मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

मालगुडी डेज - सीजन १ - भाग १

 


काल अचानक प्राईम व्हिडिओवर ह्या मालिकेचा एक भाग समोर आला. जुन्या आठवणी जागृत झाल्या. आजपासुन जमेल तसं एकेक भाग पाहुन तो प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. आज सुरुवात करुयात सीजन १ - भाग १ पासुन 

कथेचा सारांश - स्वामी हा मालगुडी ह्या एका निसर्गरम्य भागातील नऊ वर्षाचा मुलगा. आईवडील आणि आजीसोबत राहणारा ! मालिकेतील पहिला भाग बराचसा त्याच्या शालेय जीवनाभोवती फिरणारा ! घरातील धार्मिक, पारंपरिक संस्कार स्वामीला शाळेत केल्या जाणाऱ्या कृष्णाविषयीच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यास उद्युक्त करतात. त्याची परिणिती शिक्षकांनी त्याचा कान पिरगळण्यात आणि मग स्वामींच्या वडिलांनी लिहिलेल्या सडेतोड पत्रात होते. हे प्रकरण आम्ही कसे हाताळलं असतं ह्यावर मणी ह्या शाळेतील दांडगट मुलगा आणि इतर मुलं स्वामीला सल्ले देत असतानाच राजम ह्या उच्चपदस्थ व्यक्तीच्या मुलाचं आगमन होते. बालसुलभ स्वभावानुसार राजमच्या श्रीमंती राहणीमानाचे स्वामीला आकर्षण वाटु लागतं. राजमशी जवळीक साधण्याच्या त्यानं केलेल्या प्रयत्नांपायी तो आपल्या इतर मित्रांचा आणि मणीचा रोष ओढवून घेतो. मणी आणि राजम ह्यांच्यात वाढत जाणाऱ्या वितुष्टामध्ये स्वामी मध्यस्थाची भूमिका बजावतो. आणि शेवटी सर्वजण एकत्र येतात. 

भावलेले मानवी स्वभावपैलू  

१. स्वामी आणि त्याच्या आजीचं नातं - राजमच्या पहिल्या भेटीनंतर स्वामी आजीला त्याच्याविषयी मोठ्या कौतुकानं बरंच काही सांगत असतो. त्याला बाकी सर्वजण कसे मान देतात हे सांगत असतो. आजीला मग आजोबा सुद्धा कसे उच्चपदस्थ होते आणि त्यांना कसे सर्वजण घाबरत हे सांगितल्याशिवाय चैन पडत नाही . जुन्या माणसांचा हा स्वभाव आपण सर्वांनी अनुभवलाच असेल. कोण्या बाहेरच्या माणसांचं कौतुक सुरु केलं की ह्या माणसांना आपल्या कुटुंबातील माणसांचं गुणगान गायल्याशिवाय राहवत नाही ! 

२.  स्वामीने स्वामीने दिलेले रोखठोक उत्तर - घरातील धार्मिक शिकवण त्याला गप्प राहू देत नाही. 

३. मणी आणि मित्रमंडळाच्या स्वामीला सल्ला - ही परिस्थिती आम्ही कशी हाताळली असती ह्याविषयी विविध मित्रांनी स्वामीला दिलेले सल्ले. जीवन कसं जगावं ह्याविषयी मिळणारं हे अमुल्य ज्ञान ! 

४. श्रीमंत मित्राशी मैत्री करण्याची इच्छा - अत्यंत साध्या वातावरणात वाढणाऱ्या लहान स्वामीला श्रीमंत राजमविषयी आकर्षण वाटणं आणि त्याच्याशी मैत्री करण्याचा त्यानं प्रयत्न करणं ही बालसुलभ वृत्ती ! 

५. आधीच्या मित्रांविषयी सुद्धा ओढ - राजमशी मैत्री करण्याच्या इच्छेचा पहिला आवेश ओसरल्यानंतर किंवा त्यामुळं बाकीच्या मित्रांशी असलेली मैत्री तुटण्याचा धोका लक्षात आल्यानंतर होणारी स्वामीची कुतरओढ पाहण्यासारखी !

६. पाण्याच्या छोट्या प्रवाहात सोडलेली नाव आणि त्यात सोडलेली मुंगी - हा तर माझाही लहानपणीचा आवडता खेळ ! अचानक कागदी बोट प्रवाहात बुडाल्यानं मुंगीविषयी वाटणारी चिंता आणि तिच्या सुखरुपतेसाठी देवाकडं केलेली प्रार्थना मनाला भावुन जाणारी ! 

आजच्यापुरता इतकंच ! आता एक दोन दिवसांत दुसऱ्या भागाविषयी !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...