आधीचे दोन भाग काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध केल्याने संदर्भासाठी त्यांची लिंक इथे देत आहे.
http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post.html
http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_206.html
वसईतील बहुसंख्य लोक पूर्वी स्टेशनवरून गावात परतण्यासाठी एसटी बसचा वापर करीत. पारनाका, होळी, रानगाव, गिरिज, किल्लाबंदर ह्या ठिकाणांसाठी बस सुटत. तशा ह्यातील काही बस अजूनसुद्धा चालू आहेत पण पूर्वीची शान नाही. ह्या बसच्या विशिष्ट वेळा असत आणि डेपोत असलेल्या बसच्या संख्येवरून आपल्याला बस कधी मिळेल ह्याचा अंदाज बांधता येई. बस देताना पारनाक्याला नेहमीच प्राधान्य दिलं जातं अशी होळीवाल्यांची समजूत होती आणि त्यांना त्याचा रागही यायचा. एखाद्या दिवशी बसला खूप उशीर झाला की मग बसच्या रांगेतील सामाजिक जीवनात सक्रिय असणारी मंडळी जाऊन कंट्रोलरला बस देण्यासाठी आपलं म्हणणं पटवून देत. मग थोड्या वेळानं बस येई. म्हटलं तर शाळेत असताना ह्या एसटी बसने प्रवास करायची वेळ क्वचितच येई. पण बाहेरगावी गेल्यावर परतताना नक्कीच एसटीशी गाठ पडे. ह्या एसटीचे ९० सालच्या आसपास स्टेशन ते होळी तिकीट हे ९० पैसे आणि रमेदी पर्यंत तिकीट १ रुपया होते. होळीच्या थांब्याला कंडक्टर बसमधल्या उरलेल्या प्रवाशांकडे नजर टाकून त्यांनी १ रुपयाचे तिकीट काढले असावे की नाही ह्याची खातरजमा करून घेई. अगदीच संशय आल्यास एखाद्याला विचारी सुद्धा! ह्या एसटी बसमध्ये बाकी सर्व दिवे पिवळ्या रंगाचे आणि एखाद दुसरा निळ्या रंगाचा असे. ह्या दिव्याखालची सीट मिळावी म्हणून माझा आटापिटा असे.
पूर्वी सकाळी ८:४२ वाजता एक बडाफास्ट नावाची लोकल होती. ती बहुदा बोरिवली नंतर थेट बांद्र्याला थांबे. त्या लोकलला आमच्या गल्लीतून जाणारी २-३ मंडळी असत. ती साधारणतः बस पकडण्यासाठी एकत्रच निघत.
आमच्या गल्लीत जॉनी अंकल राहतात. माझे वडील भाई, काका दाजी आणि जॉनी अंकल बऱ्याच वेळा ऑफिससाठी एकत्र निघत. जॉनी अंकल हे अनेक विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीमध्ये निष्णात आहेत. मी त्यांना ८० सालांपासून आमच्या घरी विविध उपकरणे दुरुस्त करताना पाहतो. ते अजूनही जमेल तसे येतात. दाजींकडे एक शंख असायचा. थोड्या दूर घर असलेल्या जॉनी अंकलना बोलावयाचे झाले की मग दाजी ह्या शंखाचा विशिष्ट नाद करीत. मग जॉनी अंकलना हा संदेश मिळून ते घरी येत.
वसई स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या वालीव ह्या गावी आमची शेती होती. पावसाळा आला की तिथे भाताची लागवड केली जात असे. तिथे एक बेडं होतं. तिथे अण्णा, मोठी आई, बाबा (मधल्या क्रमाकांचे काका) ह्या पावसाळ्याच्या काळात बऱ्याच वेळा जाऊन राहत. तिथे विद्युतपुरवठा वगैरे काहीच नसे. त्या शेताच्या बाजूने एक ओढा वाहत असे. त्या ओढ्याचे पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकाला सुद्धा वापरलं जात असावं अशी माझी आठवण आहे. शुद्धता ती पण किती!! आज घराच्या बाजूला असलेल्या विहिरीतील पाणी थेट पिताना जीव धास्तावतो. भाई मग रविवारी वगैरे ह्या शेतावर जात. माझ्या आठवणीत मी एकदा त्यांच्यासोबत एसटी पकडून गेलो होतो. सर्वत्र पाऊस पडून गढूळ पाणी झालं होतं. शेतात मजूर कामाला होते. दुपारी गावठी कोंबडीचे जेवण चुलीवर बनवलं होतं. आणि चारच्या आसपास चहा आणि ग्लुकोज बिस्कीट खाऊन आम्ही परतलो होतो. माझे आजोबा भाऊ ह्या वालीवच्या शेतावरून बैलगाडी घेऊन रात्री अपरात्री सुद्धा घरी परतत असत. ती परंपरा बराच काळ बाबांनी चालू ठेवली होती.
