मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २ जानेवारी, २०१९

नववर्षसंकल्प !



नववर्षसंकल्पाविषयी जनमानसात एकंदरीत काहीसं चेष्टेचं वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं. यामधील मुख्य भाग हा संकल्प प्रत्यक्षात अंमलात आणण्यास बहुसंख्य लोकांना येणाऱ्या अपयशामुळे असतो. परंतु यंदा मी मात्र नववर्षसंकल्पाकडे काहीशा वेगळ्या नजरेनं बघण्याचं ठरवलं आहे. 

आयुष्यातील वास्तवांचा आपल्याला तसा वर्षभर मुकाबला करावा लागतो.  ही वास्तवं आपल्या स्वप्नाळू वृत्तीला बऱ्यापैकी लगाम घालणारी असतात.  त्यामुळे होतं काय की आपल्यातील स्वप्नाळूपणा बऱ्याच वेळा दबल्या स्थितीतच राहतो. परंतु नववर्ष ही एक अशी वेळ असते की ज्यावेळी आपल्यातील हा स्वप्नाळूपणा शब्दरूपात उतरवण्याची एक संधी नववर्ष संकल्प मिळवून देतात. हे संकल्प प्रत्यक्षात जरी १००% अंमलात आणता आले नसले तरी ते केवळ कागदावर उतरवले तरी काही प्रमाणात आपण समाधानी व्हायला हवं. 

आता वळूया ते यावर्षी मी काय ठरवलं त्याविषयी!! यंदाचा माझा मुख्य संकल्प आहे तो म्हणजे माझ्या मेंदूला जास्तीत जास्त वेळ ताज्यातवान्या / सर्वोत्तम स्थितीत ठेवणे. कार्यालयात काही कामे अशी असतात जिथं तुमचा मेंदू अत्यंत तल्लख स्थितीत असणे आवश्यक असते. जर तुमचा मेंदू त्याच्या सर्वोत्तम स्थितीत नसेल आणि जर तुम्ही ही कामं करण्याचा प्रयत्न केलात तर तो वेळ जवळपास वाया गेला असंच म्हणता येईल अशी स्थिती उदभवू शकते. त्यामुळे आपला मेंदू बाह्य वातावरणातील घटकांच्या कोणत्या परिस्थितीत सर्वोत्तम प्रकारे काम करू शकतो हे आपल्याला माहीत असायला हवे. मी माझ्या बाबतीत ह्या घटकांची ती स्थिती ओळखण्याचा प्रयत्न करणार आहे

पुरेशी झोप, योग्य आहार हे नक्कीच ह्यातील महत्वाचे घटक आहेत. त्याचबरोबर मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी आपण थांबवु शकत नाहीत पण ह्या गोष्टींमुळं आपल्या सर्वोत्तम स्थितीपासुन दुर गेलेला मेंदु परत लवकर त्या स्थितीत कसा परत येईल हे जाणुन घेण्याचा माझा यत्न राहील. 

अजून एक यातील महत्त्वाचा घटक म्हणजे दिवसातील काही वेळा आपण चांगल्या मनःस्थितीत असतो जसे की सकाळी आंघोळ करून आपण अभ्यासास बसलो असू तर त्यातील प्रत्येक मिनिटाचे क्षमता ही  दिवसातील बाकीच्या कालावधीतील मिनिटाच्या क्षमतेपेक्षा जास्त असू शकते. आता अभ्यासाची वेळ तर निघून गेली पण ऑफिसातील काम करण्याच्या दृष्टीने दिवसातील सर्वात सुरुवातीचा काळ हा सर्वोत्तम क्षमतेचा असू शकतो.  हे केवळ एक उदाहरण झाले. परंतु अशा विविध कालावधींचा मला शोध घेता यायला हवा

माझा मेंदु जर सर्वोत्तम स्थितीत असेल तर ते मला त्या क्षणी ओळखता यायला हवं आणि त्यावेळचा माझा मेंदु योग्य त्या कामांसाठी वापरता यायला हवा. 

माझ्या मेंदुला मला ट्रीट करता यायला हवं ! त्याचे  लाड  करता यायला हवेत !

ह्या नंतरचा संकल्प म्हणजे भोवतालच्या लोकांशी साधत असलेला संवाद आणि संवादशैली!  आपल्या मेंदूत एखादा विचार आला की तो विचार योग्य त्या व्यक्तीला पोहोचवण्याची बऱ्याच वेळा आपल्याला घाई झालेली असते.  परंतु समोरचा माणूस हा विचार ग्रहण करण्याच्या योग्य मनःस्थितीत आहे की नाही याचा आपण विचार करायला हवा. आपल्या मनातील विचार जसाच्या तसा समोरचा माणूस ग्रहण करू शकतो काय याचा देखील आपण थोडा विचार करायला हवा.  यादृष्टीने यावर्षी काही अभ्यास करण्याचा माझा मानस आहे. 

हे संकल्प  आणि त्यांची व्याप्ती ह्या वर्षापुरता सीमित नाहीत. ह्या वर्षी ह्या संकल्पाच्या  पुर्तीच्या दृष्टीने योग्य पावलं उचलली  गेली तर मी समाधानी असेन !


(ह्या पोस्टच्या सुरुवातीचं चित्र  २०१९ सालच्या  पहिल्या सूर्याचं ! छायाचित्रकार  प्राजक्ता पाटील ह्यांचे  धन्यवाद !)

1 टिप्पणी:

  1. फोटोग्राफरचे आभार मानणे हेदेखील मानसिक स्वास्थ्याला लाभदायक असू शकते 😂😂

    उत्तर द्याहटवा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...