मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २ मे, २०१९

महाराजा भोग



सुट्टीचा दिवस व्यतित करण्यासाठी समाजसंमत असे जे काही मार्ग आहेत त्यात कोणताही विशिष्ट हेतू मनात न बाळगता वातानुकूलित मॉलमध्ये तासंतास भटकंती करणे हा एक मार्ग आहे.  गेली काही वर्षे सुट्टी म्हटली की वसईला पलायन करणे हा एकमेव पर्याय आम्ही स्वीकारला होता. परंतु सध्या सोहम क्लासला जाण्याच्या वयोगटात असल्यामुळे वसईच्या फेऱ्यांची वारंवारता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत बऱ्याच दिवसांनंतर आम्ही मालाडच्या हायपरसिटी व इनॉर्बिट मॉलला भेट देण्याचे योजिले. 

हायपरसिटी मॉलमध्ये काही  विशिष्ट खरेदी करण्याचे प्रयोजन होते. इथे इतके विविध पर्याय उपलब्ध असताना माझ्यासारख्या मी इतक्या मिनिटात खरेदी करून मॉलबाहेर पडलो अशा वृथा अभिमान बाळगून असणाऱ्या माणसांसाठी घाईघाईने खरेदी करणे महागडे पडू शकते.  ही गोष्ट ध्यानात आल्यामुळे मी अत्यंत संयमाचे धोरण स्वीकारले होते. या संयमी धोरणाला फळ म्हणून की काय आम्हाला एक चांगली ऑफर मिळून इष्ट गोष्‍टींची मनाजोगती खरेदी झाली. मनाजोगती खरेदी हा शब्दप्रयोग पुरुषांसाठी वापरला जात असावा का ह्याविषयी उपलब्ध मराठी साहित्यात पुरेसे संदर्भ मला आढळले नसल्याने मी ह्या शब्दप्रयोगाचा वापर माझ्यासाठी नाही असे स्पष्टीकरण देऊ इच्छितो !

कार्यालयांमध्ये विविध प्रसंगांनिमित्त बाहेर जाऊन भोजन करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. सांघिक भावना निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांचा नक्कीच सकारात्मक परिणाम होत असला तरी तुमच्या एकंदरीत आकारमानावर मात्र त्याचा इष्ट परिणाम होत नाही! अशा भोजनप्रसंगाच्या माझ्या तोंडुन अनेक कहाण्या ऐकून कधीतरी आम्हाला सुद्धा या विशिष्ट उपहारगृहात जायचं आहे अशी मागणी करण्यात येते.  अशी मागणी केली गेली असता त्या उपहारगृहाविषयी विशिष्ट माहिती देऊन त्याऐवजी हे दुसरे उपहारगृह कसे चांगले आहे हे आपल्याला पटवून देता येणे जमायला हवे. 

मी याच तंत्राचा वापर करून काल इनॉर्बिटमॉल मधील महाराजा भोग या उपहारगृहात सोहम आणि प्राजक्ता ह्या दोघांना भोजनासाठी नेले.  हल्लीच्या सामाजिक संस्कृतीनुसार एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपण भोजनास गेलो असू तर तेथील अंबिएन्स मला आवडलं असे म्हणण्याची पद्धत आहे. अंबिएन्स या शब्दाच्या वापराशिवाय उपहारगृहातील तुमचा अनुभव आणि त्याचे वर्णन पुर्ण होत नाही.  त्याच धर्तीवर महाराजा भोग मधील अंबिएन्स हे अत्यंत प्रसन्न असुन मनाला सुखावणाऱ्या मंद संगीताच्या पार्श्वभूमीवर मनाला सुखावून देणारं असं आहे. 

आम्ही साधारणतः साडेसातच्या सुमारास या उपहारगृहात प्रवेश केल्यामुळे आम्हाला हवी ती आसने निवडण्याचे स्वातंत्र मिळाले. अनेक वाट्या, 3 चषक अर्थात प्याले अशा जय्यत तयारीसकट थाळी आमच्यासमोर मांडण्यात आली. चषक ह्या शब्दप्रयोगानंतर काही वाचकांच्या चित्तवृत्ती प्रफ्फुलीत झाल्या असतील तर क्षमस्व !  एका मनाला सुखावून देणाऱ्या सरबताचा आम्ही आस्वाद घेत आहोत तोवर एकामागोमाग एक अशा अनेक चविष्ट पदार्थांनी आमची थाळी भरून टाकली.  एकंदरीत हा प्रकार बघता ब्लॉग लिहिण्यासाठी हा एक योग्य अनुभव असू शकतो याविषयी आम्हां सर्वांचे एकमत झाले. इथं सोहम ब्लॉग वाचण्याची शक्यता नसल्यानं आम्हां सर्वांचे ह्या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात आला आहे. केवळ लिखाणावर वाचक ब्लॉगकडे आकर्षित होत नसल्याने त्याला पूरक असे फोटोदेखील काढावेत असा विचार योग्य वेळी आमच्या मनात आला.  परंतु ह्या विचारामुळं संपुर्ण थाळी रंगीबिरंगी चविष्ट पदार्थाने जोवर सजवली जात नाही तोवर कोणत्याही पदार्थाला स्पर्श करण्यास आम्हांला  मनाई करण्यात आली होती.  मनावर प्रचंड संयम दाखवत आम्ही या थाळीची सजावट पहात होतो. 





या उपहारगृहाचं  एक वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रत्येक वाढपी तुम्हाला प्रत्येक पदार्थाविषयी थोडीफार माहिती देऊन मग त्याचा आग्रह सुद्धा करीत असतो. संपुर्ण थाळीची सजावट झाल्यावर हवे तसे फोटो काढून घेतल्यानंतर आम्ही थाळीतील असंख्य पदार्थांचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली. पांढरा ढोकळा, चटण्या, बुंदी रायता, दाल बाटी चुरमा, आमरस पुरी, चपाती, रोटी, विविध प्रकारच्या गोड, तिखट डाळी, कढी,  तीन चार प्रकारच्या भाज्या, जिलेबी, मूंग हलवा, पापड, दाल खिचडी, पुलाव, छास अर्थात ताक अशा विविध पदार्थांचा आम्ही पुढील काही वेळ मनसोक्त आस्वाद घेत होतो.  परंतु मग मात्र माझी क्षमता संपत आली आहे हा संदेश पोटाद्वारे पाठवण्यात आल्यामुळे आम्ही आमचे जेवण आटोपते घेतले. शेवटी आम्हांला गोडसर असे पान देण्यात आले. बिल दोन हजाराच्या आत झाले. एकंदरीत दीक्षित, दिवेकर यांच्या सल्ल्याला पुर्णपणे धुडकावून देणारे असे भरपेट जेवण करून आम्ही महाराजा भोग या भोजनालयातुन प्रस्थान केले. 

त्यानंतर आम्ही अजून अर्धा-पाऊण तास त्या वातानुकूलित मॉलमधील विविध दुकानात भटकत होतो. तिथं घेतलेला हा एक फोटो!

इतक्या भरपेट जेवणांनंतरदेखील आपण फिट आहोत हे सिद्ध करण्यासाठी श्वास रोखून घेतलेला हा फोटो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...