेवला. संपतरावांचा राग दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बराच निवळला होता. गरमागरम चहाचे घुटके घेता घेता त्यांनी विश्वासरावांना अभिनंदनाचा फोन लावला तेव्हा सगुणाबाईंच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. त्यांनी संपतरावांचे बोलणे आटोपता आटोपता फोन घेतला आणि वडिलाचे अभिनंदन केले. मायलेकीच्या गप्पा त्यानंतर तासभर चालल्या होत्या. संपतरावांनी आज मुद्दामच शेतीचे काम काढले. परीक्षा नापास झालेला मुलगा ज्याप्रमाणे काही दिवस तोंड लपवून बसतो त्याप्रमाणे थोडी त्यांची गत झाली होती. उसाच्या शेतीवर त्यांनी बऱ्याच दिवसांनी फेरफटका मारला होता. मालकांच्या अशा ह्या अचानक भेटीमुळे शेतावरचे मजूर आश्चर्यचकित झाले. त्यांच्या कामातील ढिसाळपणाचा संपतरावांनी आपल्या पद्धतीने समाचार घेतला. इतक्यात त्यांचा फोन खणखणला, अनोळखी क्रमांक न उचलण्याचा त्यांचा नेहमीचा शिरस्ता त्यांनी आज मोडत फोन उचलला. 'काय संपतराव काय म्हणता आहात', समोरची व्यक्ती विचारत होती. 'आपण कोण बोलत आहात?' संपतराव काहीशा त्रासिक स्वरात उद्गारले. वसंतरावांनी मग जास्त ताणून न धरता आपली ओळख करून दिली आणि आपला फोन करण्याचा उद्देश सांगितला. क्षणार्धात संपतरावांच्या मेंदूने अनेक गणिते मांडली. त्यातल्या बऱ्याचशा गणिताची उत्तरे नकारार्थी आल्याने त्यांनी नम्रपणे आपला नकार वसंतरावांना सांगितला. वसंतराव तसे लवकर हार मानणारे नव्हते. 'बघा दुपारपर्यंत विचार बदलला तर' असे म्हणून त्यांनी फोन ठेवला. शेतकरी मोर्च्याचे काम सांभाळून आल्याने इन्स्पेक्टर जाधव काहीसे थकले होते. सकाळ थोडी आळसात घालविण्याचा त्यांचा मनसुबा होता. साहेबांनी कालच रात्री फोन करून त्यांना सुट्टीवर जायचे सुचविले होते. बायकोशी सल्लामसलत करून संध्याकाळच्या बसने गावाला जायचा त्यांनी बेत जवळजवळ पक्का केला होता. गावाला जायच्या आधी थोडी खरेदी करण्यासाठी बाजारात एक चक्कर मारण्याचे ठरवून ते निघालेही. बाजाराच्या नाक्याच्या ठिकाणी रस्ता थोडा अडला गेला होता. त्यांनी जरा कुतूहलाने नजर वळवून पाहिले, तर एक अंत्ययात्रा चालली होती. मृतात्म्याला शांती लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना करीत त्यांनी आपली बाईक पुढे दामटली. जाता जाता अंत्ययात्रेतील दोन तीन चेहरे ओळखीचे असल्याचा त्यांना भास झाला. परंतु हे चेहरे नक्की कोठले हे न आठवल्याने त्यांनी तसेच पुढे जायचे ठरविले. बाजारात सामान खरेदी करता करता त्यांना अचानक आठविले की ते चेहरे गराजमधील कामगारांचे होते. आता मात्र त्यांना स्वस्थ बसवेना. त्यांनी बाजारात चौकशी केली आणि त्यांचा संशय खरा ठरला. ती रमाकांतचीच अंतयात्रा होती. आता जाधव भयंकर अस्वस्थ झाले. काय करायचे हे त्यांना सुचेना. थोड्या शांत डोक्याने विचार करायचे ठरवून त्यांनी घरचा रस्ता पकडला. वाटेत विश्वासरावांच्या अभिनंदनाचे एक दोन बोर्ड त्यांच्या नजरेस पडले आणि ते अधिकच बुचकळ्यात पडले. एकंदरीत परिस्थितीनुसार त्यांनीसुद्धा संपतरावांना तिकीट मिळेल असा अंदाज केला होता. जे काही चालले आहे ते आपल्या आकलनापलीकडचे आहे असेच त्यांना वाटले. परतीच्या रस्त्यावर अचानक त्यांची गाठ महादेवशी पडली. पोलिस खात्याचा मध्यंतरी संगणकीकरणाचा कार्यक्रम आखण्यात आला होता त्यावेळी महादेवनेच त्यांना प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर त्यांची बऱ्यापैकी दोस्ती झाली होती. दोघेही तसे सध्या मोकळेच होते. २ मिनटात आटोपतील असे वाटून त्यांनी गप्पांना सुरुवात केली परंतु अचानक जाधवांनी आपल्या मनातील खदखदीला मोकळी वाट करून दिली. महादेव एकदम आश्चर्यचकित झाला. एकंदरीत हे फार गंभीर प्रकरण आहे ह्याची त्याला खात्री पटली. जाधवांना ते न जाणवून देता गप्पा आटपेपर्यंत त्याने धीर धरला. जाधव तिथून निघताच त्याने बाईक वरून थेट संपतरावांच्या घराचा रस्ता पकडला. महादेवच्या बोलण्यावर संपतरावांचा अजिबात विश्वास बसेना. आपल्या पक्षात असे कटकारस्थान आणि ते ही आपल्या गावात! संपतराव एकदम सुन्न होऊन विचारात पडले. भ्रमणध्वनीच्या कॉलच्या नोंदीत सकाळी आलेला वसंतरावांचा फोन त्यांनी एक दोनदा चाळूनही पाहिला. सुजितकुमारांशी बोलणे आटोपल्यावर भाऊरावांना दरदरून घाम फुटला. ह्या प्रकरणातून निस्तरण्याची जबाबदारी आता तुमची, मी ह्यात अजिबात पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट बजावून सांगितले होते. आणि ह्या विषयावर पुन्हा फोनवर न बोलण्याची तंबीही दिली होती. ह्याचा अर्थ स्पष्ट होता. एक तर हे प्रकरण पूर्णपणे दाबून टाकावयास हवे किंवा कोणाच्या तरी ह्यात अडकवायला हवे. ह्या दोन्ही शक्यता जर जमल्या नाहीत आणि हे प्रकरण जर बाहेर पडले तर भाऊराव त्यात पूर्ण अडकणार होते. राजकारणाची ही रीत भाऊरावांना नवी नव्हती. मोठा मासा केव्हाच गळाला लागत नाही, नेहमी छोटा मासाच अडकतो आणि जमेल तसं मोठा मासा मग छोट्याला सोडवितो. परंतु छोटा मासा होण्याची भाऊरावांची अजिबात तयारी नव्हती. दोन दिवस छातीच्या दुखण्याचे नाटक करून हणम्या अगदी वैतागला होता. आणि अचानक ज्यावेळी रमाकांतच्या मृत्यूची बातमी घेवून नर्स अतिदक्षता विभागातून बाहेर पडली तसा तो अगदी भेदरून गेला. पहिली संधी मिळताच त्याने रुग्णालयातून पलायन केले. घरात कालचा दिवस त्याने एकदम लपून काढला होता. बायकोच्या चौकश्यांना तोंड देता देता त्याच्या नाकी नऊ आले होते. त्यात भर म्हणून आता भाऊराव फोनही उचलत नव्हते. बाजारात ज्यावेळी जाधव आणि महादेव ह्याचे बोलणे चालू होते त्यावेळी भाऊरावांचा कार्यकर्ता रमेश हॉटेलात बसला होता. त्याच्या नजरेस ही जोडगोळी गप्पा मारताना दिसली. त्यावेळी त्याला फारसे काही विशेष वाटले नाही. परंतु नंतर जेव्हा महादेव घाईघाईने बाईक काढून निघाला तेव्हा त्याला काहीसे खटकले होते. पण नंतर तो ही गोष्ट विसरून गेला होता. भाऊरावांचा जसा फोन आला तसा तो घाईनेच त्याच्या घरी पोहचला. भाऊराव प्रचंड बेचैन दिसत होते. 'गावात सतत फिरत राहा, कोठे काय थोडे जरी घडताना दिसले तर तत्काळ मला कळवा' भाऊरावांनी त्याला आज्ञा केली. 'आता थोडे जरी म्हणजे काय?' रमेश प्रश्न विचारता झाला. कोणी निवडणुकीच्या चर्चा करताना दिसले, माझ्याविषयी बोलताना दिसले तर कळवायचे' . 'बघा आताच इन्स्पेक्टर जाधव आणि महादेव गप्पा मारताना दिसले आणि महादेव त्यानंतर अचानक घाईने बाईकवरून निघाला' आता हे ही कळवायचे का?' रमेशच्या ह्या प्रश्नाने भाऊराव हादरून गेले. त्याची कशीबशी बोळवण काढून ते खुर्चीवर बसतात तोच हणम्याचा फोन आला. भाऊरावांनी त्याचा फोन उचलण्याचे टाळले. अचानक त्यांच्या डोक्यात एक विचार आला. ह्या हणम्याला कसे वापरता येईल ह्याविषयी त्यांनी काही कुटील योजना आखली. हणम्याला थोड्याच वेळात एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. निवडणुकीच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी विश्वासरावांच्या उसाच्या मळ्यात कार्यकर्त्याची सभा भरविण्यात आली आहे असे समोरची व्यक्ती बोलत होती. विश्वासरावांनी कार्यकर्त्याच्या मोठ्या उपस्थितीत वाजतगाजत निवडणुकीचा अर्ज सकाळी ११ वाजता भरला. गावातील अनेक लोकही स्वेच्छेने त्यात सहभागी झाले होते. लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांचा विजय एकदम नक्की आहे असेच सर्व बोलू लागले होते. अर्ज भरून घरी पोहचेपर्यंत दुपारचे २ वाजले. जेवण आटपून आणि वामकुक्षी काढून दुपारचे तीन वाजले. आणि मग ती बातमी आली. विश्वासरावांच्या उसाच्या मळ्यात जबर जखमी अवस्थेत हणम्या सापडला होता. त्याला संपविण्याचाच मारेकऱ्यांचा हेतू होता. पण ऐनवेळी ऊसकामगार आल्याने त्यांनी तिथून पळ काढला. गावात ही बातमी पसरताच हल्लकल्लोळ माजला. विश्वासराव आणि संपतराव दोघेही एकदम अस्वस्थ झाले. अशा प्रसंगी थोड्या शांत डोक्यानेच काम केले पाहिजे हे ठरवत संपतरावांनी आपल्या सासऱ्यांना फोन लावला. पाच मिनटात वसंतराव आणि जाधवांबरोबर घडलेल्या घटनांचा सारांश त्यांनी विश्वासरावांना कथन केला. विश्वासराव अवाक झाले, पण इतक्या वर्षाचा अनुभव होता त्यांच्यापाशी. 'संपत, काहीतरी मोठे कारस्थान रचते आहे इथे! ताबडतोब वसंतरावांना फोन लावा, अर्ज भरायला दीड तास बाकी आहे. ताबडतोब अर्ज भरा.' संपतराव अवाक झाले. पण वेळेची मर्यादा लक्षात घेत त्यांनी ताबडतोब वसंतरावांना फोन लावला. मुंबईत पक्षाचे प्रवक्ते चिंतामण जोशी ह्यांनी पत्रकार परिषद बोलावली. विश्वासराव ह्यांच्या शेतात सापडलेला जखमी कार्यकर्ता हे विरोधी पक्षाचे कारस्थान आहे आणि विश्वासराव हे निर्दोषी आहेत अशी ग्वाही ते देत होते. गावात मात्र घडामोडींना जोरदार वेग आला. संपतरावांनी विरोधी पक्षातर्फे आपला अर्ज दाखल केला. वसंतराव आणि नगर जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांच्या अर्ज भरण्याच्या वेळी जातीने उपस्थित होते. ह्या बातमीने सत्ताधारी पक्षाला जोरदार धक्का बसला. गावातही चर्चेला उधाण आले. चिंतामण जोशी ह्याची परिषद चालू असताना तिथेही संपतरावांच्या बंडखोरीची बातमी कळली. आधी ही अफवा आहे असे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा त्यांनाही फोन आला त्यावेळी मात्र मी अधिक माहिती मिळवून मगच बोलीन असे ते म्हणाले. पक्षातील बंडखोरांची गय केली जाणार नाही असा इशाराही जाता जाता देण्यास ते विसरले नाहीत. इन्स्पेक्टर जाधवांना परत ह्या केसवर बोलविण्यात आले. हणम्याला अत्यंत कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले. सुजितकुमारांच्या डोक्यात मात्र वेगळेच चक्र फिरत होते. भाऊरावांना अडकवायचे हे तर नक्की ठरविले होते, पण त्यासाठी योग्य मुहूर्त कोणता हे त्यांना कळत नव्हते. विरोधी पक्षनेते जितेंद्रराव मांडलेली युतीची गणिते तपासून पाहत होते. नगर जिल्ह्यातील दिवेपुरची जागा मिळण्याची शक्यता आता अधिक दाट झाली होती. ह्या निमित्ताने संपत रावासारखा होतकरू युवा नेता पक्षाला मिळाला आणि आता त्यांना मोठ्या समीकरणात कसे गुंतवता येईल ह्याची जितेंद्रराव स्वप्ने पाहत होते. ह्या निमित्ताने दिवेपूर गाव खाजगी प्रादेशिक वाहिनींच्या बातमीपत्रातही झळकले. 'सासऱ्या - जावयाचा जंगी मुकाबला' ह्या ठळक मथळ्यावर ह्या वाहिन्यांच्या निवेदिका गळ्याच्या शिरा ताणून आपल्या परीने बातमी रंगवून सांगण्याचा प्रयत्न करीत होत्या. परंतु मुंबईत बसून अशी सनसनाटी लढत कव्हर करायची हे मायदेश वाहिनीच्या प्रमुखाला पटत नव्हते. त्याने आपली खास वार्ताहर आश्लेषा हिला थेट दिवेपूरला पाठविण्याचा निर्णय घेतला. अजून एक वाहिनीचा प्रमुख ह्या घटनेवर मराठी मालिका बनविता येईल का ह्याची चाचपणी करीत होता. भाऊराव आता विश्वासरावांच्या प्रचारात पूर्ण गुंग झाले होते. मतदारसंघात त्यांनी विश्वासरावांना घेवून प्रचारसभांचा जोरदार बार उडवून दिला होता. पक्षाने (आणि संपतरावांनी केलेल्या) कार्याची त्यांनी विस्तृत पत्रके बनविले होती आणि ती सर्वत्र वाटली होती. अण्णासाहेब ह्यांची प्रचारसभा तर त्यांनी नक्की ठरविली होती त्यावर मुकुल ह्यांचे जर राज्यात प्रचारासाठी येणे झाले तर त्यांनाही मतदारसंघात बोलाविण्याचा त्यांचा मनसुबा होता. प्रचाराच्या दोन दिवसानंतर मात्र चहा पिता पिता भाऊरावांना जाणविले की आपणच इथे जास्त मेहनत करतोय. जे उमेदवार आहेत ते विश्वासराव मात्र अलिप्तपणे ह्या सर्व कार्यक्रमांत केवळ एक कर्तव्य म्हणून भाग घेत आहेत. भाऊरावांच्या मते रमेश तसा कमी अकलेचा पण तोही चहाचे घोट घेत घेत म्हणाला 'पट मांडला खरा, पण पांढरी सोंगटी कोणती आणि काळी कोणती हे ही कळेनासे झालया!' त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकून भाऊराव चमकलेच. पण नंतर ते ही म्हणाले 'सोंगट्याचे जाऊद्यात, पांढरा वजिराचाच इरादा काय आहे हेच कळेनासे झाले आहे!' दिवेपुरच्या मतदारसंघाचे विस्तृत विश्लेषण देण्याची बातमी आश्लेषासाठी तशी अनपेक्षितच होती. मग तिला आठवला तो तिचा महाविद्यालयीन कालावधी. नगर जिल्ह्याच्याच दुसऱ्या टोकाला असणाऱ्या गावात वाढलेली आश्लेषा गावात चांगले महाविद्यालय नाही म्हणून दिवेपुरला शिकण्यासाठी आली. कला शाखेत शिकणाऱ्या आश्लेषाला मराठीत फार रस होता, मराठीतील लिखाण, वक्तृत्व अशा दोन्ही पातळीत तिने लगेचच प्रसिद्धी मिळविली. कॉलेजातील स्पर्धांमध्ये तिने चांगलेच नाव कमावले होते. अशाच एका स्पर्धेत तिची ओळख बुजऱ्या संपतशी झाली होती. वाणिज्य शाखेतील संपत त्या स्पर्धेत स्वयंसेवकाचे काम करीत होता. ही ओळख हळूहळू मैत्रीत रुपांतरीत झाली. परंतु त्या पुढच्या पातळीवर हे नाते नेण्यासाठी ना बुजऱ्या संपतने पुढाकार घेतला ना आश्लेषाने धीटपणा दाखविला. आणि मग बघता बघता कॉलेजचे दिवस संपले आणि आश्लेषा लग्न करून मुंबईला निघून गेली. आणि आता दहा वर्षानंतर एका वळणावर आता हे दोघे परत भेटणार होते. हा बुजरा संपत अचानक इतका बंडखोर बनण्याइतपत धीट कसा झाला ह्याचेच आश्लेषाला राहून राहून आश्चर्य वाटत होते. जाधवांचा तपास जोरात चालू होता. रमाकांतनेच विजयरावांच्या जीपचे काम केले होते. त्या आधीच दोन दिवस विजयरावांनी जीपचे सर्विसिंग केले होते, आणि त्यात सर्व काही ठीकठाक असल्याचे कागदही जाधवांनी तपासून पाहिले. जीपच्या विश्लेषणानुसार तिचे ब्रेक फेल झाले होते. रमाकांतने हे कोणाच्या सांगण्यावरून केले आणि रमाकांतला अन्नातून विषबाधा कोणी केली ह्याकडे आता जाधवांनी लक्ष केंद्रित केले. जाधवांची बाईक गराजमध्ये पोहचली. त्या दिवशी रमाकांत जीपवर काम करीत असताना त्याने जेवण कोठून घेतले ह्याचा त्यांनी तपास सुरु केला. रमाकांत घरूनच डबा आणायचा अशी माहिती त्यांना देण्यात आली. रमाकांतच्या घरी अजून शोकाकुल वातावरणच होते. परंतु जाधवांना आपले कर्तव्य बजावायचे होते, त्यांनी हळू हळू रमाकांतच्या बायकोकडे त्यादिवशीच्या घटनांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्या दिवशी रमाकांतच्या मुलानेच डबा नेवून दिला होता. मुलगा कोपऱ्यात पुस्तक घेवून बसला होता. जाधवांनी आपला मोर्चा त्याच्याकडे वळविला. 'डबा नेवून देताना वाटेत कोठे थांबला होतास का?' जाधवांनी त्याला विचारले. मुलाने आठविण्याचा प्रयत्न केला. 'हो हो, मध्येच एक काका भेटले होते आणि त्यांनी मला बोलावून चॉकलेट दिले आणि एक लिफाफा समोरच्या दुकानदाराला द्यायला सांगितला'. तो म्हणाला. तू काय कोणीही सांगितले की ऐकतोयस का? जाधवांनी थोड्या रागाने विचारले. ' असं कसं, मी त्यांना नेहमी सभेला वगैरे बघतो आणि पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते', मुलगा म्हणाला. 'लिफाफा दुकानदाराला देईपर्यंत तू डबा त्यांच्या हाती दिला असशील ना?' जाधवांच्या ह्या प्रश्नाला मुलाने होकारार्थी उत्तर दिले. जाधवांच्या ह्या भेटीची बातमी योग्य (अयोग्य) ठिकाणी पोहचली होती. राज्यातील स्थिती एकदम दोलायमान होती. सत्ताधारी पक्षाला बहुमताची खात्री वाटत नव्हती आणि विरोधी पक्षांच्या युतीचे कडबोळे काही चांगल्या स्थितीत नव्हते. जितेंद्ररावांचा पक्ष युतीतील मुख्य घटक असला तरी जागावाटपात त्यांच्या पक्षाला मनासारख्या जागा मिळाल्या नव्हत्या. निवडणुकीनंतर समीकरण कसे असणार ह्याचेच आडाखे बांधण्याचा जितेंद्रराव विचार करीत होते. इथे अण्णासाहेब आणि सुजितकुमारांची स्थिती काही वेगळी नव्हती. आपआपल्या गटाला कमीच जागा मिळाल्या असे दोघांनाही वाटत होते. युवाशक्तीला पुढे आणण्याचे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाले नव्हते आणि युवाशक्ती कितपत यशस्वी होणार ह्या बाबतीत शंका व्यक्त करणाऱ्या बुजुर्ग नेत्यांना संपतरावांच्या निमित्ताने आयतेच कोलीत मिळाले होते. संपतरावांच्या प्रचाराने हळूहळू वेग घेतला होता. विरोधी पक्षाची यंत्रणा तर त्यांच्या साथीला होतीच वर त्यांनी ज्यांच्याबरोबर इतकी वर्षे काम केले त्या कार्यकर्त्यांनीही पक्षांची बंधने झुगारून त्यांच्या प्रचारात भाग घेतला होता. राहता राहिला प्रश्न तो निधीचा. थोड्या तंगीत सापडलेल्या संपतरावांना एके रात्री माहेरी जावून आलेल्या सगुणाबाईंनी एक सूटकेस दिली. ती उघडल्यावर त्यातील नोटांची पुडक्यांकडे संपतराव आ वासून बघतच राहिले! ही कथा अचानक आटोपती घेतोय. मागचे काही भाग मनासारखे झाले नाहीत. कथानकातील रंगत काही वाढली नाही. वाचकसंख्या कमी होऊ लागली. एकंदरीत संदेश लक्षात घेऊन ही कथा / किंवा हे पर्व आज संपवतोय. पूर्ण कथा काही लिहित नाहीये. पण पुढील प्रमुख घटना अशा! आश्लेषा आणि संपत ह्यांची जुनी मैत्री भाऊरावांना समजते. तिला विपर्यस्त रूप देण्याचा ते आणि त्यांचे हस्तक प्रयत्न करतात. त्यामुळे संपतरावांच्या संसारात थोडे वादळ निर्माण होते. आपल्या मुलीच्या संसाराला वाचवायला विश्वासराव पुढे सरसावतात. भाऊरावांना ते वेळीच आवरतात. जाधवांचे फासे हळू हळू भाऊरावाभोवती पडतात. शेवटचा प्रयत्न म्हणून भाऊराव विश्वासरावांना त्यात अडकवायचा निष्फळ प्रयत्न करतो. त्यात यश न आल्याने भाऊरावास तुरुंगात जावे लागते. संपतराव अपेक्षेनुसार निवडणूक जिंकतो. निवडणुकीत कोणत्याही पक्षास निर्णायक बहुमत मिळत नाही. तरुण संपतरावांना आणि १० आमदारांच्या एका गटास फोडण्यास अण्णासाहेबास यश येते. ह्याचे पारितोषिक म्हणून संपतरावाचा मंत्रिमंडळात आश्चर्यकारकरित्या समावेश होतो. आणि अशा प्रकारे ह्या पर्वाचा गोड शेवट होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...