मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८

मुरांबा !




एका भरभक्कम खांबाला मजबूत जोराने बांधलेल्या बैलाची कल्पना करुयात ! बैल त्या खांबापासून मोकळा होण्यासाठी सुरुवातीला खूप धडपड करतो. त्या दोराला खूप मोठमोठे हिसके देऊन त्यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत असतो. परंतु खांब आणि दोर यांची युती त्या बैलाला मुक्त होऊ देत नाही!

गेल्या रविवारी सोनी टीव्हीवर मुरंबा हा एक उत्तम चित्रपट पाहण्याचा योग आला. रविवारच्या दुपारच्या जेवणाच्या वेळी सुरू झालेला हा चित्रपट जाहिरातीच्या व्यत्ययाशिवाय सुरुवातीची जवळपास चाळीस मिनिटे चालला.  त्यामुळे आम्ही चित्रपटात गढून गेलो. 

चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, मिथिला पारकर आणि सुमित राघवनची पत्नी चिन्मयी सुमित यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट मला बऱ्याच गोष्टींसाठी आवडला. बेसिकली मला चित्रपट आवडण्यासाठी जास्त काही गोष्टी लागत नसाव्यात अशा निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहोचलो आहे! वेगाने पुढं सरकणारी कथा, मेंदुला जागं ठेवणारे बौद्धिक अथवा विनोदी संवाद, डोळ्याला सुखावणारा निसर्ग अथवा घरं ह्या काही महत्वाच्या गोष्टी !

चित्रपटातील एक आवडलेली गोष्ट म्हणजे चित्रपटाचे चित्रीकरण ज्या बंगल्यामध्ये झालं आहे तो बंगला सुंदर / प्रशस्त / भव्यदिव्य आहे. चित्रपटाचे जवळपास ८६ टक्के चित्रिकरण याच बंगल्यात झाले असल्याने चित्रपटाचा निर्मितीखर्च खूप कमी झाला असणार असा विचार येण्यापासून मनाला थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी तो विचार मनात आलाच!  बाकी मिथिला पारकरचे घरसुद्धा पॉश आहे असे सोहम म्हणाला. 

चित्रपटाच्या सुरुवातीलाच आमचं ब्रेकअप झालं आहे असे अमेय आपल्या आई-वडिलांकडे जाहीर करतो.  साहजिकच आईला खूप धक्का बसतो.  वडिलांचा संपर्क बाह्यजगताशी जास्त प्रमाणात येत असल्यामुळे काहीशी संयत अशी प्रतिक्रिया ते नोंदवितात. बहुदा वडिलांच्या मेंदूमध्ये पुढील काही वेळ विचारचक्र फिरत रहात असावं आणि त्यांच्या मनात एक योजना साकारते. आपल्या मुलाचा विरोध हुशारीने मोडून काढून ते पुढील काही गोष्टी अशाप्रकारे घडवून आणतात की चित्रपटाच्या शेवटी आपणा सर्वांना एक गोड अनुभव मिळतो. 

वरकरणी पाहायला गेलं तर एकमेकाला अगदी अनुरुप अशी अमेय आणि मिथिलाची जोडी! गेली तीन वर्षभर ते एकत्र फिरत आहेत. त्यामुळे डन डील नावाचा जो प्रकार असतो त्यानुसार मिथिला आता या घरची सून होणार हे दोन्ही बाजूच्या आई-वडिलांनी आणि त्यांच्या ओळखीतील सर्वांनी गृहीतच धरलेलं असतं. त्यामुळे ज्यावेळी अमेय आपल्या ब्रेकअपची घोषणा करतो त्यावेळी साहजिकपणे त्यांच्या आई वडिलांना धक्का बसतो. 

चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतसं चर्चेतून आणि फ्लॅशबॅकमधून खऱ्या कारणाचा आपल्याला उलगडा होत जातो. व्यावहारिकदृष्ट्या अमेय एक शिकलेला, देखणा तरुण असला तरी व्यावसायिक जगात जी काही तीव्र स्पर्धा आहे, त्याला तोंड देण्याची त्याची मानसिक इच्छा नाही. यामध्ये त्याची स्पर्धेला तोंड देण्याची क्षमता नाही की इच्छा नाही या प्रश्नाचा खोलात जाऊन चित्रपट ऊहापोह करीत नाही. परंतु आपला होणारा नवरा हा स्पर्धेला तोंड देत नाही किंवा व्यावसायिक जगात यशस्वी होण्याची त्याची इच्छा नाही ही गोष्ट मिथिलाला खूपच खटकत असते. ती स्वतःच्या करिअरबाबत खूपच आग्रही आहे असे साधारणतः चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं.  बाह्य जगतापुढे एक पिक्चर परफेक्ट प्रेझेंट करीत असताना प्रत्यक्षात मात्र हे दोघे या मुद्द्यावरून खूप चर्चा करीत असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये तणावही निर्माण होत असतो. एका क्षणी आपण Point of No Return ला पोचलो आहोत असा निर्णय हे दोघे जण घेतात. 

आता इथं चित्रपट आपल्यासमोर दोन वेगवेगळ्या विचारधारा घेऊन येतो.  एक आहे ती आधुनिक पिढीची विचारधारा आणि दुसरी म्हणजे आयुष्य बऱ्यापैकी पाहिलेल्या मध्यमवर्गीय पिढीची विचारधारा! आधुनिक पिढीच्या विचारधारेतून पाहिलं असता दोघांची करिअर्स ही आयुष्यातील महत्त्वाच्या मोजक्या  बाबींपैकी एक बाब! जर याबाबतीत एकमत नसेल तर हे नातं पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करणारी!  यात अजून एक मुद्दा !!हल्ली इन-रिलेशनशिप आणि तत्सम मोठ-मोठाले शब्द आपण सेलिब्रिटींच्या बाबतीत सतत ऐकत असतो. कुठेतरी मनात आपल्यालासुद्धा हे शब्द आपल्याबाबतीत वापरण्याची संधी नवीन पिढी शोधत असते.  आणि त्यामुळे ब्रेकप झाल्याचं दुःख असतं परंतु हा शब्द आपल्याला वापरता येतो याच मनात कुठेतरी थोडासा आनंद सुद्धा होत असावा !

सचिन खेडेकर आणि मध्यमवर्गीय पिढीच्या दृष्टिकोनातून! आयुष्याचे सर्व कंगोरे या टप्प्यावर साधारणता पाहून झालेले असतात. Absolutely Perfect असं काही नसतं याची जाणीव किंवा खात्री बऱ्यापैकी झालेली असते. त्यामुळे ज्याच्याशी आपलं बऱ्यापैकी जमतं,  ज्या माणसाबरोबर आपण घरात शांतपणे राहू शकतो असा माणूस हा जिवनसाथी म्हणुन मिळाला तर भाग्य समजायला हवं अशी मानसिकता एव्हाना विकसित झालेली असते.  बाविशी ते पंचविशीच्या आसपास ज्या काही भव्यदिव्य आकांक्षा असतात,  त्या तशाच्या तशा व्यवहारात साकारणं शक्य नसतं हे एव्हाना समजलेलं असतं. आपल्याला जी काही गोष्ट समजली आहे ती गोष्ट आपल्याला पुढील पिढीला समजावता आली पाहिजे याची जी तयारी सचिन खेडेकर दाखवतात ते खरोखर उत्तम आणि ते चित्रपटाचा शेवटाला अमेयला जे ज्ञान देतात तेही उत्तम!! तुझ्या भल्यासाठी काहीसं कठोर होऊन तुला सल्ला देणारी मैत्रीण तुला एक जोडीदार म्हणून मिळत आहे तर केवळ तुझ्या पुरुषी अहंकारामुळे तू तिला गमवायची स्थिती ओढवुन घेत आहे हे अगदी उत्तम प्रकार अमेयला ते समजावतात!!

अमेय आणि मिथिला यांचे जे ब्रेकप लग्नाआधी झालं तशीच कारणे लग्नानंतर सुद्धा उद्भवू शकतात आणि हल्ली घटस्फोटाविषयीसुद्धा अगदी मुक्त विचार संस्कृती पसरल्यामुळे असे काही चर्चेच्या आधारे सोडवता येणारे प्रश्नसुद्धा गंभीर स्वरूप धारण करतात.  एकंदरीत नातं  तुटण्यास फारसा वेळ लागत नाही. चित्रपटातून सर्वात महत्त्वाचा घेण्यासारखा बोध म्हणजे हाच!! हल्लीच्या आयुष्यातील क्लिष्टता तुमच्या नात्यांमध्ये सुद्धा उतरली आहे.  त्यामुळे सर्वच गोष्टी बाबत जोडीदारांची एकवाक्यता होण्याची शक्यता कमीच आहे.  न पटणाऱ्या गोष्टिंवर किती चर्चा करायची,  त्यांना किती ताणून धरायचं याचा सारासार विचार दोघांनी करायला हवा!!

खरंतर ही चर्चा ज्याची त्यांनी करायला हवी आणि सामंजस्यपूर्वक निर्णय घ्यायला हवा.  परंतु तुमच्या बाबतीत असं होऊ शकत नसेल तर तुमच्या भोवताली तुमच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींत एक सचिन खेडेकर असावा!! सचिन खेडेकर यांची व्यक्तिरेखा म्हणजे स्वतःच्या आयुष्यात बऱ्यापैकी समाधानी असणारा, प्रगल्भतेच्या काही पायऱ्या ओलांडलेला, दुनिया पाहिलेला असा माणूस! आपलं जे काही ज्ञान अनुभव आहे ते दुसऱ्याला शांतपणे शब्दरूपात मांडून सांगू शकणारा माणूस!! अशी माणसं तुमच्या भोवताली वावरत असतील आणि जर ती तुम्हाला ओळखता आली तर खरोखर उत्तम!! तुम्ही सुदैवी आहात !!

बाकी चित्रपटातील मिथिलाचे रुप लक्षात राहिले. क्वचितच ड्रिंक घेणारी, ऑफिसच्या कामानिमित्त उशिरापर्यंत थांबावी लागणारी, घरी आलेल्या आपल्या मित्राला तूच फ्रीजमधलं उघडून त्यातलं पाणी घे आणि पी असं सांगणारी ! अशी ही बाह्यरुपी बंडखोर वाटणारी मिथिला, आपल्या भावी सासू-सासऱ्यांसमोर मात्र एका पारंपरिक सुनेच्या रुपात मनापासुन वावरते! तिचं आधुनिक रूप पचवण्याची ताकद तिला जीवनसाथी म्हणून वरु  इच्छिणाऱ्या तरुणांकडे असावी! हा संदेश पुढील पिढीसाठी फार महत्त्वाचा आहे नाहीतर पुढील काळ कठीण आहे!!!

ते सुरुवातीचे खांब, दोर आणि बैल यांचा संदर्भ काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बैल म्हणजे हल्लीची नातेसंबंध खिळखिळी करु पाहणारी भोवतालची परिस्थिती ! खांब आणि दोर म्हणजे नातं एकत्र ठेवू पाहणारा विश्वासाचा धागा!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...