मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

स्वप्नरंजन



"सुदैवी आहेत जे त्यांनी नियोजित निवृत्तीचा क्षण अनुभवला"  ह्या अर्थाचा शेर ह्यांनी मिर्झा गालिब ह्यांनी उर्दूत जर लिहिला असता तर आज मला इथं तो उद्धृत करता आला असता. त्यांनी तसं काही लिहिलं नसावं आणि जरी लिहिलं असलं तरी ते माझ्यासारख्या मर्यादित वाचन करणाऱ्या माणसाच्या वाचनात येण्याची शक्यता तशी कमीच !  

हल्लीच्या काळात काही विशिष्ट वर्षांच्या अनुभवानंतर  व्यावसायिक जीवनात येणारं प्रत्येक वर्ष हे बोनस म्हणूनच समजावं ही सत्य परिस्थिती आहे.  त्यामुळं अगदी सविस्तर जरी नसलं तरी निवृत्तीनंतरचं नियोजन काही अंशी आपल्या मनात तरी तयार असावं ही माझी विचारधारणा.  त्यामुळं निवृत्तीनंतर करावयाच्या काही ठळक गोष्टींची माझ्या मनातील यादी आज कागदावर उतरवत आहे. 

१. जंगल लागवड  -  बऱ्याच काळापासून हे माझ्या मनात घोळत आहे. आता लागवड केलेलं  जंगल अगदी घनदाट होण्यासाठी कित्येक वर्षे जाणार, त्यामुळं मला ह्यासाठी आधीच उशीर झाला आहे, तरीही ह्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार. जमेल इतकी मोठी जमीन विकत घेऊन पारंपरिक डेरेदार वृक्षांच्या बियांची त्यात पेरणी करणार. मध्यावर काही मोजकी तळी असावीत. ह्या जंगलात चालत जाण्यासाठी सुद्धा पायवाट उपलब्ध नसावी. हळूहळू पक्षी येऊन इथं आपलं वास्तव्य करतील. त्यांच्या मधुर रवाने जंगलाचा परिसर प्रसन्न होऊन जाईल. वृक्ष इतके घनदाट होतील की ते सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करण्यासाठी उंच उंच वाढत जातील. संध्याकाळी जंगलात चालत गेल्यावर थंड वाऱ्याची झुळूक आपल्याला सुखावून जाईल. मावळत्या सूर्याची किरणे जंगलातील झाडांमधून मार्ग काढत कशीबशी आपल्यापर्यत पोहोचतील.  भास्कराचे ते दर्शन नयनांना आल्हाददायक ठरेल. 

हळूहळू माझ्या भोवतालच्या परिसरात माझ्या सारखेच निसर्गप्रेमी असाच उपक्रम राबवतील आणि एक मोठालं जंगल जिथं प्राणवायूचा अगदी मुबलक पुरवठा होईल, पक्ष्यांचे मधुर आवाज कानावर पडतील उदयास येईल ! कदाचित वाघ - सिंह सुद्धा तिथं वास्तव्यास येतील. 

२. प्रवास -  जगभरातील अफाट, वैविध्यपूर्ण निसर्ग पाहण्यासाठी मी भटकंतीवर निघीन. पुन्हा जंगलांत भटकंती करणं हा माझा प्राधान्यक्रम असेल. त्यासाठी आवश्यक असलेली काटक प्रकृती बनविणे आवश्यक असेल. ती मेहनतीनं कदाचित मी बनवीन सुद्धा पण जंगलात भटकण्यासाठी लागणारी हिंमत आणणं हे मात्र जरा जिकिरीचं काम असेल. त्यासाठी मात्र सुनियोजित असा उपाय काही नसतो. 

प्रवासात वेगवेगळ्या माणसांना भेटून त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा अभ्यास करणं हे माझ्या यादीत वरच्या क्रमांकावर असेल. काळ पुढे जात असला तरीही जुन्या विचारसरणीची माणसं जगात अस्तित्वात आहेत आणि राहतील ह्या सिद्धांतावर माझा विश्वास आहे. ह्या सिद्धांताला पुष्टी देणाऱ्या माणसांना भेटण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. माझा प्रवास, मला भेटलेली ही माणसं, मी भेट दिलेली जंगलं, त्यात भेटलेले पशु, पक्षी ह्यावर खूप खूप लिहीन. 

३. क्रीडा - जगभरात वर्षभर विविध क्रीडास्पर्धा होत असतात. वर्षभरात ह्या सर्व क्रीडास्पर्धा दूरदर्शनसंचावर आणि शक्य असल्यास प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहीन.  प्रत्यक्ष स्टेडियमवर  जाऊन पाहण्याच्या यादीत प्राधान्यक्रमावर खालील क्रीडास्पर्धा असतील 

अ - एडन गार्डन्स, मेलबॉर्न आणि लॉर्ड्स येथील कसोटी सामने 

ब - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना 

क - वसई मैदानावर पूर्वी दोन दिवसांचे क्रिकेटचे अंतिम सामने होत असत. त्यातील होळी विरुद्ध पारनाका ह्या संघातील अंतिम सामना 

ड - न्यूझीलंडच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याची पार्श्वभूमी लाभलेल्या क्रिकेट मैदानावरील एक दिवसीय (दिवस - रात्र) अंतिम सामना. ह्यात रात्री नऊ वाजता वगैरे मावळणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांत न्हाऊन निघालेलं ते हिरवेगार मैदान !

ई - विम्बल्डन स्पर्धेचा पुरुष गटातील अंतिम सामना. 

फ़ - मुंबई विरुद्ध दिल्ली रणजी अंतिम सामना 


४. अध्यापन - एक मराठी माध्यमाची शाळा सुरु करून त्यात अगदी तीस - चाळीस वर्षांपूर्वीचं वातावरण निर्माण करायचं. मुलांना मराठीतील गाजलेल्या लेखकांच्या साहित्यकृती जसे की स्वामी, पानिपत, श्रीमान योगी वगैरे. साने गुरुजींच्या गोष्टी सुद्धा ह्या मुलांना वाचायला मिळाव्यात. महाराष्ट्राचा इतिहास त्यांना कळायला हवा. गाजलेल्या कवींच्या कवितांचं रसग्रहण करण्याचा अनुभव त्यांना मिळायला हवा. इतकं सारं करताना त्यांना आधुनिक जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक सर्व शिक्षणसुद्धा योग्य त्या माध्यमातून दिलं जाईल.  त्यात मी दहावीपर्यंत गणित हा विषय शिकवीन. 

५. वाचन - मराठी आणि इंग्लिश भाषांतील नावाजलेल्या साहित्याचे अगदी सखोल वाचन करणार. (बहुदा हे एकाग्रतेनं करण्यासाठी मी जोपासलेल्या जंगलात वास्तव्य करावं लागणार). हे वाचन केल्यानंतर त्याचे रसग्रहण करणाऱ्या ब्लॉगपोस्ट्स लिहिणार. 

ह्याला आज नक्की झालं काय असं आपल्याला कदाचित वाटलं असणार. मला जवळून ओळखणाऱ्या लोकांना बहुदा ही शंका येणार नाही. कधी नव्हे ती सतत तीन दिवस सुट्टी आल्यानंतर आणि सलग आठ तास कंपनी ई-मेल कडे लक्ष न दिल्यावर मिनी निवृत्तीचे विचार मनात आले ह्यात आश्चर्य नाही. पण खरोखर ह्यातील थोड्याफार गोष्टी जरी करता आल्या तर मी स्वतःला धन्य समजीन !

1 टिप्पणी:

नाच ग घुमा !

  शहरी दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक असणाऱ्या, घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांवर आधारित हा एक सुरेख चित्रपट!  नम्रता संभेराव, मुक्ता बर्वे...