मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ६ जून, २०१५

Multitasking


 
हल्ली बऱ्याच वेळा मुलाखतीदरम्यान "तुम्ही बरीच कामे एका वेळी सक्षमपणे हाताळू शकता का? " असा प्रश्न विचारला जातो. आणि मग तो होतकरू उमेदवारसुद्धा उत्साहाच्या भरात हो म्हणून जातो. 
Multi-tasking चा नक्की अर्थ काय ह्याचं आपण थोडं विश्लेषण करूयात. सर्वांना समजेल अथवा आवडेल असे गृहिणीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून! सकाळी उठून तिच्या डोळ्यासमोर अनेक कामे असतात. स्वतःची, मुलांची तयारी करणे; सर्वांच्या न्याहाऱ्या बनविणे, सर्वांचे डबे बनविणे आणि भरून देणे. ह्यातच घरात कामवाली आल्यास तिला सुचना देणे इत्यादी इत्यादी. हल्ली त्यात whatsapp चे मेसेज बघणे ह्याची भर पडली आहे. 
ह्या सर्व कामांची यादी कागदावर लिहून तो कागद डोळ्यासमोर ठेवण्याची चैन तिला परवडण्यासारखी नसते किंबहुना त्याची तिला गरजही नसते. आता वळूयात मूळ मुद्द्याकडे. समजा एखाद्या गृहिणीने ठरवले की ही सर्व कामे मी एका मागोमाग एक करणार. म्हणजे प्रथम सर्वांची न्याहारी बनवायची, ती पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या कोणत्या कामाला हात लावणार नाही. आदर्शवादी आणि अव्यावहारिक दृष्टीकोन झाला. समजा असा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून कोण्या गृहिणीने तयारी करायची ठरविली तर मग ती बहुदा दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होईल. ह्यातील अतिश्योक्तीचा भाग सोडला तर आपल्या असे लक्षात येईल की multitasking करणे ही गृहिणीची गरज असते. कुकर लावणे हा गृहिणीला multitasking करण्यात हातभार लावणारा महत्वाचा घटक आहे. एकदा का कुकर लावला की तो त्याचे काम आपसूक करत राहतो. तो जरी माहेरून दिलेला असला तरी तो कसा मस्त शिट्टी देतो हे बघत बसायचं काम नाही. मग अशा वेळात गृहिणी दुसरे काम सुद्धा करू शकते. आता ह्या क्षणी आपण दुसरं काम करू शकतो हा निर्णय घेणे हा सोपा भाग पण ते दुसरं काम कोणतं हा निर्णय घेणे हे कौशल्याचं काम. मुल थोडं लहान असेल तर त्याला जास्त लवकर उठवून ठेवणं हा शहाणपणाचा भाग नाही कारण ते लुडबुड जास्त करेल. त्याचप्रमाणे कोणताही प्रसंग असो दाढी, आंघोळीला अगदी मनसोक्त वेळ घेणाऱ्या नवऱ्याला न्हाणीघराचा ताबा अगदी शेवटी घेऊ देणे असे कठोर पण आवश्यक निर्णय ती घेत असते. 
आता ह्या प्रस्तावनेनंतर आपण लेखाच्या मुख्य भागाकडे म्हणजे कार्यालयातील multitasking कडे वळूयात. साधारणतः कार्यालयात परिणामकारक कार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक समान गुणधर्म असतो आणि तो म्हणजे ते आपल्याला दिवसभरात कराव्या लागणाऱ्या कामाची यादी तयार बनवून ठेवतात. ही यादी जमल्यास उतरत्या प्राधान्यक्रमाने असावी. हा कर्मचारी सकाळी किंवा जेव्हा केव्हा त्याची शिफ्ट सुरु होते त्यावेळी अगदी स्वप्ने पाहत कार्यालयात प्रवेश करतो. आज माझी सर्व कामे मी आटपून टाकीन असे ते स्वप्न असते. त्याचवेळी नियतीच्या मनात मात्र वेगळेच विचार असतात. आता मी नियतीवर विश्वास ठेवतो म्हणून माझ्या आधुनिक विचारसरणीच्या मित्रांनी खट्टू व्हायचं काम नाही! इथे नियती म्हणजे आपल्या जीवनातील अनिश्चततेचे प्रतिक! आपली कामे पूर्ण करण्यात आपल्या प्रयत्नांसोबत बाकी काही घटक अवलंबून असतात जसे की योग्य व्यक्तीची चर्चेसाठी, निर्णय घेण्यासाठी अथवा काम करण्यासाठीची उपलब्धता! काही दिवशी ह्या बाह्य घटकांचा मेळ जुळून येतो तर काही दिवशी नाही. 
ज्या दिवशी हा मेळ जमून येत असतो त्या दिवशी झटापट कामे उरकून घ्यावीत हेच शहाण्या माणसाचे लक्षण! वरवर पाहता multitasking हे एका कार्यक्षम माणसाचे लक्षण मानले जाऊ शकते. पण बऱ्याच वेळा हा आभास असू शकतो. काही कामे अशी असतात जी कमी वेळात अचूकपणे पूर्ण करण्यासाठी तुमचे एकाग्र होऊन गुंतून जाणे आवश्यक असते. आणि अशा कामाचा प्राधान्यक्रम वरचा असू शकतो कारण ती पूर्ण होण्यावर बाकीची अन्य महत्त्वाची कामे अवलंबून असतात किंवा त्याच्या आऊटपुट वर एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो. अशा वेळी multitasking बाजूला सारणे आवश्यक असते. बाजूला सारायचं म्हणजे नक्की काय करायचं. आपल्या डेस्कवर येणाऱ्या फोनकडे सरळसरळ दुर्लक्ष करायचं, अगदी पराकोटीच्या प्रसंगी मग तो तुमच्या बॉसचा फोनही का असेना! हल्ली लोक पिंग करतात त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं, एखादी कमी महत्त्वाच्या मिटिंगला सरळसरळ टांग द्यायची. ह्या सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण देणे शक्य आहे जर तुम्ही खरोखर महत्वाच्या बाबीवर काम करत असाल! गेल्या आठवड्यात ऑफिसात झालेल्या चर्चेनुसार ह्या multitasking च्या नादापायी आपण बऱ्याच कामांना पूर्ण करण्यात आवश्यकतेपेक्षा बराच जास्त वेळ घेत असल्याचे आढळून आल्याचे म्हटलं होतं. 
वरचा परिच्छेद multitasking च्या काहीशा विरोधात गेला. पण बऱ्याच वेळा multitaskingआवश्यक असतं. एखादं काम बराच वेळ सतत करून आपली त्या कामातील परिणामकारकता एखाद्या विशिष्ट मर्यादेच्या खाली उतरल्याचे आपणास वेळीच लक्षात यायला हवं म्हणजे आपण आपल्या to do list मधील प्राधान्यक्रमातील पुढील काम तात्काळ हाती घ्यायला हवं. अजून एक मुद्दा २० : ८० तत्वाचा. बऱ्याच वेळा एखाद्या कामाचा ८० टक्के भाग पूर्ण करायला केवळ २० टक्के वेळ पुरेसा असतो; पण पुढील २० टक्के भाग जो आपणास परिपूर्णतेकडे घेऊन जातो तो मात्र पुढील ८० टक्के वेळ घेतो. अशा वेळी दुनिया आपल्याकडून जर त्यांच्या प्राध्यान्यक्रमातील कामे पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवत असेल तर त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. 
multitasking म्हणजे कोणत्याही क्षणी दोन कामे करणे असा नव्हे! खऱ्या अर्थाने पाहिलं तर संगणक सुद्धा multitasking करत नाही. multitasking चा खरा अर्थ म्हणजे आपल्यासमोर आपल्याला करायच्या असलेल्या सर्व गोष्टींची यादी तयार ठेवणे आणि त्यातील प्रत्येकावर किती वेळ काम केल्यास आपण परिणामकारक राहू ह्याचा अंदाज घेत; काळाच्या तितक्या भागात त्या टास्कवर काम करून मग योग्य वेळी दुसऱ्या टास्कवर झेपावणं!  
आता पहा ना ही पोस्ट लिहून होईस्तोवर मी ना whatsapp पाहिलं ना कार्यालयाची ई - मेल चेक केली!! बाकी कोणी multitasking  पर्यायी मराठी शब्द सुचवा बरं!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...