मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ३१ मे, २०१९

कास पठार, माउंट एव्हरेस्ट वगैरे वगैरे



निसर्ग हा एक मनस्वी सिद्धहस्त कलाकार आहे. निसर्ग ज्याप्रकारे आपल्या अदभुत कलाकारीनं मनुष्याच्या डोळ्यांचं, मनाचं पारणं फेडु शकतो त्याची सर कोणत्याही मानवनिर्मित कलाकृतीला येणं तसं कठीणच ! असं असलं तरी मनुष्यसुद्धा आपल्या परीनं नेटानं प्रयत्न करीतच असतो ! मनुष्यानं सुद्धा काही अप्रतिम कलाकृती ह्या भुतलावर निर्मिल्या आहेत!

निसर्ग आणि मनुष्यनिर्मित कलाकृतींचा याची देही डोळा आनंद घेणे ही इच्छा बऱ्याच जणांच्या मनात वर्षानुवर्षे रुजलेली असते. काही काळापुर्वी मर्यादित आर्थिक परिस्थिती, दुरवर आणि दुर्गम ठिकाणी जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाची सर्वसामान्य जनांपर्यंत असलेली मर्यादित उपलब्धता आणि आयुष्यात धाडस किती प्रमाणात करावं ह्याविषयी असलेली काहीशी मवाळ भूमिका ह्यामुळं सर्वसामान्य लोकं मर्यादित धाडशी कृत्यं करीत. 

अचानक आपण खालील तक्त्याकडं वळूयात! 
  
मुंबई उपनगरातील गणपती मंदिर 
सिद्धिविनायक मंदिर 
हिराडोंगरी (वसई )
माउंट एव्हरेस्ट
घरासमोरील बाग  
कास पठार 

मनुष्य कोणत्याही गोष्टीचा आनंद दोन पातळ्यांवर घेत असतो. 

पहिली असते मनातील भावनेची अनुभूती ! उपनगरातील गणपती मंदिर असो वा प्रभादेवीचं सिद्धीविनायक मंदिर, त्या सर्वशक्तिमानाच्या चरणाशी लीन होण्याची अनुभूती सारखीच असायला हवी ! 
दुसरी भावना असते ती त्या स्थळाच्या दर्शनाने अनुभवलेल्या इंद्रिय अनुभवांनी नतमस्तक होण्याची अनुभूती ! इथं आपण मानसिक अनुभूतीपेक्षा आपल्या इंद्रियांना जाणवलेल्या संवेदनावर आपल्या आनंदाची पातळी ठरवत असतो. 

भुतलावरील जी काही निसर्गनिर्मित अद्भुत स्थळं आहेत त्यांना प्रत्यक्षात भेट देणं हा म्हटलं तर प्रत्येक मनुष्याचा हक्क आहे. परंतु आपल्या प्रत्यक्ष भेटींनी  आणि तिथं आपण मागं सोडत असलेल्या पाऊलखुणांनी त्या स्थळाच्या सौंदर्यावर जर विपरीत परिणाम होत असेल तर मानवजातीचा एक  सुजाण प्रतिनिधी म्हणुन आपण खरोखर त्या स्थळांना भेट द्यायला हवी का ह्या गोष्टीचा विचार करायला हवा. 

गेल्या दहा वर्षात अचानक प्रसिद्धीला आल्यानं आपली नैसर्गिक विविधता धोक्याच्या पातळीवर जाण्याच्या संकटात सापडलेलं कास पठार, पर्यटकांच्या गर्दीत सापडलेलं एव्हरेस्ट शिखर ही सारी उदाहरणे कसली प्रतिक आहेत? एव्हरेस्ट शिखरावरील गर्दीमुळं वेळेत शिखरावरुन परतीच्या मार्गावर बेस कॅम्पपर्यंत पोहोचु न शकल्यानं मृत्युमुखी पडलेल्या अभागी गिर्यारोहकांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली ! 

मनाच्या हिंदोळ्यावर बसुन अफाट कल्पनाशक्तीनं सुद्धा आपण ह्या विश्वातील सौंदर्य अनुभवू शकतो, त्याच्याशी एकरुप होऊ शकतो ह्या भावनेचा पुर्णपणे झालेला लोप हे महत्वाचे कारण !

एक समाज म्हणुन लयाला गेलेली आपली मानसिक संवेदनशीलता परत मिळविणं कठीणच ! काही कठोर निर्बंधांचाच (जसे की मर्यादित पर्यटकांनाच कास पठाराला भेट देण्याची परवानगी !) वापर करणे आता आपल्या हाती आहे !

आपल्या पुढील पिढीला पृथ्वीवरील सौंदर्याचा आनंद अनुभवता यावा ह्यासाठी वसुंधरेचे जतन करणं ही प्रत्येक पिढीची जबाबदारी असते ! उपभोगवादाला शरण जाताना कुठंतरी ह्या जबाबदारीचं भान असु द्यात !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...