ह्या वालीव शेताच्या बाजूला एक छोटी टेकडी होती. ह्या टेकडीवर आंब्याची अनेक झाडे होती. एका वर्षी ह्या आंब्यांना खूप आंबे आले आणि मग ते पिकण्याच्या सुमारास बैलगाडीत भरून मग घरी आणण्यात आले. ह्यात अनेक प्रकारचे आंबे होते. त्या पिकलेल्या आंब्यांच्या मधुर सुवासाने आजीची खोली भरून गेली. आजी मग आम्हांला प्रत्येक दिवशी ह्या आंब्याचे वाटप करी.
घराच्या मागे असलेल्या बेड्यात दोन कणगे असायचे. त्यात मग ऑक्टोबरच्या आसपास झोडणी करून झालेलं भात आणून भरलं जायचं. आणि बाबा मग लॉरीवाल्यांबरोबर बोलणी करून पेंढा भरून आणत आणि अंगणातील मोकळ्या भागात टाकत. ह्याचं वर्णन मागच्या भागात आलं आहे. हा पेंढा आल्यानंतर काही काळातच मग दिवाळी येई. दिवाळीत आम्ही बाण लावताना ह्या पेंढ्याच्या दिशेने तो लावू नये म्हणून आम्हांला खास सूचना दिल्या जात.
भाई आणि दाजी ह्यांना एकत्र कुटुंब असेपर्यंत एकच भाजी डब्यात मिळायची. एकदा डांगर वर्गातली एक भाजी कडू निघाली. परंतु ह्या सत्याचा महिलावर्गाला साक्षात्कार होईस्तोवर ह्या दोघातील एक आधीच डबा घेऊन ऑफिसात निघाले होते. त्यामुळे मग दुसऱ्याबरोबर दोघांनी अ-कडू भाजी पाठविण्याचे काम आजीने व्यवस्थित सुनांकडून करून घेतलं.
आधी एक मजली असणारे घर ८४ च्या आसपास दुमजली करण्यात आले. युसुफभाई कंत्राटदार आणि डिसोजा वास्तुतज्ञ अशी जोडगोळी होती. खालच्या घराची जशी संरचना होती तशीच वरच्या मजल्याची सुद्धा ठेवण्यात आली. ह्या वर्षांतच केव्हातरी घरी पाण्याची मोटार बसविण्यात आली. वरच्या मजल्याचे काम सुरु असताना तिथल्या कच्च्या भितींना दररोज पाण्याने भिजविण्याचे काम मोठी मंडळी उत्साहाने करीत. आपली ह्या कामात मदत होतेय की अडथळा ह्याची चिंता न करता आम्ही सदभावनेने त्यात सहभागी होत असू. ह्या मजल्याचा स्लॅब जेव्हा टाकण्यात आला तेव्हा आम्हां बच्चे मंडळींना मोठे अप्रूप वाटलं. हा स्लॅब कसंही करून एका दिवसात / एका फटक्यात पूर्ण झाला पाहिजे हा महत्वाचा घटक होता. मिक्सरमधून वेगाने निर्माण होणार कॉंक्रीटआणि त्याहून अधिक वेगाने ते वरती चढवायचा प्रयत्न करणारी कामगार मंडळी हे चित्र पाहून मी धन्य झालो होतो. हा स्लॅब यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर सायंकाळी युसुफभाईच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधानाचे भाव अजूनही मला आठवतात.
१९८० साली एक मोठे सूर्यग्रहण झालं होतं. त्यावेळी घरातील सर्व मंडळी सर्व दारं खिडक्या बंद करून घरात बसली होती. पण आमची अनिता दिदी बऱ्यापैकी बंडखोर होती. ती काहीतरी निमित्त काढून घराबाहेर पडली आणि मग घरातील सर्व मोठ्या मंडळींचा संताप झाला होता.
१९८२ साली एकदा मुंबई पोलिसांनी बंड केले होते आणि त्या संबंधित कारणांमुळे माझ्या वडिलांना रात्रभर ऑफिसात थांबावे लागलं. परंतु त्याकाळी हा संदेश घरी पाठविण्याची सोय नसल्याने घरची मंडळी मात्र रात्रभर चिंतेत राहिली. मी लहान असलो तरी मलाही मोठी चिंता लागून राहिली आणि झोपही आली नाही. सकाळी शाळा होती आणि परीक्षाही होती. शाळेत निघायच्या आधी भाई घरी परतले आणि मग माझा जीव भांड्यात पडला.
असंच एकदा पावसाळ्यात गल्लीतलं चिंचेचे मोठे झाड विजेच्या तारांवर पडून पूर्ण गल्लीतील विद्युतपुरवठा दोन तीन दिवस खंडित झाला. विहिरीतून पाणी काढून घरात भरणे वगैरे प्रकार करून सर्वांचाच जीव मेटाकुटीला आला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळांच्या कर्मचाऱ्यांनी शेवटी जेव्हा तीन चार दिवसांनी हा विद्युत पुरवठा पूर्ववत केला तेव्हा सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
मला लहानपणी पेपर वाचण्याचा मोठा छंद जडला होता. आंघोळ वगैरे करून मी अंगणात पेपरवाल्याची वाट पाहत थांबे. आता नक्की आठवत नाही पण बहुदा त्यावेळी शुजा नावाचे कार्टून रविवारच्या लोकसत्तेत येई. ते मला भारी आवडे. १९८० सालचे ऑलिम्पिक सुद्धा मला काहीसं आठवत. भारताने ह्यात सलामीच्या हॉकीच्या सामन्यात टांझानियाचा १८ -० असा दणदणीत पराभव केला होता. अंतिम सामन्यात भारताने स्पेनचा ४-३ असा चुरशीच्या सामन्यात पराभव केला. ह्या सामन्याचे धावतं वर्णन मी घरच्या रेडियोवर ऐकलं होतं. नंतर कधीतरी हे ऑलिम्पिक शीतयुद्धाच्या कालावधीत मॉस्कोत झाल्याने त्यावर अनेक देशांनी बहिष्कार टाकला होता हे मला समजलं तेव्हा मला काहीसं वाईट वाटलं. हा वॉल्वचा रेडियो अधून मधून बिघडे मग जॉनी अंकलना पाचारण केले जाई आणि मग ते आपल्या सवडीने हा दुरुस्त करीत. माझ्या आठवणीत त्यांनी हा रेडियो सात आठ वेळा तरी दुरुस्त केला असावा. हा रेडियो चालू स्थितीत असला की भाई न चुकता सकाळी सहा वाजताची मंगल प्रभात आणि रात्रीचा १० वाजताच छायागीत हे कार्यक्रम लावतं. सहा वाजता अडीच अडीच मिनिटाच्या हिंदी आणि इंग्लिश बातम्या झाल्या की मग सुंदर मराठी गाणी लागत. ह्यात भीमसेन जोशी ह्यांचं "माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी" हे खास प्रिय होतं. सहा पस्तीस झाले की मग एक हिंदी गाणं लागून मग ह्या कार्यक्रमाची सांगता होई. ही हिंदी गाणी - "हम होंगे कामयाब" "हर बस्तिका रहनेवाला हमको प्यारा है!" वगैरे असत.
१९८१ च्या साली आमच्या घरी दूरदर्शन संच आला. त्याआधी आम्ही सामने बघायला दामूतात्या यांच्या घरी वगैरे जायचो. नंतर मग जुन्या घरच्याच बंधूनी १९८४ -८५ साली रंगीत दूरदर्शन संच आणला. भारतात रंगीत दूरदर्शन संच इंदिरा गांधी ह्यांनी १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आणला. ह्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळी भाई, आई, सुपितताई, बंधू आणि मी महामंडळाच्या सहलीला गेलो. ह्यात कर्नाळा अभयारण्य, महाबळेश्वर, गोवा आणि गणपतीपुळे वगैरे ठिकाणांचा समावेश होता. ही सहल एसटी बसने जायची आणि अजूनही जाते. स्वयंपाकी लोक बस मध्येच असत. ठरलेल्या ठिकाणी पोहोचलं की मग ते स्वयंपाकाला लागत. रात्री झोपायला काही ठिकाणी मोठा हॉल असे त्यात सर्व मंडळी झोपत. आमच्याच कुटुंबातील सुभाषबंधू ह्यांच्याकडे आयोजनाची जबाबदारी होती. त्यांनी गणपतीपुळेला हॉटेलमध्ये आम्हांला चांगली रूम दिली. तिथे पौर्णिमेची रात्र होती आणि रात्री वीज गेली होती. त्यामुळे बाहेर समुद्रकिनारी अगदी मनोरम दृश्य होते. मी पेपर वाचत ह्या आशियाई खेळांशी संपर्क ठेवून होतो. सहलीवरून परत आल्यावर मग बाकीचे सर्व सामने पाहिले. गीता झुत्शीला रौप्य पदक मिळाले आणि भारताचा पाकिस्तानने ७-१ पराभव केला ते ही पाहिलं. ते मनाला खूप लागून राहिलं. तरी एकंदरीत १३ सुवर्ण मिळवून भारताने चांगली कामगिरी केली.
त्याकाळी लग्नाला जायचं म्हणजे बरीच मजा वाटायची. रंगीबेरंगी प्लास्टिक ग्लास मध्ये सरबत, शेव आणि लाडू असे पदार्थ आदल्या दिवशी खायला मिळत. डॉन चित्रपटातील जिसका मुझे था इंतजार हे गाणं बऱ्याच लग्नाच्या आदल्या दिवशी ऐकल्याचे आठवते.
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा