आजची रात्र सुद्धा नेहमीसारखीच सुरु झाली होती. जिमी आपल्या कॉफीचा कप घेऊन आपल्या टेबलावर येऊन बसला होता. त्याने आपला संगणक सुरु केला. दिव्यांश
मात्र अजुनही आपल्या टेबलावरील गणपतीच्या मुर्तीची पुजा करण्यात दंग होता.
"अरे आज अ[आपलं बरंच काम बाकी आहे. तुझी देवपूजा आटप लवकर!" जिमीच्या ह्या नेहमीच्या शुभप्रभात संदेशाकडे दिव्यांशने तसे दुर्लक्षच केलं. त्याची देवपूजा थोड्या वेळातच आटोपली आणि मग जिमीला तसंच काहीसं खट्याळ उत्तर द्यायला दिव्यांशने त्याच्याकडे आपली नजर वळविली. जिमीचा चेहरा अगदी गंभीर झाला होता.
दिव्यांश लगेच आपली खुर्ची सोडून जिमीच्या डेस्कवर गेला. "हे बघ, ही एक महाकाय उल्का अचानक आपल्या रडारवर उमटली आहे. जर का ही कालपर्यंत आपल्या रडारवर नव्हती आणि आज अगदी ठळकपणे दिसतेय म्हणजे तिने एका दिवसात अगदी मोठा पल्ला गाठला असणार." जिमीचे हे बोलणे ऐकून त्याची टर उडविण्याचा आपला इरादा दिव्यांशने बाजूला सारला. लगबग आपल्या डेस्कवर जाऊन त्याने संगणकात डोके खुपसलं. ह्या उल्केचा वेग आणि तिची दिशा ह्याचे अचूक गणित मांडणे आवश्यक होते. आणि हे गणित मांडण्याच्या अचुकतेमध्ये ह्या जोडगोळीचा हात धरणारं तरी कोणी नव्हतं.
पुढचे सात तास आणि ३७ मिनिटे ही जोडगोळी जागची हलली नाही. दोघातला संवाद सुद्धा फक्त संगणकाद्वारेच चालू होता. नियमानुसार त्यांना ही गोष्ट आपल्या वरिष्ठांना तात्काळ कळविणे आवश्यक होते. परंतु
पूर्ण माहितीशिवाय अहवाल पाठविणे त्यांच्या कार्यपद्धतीत बसत नसल्याने त्यांनी पहिला अहवाल पाठविण्यास जवळजवळ १ तास घेतला होता. त्यांचा रिपोर्ट वरिष्ठांना पोहोचला आणि तात्काळ सर्व वातावरण हादरून गेलं होतं. एव्हाना मध्यरात्र झाली असली तरी पुढील अर्ध्या तासात नासाची वरिष्ठ मंडळी ह्या जोडगोळीच्या मागे उभी होती. जवळपास प्रत्येक सव्वा तासाच्या अंतराने हे दोघे अहवाल पाठवत होते आणि प्रत्येकाच्या मनातील जी भीती होती ती खरी ठरण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्यांनी सहावा तास संपत येताना पाठविलेला अहवाल नासाचे प्रमुख विल्यम्स ह्यांच्या हातात पडला आणि त्यांनी अमेरिकेच्या प्रेसिडेंटना फोन लावण्याचा निर्णय घेतला.
जोडगोळीचा अंतिम रिपोर्ट सकाळी साडेचार वाजता निघाला. तोवर ह्या सर्व अहवालांची पर्यायी स्त्रोतांच्या आधारे तपासणी करण्याचे काम समांतरपणे चालूच होते. ह्या जोडगोळीच्या गणिती कारभारात काही चूक असल्याची जी काही अंधुक आशा होती तीही पाच वाजेस्तोवर संपुष्टात आली. ह्या दोघांची गणिते अचूक होती. त्याही स्थितीत विल्यम्स ह्यांना ह्या दोघांचा अभिमान वाटला. इतक्या सततच्या क्लिष्ट गणिती आकडेमोडीने दोघे अगदी थकून गेले होते. कॅफेटेरिआ मध्ये जाऊन गप्पा मारून काहीसं मोकळं होण्याचा दोघांचा इरादा होता. आणि त्या इराद्यानुसार ते दोघे आपल्या जागेवरून उठले सुद्धा! मागे वळून पाहतात तो दरवाज्याबाहेर दोन धट्टेकट्टे सैनिक उभे होते. "सभ्य गृहस्थांनो, आपण हा कक्ष सोडून जाऊ शकत नाहीत. कोड रेड लागू करण्यात आला आहे. आपला बाकीच्या नागरिकांशी संपर्क पुढील सूचनेपर्यंत बंद करण्यात आला आहे. आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हांला इथेच आणून दिल्या जातील." त्या दोघातील एक अगदी यांत्रिकपणे हे बोलून दाखवत होता. "अरेच्चा, गेले सात तास भर केवळ आपण ह्याच्या कडे गणिती आव्हान म्हणून पाहिलं; त्याच्या व्यावहारिक गांभिर्याकडे आपलं लक्षच कसं वेधलं गेलं नाही!" काहीशा गंभीर स्वरात जिमी म्हणाला.
प्रसाधनगृहात जायचं त्यांना इतका वेळ भान राहिलं नव्हतं पण आता जिमीच्या ह्या उदगारांनी मात्र ते दोघे पुरते भानावर आले. "नशीब म्हणायचं, प्रसाधनगृह आपल्याला स्थानबद्ध केलेल्या भागातच आहे!" दिव्यांशच्या मनात विचार आला. तिथे जाऊन तो परतला तर जिमी बर्गर हादडताना त्याला दिसला. इतक्या गंभीर परिस्थितीत सुद्धा जिमीची खाण्यावरील श्रद्धा पाहून दिव्यांशने त्याला मनोमन नमस्कार केला. आपल्या डेस्कवर गेल्यावर मात्र त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याचा आवडता गरमागरम मसालाडोसा अगदी सांबर, चटणी सकट त्याच्या डेस्कवर होता. ह्यांना आपली आवड कशी माहित झाली ह्याचा त्याला क्षणभर उलगडा झाला नाही. "आपले सर्वांचे मोजके दिवस बाकी राहिलेत म्हणून त्यांनी आपली आवड पूर्ण करायचे ठरविलेले दिसतेय!" जिमीच्या ह्या बोलण्याने त्याला उलगडा झाला. म्हणजे त्यांनी ही आपली सर्व माहिती खास वैयक्तिक डेटाबेसमधून घेतली असणार. "अरे म्हणजे मग सौमित्राची माहिती ह्या लोकांनी काढली असणार!" ह्या विचारांनी त्याला एकदम धक्का बसला. सौमित्राची आपल्याला इतका वेळ आठवणच कशी आली
नाही ह्या विचारांनी त्याला काहीसं अपराधी वाटलं. तो तसाच खिडकीपाशी आला. संपूर्ण इमारतीला एव्हाना खास सुरक्षादलाने वेढलं होतं. सैनिकांची तयारी आणि खाश्या सैनिकांचा गणवेश पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ह्या इमारतीत आले असल्याच्या शक्यतेला वाव होता.
"सभ्य गृहस्थहो!" राष्ट्राध्यक्षांनी आपल्या धीरगंभीर स्वरात बोलण्यास सुरुवात केली. "ही महाकाय उल्का जर आपण संशोधित केलेल्या मार्गाने आणि अंदाजित वेगाने प्रवास करीत राहिली तर बरोबर १६५ व्या तासाला पृथ्वीवर आदळेल. तिच्या आकाराच्या आणि द्रव्याच्या घनतेचा विचार करता आपली भूमाता ह्या धक्क्यातून वाचण्याची शक्यता शून्य आहे." त्यांचे हे भाषण ऐकण्यासाठी त्यांच्यासमोर नेहमीप्रमाणे शेकडो लोकांचा जमाव नसून केवळ नासाचे अध्यक्ष विल्यम्स आणि अमेरिका सेनाप्रमुख गिल्बर्ट हे दोघेच होते.
"गिल्बर्टमहाशय आपल्याजवळील सर्व क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे आणि अणुबॉम्ब ह्या उल्केच्या मार्गात नेऊन त्याच्या आधारे तिचा विनाश करण्याची शक्यता कितपत आहे?" राष्ट्राध्यक्ष जॉन्सन ह्यांच्या प्रश्नाला गिल्बर्ट ह्यांचा क्षणभर प्रतिसाद आला नाही तेव्हा राष्ट्राध्यक्षांच्या चर्येवर काहीशा आठ्या उमटल्या. "ही शक्यता शुन्य पूर्णाक शून्य सात टक्के आहे" पुढील क्षणाला गिल्बर्टह्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीनुसार उत्तर दिलं. "आणि चीन, भारत, युरोपियन देशांची मदत घेतल्यास? " जॉन्सन ह्यांनी पुढचा प्रश्न विचारला.
"हे शोधून काढण्यास मला तासाभराचा अवधी लागेल" गिल्बर्टह्यांनी नम्रपणे उत्तर दिले.
"ठीक आहे! आपली पुढील बैठक सव्वा सहा वाजता!" आपल्या घड्याळाकडे पाहत जॉन्सन म्हणाले. ही बैठक आटपून जॉन्सन आपल्या कक्षात विश्रांतीला गेले. भल्या पहाटे उठविले गेल्याने त्यांना काहीसा आळस आला हे जरी खरे असले तरी एव्हाना त्यांची झोप पूर्ण उडाली होती. गुप्त अभियान चंदन अमलात आणावे लागेल ह्याची लक्षणे त्यांना स्पष्टपणे दिसू लागली होती. ह्या अभियानात सुटका करू जाऊ शकणाऱ्या मोजक्या दीडशे लोकांची निवड बाकी कोणाला कळू न देत कशी करायची हा मोठा यक्षप्रश्न त्यांच्या समोर होता!!
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा