मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

इंद्रायणी - १



 
शाळेतून परतणाऱ्या गोपाळरावांची मूर्ती दिसताच सगुणाबाईंची धावपळ उडाली. ते परतले तरी स्वयंपाक पूर्ण झाला नव्हता. आज छोट्या इंद्रायणीने खूपच धावपळ उडवली होती. आज अगदी मस्तीचाच मूड होता इंद्रायणीचा. आणि मग सगुणाबाईंना सुद्धा राहवलं नव्हतं. त्या ही बसल्या तिच्याशी खेळत. मग आला तो वाडीत काम करणारा शंकर! त्यानं वाडीतले फणस काढून आणले होते. ते मोजून घेता आणि त्याला पैसे देताना अजून वेळ गेला होता. आता रागीट गोपाळराव काय करणार ह्याचीच चिंता सगुणाबाईंना लागून राहिली होती.
गोपाळरावांनी आपली टोपी काढून खुंटीला लावून ठेवली. इतक्यात छोटी इंद्रायणी आपल्या दुडक्या चालीनं धावत धावत गोपाळरावांसमोर आली. "बाबा बाबा आज किनई खूप खूप मज्जा झाली! वादीतून शंकरतातांनी मोते मोते कातेवाले फनस आनले!" तिच्या ह्या बोबड्या बोलांनी गोपाळरावांची छबी खुलली. तिला त्यांनी उचलून आपल्याजवळ घेतले.  "मग तू फणसाचा गरा खाल्ला कि नाही?" गोपाळरावांनी तिला विचारलं. "आईने नाहीच दिल्ला!" आईची तक्रार करीत छोटी इंद्रायणी म्हणाली. चुलीच्या धुरात भाकऱ्या भाजणाऱ्या आपली पत्नीकडे गोपाळरावांनी मोठ्या कौतुकाने पाहिलं. आज ते एकंदरीत प्रसन्न होते. जिल्हा पातळीवर आदर्श शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती.
"बापलेकीचा काय वार्तालाप चालू आहे?" देवघरातून आपली पूजा आटपून येणाऱ्या यमुनाताईंनी प्रेमाने विचारलं. तिला गोपाळराव उत्तर देणार इतक्यात "बाबा बाबा आपण फनचाच झाड बगायला जाऊ या का!" असं इंद्रायणीने विचारलं. आज तिचा हा हट्ट मोडण्याची गोपाळरावांची अजिबात इच्छा नव्हती. "चला जाऊयात!" पायात पुन्हा वहाणा चढवीत गोपाळराव म्हणाले. त्यांच्या वाक्य ऐकताच सगुणाबाईंनी सुटकेचा निश्वास टाकला. आता भाकऱ्या सुद्धा होणार होत्या आणि गोपाळरावांची आवडती वाल वांग्याची भाजी सुद्धा!
वाडीत  फेरफटका मारताना गोपाळराव नेहमीच प्रसन्न होत. आज इंद्रायणी सोबत असल्याने त्यांना तिची दुडकी चाल पाहण्यात अजून मजा वाटत होती. घनदाट सावलीने त्यांची वाडी व्यापली होती. वाडी नारळ, सुपाऱ्या, फणस आणि आंबे अशा झाडांनी भरगच्च भरली होती. काही वड, पिंपळाची मोठाले वृक्षही होते. गोपाळरावांच्या वाडीला लागुनच त्यांच्या चुलत्याची जमीन होती. फणसाचे झाड दिसताच इंद्रायणीच्या छोट्या पावलांची गती आपसूकच वाढली. "अग अग धावू नकोस! पडशील!" पित्याच्या मायेने गोपाळराव बोलायला आणि इंद्रायणीचा पाय अडखळून ती पडायला नेमकी गाठ पडली. तिचे कपडे मातीने माखले. इंद्रायणी तशी धीट! ती झटकन उठली. तोवर गोपाळराव तिच्याजवळ पोहोचले होते. त्यांनी तिला उचलून घेतलं आणि छातीशी कवटाळून धरलं. आता मात्र इंद्रायणीच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरु झाल्या. "अग वेडूबाई असं जरासं पडलं म्हणून काय रडायचं असतं थोडंच!" गोपाळरावांनी तिला प्रेमानं दटावलं.
पित्याच्या उबदार पकडीतून मग इंद्रायणीने नजर वर उचलली. तिचं फणसाचं झाड समोरच होतं. "बाबा बाबा इथे किन्नई एकही फणस नाहीये!" आपलं पडण्याचं दुःख विसरून ती म्हणाली. "आता कसे असणार? शंकरकाकांनी सगळे काढून नाही का नेले!" गोपाळराव म्हणाले. "मग त्या सगल्या फनसांना किती वाईत वातलं असेल नाही!" तिच्या ह्या स्वरांनी गोपाळरावांना अगदी आश्चर्य वाटलं. "हो त्या सगळ्या फणसांना जसं वाईट वाटलं तसं झाडाला सुद्धा वाईट वाटलं असणार! ते पण कसं आता एकट पडलं नाही का!" गोपाळराव म्हणाले. ह्या इतक्या छोट्या मुलीच्या तोंडी अशी मोठ्यांना शोभतील अशी वाक्य कशी येतात ह्याचंच त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं.
एव्हाना इंद्रायणीच मन भरलं होतं. बापलेकीची जोडी घरी परतेस्तोवर सगुणाबाईंनी पानं मांडून ठेवली होती.  पायावर पाणी टाकून मोठ्या प्रसन्न मनाने गोपाळराव पानावर बसले. पहिला घास त्यांनी तोंडात टाकला आणि त्यांनी अगदी खुश होऊन सगुणाबाईंकडे पाहिलं. चुलीचा धूरही आताशा घरातून नाहीसा झाला होता. त्यांच्या एका नजरेने सगुणाचा आजचा दिवस सार्थकी लागला होता.

(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...