मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

आधुनिक काळातील शिक्षकवर्गासमोरील आव्हानं !


नुकत्याच येऊन गेलेल्या शिक्षकदिनाच्या निमित्ताने आधुनिक काळातील शिक्षकवर्गासमोरील असणाऱ्या आव्हानांचा आढावा घ्यावा असे आमचे नातलग संदेश राऊत यांनी सुचविले. 

शिक्षक हे पुढील पिढी घडवत असतात हे पुर्वी म्हटलं जायचं, लोकांच्या मनात खरोखरीची ती भावना असायची! त्यावेळी शाळा-कॉलेजातील वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असावी याचा आपण विचार करुयात.  गुरुवर्य हा भगवंतासमान ही विचारधारणा घेऊन बहुतांशी विद्यार्थी शाळा-कॉलेजात जात असत. यामागं बहुदा घरातील शिकवण, संस्कार कारणीभुत असावेत. शिक्षकांकडून जे काही ज्ञान मिळतं त्यामुळं मुलं मार्गाला लागतात, शिक्षकांकडुन मुलांवर जीवनावश्यक संस्कार होतात ही धारणा त्यावेळी पालक बाळगुन असत.  

शिक्षकांना योग्य आर्थिक मोबदला देणं हे त्याकाळी फारसे प्रचलित नव्हतं. परंतु आपल्या परीने शेतातील पिकणारं धान्य, आपल्या व्यवसायातील उत्पादित होणाऱ्या वस्तु ह्या शिक्षकांना भेट देऊन शिक्षकांप्रती आपल्याला असलेला आदर व्यक्त केला जात असे.  ज्ञानधारणेसाठी विद्यार्थी बहुतांशी शिक्षकांवर अवलंबुन असत. ग्रंथवाचन वगैरे मार्ग महाविद्यालयात गेल्यावर उपलब्ध होत असत, परंतु सर्वानाच ते सहजासहजी उपलब्ध नसत. शिक्षकांना फी दिली म्हणजे त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याचा आपला हक्क आहे ही भावना जी आज मुळ धरु लागली आहे,  ती त्या काळी अस्तित्वात नव्हती. 

बहुतांशी शिक्षक वर्ग हा विषयाशी संबंधित संदर्भग्रंथांचं खोलवर वाचन करीत असे. त्यामुळे बऱ्याच वेळा शालेय / महाविद्यालयीन वर्गांमध्ये मुलांना एका अमर्याद अशा ज्ञानदालनाची आनंददायी सफर घडत असे! केवळ शब्दांनी आणि शिक्षकांच्या आदर्श वर्तवणुकीच्या माध्यमातुन मुलांची आयुष्य घडत, त्यांच्यावर जन्मभराचे संस्कार होत असत. मुलांचा मेंदु हा ज्ञानग्रहणासाठी शाळा-कॉलेजात आल्यानंतरच सक्रिय होत असे.  घरी असताना त्यांच्याकडं ज्ञानग्रहणासाठी शालेय पुस्तकांव्यतिरिक्त फारसे स्त्रोत उपलब्ध नसत. त्यामुळं शिक्षकांसमोर ज्ञानासाठी आसुसलेला विद्यार्थीवर्ग उपलब्ध असे. 

शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीतून पाहिलं असता बऱ्याचवेळा त्यांना शिक्षक ह्या भुमिकेच्या जोरावर वैयक्तिक आयुष्यातील जबाबदाऱ्यांपासुन काहीशी सुटका मिळत असे. एकंदरीत शिक्षकानं आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हायलाच हवं असं दडपण नसे ! शिक्षकांना दैवत्वाच्या गाभाऱ्यात बसवुन त्यांच्याप्रती असलेलं आपलं आर्थिक दायित्व झटकुन टाकायला समाज मोकळा होत असे. 

काळ खुप बदलला. विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांची मानसिकता बदलली. 
शिक्षकांपुढे बरीच आव्हानं दिसुन येत आहेत. आपल्या आर्थिक स्थितीकडं दुर्लक्षच करायला हवं ही मानसिकता शिक्षकवर्गानं  बऱ्याच प्रमाणात झटकुन दिली, कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनातील भुमिकेविषयी त्यांना मिळणारी सुट काळानुसार नाहीशी झाली. आर्थिकदृष्ट्या केवळ शाळा, कॉलेजातील नोकरीवर अवलंबून राहणे अशक्यप्राय बनलं.  त्यामुळे उत्तम शिक्षकांना या पेशाकडे कायमचं टिकवून धरणे कठीण होत चाललं आहे! ज्ञानधारणेपेक्षा गुण मिळविण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढु लागला. त्यामुळे शिक्षक म्हणजे गुण मिळवून देणारे एक साधन आणि आपण त्यासाठी फीचे मोल मोजणारे उपभोक्ता ही अत्यंत चुकीची भावना काही प्रमाणात निर्माण झाली.  

त्याचप्रमाणे घरामधील संवादांमधुन शिक्षकांविषयी दिसण्यात येणारी आदरभावना सुद्धा संपुष्टात येत चालली आहे.  ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांकडे असंख्य स्त्रोत निर्माण झाले आहेत. पुर्वी  शिक्षक मिळालेल्या माहितीची वैधता तपासुन घेऊन त्यानंतरच ते विद्यार्थ्यांपुढे मांडत असत. ती अचुकतेची शक्यता विद्यार्थ्यांपुढे आज उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांच्या बाबतीत खरी ठरत नाही. इंटरनेटच्या माध्यमातुन मिळालेलं  बरेचसं ज्ञान हे जरी शंभर टक्के अचूक नसलं तरी त्यावर विद्यार्थ्यांचा विश्वास बसण्याची शक्यता जास्त असते. या सहजासहजी मिळालेल्या माहितीच्या आधारावर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उगाचच बळावतो.  पुर्वी एखाद्या विषयाबाबतीत कोरा करकरीत मेंदु घेऊन शिक्षकांपुढे येऊन बसणारा विद्यार्थीवर्ग आज उरला नाही. हा विद्यार्थीवर्ग आधीच काही बरोबर आणि काही चुक अशा संकल्पनांचं ओझं घेऊन शिक्षकांपुढं बसतो. अशावेळी त्यांच्या मेंदुतील चुकीच्या संकल्पनांना दुर करुन योग्य संकल्पनांना त्या मेंदुत जागा करण्याची वाढीव जबाबदारी शिक्षकवर्गापुढं आहे! 

शिक्षकांकडून आपल्याला संस्कार, जीवनज्ञान मिळतं अशा काही संकल्पना अस्तित्वात आहेत याची जाणीवच या विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांशी वर्गांमध्ये संवाद साधताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं हे काहीसं  मित्रत्वाकडे झुकणारे असावं ह्या अधिकच्या ओझ्याचे बोजे शिक्षकवर्गावर आहे. 

कुठंतरी एक मोठी चुक घडत आहे. गुरुजनांविषयी असणारा आदर पुढील जीवनातील व्यक्तीच्या संस्कारी वर्तवणुकीचा पाया बनत असे. आयुष्यात केव्हाही आपण चुकीचं वागल्यास आपल्या शिक्षकांना काय वाटेल हा विचार सदैव मनात राही! आज ह्या विचाराचं बंधन विद्यार्थ्यांवर नाही! 

राहता राहिला शिक्षकवर्ग! दैवत्वाच्या गाभाऱ्यात अजुनही त्यांनी राहावं ही पालकवर्गाची अपेक्षा, उच्चशिक्षणाच्या आपल्या महत्वाकांक्षांना त्यांनी येनकेनप्रकारे बळ द्यावं ही विद्यार्थीवर्गाची अपेक्षा आणि शेजारच्या घरातील कमावत्या माणसाप्रमाणे त्यांनीही पैशाचा ओघ सुरु ठेवावा ही घरातल्या माणसांची अपेक्षा!  ह्या पुर्णपणे भिन्न दिशांना तोंड करुन असणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरत जमेल तितकं ज्ञानग्रहणाचे आणि ज्ञानदानाचे कार्य हा शिक्षकवर्ग आजच्या काळात बजावत आहे !

२ टिप्पण्या:

  1. पुर्वी शिक्षा (मार) हे हत्यार होते, ते देखील काढून घेण्यात आले. शिक्षकांचा धाक असा राहीला नाही. शिक्षकांपुढील आव्हान लेख उत्कृष्ट. आता शिक्षण पद्धतीवर लिहा. गेली 60 वर्ष घोकमपट्टीच शिक्षण बदलेल नाही.वर्गात 2 विद्यार्थी लक्षात राहणे ह्या मेंदूच्या कौशल्यावर पुढील समान पद्धतीच्या शिक्षणात प्रगती करतात. त्या मूळे बहुजन पुढील शिक्षणाला काहीसा दूर जातो. व्यावसायिक शिक्षण आणि तसे शिक्षक हा आजच्या बाजारपेठीची देखील गरज आहे. जे व्यवहारात नाही असे विषय रद्दददबादल करता येतील का? किंवा पालकांनी मूलांच्या गुणतालिकेत अश्या विषयांकडे काना डोळा करण्याची हिंमत धरता येयील का?

    उत्तर द्याहटवा
  2. पुर्वी शिक्षा (मार) हे हत्यार होते, ते देखील काढून घेण्यात आले. शिक्षकांचा धाक असा राहीला नाही. शिक्षकांपुढील आव्हान लेख उत्कृष्ट. आता शिक्षण पद्धतीवर लिहा. गेली 60 वर्ष घोकमपट्टीच शिक्षण बदलेल नाही.वर्गात 2 विद्यार्थी लक्षात राहणे ह्या मेंदूच्या कौशल्यावर पुढील समान पद्धतीच्या शिक्षणात प्रगती करतात. त्या मूळे बहुजन पुढील शिक्षणाला काहीसा दूर जातो. व्यावसायिक शिक्षण आणि तसे शिक्षक हा आजच्या बाजारपेठीची देखील गरज आहे. जे व्यवहारात नाही असे विषय रद्दददबादल करता येतील का? किंवा पालकांनी मूलांच्या गुणतालिकेत अश्या विषयांकडे काना डोळा करण्याची हिंमत धरता येयील का?

    उत्तर द्याहटवा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...