मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ३ जून, २०२१

Being नाओमी ओसाका


ह्या आठवड्यात एक लक्षवेधी घटना घडली.  नाओमी ओसाका ह्या जपानच्या महिला टेनिस खेळाडूने चार ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक असलेल्या फ्रेंच ओपन मधून आपला सहभाग काढून घेतला. ह्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या कारणासाठी तिनं सहभागी होण्याचं नाकारलं ते कारण ! सामना संपल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांसमोर जाण्यानं आपल्याला मानसिक तणाव येतो म्हणून तिनं प्रसिद्धीमाध्यमांसमोर जाण्यास नकार दिला होता.  पण ते आयोजकांना फारसं रुचलं नव्हतं. ही चर्चा काहीशी गंभीर होऊ लागताच तिनं सरळसरळ स्पर्धेतून अंग काढून घेतलं. 

मान्यवरांनी एक परिपूर्ण चित्र बनून जनतेसमोर यावं ह्या अवास्तव अपेक्षेनं आता बऱ्याच क्षेत्रात शिरकाव केला आहे. ह्याला मुख्य कारण म्हणजे प्रसारमाध्यमांचे आणि त्याच्या अनुषंगानं जाहिरातदारांचे वाढलेलं स्तोम ! काही दशकांपूर्वी असलेल्या प्रसारमाध्यमातील नोकऱ्यांच्या संख्या आता दहापटीने वाढल्या आहेत. ह्यांना सतत खाद्य हवं असतं लोकांपुढे ठेवण्यासाठी ! ह्यासाठी मान्यवर (Celebrity) हे एक सोपं लक्ष्य असतं. मान्यवरांच्या खासगी आयुष्यात काय चाललं आहे ह्यापासून प्रत्यक्ष  स्पर्धेत भाग घेण्यासाठी ते तयारी कशी करतात हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांना रस असतो.  ज्या कट्ट्यावर जास्तीत जास्त लोकांची गर्दी असते त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जाहिरातदार सुद्धा गर्दी करतात. 

प्रसिद्धीमाध्यमांसमोर सामोरं जाण्याचा तणाव येण्याचं कारण काय असावं? एखादा प्रसिद्ध खेळाडू ज्यावेळी प्रसिद्धीमाध्यमांसमोर येतो त्यावेळी त्याला / तिला अनेक निकषांवर जोखलं जातं. तुमची देहबोली, भाषेचा दर्जा, jargon वापरण्याची क्षमता, नर्म विनोद पेरण्याची खुबी आणि तुम्हांला politically correct राहता येणं ! एखादा अटीतटीचा सामना खेळल्यानंतर लगेचच ह्या सर्व गोष्टींना सामोरं जाणं ही सोपी बाब नाही ! आणि हो कदाचित तुम्ही ज्या संस्कृतीतून पुढे आला आहात त्याचादेखील तुम्ही ह्या साऱ्या सोशल मीडियावरील गोष्टींना कसं हाताळू शकता ह्यात महत्वाचा सहभाग असतो ! जपानची एक वाहिनी सध्या अधूनमधून पाहतो. बरेचसे शांत जीवनावरील, निसर्गाला जोडणारे कार्यक्रम पाहायला मिळतात ! बिचारी नाओमी कदाचित अशाच शांत जीवनसरणीची चाहती असेल ! 

प्रत्येक खेळाडूंचं व्यावसायिक आयुष्य मोजक्या वर्षांचं असतं. त्यामुळं ह्या वर्षांत अधिकाधिक कमाई करुन पूर्ण आयुष्यभराची पुंजी गोळा करुन ठेवण्याचा तणाव त्यांच्यावर असतो. पुर्वी पोट सुटलेला अथवा सीमारेषेकडं जाणाऱ्या चेंडूला सोबत देणारा खेळाडू संघात आपल्या फलंदाजीच्या जोरावर खपून जायचा कारण सर्वांचं लक्ष तो आपल्या बॅटीने किती धावा करतो किंवा एखाद्या नजाकतीच्या फटाक्याने चाहत्यांची मने अशी जिंकतो हेच महत्वाचं होते. आता खेळाडूचा फिटनेस, त्यानं क्षेत्ररक्षण करताना वाचविलेल्या धावा, सामन्यानंतर पत्रकार परिषदेला अगदी सहजरित्या सामोरं जाण्याची क्षमता ह्या साऱ्या गोष्टी महत्वाच्या ठरु लागल्या आहेत.  वार्ताहराने प्रश्न काहीही विचारु दे "Boyz Played well" ह्या वाक्यानं उत्तराची सुरवात करणाऱ्या आपल्या शेजारी राष्ट्रातील खेळाडूंची टर उडविण्यात आपला पुढाकार असतो ! 

कुठंतरी काहीतरी चुकतंय ! तुम्ही तुमच्या अंगी असलेल्या काही नैसर्गिक गुणांमुळं पुढे येता, पण एका विशिष्ट मर्यादेपलीकडे तुम्ही यशस्वी झालात तर तुमच्या आयुष्यावर तुमचा अगदी मर्यादित हक्क राहतो! तुम्ही आयुष्य कसं जगावं, सार्वजनिक जीवनात कसं वागावं ह्याची बरीचशी मार्गदर्शक तत्त्वं तुमच्यावर लादली जातात. आणि तुम्ही जे काही नसता ते तुम्हांला बनावं लागतं ! तुमचा हा संघर्ष तुम्हांलाच लढावा लागतो ! कारण वर्षातील बराच काळ You are Living Out of Suitcase ! मग विराटसारखा अत्यंत यशस्वी खेळाडू सुद्दा बऱ्याच वर्षांनी आपल्या मानसिक तणावांविषयी बोलायला धजावतो ! 

स्वतःशी प्रामाणिक राहिल्याबद्दल नाओमी तुझं अभिनंदन ! ह्याची व्यावसायिक किंमत तुला भोगावी लागेल! ह्या सगळ्याला आपणसुद्धा अप्रत्यक्ष का होईना हातभार लावत आहोत ही जाणीव आपण सर्वांनी बाळगावी ही किमान अपेक्षा ! हे सारं काही थांबण्यापलीकडं गेलं आहे ! ते केवळ पाहणं आपल्या हाती आहे ! पुढील पिढ्या बहुदा ह्या साऱ्याला तोंड द्यायची क्षमता बाळगूनच जन्माला येतील ! त्यामुळं चिंता करायची असेल तर ती आपण आपली करावी ! 

३ टिप्पण्या:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...